असहाय्य द्रोपदी

असहाय्य द्रोपदी

तिच्याकडे जाताजाता वळलं आणि खुशाली घेऊन निघू म्हटलं तरी तासभर कसा गेला कधी कळत नसे,आता तीची पावलं भडगाळवाच्या दिशेने पडावी असे तिचे वय. संपूर्ण शरीरावर सुरकुत्या, मान लटलटू लागलेली, हाताला कंप, तरी अजूनही ती डोंंगरात जाऊन सुरंगीची फुलं आणून वळेसार करून विकते. विकते म्हणजे तिला वळेसार विकण्यासाठी कुठे जावं लागत नाही. वळेसार हाती धरून गावातील मंदिराकडे हळूहळू चालत गेली तरी त्यांचा गंध लपत नाही. कोणीतरी सहजच विचारतो, “गे आवशी वळेसार देवचो हा काय?” ती भयंकर विनोदी, “रे मेल्या देवचोच हा पण विकूक हाडलय, व्हयो काय?””विकूक हाडलं, माका वाटला काय पावणाईक घालतलस?” “पावणाईक घाल नायतर घराकडे ने, घरी वळेसार नेलस म्हंजे रातीक चांदणा फुलात, जास्त नको देव फक्त पाच रूपये. किती देव?”

तो दहाची नोट तिच्या हातावर घालतो आणि म्हणतो,”एकच दी, पैसे ठेव तुया, परत येशीत तेवा वळेसार आण मगे पावणाईक घालतय, हो घरवालीक, रात्री चांदणा फुलता का बगतय.” ती फिदीफिदी हसते, “व्हयतो वळेसार हातान माळलस तर चांंदणा काय चांदव फुलून येऊकच व्हयो, मेल्या अनुभवाचे बोल आसत, खोटा नाय सांगणय सवड काडुन घराकडे ये म्हंजे कथा सांगतय.”

तो हसता हसता म्हणतो, “मगे येऊकच व्हया, एक दिवस, क्वार्टर घेऊनच येतय. माका तुझी खोड ठाऊक हा, तुझो घसो सुटल्याशीवाय गजाल बाहेर कशी पडात?” ती डोळे मिचकावते, “रांडेच्या पाणी भरून आणू नकोस, पेट्रोल टाकल्यावर गाडी वर चडाक व्हयी, घासलेट टाकल्यावरी अडकून काय झेंगट बघीत रवशीत.” तो, हसतो, “बरे, आवशी तू निवांत ये माका म्हाडगुताकडे झाडा बेणूक जावचा हा तुझी गजाल ऐकीत रवलय तर त्याची माघारीण खेटरान पुजा करीत.” “मेल्या पुजा खेटरान केल्यान तरी प्रसादव दाखवतली, तुझ्या सारखो तरणोबांड सेवेकरी अजून खय गावतलो, जा बाबा, जा लय वाट बगुक लावा नको.” ती पुन्हा रहस्यमय हसली. “तुका अख्ख्या गावची बातमी तु कोणाक ऐकशीत, पण तु म्हणतस तेतुरला काय नाय, आपला काम सरळ, कोणाकडे वाकड्या नदरेन बगणा ही अक्करमाशी सवय माका नाय, आमी सरळसोट, आपलो बोलून चालून टाईमपास करतव इतक्याच.” त्याने पाय उचलले.

ती एक एक पाय उचलत चालत राहिली,आताशा पावले नीट पडत नव्हती, पण गावात एक फेरी मारून आल्याशिवाय चैन पडत नव्हतं. भाऊ आळव्याच्या दुकानावर, रूपयाची तंबाखू, पाने, दोन रूपयाचे फरसाण कधीतरी हमाम वडी, मसुरकरांचा चहा आणि कांदाभजी आणि देवाशी हितगुज इतक काम उरकल की ती परतायला मोकळी. तिथे आळव्यांच्या दुकानावरही तिची थट्टा मस्करी चाले, “रे भाऊ, आपला तुझा ता ह्या दी माका.” “गे ह्या माझा ह्या काय? काय नाव बीव सांगशीत का नाय!”
“रोज तुझ्याकडसून घेतय बग, ता दी, जीव नुसतो हैराण झालो हां” भाऊ थंडाची बाटली पूढे करत म्हणतात, “धर जीव थंड कर नायतर कलकलणी लागात.” ती थंडाची बाटली तोंडाला लावते, घटघट पिते आणि म्हणते, “रे भाऊ आज इतको उदार सो झालस?” “गे तुच मागलस ना, सांगलस जीव हैराण झालोहा म्हणान.” “रे ! मी रोज घेतय तशी तंबाखू, चूनो आणि पाना मागलय,माका वाटला घराकडे आज कायतरी विशेष असात म्हणान तू थंड पाजलस.” भाऊनी कपळावर हात मारलो आणि म्हातारेक,पान, तंबाखू दिलो. आता तिच्याकडे थंडाचे पैसे मागायचे तरी पंचायत, तिने नेहमीप्रमाणे दोन रूपये भाऊकडे दिले, भाऊ तिच्याकडे पहात कसनूस हसले.
म्हातारीने भाऊला शब्दात गंडवलं होतं.

