अक्षय तृतीया
मिंत्रानो आज अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी एक. सत्ययुग आणि त्राता युगाची सुरवात या दिवशी झाली असे मानण्याचा संकेत आहे.कृष्णाने युधिष्ठिराला सांगितले हा असा दिवस आहे की जे काही या दिवशी करशील त्याचा क्षय होणार नाही. पराक्रम, पुण्याचे कर्म, दान किंवा मौल्यवान वस्तूची खरेदी, आम्ही मर्त्य मानव आम्ही सोईस्कर अर्थ घेऊन सोने ,कपडे अश्या वस्तूची खरेदी करू लागलो. पण खरे तर अक्षय काय आहे तर ज्ञान, मैत्री, सेवा. कारण धन आपण गेल्यावर वाटून घेतील त्यामुळे नात्यात दुरावा येईल, पण तुमच्या ज्ञानाचा, तूमच्या मैत्रीचा आणि तुमच्या सेवभाची वृत्तीचा आणि सद्गुणांचा बोला बाला होईल, तुमच्या मागेही लोक त्याचा उल्लेख करतील. टाटा, बिर्ला यांनी उभारलेली हॉस्पिटल त्यांच्या मागे चिरकाल आहेत, राहतील. चाणक्य आजही जिवंत आहे. तेव्हा, “मरावे परी कीर्ती रुपी उरावे.” हा अक्षय या शब्दाचा अर्थ.
आजही जुनेजाणते कोकणातील शेतकरी अक्षय तुतीयेला नांगरट करून भात पेरतात, आशय हाच असतो की आज पेरलेले बी शेतकरी राजाला समृद्धी देते. कोकणात आज किमान एक कोपरा नांगरून सुके भात पेरण्याची परंपरा आहे. पहिला पाऊस झाला की हे भात उगवते आणि याचे रोप बनते त्याला तरवा म्हणतात. ज्या शेतकऱ्यांना शेत भिजवून भात पेरण्याची सुविधा आहे, मग ते पाटाचे पाणी असो की विहिरीचे ते शेत नांगरून भिजवून भात पेरतात. तेव्हा या अक्षय तृतीयेचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळ्या समृद्धीचा आहे. सोनार आणि कपडा व्यापारी आज मुहूर्ताची खरेदी होईल या आनंदात असतात. तेव्हा प्रत्येकाचा अक्षय तृतीयेचा आनंद वेगळाच असणार यात शंकाच नाही.
आपण आपली मैत्री,आपला स्नेह, आपल्या मानतील वात्सल्य, दुसऱ्या व्यक्तीला मदत करण्याची वृत्ती वृद्धिंगत करू. स्वतः आनंदी राहू, इतरांना आनंदी ठेऊ ,आनंदी पाहू. अक्षय तृतीयेचा खरा अर्थ समजून आपली मैत्री अभंग ,अक्षय राखू.
सर्वांना अक्षय तृतीयेच्या अक्षय प्रेमळ नात्यासाठी, आनंदासाठी शुभेच्छा!