बीज अंकुरले

बीज अंकुरले

पुन्हा आला आला पावसाळा ,मन आनंदुनी गेले
होती मोकार जमीन, तेथे बीज अंकुरूनी आले

 झाडी हिरवाई ल्याली, रावा फांदी फांदी वर
 माझ्या अंगणी प्राजक्त, त्यांचा सडा भुईवर

मंद,गंध मोगरीचा, रानी सुटला चौफेर
माती “पोटी” ओलावली, फुटे डोंगरा निर्झर

कौल पाझरे पावसात, सुटे फरशीला घाम
माझ्या घर पडवीची, लाल हासते जमीन

माझ्या मनाच्या कप्प्यात, गोड लपले गुपीत
पोटी फुटतोय अंकूर, या झिम्माड पावसात

आली हलकिशी सर, झाली नजरा नजर
मी पाहूनी लाजले, उडे दूर, दूर तो पदर

मी सावरले मना,परी ते धावे वा-या वेगे
घेती कवेत भरूनी, माझे धनी मागे उभे

 कळे नजरेची भाषा,घट्ट प्रेमाची ती गाठ
 सर आली तशी गेली,माझे शिवले ग ओठ

झाली वसंतात  गाठ,मिळे जन्माची सोबत
माझा सखा शेतकरी, त्याचे कष्टाचे  संगीत

 दिले मातृत्वाचे दान,या पहिल्या पावसात
 फूले अंग अंग माझे,केळ भरली सोप्यात

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “बीज अंकुरले

  1. विभावरी सतीश दामले
    विभावरी सतीश दामले says:

    अप्रतिम शब्द चित्र
    निसर्ग काव्य नि प्रेम कविता दोन्ही अरुपांचे ही कविता म्हणजे द्वैत आहे.
    सृजन आहे तिथे लावण्य नि समाधान असणारच जे या कवितेच्या ओळींत तृप्त पणे भरून उरलंय.

  2. Harshada Mishra
    Harshada Mishra says:

    खूपच छान कविता सर!

  3. राजेंद्र भोसले
    राजेंद्र भोसले says:

    छानच कविता सर

Comments are closed.