अण्णा एक तालेवार गडी

अण्णा एक तालेवार गडी

आपण पाहिलेल्या आणि मनात दबा धरून बसलेल्या काही व्यक्ती धरणीवर ज्वालामुखी उद्रेक व्हावा आणि लाव्हारस उसळून बाहेर पडावा तशा मनातून आठवणींच्या स्वरूपात बाहेर पडतात. त्या तेव्हा का अचानक आठवतात याला खरं तर काही कारण नसतं. पण तेवढा वेळ त्या मनाचा ताबा घेतात. मागील संपूर्ण घटनाक्रम डोळ्यासमोर तरळू लागतो,जणू त्यांना तो इतिहास पुन्हा सांगण्याची खुमखुमी येते. गावी जातांना अचानक चिकूने वेढलेल्या त्यांच्या बंगलीकडे लक्ष गेलं आणि सगळच झरझर आठवत गेलं. पुर्वीसारखा राबता आता तिथे नसतो. पण मन पन्नास वर्ष मागे गेलं. सगळा भुतकाळ आठवू लागला.

गावात हाताच्या बोटावर मोजता येतील अशी तालेवार माणस होती. अण्णा त्यांच्याचपैकी एक, त्यांच नाव काय होत? विचारण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही, आमची त्या वयात नाव माहिती करून घेण्याची पात्रता नव्हती. आम्ही त्यांना मधूअण्णा म्हणून ओळखत होतो.

त्यांचा सर्वत्र वावर असे. त्यांच माडीच घर होत आणि १९७० साली पुढच्या हॉलला स्लॅब असणारे ते गावातील एकमेव घर होते. वर्णाने सावळे, साधारण सव्वापाच ते साडेपाच फूट उंचीचे, मोठा देह असलेले अण्णा हे भारदस्त वाटत. जर त्यांनी झुपकेदार मिशी राखली असती तर ते मल्ल वाटले असते. सांप्रत त्यांचा फोटो उपलब्ध असता तर चिनी प्रवासी हू यांग सारखे दिसले असते. अण्णा तालुक्याला जायचे तेव्हा त्यांचा रूबाब पाहण्यासारखा असे. स्वच्छ सफेद कसलेले धोतर, नेहरू शर्ट, बोटात अंगठ्या, गळ्यात सोन्याची जाडजूड साखळी. डोक्यावर काळी टोपी, हातात वेताची तेल खाऊन तुळतुळीत झालेली काठी आणि हाती पिशवी. अण्णांनी रस्त्यावर पाऊल ठेवलं की नमस्कार झडत. ते कधी हसून तर कधी हात हलवून प्रतिसाद देत.

अण्णांच्या घराभोवती तार कुंपण होत त्यात चिकूची कलमे दाटीवाटीने उभी होती त्यामुळे घरापाठी, माडीचे दुसरे घर सहजा दिसत नसे. तेथे अभ्यगत त्यांना भेटत. त्यांच्याकडे भरपूर जमीनजुमला होता आणि स्वतः ची लाकूड कापण्याची गिरणी होती. जमीन खरेदी विक्री चे व्यवहार ते करत. मामलेदार, मंत्री अशा मोठ्या पाहुण्यांची उठबस तेथे चाले.

तुम्ही म्हणाल हे तर सर्व सामान्य व्यक्तीचे वर्णन आहे,यात विशेष काय आहे? मधूअण्णा हे प्रकरण विशेष होतं, म्हणून ते गेले पन्नास वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ लक्षात राहीले. संपूर्ण पालघर तालुक्यात जी दांडेकर किंवा नाईक, पंत यांच्या सारखी काही श्रीमंत आणि पत असणारी कुटुंबे होती त्यापैकी ते एक होते. त्यांच्या शब्दाला तालुक्यात किंमत होती. जर कोठे मारामारी किंवा काही अन्य प्रकरणात पोलिसांनी कुणाला अटक केली तर त्याचे नातेवाईक मधूअण्णा यांना, त्यांनी जामीन द्यावा म्हणून गळ घालीत आणि अण्णानां योग्य वाटले तर ते पालघर कचेरीत जाऊन त्या माणसासाठी जामीन अर्ज भरत. अटक केलाला माणूस सुटून आला अण्णांच्या पायावर नतमस्तक होई. सार्वजनिक किंवा ग्रामपंचायत राष्ट्रीय सणाला मधूअण्णा उशिराने आले तरी स्टेजवर त्यांच्यासाठी कोणीही तातडीने खुर्ची खाली करून देत असत.

