अन्नदाता
बत्तीस वर्षापुर्वी कामासाठी मुंबईला स्थलांतरीत झालो.त्या नंतर काही वर्षे शनिवारी- रविवारी सफाळ्याला जाणे होत होते.
त्यानंतर महीन्या दोन महिन्यांनी एखाद्या रविवारी सफाळ्याला जात होतो .नंतर जाण्याच्या फे-या कधी कमी झाल्या ते मलाच कळले नाही. मागच्या रविवारी सफाळ्याला जाणे झाले.माझेच गावं ,माझाच पाडा मला वेगळाच दिसत होता. माझ्या गावाने कात टाकली होती. जागोजागी बंगले , बंगल्यांच्या लांबच लांब रांगा आणि त्यांच्या दारातून गेलेल्या डांबरी सडका .
माझ्यासाठी सारेच नवे, गावात अजूनही रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडे टिकून होती हीच गोष्ट समाधानाची.मी घरी गेलो वहिनीने चहा दिला, जरा गावात फिरून यावे ,भेट झालीच तर जुन्या मित्रांना भेटाव म्हणून पायात पुतण्याची स्लीपर सरकवली आणि नरू पाटील यांच गावातल्या मध्यभागी असणार दुकान गाठलं “काय नरू ,कसा आहेस? नरूने माझ्याकडे पाहीले, हसला आणि म्हणाला “जाम दिवसानं आला तो, बरा हाय ना?”
मी हसलो, “एकदम फस्टक्लास , तू कसा आहेस ? दुकान काय म्हणतंय ? ” तो खांद्यावर हात टाकत म्हणाला,”बरा हाय, आता गावांन चार दुकाना हान, धंदा वाटलाय पण इश्र्वर कृपेनं बरा हाय.एका पोरांना मेडिकल टाकलाय न बिसा दुकान सांभलतय मी अधुन मधुन दुकानावर येताव.” आमचं बोलणं चाललं असताना एक चाळीसीचा माणुस दुकानावर आला. माझ्याकडे पहात नरू म्हणाला ,”याला ओलखला का?” मी त्याच्या चेह-याकडे पहात म्हणालो “हा नानाचा पोरगा का रे! चेहरा तरी तसाच दिसतोय ” त्याला आश्र्चर्य वाटल , “मला कसं काय ओळखलं ? मी हसलो “तुझा चेहराच नानासारखा आहे.”
“नानाला कोण विसरेल,नाना आमचा अन्नदाता. आमचा हिरो.”
मी काय बोलतोय त्याचा संदर्भ क्षणभर कोणालाच लागला नाही. तो आश्र्चर्य झाल्यासारखा माझ्याकडे पहात होता.
मी त्याला म्हणालो ” तू तेव्हा होतास की नाही मला माहीत नाही १९७३ते१९७५भारतभर दुष्काळ होता. दोन तीन वर्षात पाऊस पडला नव्हता.शेतं वित वित फाटली होती. विहीरीच्या तळालाही पाणी नव्हतं , तळ खरवडून पाणी पहाटे किंवा रात्री भराव लागे. रेशनवर महीन्यासाठी पाच किलो तांदुळ आणि आठ किलो गहू , दिड किलो साखर मिळत होती.
रेशनसाठी भल्या पहाटे लाईन लावावी लागे.आणि दुकान उघडले की मध्ये दांडगाई करणा-यांची झुंबड पडे. कधी कधी आपला नंबर येई पर्यंत धान्य संपलेल असे.असे ते दिवस होते.”
सर्वच भुतकाळात गेले. नरू माझ्याकडे पहात म्हणाला
“मंगेश, जाम गरीबी का रं , आयला, कोणाचेच शेतान पीकं नी, आमचा बाबाव मक आणी, मायला मक्याची वातट भाकरी मिलतव नवती , मिलोव खाल्ला.”