नेहमीप्रमाणे तिने मसूरकरांच्या हॉटेलमध्ये चहा भजी घेतली आणि ती पावल ओढत परतीच्या वाटेला लागली. घरी आली की ती बाहेरच्या न्हाणीवर कडद कडद चार तांबे अंगावर घालून तोंडाने काहीतरी पुटपुटायची. सुनेने दिलेले चार घास गिळले की चंची सोडून पान लावले की लोट्यावर पथरी पसरायला मोकळी. झोप येई पर्यंत पडून रहायची, जाणाऱ्या येणाऱ्याची जाग घ्यायची. कुणी हाक मारली तर किलकिले डोळे करून विचारायची खय चलल दोपारचो ? आज तिला परशा पाटकर दूरून येताना दिसला. तो जव येताच ती ओरडली, “रे परश्या मेल्या तो डोक्यावर आग ओकता, खय चललं? गोरवा डोंगराक पळाली काय?”





“नाय गे, पोट ढवळता म्हणान औषध हाडूक गावकराकडे चललय, दोपार शिवाय तो घराकडे गावणा नाय.” “मेल्या आठ , आठ दिसान डुक्कर मारून खातास,पचाक नको, दोन दिस कडकडीत उपवास कर, पेजेच्या घोटाशिवाय काय घेव नको, बघ बरा होता की नाय.” “तसाच करतलय पण एकदा गावकर काय म्हणता ता तर बगतय!” ती हात हलवत म्हणाली,”जा, जा, बेगीन जा, लय उशीर करू नको, दोन पाराक उठवळ फिरता,नसता झंगाट लागाक नको.” “येतय गे!” तो वाटेला लागला.तिची खुशाली न घेता सहसा कोणी जात नव्हतं.

ती सरळ बोलेल तर शप्पथ, काही बाही सांगून मनोरंजन करण्यात एकदम माहीर. बोलतांना टायमींग साधणं तिला उत्तम जमे.तिच्याकडे अनुभवाची पोतडी भरलेली होती. हजार जणांची लफडी तीला माहीत होती. गावच्या सरपंच, पोलीस पाटलापासून ते आरोग्य अधिकारी आणि शाळेचे शिक्षक सुध्दा. शाळेत जाणारी वाट तिच्या घरावरून जायची. थोडी मोठी पोरं काही तरी वात्रट ऐकायला मिळेल म्हणून मुद्दाम तिच्या घरी प्यायला पाणी मागण्याच निमित्त काढून लोट्यावर थांबायची. मग तिच्या आठवणीतले किस्से ती मिठ मसाला लावून सांगायची.

एकदा द्रोपदी वस्त्रहरण प्रसंग सांगताना म्हणाली, “वस्त्रहरणच्या एका प्रयोगाक पाच साड्ये नेसण्याऐवजी बाबलो सारंग दोनच साडये नेसलो. दुशासन झालेलो मिठबावकर त्या दिवशी टाकून इलेलो होतो. आयत्या वेळेक बायलेन साडे धुवून टाकल्यामुळे बाबलो दोनच साडये नेसलोहां ह्या काय त्याका माहिती नव्हता. वस्त्रहरण करूचा म्हणान पिनटक मिठबावकरान, “द्रोपदी भर सभेत तु माझा मानभंग केला होतास ना? तुझे अजेय असे पाच पांडव द्युतात हरले आहेत आता तू माझी दासी आहेस हां, हां हां, आता तुला कोणता पांडव वाचवतो तेच मी पाहतो.” अस म्हणत बाबल्याच्या साडयेक मसुरकरान हात घातल्यान, बाबल्या आरडलो, “सख्या कृष्णा वाचव, बंधू कृष्णा, मनमोहना या अबलेची अब्रू वाचव,मिठबावकर पदर धरून साडी फेडीत चललो तरी कृष्णाचो पत्तो नव्हतो,मेलो पवलो, विडी हाताक चटको लागासर फुकत रवलो होतो की काय कळय ना. दोन्ही साडये फेडले तरी कृष्णाचो पत्तो नव्हतो., दुशासनाची पंचायत झाली, कृष्णान काय एक न सांगता त्यांनी साडीक घातलेलो हात काडलो तर तो दुशासन कसलो? कृष्ण एन्ट्री घेईसर, बाबल्याचो परकर दिसाक लागलो,’दुशासना ‘, धूर सोडत एंट्री घेतलेल्या, पवल्याचो शब्द ऐकल्यावर मिठबावकर आरडत विंगेत पळालो, त्याच्या मागे कृष्ण आरडत गेलो,”मेल्या दुशासना, सोड तिला, तिच्या पदराला हात घालण्याचे साहस तुला कसे झाले?” हय बाबलो धायकुतीक इलो,तो मसुरकराक खालच्या आवाजात कधीपासून सांगित होतो, आता काय ओडशीत? तुका सांगलेलय मा हळू हळू ओड म्हणान दोनच साडये हत म्हणान.” शेवटी बाबलोव विंगेत पळालो. मसुरकरान खेळाची पार घाण केल्यानं.