इतक्या पतदार माणसाला एका मुलीने मात्र भरल्या बाजारपेठेत सर्वा समक्ष मान खाली घालायला लावली, अण्णा तिचे नोकर असल्याप्रमाणे तिच्या पायातली चपलं काढून तिची पसंती होईपर्यंत बदलत होते. एका असामान्य व्यक्तीला सर्वासमक्ष इतक वाकतांना आम्ही तरी पाहिले नव्हते. त्याच झालं असं, अण्णाच एक खाजगी प्रकरण होत. प्रेम प्रकरण खाजगीच असते, ते या कानाचे त्या कानाला होत होतं, सार्वजनिक होते. या श्रीमंत लोकांना घरात सुस्वरूप पत्नी असतांना अशी प्रकरणे का लागत? ते त्यांनाच माहिती. तर या प्रकरणात त्यांना एक कन्या झाली.हे प्रकरण गावापासून दूर राहात होतं त्यामुळे अण्णांच्या वयाच्या लोकांना ते माहिती असले तरी त्याची जाहीर वाच्यता करण्याची कुणाची शामत नव्हती. गावात बऱ्याच श्रीमंत धेंडांची अशी अंगवस्त्र होती. अंगवस्त्र बाळगणे हा त्यांचा अभिमान होता, की कसे ईश्वर जाणे? तर या अंगवस्त्रापासून झालेली कन्या, गावापासून दूर असलेल्या डोंगर वस्तीत राहात होती तिथेच ती शिकली त्यामुळे इतरांना तिची माहिती नव्हती. तिथे अण्णांचा मोठा जमिनी जुमला होता. फणस हापूस कलम, लिंब, सफेद जांभ, पपनस अशी कोकणात होणारी झाडे मुद्दाम लावून वाढवली होती. याच बागेत अण्णांनी आपल्या प्रकरणासाठी घर बांधून दिलं होत. अण्णांच्या प्रकरणाबाबत कदाचित मोठ्या लोकांना माहिती असावी पण हा विषय तसाही जाहीर वाच्यतेचा नव्हता. असं म्हणतात की ती उपवर झाली तेव्हा तिच्या आईने अण्णांना सज्जड दमात घेतले. माझ्या पोरीचे लग्न थाटामाटात आणि सुशिक्षित मुलाशी झाले पाहिजे.

आता अण्णांची पंचायत झाली, ती आपली कन्या आहे हे घोषित केल्याशिवाय चांगला मुलगा कोठून मिळणार? मग अण्णांनी आपल्या विश्वासू मित्रांना एक चांगल्या मुलाचा जावई म्हणून शोध घ्या अशी विनंती केली. मधूअण्णांचा जावई होण्याची संधी म्हणजे हाती घबाड लागण्याची संधी.
त्यांच्या मित्रांनी एका तरूणाचा शोध घेतला, त्याचा कांदे बटाटे विक्रीचा व्यवसाय होता. तो अण्णांच्या मित्राला म्हणाला,”काका, तुम्ही म्हणताय तर, मी अण्णांच्या मुलीशी लग्न करण्याचा विचार करतो,आधी मला मुलगी पाहू दे, मी कोणतीही मुलगी गळ्यात बांधून कशी घेऊ?” अण्णांच्या मित्रांनी त्या मुलीच्या आईला, विश्वासू नोकाराबरोबर मुलीला सोमवारच्या बाजारात घेऊन येण्याचा निरोप पाठवला.मुलगी तिच्या मनाने नटून थटून बाजाराला आली. पाचवारी शेवाळी रंगाची साडी, डोक्यात आबोली गजरा, हातात डझनभर बांगड्या, नखांना नेलपेंट. ओठांना लाली, मुलगी सावळी असली तरी रूपाने बरी होती. राऊत मनातच हसले, अण्णांनी मुलीला तैनातीत ठेवले होते. अण्णांच्या मित्रांनी मुलीच्या आईला कांदे, बटाटे खरेदीसाठी म्हणून रमेशच्या दुकानावर पाठवले. तिथे गजबज होती. राऊत काका रमेशच्या पाठी जाऊन उभे राहिले आणि रमेशला हळू आवाजात म्हणाले, “रमेश माल बघून घे, तुझ्या आग्रहावरून मुद्दाम खरेदी करायला मुलगी आई सोबत आल्याय बघं. नंतर तक्रार नको,माल पहिलाच नाही म्हणून.” रमेश सावध झाला,खरेदीसाठी आलेल्या मुलीकडे पाहू लागला. मुलीचा चेहरा पाहताच हा माल अण्णांचाच आहे याची खात्री त्याला पटली. दुकानदार एकमेकांची थोबाडं पहात कस राहणार म्हणूध मुलीच्या आईने त्याच्या दुकानावर खरेदी केली, रमेश तिच्याकडे पहात राऊतना म्हणाला, “काका, मी तुमच्याशी नंतर बोलतो,सध्या गिऱ्हाईक बघू दे.” रमेशने आज नेहमीपेक्षा चांगले कपडे घातले होते, तुळतुळीत दाढी केली होती.केसांचा कोंबडा काढला होता. उजव्या हातात सरदारजी घालतात तसे कडे होते. दोघांची नजरा नजर होताच, ती लाजली. तसा तो ही हसला. रमेशने मुलीच्या आईकडून नेहमीच्या दरापेक्षा कमी पैसे घेतले तशी ती ही हसली. मुलीने जाताजाता पुन्हा त्याच्याकडे वळून पाहिले. रमेशची नजर तिच्या धष्टपुष्ट छातीवरून हलत नव्हती, तो गालात हसला. ‘आयला माल लय भारी आहे.’ तो हळूच स्वगत बोलला .

