ह्या  पावसात

ह्या पावसात

ह्या पावसात आता, भिजल्या चिप्प वाटा
रस्त्यावर उठती सरीतून, पावसाच्या शुभ्र लाटा
वाटेवरी गढूळ पाणी, रूते पायी बाभळी काटा

ह्या पावसात आता मखमल मिरवतो रस्ता 
हरवून गेल्या बाई  परिचित डोंगर वाटा
दुभत्या गुरांनी भरला बाई आमचा गोठा

ह्या पावसात आता भरुनी वाहे ओढा
शेतात नांगर चाले ओढतो आमचा पाडा
शेतात पीकवतो सोने, धनी माझा राजस तगडा

भात रोपणीसाठी,शेतात घोंंगड्या निघती
अन् बांधावरल्या वाटा,गवतात हरवूनी जाती
कोपरे पाहती नवलाई ,घोंगडीतून गाणी येती

ह्या पावसात आता, मुले पेळेवर रेंगाळती
पागोळ्याचे थंड पाणी, उगाच भिजून पाहती 
काहिलीत भाजले चणे, खडाडा दातांनी रगडती

ह्या पावसात आता राबूनी अंगात हुडहूडी भरते
धनी चिप्प भिजूनी येता, मज त्याचीच चिंता खाते
कापूनी कोंबडा घरचा, धन्याची  सर्दी पळवते

ह्या पावसात आता सुकविण्यास सोय ना उरते
दिन राब राबूनी सरतो, मन वेडे रात्रीस होते
कुस बदलता मध्यरात्री, मी धन्याची चाहुल  घेते

ह्या पावसात आता न सोय कशाचीही उरते
जमीन ओलाऊनी थंड झोपमोड रात्री होते 
झुंजूमुंजू झाले तरी मी गोड स्वप्नात  हरवते 

सण नागपंचमी येते सय माहेराची होते
शेतीची नडणी सरता, माझी सासूच माय होते
धन्यास ताकीद देऊनी मज माहेरी सोडून येते

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

569 thoughts on “ह्या पावसात

  1. Korey Bentz