बाबल्याचे दोन्ही साडये ओढल्यामुळे छातीवर बांधलेले करवंटे सुटुन पडले, लोका हसून हसून मेली. बाबल्यान खाली काय घातला नसता तर बाबल्याचा ता तसला दर्शन घेऊन मिठबावकर स्टेजवरच मेलो असतो.” बाय माझे हसून हसून लोका गडबड लोळूक लागली.कोणीतरी शाणपण करुन पडदो ओडलो. असला वस्त्रहरण कधीच मी बघूक नायं.”

मावशीच्या बोलण्यात मुल गुंतुन गेली होती.त्यांची हसून हसून वाट लागली. अंधार पडत चालला तरी कोणी चाळवला नव्हता. आज मावशीने मुलांची चांगलीच करमणूक केली. एका मुलाने तिच्या हाती एक रूपया ठेवला, म्हातारे, हो तुका पान सुपारीक ठेव. तु कधी काम केललस काय नाटकात?” “करूचा होता, पण आमका दशवतारीत घेतला कोण? आणि घेतल्यानी असता तर प्रत्येक जण म्हणालो असतो मीच दुशासन होतलय. तुमच्या वयाची असतांना एकव नाटक बगल्याशीवाय सोडूक नाय. खयंव नाटक असांदे, आमी चार, सा जणी नाटकाक हजर. आता कोणेक मागे उराक नाय मीच उरलय पण माझ्या जीवनाचाच नाटक झाला. माझ्यावर द्रोपदी होवची पाळी इली.” मावशे तुझ्यावर द्रोपदी होवची पाळी इली, म्हणजे नक्की झाला तरी काय? तुझी साडी कोणी फेडली की काय?”

“मायंझया माझी साडी फेडली काय म्हणान विचारतस? आपल्या आवशीक विचार जा, माझी साडी फेडूक सात जन्म घेवचे लागतीत. पुन्यांदा विचारलस तर नागवो करून बांधीन.” तो धुम घेत पळाला तशी म्हातारी खो खो हसली.” रे थोडी गंमत केलय, भिया नको, तुमी आपले दिसाउजेडी घराकडे जावा, नायतर बापूस तुमची खबरबात घेऊक हय येईत आणि आपणच बसुन रवात.जावा बेगीन, पायाखाली बघा किरडू चिरडशात.” “मावशे आमका तुझी द्रोपदी कथा ऐकूची हां” “मेल्यानू आता घराकडे जावा मगे सवडीन गजालीक येवा. माझा काय झाला ता ऐकून तुमचा पॉट भरात काय?” मुलानी दिलेले पैसे तिने लटपटत्या हाताने कनवटीला लावला. “देव तुझा भला करो, ओळख देख ठेवीत जा.” मुलं हसत हसतच निघाली.





ज्या मुलांची शाळा दहावी, अकरावीत सुटली आणि पूढे शिकण्याची सोय नाही म्हणून मुंबईला पोटा पाण्यासाठी गेली ती सणावाराला गावी आली की वाट वाकडी करून तिची भेट घेत. कोणी सुगंधी तंबाखू तर कोणी फरसाण पुडी, कोणी चक्क साडी तर कोणी ब्रॅंडी किंवा रमची बाटली तिला आणून देत. कानावर बोट कडाकडा मोडून ती म्हणे, “बा सोन्या तुझा कल्याण होवो, चांगली पोरगी तुका मिळो, सोन्याचो संसार होवो.”