संध्याकाळी राऊत रमेशला भेटले, “रमेश शेट, मग कशी वाटली पोरगी? असला माल शोधून सापडणार नाही, शेवटी माल ऐऱ्या गैऱ्याचा नाही. काय समजलास?” “काका, मुलगी दिसायला ठिक आहे,पण थोडी सावळी वाटते.”
“अरे सकाळी तर म्हणत होतास माल भारी आहे म्हणून.”
“ते आपल असचं, म्हणजे खरच मुलगी भारदस्त आहे,थोडी उजळ असती तर आणखी छान दिसली असती.” अरे ती आता ती खेड्यात राहते, उद्या लग्न करून इथे आली की महिन्यादोन महिन्यात उजळेल, मग तिला कोणी ओळखणारही नाही, आहेस कुठे?” “ते ठिक आहे, पण काका महत्त्वाचे सांगायचे राहिले, नुसती मुलगी पाहून काय करू? माझा धंदा असा रस्त्यावर, मुलीची आयुष्यभरासाठी जबाबदारी घ्यायची तर अण्णानी मला माझा धंदा वाढवण्यासाठी भांडवल द्यायच कबूल करावं, लग्न होण्यापूर्वी स्टेशनवर एक गाळा आणि थोडे पैसे द्यावे. शेवटी लग्न केल म्हणजे खर्च वाढणारच मग उत्पन्न वाढवायला हवं ना? बघा अण्णा गोष्टीला तयार असतील तर तसा निरोप मला द्या.” रमेशने सरळसरळ व्यवहार मांडला.

राऊत म्हणाले, “मुलगी तुला पसंत पडली ना,बाकी व्यवहाराचं मी बघतो.अण्णा माझ्या शब्दाबाहेर नाहीत. मात्र अण्णाच्या मुलीशी लग्न करतोस, लक्षात ठेव,मुलीला नीट वागवल नाही तर,अण्णा जितका चांगला तितकाच वाईट माणूस आहे. पोरीला त्रास दिलास तर तुझी बिनपाण्याने करून टाकेल.” “काका,आपला शब्द आहे अण्णांनी मला आर्थिक मदत केली तर पोरीला सुखात ठेवीन, तुम्ही तेवढ व्यवहाराच बघा,बाकी तुम्ही निर्धास्त रहा.”

राऊतांनी आपल्या अन्य मित्राकडून मुलाच्या चारित्र्यवषयी आणि कुटुंबाची माहिती घेतली. मुलगा म्हंटले तर चांगल्या कुटुंबातील होता, केवळ शिक्षणात फार डोक चालत नव्हते म्हणून नोकरी न करता कांदे, बटाटे,लसूण, नारळ, असा रिटेल धंदा करत होता. कुटुंब सांभाळू शकेल इतके बरं उत्पन्न होत. मुख्य म्हणजे मुलगा निर्व्यसनी होता. आजपर्यंत धंद्यापलीकडे पहायला त्याला वेळही नव्हता.