नानांच्या मुलांसाठी मिलो हा शब्दच नवखा होता, “मिलो, त्या काय होता? मी त ऐकेलव नी” नरू आता भुतकाळात शिरला
” अरे वेड्या बाजरी असताना तेचे पेक्षा एकदम बारीक धान, निवडताना डोल फुटतील इतका बारीक, भाकरी त्याची काली काली, खाताना डोखा फिर पण पोटाने आग पडली का ती भाकरव खावी लागं , का रं मंग्या,आठवतंय ना !” मी हसलो खरं आहे दोस्ता ते भयानक दुष्काळाचे दिवस आठवले की अंगावर काटा येतो.
त्या काळात सर्वांच्याच घरात अन्नाची मारामार होती,सधन होते ते काळ्या बाजारातील , महागड अन्न वीकत घेऊ शकत होते पण सामान्य माणसाची जाम हालत होती.कुटुंबातील सर्वांना अगदी मर्यादित खायला मिळे , मग भुक कितीही असो वाट्याला येईल तेवढ्या दिड -दोन भाकरीवर वेळ निभावून न्यावी लागे.
उंबर, आसन,पेटार ,तोरण,हटुर्ण ,हुंब अशी काहिही फळ खाऊन गुजराण करावी लागे.रेशनवर बाजरी,मिलो,जव, मका असं धान्य मिळे, त्यासाठीही प्रचंड मारामारी होती. सीमेंटचा काळाबाजार चाले.राॅकेल कार्डाला पाच लिटर मिळे ते जपुन वापरलं नाही तर अंधारात रात्र काढावी लागे. अशा वेळी या पाच लिटर राॅकेलच महत्त्व कळे. या अवघड परिस्थितीत एक दिवस संध्याकाळी एक दुत घरी आला .माझ्या आईला म्हणाला “काकू धान्य घेतील का तुम्ही? ” आईला त्याचे म्हणणे कळेना, ती म्हणाली “कोण तू? धान्य कोण देतय?कस देणार ?”
“मके हान , आठ रुपये पायली,लवकर घेशील तं मिळतील , लोकायनी नेले पण” तीला तरिही त्याचा अर्थ बोध होत नव्हता “कोण विकतय? ” “आपले दाजी काल्याचे हान, लवकर पोराला पाठव नी त खपतील.” तो इतकं सांगून निघुनी गेला.
त्यानंतर आईने मला बोलावून सांगीतलं “हे बघ तो मुकूंद काय सांगून गेला ऐकलस ना दाजी काळ्याच्या घरी जा आणि पायलीभर मके घेऊन ये” तीने पीशवी आणि दहा रूपये दिले. मी शर्टाची बटण लावत गावात धाव मारली. दाजी काळ्याच्या मांडीवर मक्याचा ढीग पसरला होता आणि त्यांची सून कोणालातरी पायरीने मके देत होती. तीने मापता मापता माझ्याकडे पहात विचारलं,”बामणाचा का रं ” मी मान डोलावली, तसं तीने जवळ बोलवत विचारलं “किती पायल्या देव?” मी ,एक बोट दाखवत म्हणालो, “एक” आणि दहाची नोट पूढे केली तसं ती एक पायरी आणी थोडे मके देत म्हणाली “काकीला सांग हो जास्त दिलें माझ्याकडे सुटे नी पैसै”
मी निघालो तसं माझ्याकडे पहात म्हणाली “धुम्यानशी जा हो, गावांशी नको, पीशवी लपव.” मी मक्याने भरलेली, किमान साडेतीन चार किलो मक्याची पीशवी कशी काय लपवणार होतो?” तरीही मी हुंकार भरत तिथून सटकलो.गावाबाहेरच्या वाटेने लपत लपत मी घर गाठले.मी तसा का गेलो हे मलाच कळले नाही. घरी जावून मी पिशवी आईच्या हाती दिली,तशी ती माझ्याकडे पहात म्हणाली “आठ रूपये पायली ना?मग दोन रुपये?” मी पीशवी दाखवत म्हणालो “त्यांच्याकडे पैसे सुटे नव्हते म्हणुन मकेच जास्त दिलें.” माझ्या उत्तराने तीचे समाधान झाले नाही. तीने पीशवी उचलून अंदाज घेतला व म्हणाली अजुन कोण आले होते मके न्यायला?” मी म्हणालो मी नाही ओळखलं पण दोन माणसं आणि काकू आलेल्या होत्या “