पैसे असले किंवा नसले तरी तिची पावशेर दारूची सोय व्हायची, झील दारूला शिवत नव्हता पण आयेसाठी न चुकता संध्याकाळी पावशेर घेऊन यायचा. दोन मोठी मुले मुंबईत होती तर एक वेंगुर्ला येथे घरजावई. घराकडे दोघे होते. दोघांचे संसार वेगळे होते. दोन वेळेला दोन सुना, चहा, पेजपाणी घालत होत्या. तिची काहीच तक्रार नव्हती. तरूण असताना दशावतारी अनेक नाटक पाहिली होती. धृतराष्ट्र जन्मतः आंधळा म्हणून डोळे असून डोळ्यावर पट्टी बांधलेली गांधारी हुबेहुब वठवत असे. द्रौपदी वस्त्रहरण होतांना द्रौपदीने सभागृहात पांडव,कौरवांची केलेली निर्भत्सना तिला मुखद्गत होती. एकदा तारेत असताना ती मोठ्याने बडबडत होती, द्रोपदीची विटंबना झाली म्हणान महाभारत झाला.तिची विटंबना परक्यांनी केली. माझ्या विटंबनेक मीच जबाबदार, एक गेलो म्हणान दुसरो केलो वाटला सूख देईत, कुठला काय तो गेलो म्हणान तिसरो आपणच पाट लाऊक येईत. मी तशीच होतय, रूक्मीणीकव असला रूप नसात, पाच घो केलय पण एकानव शेवटपर्यंत सोबत करूक नाय, एकवं पाठी रवलो नायं. मीच कमनशिबी त्याका काय करतलय?

पाच पोरा पदरात टाकून निघूनव गेले. त्या पोरांका कशीबशी वाढवली, तेतुरली चार उडान गेली. आये जीती हां, का मेलीहा, बगुकव कोणी येणा नाय. द्रोपदीक राजपाट गावलो,माका काय xx गावली? लोका कायेव बोलतत, आपण उत्तर करता नये, करता नये, आवझवरी भुकतीत आणि निवांत रवतीत.” तिची बडबड ऐकून सुन कंटाळली होती. दोन तिन वेळा तीने येऊन सांगितले, “गे चूप कर, आपण शाण खाऊन लोकाक शोभा नको. आमका जगूग देशीत का नाय?” “तू माका तोंड गप्प करूक सांगा नको, मी तुझी गजाल करूक नाय, माझ्या घरात मी व्हया ता करीन.माझ्या तोंडाक लागा नको, पोर टोर काय जाणा नाय आणि माका शिकयतली!” तिच्या तोंडाला लागू नये म्हणून तीने घरात जाऊन दार लोटून घेतले. थोड उशीराने मुलगा आला, येताच त्याने आवशीची खुशाली घेतली, “गे, डोक्या फिरल्यावरी बडबड कित्याक चललीहा, वाटभर ऐकू येता.
लोका हसतली, पाच घो केले, पाच घो केले, काय कौतुक सांगतस? फिरुन तोंड उघाडलस तर गायरेत नेऊन ठेवीन. ही बाटली घे आणि निवात पड.”

तीने घटागट पावशेर प्यायली आणि वेगवेगळ्या नाटकातील प्रवेश जसेच्या तसे ती बोलत बसली. कधी सत्यभामा तर कधी मंदोदरी तिच्या तोंडातून बोलत होती. हळूहळू तिचा आवाज अडखळू लागला आणि तिचं शरीर बसल्या जागेवर झुलू लागलं.आता ती तोंडातल्या तोंडात पुटपुटू लागली. मुलाने तिला सावकाश जमीनीवर झोपवल आणि अंगावर चादर टाकली. नाट्यावर पडदा पडला होता. तिच्या अंतरात्म्यातील द्रोपदी लोट्यावर कुणा कृष्णाची वाट पहात विझून निजून गेली.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “असहाय्य द्रोपदी

  1. Rajendra Baliram Bhosle
    Rajendra Baliram Bhosle says:

    छान….. छान….. छान….. 👌🙏🏻

  2. Rajendra Baliram Bhosle
    Rajendra Baliram Bhosle says:

    छान….. कथा….. अगदी विनोदी….. भाषेतील गोडवा आवडला 👌🙏🏻

  3. Mangesh Kocharekar
    Mangesh Kocharekar says:

    भोसले अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.

Comments are closed.