धंदा वाढविण्यासाठी भांडवल आणि गाळा मिळत असेल तर अण्णांचा जावई म्हणून घ्यायला त्याची हरकत नव्हती. राऊतनी ही गोष्ट अण्णांच्या कानावर घातली. अण्णा गुरगुरले, “काय म्हणतो तो बावळट कांदेवाला? गाळा घेऊन द्या, गाळा ठेवलाय त्याच्या बापानं, गाळा घेऊन देणं खायच काम आहे का? हुंडा म्हणून दोन, पाच हजार द्यायला माझी हरकत नाही पण चक्क गाळा म्हणजे फारच झालं” “अण्णा, तुम्ही पण कमाल करता, तुमच्या मुलीचे सुख तुम्ही नाही तर कोण पाहणार? ती तुमच्या डोळ्यासमोर राहील हा फायदा नाही का?” “राऊत तू म्हणतोस ते पटतयं. तरी पण,आठ दहा हजार घालावे लागतील, एवढे पैसे तिच्यासाठी खर्च केले, हे मुलांच्या कानावर गेलं तर भांडायला उभे राहतील.” “मग काय निरोप देऊ,नाही जमणार सांगू का?” “हातघाईवर का येतोस बाबा, थांब थोडं, बघू पाच सहा हजारात गाळा मिळाला तर घेऊन टाकू, तूच त्याचा शोध घे. मात्र त्या पोराला सांग जे काही देतोय त्या उपर छदाम मागायचा नाही, नाहीतर दुखणी घेऊन यायचा, उद्या त्या पोरीचं बाळंतपण आल तरी हात पसरायचा नाही.”

राऊत हसले, “तुम्ही म्हणताय तसच सांगतो पण माझा आपला साधा प्रश्न, पहिलं बाळंतपण माहेरच असत खरं ना?” “तू माझ्या बाजूने बोलणार आहेस? का त्या रांडेच्याची बाजू घेऊन बोलणार तेच कळत नाही.” राऊतने हात जोडले, तसे अण्णानी त्याचे दोन्ही हात आपल्या हातात धरले “रागावू नकोस,अरे सध्या वातावरण तापलं आहे,तुला म्हणून सांगतो आमची ही दर चार दोन दिवसांनी उध्दार करते, बाहेर शेण खायची काय गरज होती, माझ्यात काय कमी होत? विचारते. का शेण खाल्ल मलाच माहिती नाही, सगळा वयाचा दोष. तेव्हा ती उफाड्याची होती. झाला घोळ, मग तिच्या नादात गुंतत गेलो. तेव्हा तो विरंगुळा होता. पुढे हे सगळं वाढत गेलं. आता मुलं ही आडून आडून बोलतात. बर हे तुला सांगतोय,जगाला सांगून अण्णाची मागून मारू नको म्हणजे झालं.” “काय हे ,इतका का मी निच आहे? आपली दोस्ती काय कामाची? राऊतने जाता जाता विचारलं, “मग अण्णा सांगा काय निरोप देऊ?”

“मी सांगितला तसाच निरोप दे.म्हणावे जरा ठिकठाक रहात जा. आता तुझ्याकडे बघण्याचा लोकांची नजर बदलेल हे लक्षात घे.” राऊत आणि अण्णा यांच्यातील संभाषणाला दोन दिवस झाले नसतील तर लक्ष्मीचा कोंड्याबरोबर बाजारात, ‘मी येते ‘ असा निरोप आला. स्टेशनवर व्यवसायासाठी गाळा शोधणे बाकी होते, अण्णानी तुर्तास वाट पाहण्याचे ठरवले तोवर अंगवस्त्र मुलीसह स्टेशनवर अण्णांच्या घरी यायला निघाले. ही बातमी त्यांच्या कानावर घालण्याची सोय तिने केली.

अण्णाच अंगवस्त्र साधसुध असेलच कस? अण्णा तरी कोणाशीही संबध ठेवण शक्य होतं का?, घरात दोन कर्ते सवरते मुलगे असताना इथे तमाशा नको आणि इज्जतीचा पंचनामा नको म्हणून अण्णांनी तिची बाहेरच भेट घेतली आणि तिला लटके रागावत म्हणाले, “लक्ष्मी sss, अगं तू कशाला इथे आलीस? तुला मी सांगितले होते ना लवकरच पोरीच लग्न करून देतो. उगाचच एवढ्या दूर येण्याचा त्रास. काही हवे असेल तर आपल्या कोंड्या बरोबर निरोप पाठवायचा. आता ऊन पडायच्या आत एसटी पकडून घरी जा.” अण्णांनी तिला समजूत काढून परत पाठवले. अण्णा सारखा अब्रुदार माणूस. लोकांची हमी घेण्यात त्यांच आयुष्य गेलं पण ‘धोतरात कमावलं ते पातळात गमावलं’ म्हणायची पाळी आली.’ अण्णाच्या होऊ घातलेल्या जावयाचा हट्ट पुरवावा लागला.

