अंकुर
माझे हिरवे कोकण, परी बडवते उर
पाणी बरसते फार, तरी रितीच घागर
रोज श्रमूनिया रानी, केली माती मी मोकार
बांध घालूनिया शेता, त्याला दिला मी आकार
तिला पालापाचोळ्याचे, दाट शिवले अस्तर
लाल भिंतींच्या घरात, सुखी मांडला संसार
परी त्याला लागे दृष्ट, लांबला पाऊस फार
दाणा गोटा सरुनी गेला, दाटे नशिबी अंधार
रखरखीत आभाळ, मेघ दिसेना दूर दूर
रया गेली सृष्टीची साऱ्या, ना दिसे कुणाचा वावर
म्हटले ज्याला मायबाप, त्याचा कळेना व्यापार
शिरलो कुशीत मी जिच्या, तिने मारली ठोकर
देवा करूनी आर्जव, केला पाण्यासाठी धावा
माझ्या भक्तीची परीक्षा, दयाघना नको हा रुसवा
किती करावे नवस, किती घेऊ तुझी नावे?
न करी रे अन्याय, वरूण राजा आता तू यावे
दु:ख असह्य हे नेत्री, आसवांचा आता महापूर
परी प्रित तुझ्यावरी, भक्तीचा न आटला सागर
तुला करुनि आर्जव, झाले झाले मन गपगार
परी मनाची झाली दैना, तू कसा रे ओंकार?
अश्रू ओघळले गाली, आले भरूनी आभाळ
माझ्या उद्याच्या स्वप्नांना, त्याच्या सरींचा आधार
माझ्या उमेदीस पुन्हा, फुटे हिरवा अंकूर
या पावसाच्या धारा, हेच हक्काच माहेर