आईने मके पाहिले आणि स्वत:शीच पुटपुटत म्हणाली “मेल्यानी गाडीचा डबा फोडला की काय? एवढा मका आणाणार कुठून?” दोन दिवसांनी कळलं ते खरं होतं. तीला चोरीचे मके घेतल्याबद्दल वाईट वाटलं पण तीने ते मके दुस-या दिवशी धुवून वाळवले आणि दळून आणल आणले. त्या संध्याकाळी तीने भाकरी केल्या आणि पोटभर खाऊ घातल्या.आम्हालाही आश्र्चर्य वाटल आज जेवणाच रेशनींग नव्हतं. ब-याच दिवसांनी आम्ही सर्व भावंडे पोटभर जेवलो.
रात्री आम्ही झोपायला गेलो.
आई भांडी कुंडी आवरून झोपायला आली व देवाकडे जात तीने हात जोडले व कातर स्वरात म्हणाली मुलांना द्यायला पोटभर अन्न नाही म्हणून हे चोरीचे धान्य घेण्याची दुर्बुद्धी झाली , देवा मला माफ कर.” मी जागा असल्याने ऐकत होतो, तेव्हा मला कळलं की मी चोरीचे मके विकत घेतले होते.
त्या नंतर अशी चोरटी खरेदी आम्ही नाइलाजास्तव अनेकदा केली मात्र अपराधीपणाची भावना मनातुन कमी झाली नाही.
त्या नंतर महिन्या भराने आम्ही शाळेत जात असताना एका माणसाचे दोन्ही हात हातकडीने बांधून पोलीस घेऊन जातांना आम्ही पाहिले. उत्सुकता म्हणून मी मित्रांना विचारले तेव्हा ते म्हणाले “तो नाना हाय , नाना ,दाजी काळ्याचा ,आज पहाटे डबा फोडताना आर.पी.एफ. लोकांनी पकडला त्याला.”
मी नानांकडे पाहिले तर त्याच्या चेह-यावर कोणताही ताण नव्हता, भिती नव्हती. एखादा स्वातंत्र सेनानी जाईल तशा ताठ मानेने नाना पोलीसांसह चालला होता.गरीबांना स्वस्तात धान्य देणारा आमचा अन्नदाता स्वताच्या मस्तीत सरकारचा पाहुणचार घेण्यासाठी निघाला होता.
माझी गोष्ट नव्हे सत्य घटना कोणताही आडपडदा न ठेवता मी त्याच्या मुलाला ऐकवली तसं तो गहिवरला आणि म्हणाला “आता नाना पार डोकरा झालाय, कंदीव मरल, तो गेला तर खांदा द्यायला ये हो, मला बरा वाटलं” मी माझ्याच नकळत माझ्या अन्नदात्यासाठी गहिवरलो. काय चूक, काय बरोबर मला खरंच माहित नाही परंतू त्या दुष्काळात स्वत: शिक्षा भोगत या अन्नदात्याने आम्हाला जगवले होते हे मला विसरता येत नव्हतं.मी नकळत त्याचा हात घट्ट हातात धरला आणि थोपटत म्हणालो, हो नक्की येईन.
Have you ever thought about adding a little bit
more than just your articles? I mean, what you say is
fundamental and all. However think about if
you added some great visuals or videos to give your posts more, “pop”!
Your content is excellent but with images and video clips,
this site could certainly be one of the best in its niche.
Fantastic blog!