रमेश सवाईला लॉटरी लागली.अण्णांच्या मित्रांनी पुढाकार घेऊन सगळं जुळवून आणलं. अण्णा कोर्ट मॅरेज बद्दल म्हणत होते, जावई म्हणाला “माझी काही हरकत नाही मात्र, पोशाख व इतर खर्च मिळून दोन हजार द्या म्हणजे मला कोर्टात उद्या गबाळे कपडे घालून यायला नको. माझं काहीच नाही पण तुमची तिथे मोठी पत आहे, लोकांनी तुम्हाला हसलेलं बर दिसणारे नाही.” ज्या माणसाने महिनाभर कांदे बटाटे विकून पाचशे रूपये कमावले नसते तो दोन हजार पोशाख खर्च मागत होता. अण्णांनी त्याच्यावर डोळे वटारले, “माझ्या बरोबर चल, तुला हवे तसले कपडे घे, सखाराम पालव शिवून देईल मग तर झालं, हाताला लागतय म्हटल्यावर ओरबाडून घ्यायघी सवय वाईट.”

त्याला कळून चुकल,इतक्या सहजासहजी म्हातारा हाताला लागणार नाही. तो म्हणाला, “अण्णा माफ करा, तुमचा काही तरी गैरसमज झालायं,मी फक्त माझ्या पोशाखा बद्दल नाहीच म्हणत, आमचा दादा, वैनी लग्नाला साक्षीदार म्हणून येणार आहेत, त्यांच्या कपड्याचं मलाच पहावं लागणार, माझ्या लग्नाचा खर्च त्यांनी का करावा? पण तुम्हाला दोन हजार जास्त वाटत असतील तर दिड हजार द्या, मी भागवेन कसबस.”

त्याच म्हणणं खरं होत, मोठा भाऊ त्याच्या लग्नाला काय म्हणून खर्च करेल? तरीही ते म्हणाले, “हे अती होतयं, मी हजार देतोय त्यात भागवं आणि सारखे सारखे लकडे लावत बसू नको, बायको केलीस तर तुझी सोयच होणार,खर की नाही? म्हणजे गरमागरम जेवण मिळेल,आणखी
काही मिळेल, खर की नाही!” अण्णा छद्मी हसले. तो ही ओठ न हलवता हसला,”ठिक आहे द्या, हजार तर हजार.”, मग हळू आवाजात पुटपुटला “नाहीतरी तुमच्या हातून काही सुटायचं नाही.” अण्णाना निट ऐकू आलं असत तर कानफाट फुटलं असतं. नशीब अलीकडे अण्णांना थोड कमीच ऐकू यायचे. सगळच जुळून आल्यावर रमेशने ही गोष्ट आपल्या थोरल्या भावाला सांगितली,भाऊ म्हणाला,” आपण मराठा ती मुलगी खालच्या समाजातली कस काय हो म्हणलास?” रमेश म्हणाला,” जातीला कोण विचारतो?, माझ्या धंद्याला भांडवल मिळतंय. ती कोणत्या जातीची आहे या पेक्षा ती मधूअण्णा यांची मुलगी आहे हे काय कमी आहे का? माझा होणारा सासरा गावची प्रतिष्ठित व्यक्ती आहे. लग्न कोर्टात रजिस्टर होणार आहे, लोकांच्या लक्षात थोडच राहते? काही महिन्यात लोक सगळं विसरून जातील पण ही संधी घालवली तर पुन्हा अशी संधी मिळणार नाही. मी मुलगी दुरून पाहिली आहे. नाके डोळी बरी आहे, थोडी सावळी आहे पण चालेल, रंगाच काय करायचं? हळूहळू उजळेल, मी तरी होकार दिलाय.”

भावाने सगळं ऐकून घेतले तो अनुभवी आणि हुशार होता तो म्हणाला “संधीच म्हणतोस तर अजून एक कर,होणाऱ्या सासऱ्यांना म्हणावं मुलीच्या नावावर एक एकर जमीन करून द्या. त्यांची खूप जमीन आहे. त्यांना एक एकर म्हणजे काहीच नाही.” तो बघतो म्हणाला.नाहीतरी लग्न एकदाच करायचं तर पदरात पडेल ते पाडून घ्यावं असा विचार त्यानेही केला.

हा किडा त्याच्या डोक्यात बरोबर घुसला, तो मध्यस्थ सुनील राऊत ना भेटून म्हणाला, “काका,एक सांगायचं होत.”
“आता आणि काय राहिले? अण्णांनी तुझ्या दोन्ही अटी मान्य केल्या शिवाय पोशाखासाठी पैसे द्यायचे कबूल केले.”
ते सगळ ठिक आहे पण आमचे मोठे बंधू म्हणतात, मी जातीबाहेर लग्न केलं तर लोक उद्या नावं ठेवतील. कदाचित नातेवाईक आपल्याशी संबंध तोडातील. एवढी रिस्क घ्यायची तर अण्णांना विनंती कर, मुलीच्या नावावर एखादं एकर जमीन केलीत तर बरं होईल.” राऊत चिडले, “भोसडीच्या तुझी हाव वाढत चालली, अण्णा ला ओळखत नाही काय? अण्णाजवळ पुन्हा नवीन मागणी घेऊन गेलास तर अण्णा तुझ्या गांडीवर लात मारून हाकलून लावतील.”
तस तो राऊत काकांचे पाय धरत म्हणाला,”काका तुमचं अण्णा ऐकतात सांगून तर बघा,आमचा दादा म्हणाला, अण्णांना हे काही जड नाही, हीच एक संधी आहे.”

“अरे चुतया आताच काय घाई आहे, वर्ष दोन वर्षे जाऊदे, त्या पोरीला एखादे मुलं होऊ दे, अण्णांच्या मनात असले तर अण्णा एक काय पाच एकर जमीन पोराच्या नावावर करून देईल पण आत्ताच घाई कशाला?” “तुमचं ही बरोबर आहे म्हणा,पण उद्या अण्णांच काही बरं वाईट झालं तर, मग जमीन मागायला मी स्वर्गात जाऊ का?” “भडव्या माझ्या तोंडावर सरळ म्हणतोस अण्णा गेले तर! ,चालायला लाग, चालायला लाग, एक मिनीट माझ्या समोर उभे राहू नको नाहीतर कानशिल फोडीन. दिडदमडीचा, रस्त्यावर गाडी लावतो आणि स्वप्न मोठी मोठी बघतो. मी अण्णाला दुसरा जावई पाहून देईन. चालायला लाग.” राऊत फारच रागावले, खरतर त्यांचा नूर पाहता ते आता त्याला हाणणार अस वाटत होतं ” काका चूक झाली, अस बोलायला नको होत,माफ करा पण..”

राऊतांनी त्याची गचांडी धरली आणि दोन कानाखाली वाजवल्या तसा तो भिरभिरला. दोन तीन माणसे धावत जवळ आली,राऊतांचा हात धरून त्यांना मागे मागे रेटू लागले. राऊतांची पकड मजबूत होती. दोन जणांनी कसाबसा त्यांचा हात सोडवला आणि दूर घेऊन गेले.
रमेश सवाई रागाने लालेलाल झाला पण त्याला स्वतःच्या ताकदीचा अंदाज होता,कांदे, बटाटे उचलण वेगळ आणि राऊतांवर हात उचलण वेगळ. तो त्यांना हळू आवाजात शिव्या घालत निघून गेला. दोन चार दिवसांनी त्याचा भाऊ दिनकर, सुनील राऊतना रस्त्यात भेटला, “राऊत साहेब,नमस्कार” “कोण तुम्ही, मी नाही तुम्हाला ओळखले?” “पण मी तुम्हाला ओळखतो ना ,तुम्ही आणि मधूअण्णांला बरेचदा एकत्र दिसता. तुमच्याकडे थोड काम होतं, आपण चहा घेऊया का? चला विसूच्या हॉटेलात बसूया.” “हे पहा,तुम्हाला काय विचारायचे असेल ते लवकर विचारा मला तुमचा चहा नको आणि पाणी नको. मला थोडी घाई आहे.” “मी रमेशचा भाऊ,परवा तुम्ही त्याला रस्त्यात मारलं, तो आजरी आहे. ताप आलाय त्याला. एवढ्या मोठ्या मुलाला तुम्ही रस्त्यात मारलंत हे काही ठीक नाही.” “मी का मारलं ते तुझा भाऊ तुला म्हणाला का?”
“नाही, त्याची चूक झालीच आम्हाला कबूल आहे पण तुम्ही वयाने मानाने मोठे होता, एवढं मारायची गरज नव्हती.तो म्हणून, काही घडत का?” “मी फक्त दोन कानशिलात लगावल्या, अण्णांना कळलं तर ते तुमचा बाजार उठवतील, शहाणे असाल तर आल्या वाटेने गुपचूप जा.” “राऊत साहेब ऐका तर,मी माफी मागतो,पुन्हा चुकूनही तोंडातून अपशब्द निघणार नाही, पण हे जुळून आलेल मोडू नका एवढी विनंती आहे. त्याची बिचाऱ्याची काही चूक नाही, मीच त्याला भरीला घातल.”

राऊतना दया आली, “हं ठिक, मग आता काय सांगताय?”
“हे बघा साहेब आम्ही खरचं गरीब आहोत हो,तेवढ काम झाल असत तर, उद्या त्याच्या मुला बाळांना आधार झाला असता.धंदा काय,आज आहे, उद्या नाही, दया करा भावावर.” “हे पहा, जे काही तुमच्या भावाला द्यायला अण्णा तयार झालेत त्याची किंमत दहा पंधरा हजार होईल, शहाणे असाल तर अजून काही मागू नका, तुमचा भाऊ अण्णांच्या विषयी जे काही बोलला ते त्यांना समजल तर भर चौकात नागडा करून ते मारतील. जागेचं म्हणाल तर तुमच्या भावाची होणारी सासू हुशार आहे ती अण्णांजवळून जमीन घेणारच यात शंका नाही. आता निवांत जा आणि तुमच्या भावाला थोड निट समजवा. लग्नाला आठ पंधरा दिवस राहिलेत, भावाला खाऊ पिऊ घालून ठिक करा, कोर्टात लग्नाला भेटूच.”

लग्न जवळ आलं तस पोरीच्या कपड्यासाठी लक्ष्मी घाई करू लागली, तिने अण्णांना कुंड्या बरोबर निरोप पाठवला. पोरीच लग्न पंधरा दिवसावर आलय ब्लॉऊज शिवून घ्यायचा हवा, साडी फॉल बिडिंग करून घ्यायला हवी, तिला तिचे कपडे घ्यायला हवे, पोरीला कधी घेऊन येऊ? अण्णांना हे प्रकरण शक्य तितक्या लवकर संपवायच होत पण कोर्टात आधी नोटीस देण,प्रतिज्ञापत्र भरून देण या गोष्टी पूर्ण केल्या शिवाय, रजिस्ट्रार तारीख कशी देणार? लोकांनी मुलांचे कान भरल्यापासून मुलं त्यांना आडून आडून सुनवत होती, फक्त समोरासमोर बोलण्याच धाडस अजूनही त्यांच्यात नव्हते. पत्नी दर चार दिवसांनी गळा काढून सवतीच्या नावाने बोट मोडत होतीच. माझा संसार लुटून तिच्या मढ्यावर घातल अस म्हणत होती आणि तरीही मंगळागौर पुजत होती. त्या काळात नवऱ्याने एखादी बाई ठेवली तरी ती आकांडतांडव करत नसत. जोवर ते हे प्रकरण बाहेरच्या बाहेर भागवित महिलांना काही वाटत नसे. त्यामुळे हे प्रकरण लवकर तडीस लावावे म्हणून त्यांनी लक्ष्मीला निरोप देऊन बाजारपेठेत बोलवून घेतल. दोन दिवसांनी लक्ष्मी गौरीसह हजर झाली. ती दुकानात पोचण्यापूर्वी अण्णांनी दुकानाचा मालक, गणेश मेहताला सांगितले,” हे बघ यांना चार पाच मध्यम किमतीच्या साड्या दाखव, आणखी काही सटर फटर हवे ते दे, बिल लिहून ठेव. उगाचच बोंब मारून कुणाला काही सांगत बसू नको. कळले का.” अण्णांच, या व्यापारी लोकांना हवे तेव्हा व्याजाने पैसे पुरवत,त्याचा शब्द कोण मोडणार?
मग ते आपल्या प्रकरणाकडे जात म्हणाले,” लक्ष्मी, तुला आणि पोरीला हव्या तसल्या साड्या घेऊन झाल्या की पोरीला घेऊन अपना फुटवेअरकडे ये तिला आणि तुला चप्पल घेऊन टाक, आणखी काय खरेदी करायची असेल तर हे पाचशे ठेव. आजच काय ते घ्या. आता पोरीला उगाचच बाहेर पाठवत बसू नको. उगाचच चर्चा झालेली मला आवडणार नाही. मी चार दिवसांनी येऊन जाईन.”

ते मेहताचा निरोप घेऊन गेले.दोघींनी दोन तास घोळ घालून चारसहा साड्या, ब्लाऊज पिस खरेदी केले.त्या पिशव्या नंतर नेण्याचं सांगून त्या कासाराकडे आल्या तिने मुलाला आवडतील त्या बांगड्या भरून घेतल्या आणि जैनच्या अपना फुटवेअरमध्ये पाठवले.तिला आणखी काही खरेदी करायची होती. अण्णा तिथे वाट पाहात उभे असतील आणि उशीर झाला तर निघूनही जातील म्हणून मुलगी अपना फुटवेअरकडे आली. “गौरी, अग तुझी आई कुठे राहिली?” “ती मागून येते, मला म्हणाली तू तुझी चपल घेऊन टाक.गौरी मान वर न करता म्हणाली.
त्यांनी भावेशला पोरीसाठी चप्पलं दाखवायला सांगितली.
मुलगी एका जागी खुंटासारखी ढिम्म उभी राहूध भावेश देईल ते एक एक चप्पल पायात घालून पाहात नकारार्थी मान हलवत होती. अण्णा तिला भावेश देईल ते दुसरे चप्पल मुलीच्या पायासमोर ठेवून घालायला सांगत होते. अण्णा, तिला, “पाय पूर्ण चपलेत घाल,थोड चालून बघ.” अशा सूचना करत होते. तिने स्वतः योग्य वाटेल ते चप्पल निट पायात बसते की नाही पहायला हरकत नव्हती. पण तिची नाटकं सुरु होती. भावेश एक एक चप्पल ट्राय करायला देत होता तिला कोणतही चप्पल निवडता येत नव्हते. पायातून काढलेल चप्पल अण्णा काऊंटरवर पून्हा ठेवत होते. आता अण्णांचा चेहरा बदलत होता.आजुबाजुला असलेले लोक मुलीचे फाजील लाड बघत होते. एवढ्या मोठ्या जमीनदार, सावकाराला एक मामुली पोरगी झुकवत होती, तिचा थाट पाहून लोक ती कोण असावी अंदाज लावत होते. आश्चर्य याचच होत, एक प्रतिष्ठित व्यक्ती एका मामुली मुलीची नाटकं खपवून घेत होता.

काही दिवसांनी रमेशने आपल दूकान एका आठ बाय दहा फुटाच्या गाळ्यात नेल आणि लोकांच्या तोंडी तो अण्णांचा जावई झाल्याची चर्चा आपोआप रंगली. त्याची बायको अधुनमधून त्याला नाश्ता-चहा दुकानात आणून देतांना दिसू लागली आणि लोकांची खात्री पटली की त्याने सासऱ्यांकडून भरपूर हुंडा उकळला. पोरीच्या मुखावर तजेला तजेला आला आणि हळूहळू तिचा वर्ण खुलून आला.

रूप उजळलं तस कोणी कुणाला न सांगताही ती कोणाची कोण हे जगजाहीर झाल. तिला वर्षभरात मुलगा झाला त्याने आईचे रूप घेतले. अण्णानी नातवासाठी राऊत जवळून शक्य ते सगळच पाठवल पण जसा मुलगा मोठा झाला तो हुबेहूब अण्णांच्या मुलांसारखा दिसू लागला. नातवाला जवळ घ्यावं अस वाटत असूनही अण्णा लोकलज्जेसाठी ती हिंमत दाखवू शकले नाहीत.

गौरीच्या शहरातील वास्तव्यामुळे अण्णांच्या घरातील भांडण वाढली. उगाचच चर्चेला विषय मिळू नये म्हणून अण्णांनी खुलेआम फिरणे जवळजवळ बंद केले. तरुण वयात नकळत केलेला पराक्रम या वयात पोरका करून गेला कारण मुलांनी त्यांच्याशी फारकत घेतली. या गोष्टींचा त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि एक दिवस अण्णा हे जग सोडून गेले. मात्र लोक जेव्हा केव्हा ते रमेशच्या पत्नीला तिच्या मुलासह पहात, तिच्या मुलाच्या चेहऱ्यातुन अण्णा डोकवत. अस म्हणतात की अण्णांनी आपल्या मृत्युपत्रात त्या मुलाच्या नावाने एक एकर जागा देण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. न दिलेला शब्द पाळण्याची धम्मक दाखवून अण्णा निघून गेले.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

6 thoughts on “अण्णा एक तालेवार गडी

  1. theorangedip

    Wonderful web site Lots of useful info here Im sending it to a few friends ans additionally sharing in delicious And obviously thanks to your effort

  2. globesimregistration

    Your blog is a true hidden gem on the internet. Your thoughtful analysis and engaging writing style set you apart from the crowd. Keep up the excellent work!

  3. igameplay

    Wow amazing blog layout How long have you been blogging for you made blogging look easy The overall look of your web site is magnificent as well as the content

  4. globesimregistration

    Somebody essentially lend a hand to make significantly posts I might state That is the very first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to create this particular put up amazing Excellent job

  5. globesimregistration

    Nice blog here Also your site loads up very fast What host are you using Can I get your affiliate link to your host I wish my site loaded up as quickly as yours lol

  6. bizzlyn

    I do believe all the ideas youve presented for your post They are really convincing and will certainly work Nonetheless the posts are too short for novices May just you please lengthen them a little from subsequent time Thanks for the post

Comments are closed.