अफसाना लिख राहा हू ||

अफसाना लिख राहा हू ||

लिहण,तेही पत्र, “काय चेष्टा करताय राव,संगणक युगात पत्र  लिहण्याच तुम्हाला सुचत कस?तब्येत बरी आहे ना ! नाही म्हणजे अचानक पत्र लिहण्याची हुक्की आली कि काय?” या आशयाची शब्दफेक तुमच्यावर झाली नाही तरच  नवल पण जेव्हा मोबाईल, मोबाईलच काय ! साध्या फोनचा शोध लागला नव्हता तेव्हा संपर्क करण्याच साधन काय होत,जरा आठवा पाहू. मी काही नळ आणि दमयंतीच्या काळातल सांगत नाही.तुमच्या आणि अर्थात  माझ्या आजोबांच्या काळातल आठवायला सांगतोय.अर्थात टपालाने येणार पत्र आणि तो घेवून येणारा पोस्टमन यांच्या विषयी मी बोलातोय  हे तुम्ही आधीच ओळखल असणार.समझने वालोको इशारा काफी होता है| खर ना.
हे पत्र एका शहरातून दुसऱ्या शहरात,एका गावातून दुसऱ्या गावात आणि कधी कधी गावातून शहरात किंवा शहरातून गावात असा प्रवास करत संदेश वहनच काम करायचं. एका व्यक्तीचे विचार त्याच्या भावना त्याची शब्दातील तळमळ त्याचा विरह,त्याला झालेला आनंद, किती किती गोष्टी त्या पत्रातील मजकुरात सामावलेल्या असायच्या. पत्राच सामुहिक वाचन होणार कि एखाद्या एकांत जागी वाचन होणार,हे पत्र कोणी कोणाल पाठवलय यावर अवलंबून असायचं.पत्रातील मजकूर वाचतांना चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावातून  पत्राचा मजकूर समोरच्या व्यक्तीला न  सांगताही कळायचा ह्यालाच पत्र बोलक होत अस हव तर म्हणता येईल.एका प्रेमिकांन आपल्या प्रेयसी अथवा प्रियकराला लिहिलेलं पत्र त्यातील भाव वाचणाऱ्या व्यक्तीच्या चर्येवरून ओळखता यायचे.वाचणाऱ्या व्यक्तीच्या  चेहऱ्यावरची लज्जा,पत्रातल्या मजकुराचा आशय सांगून जायचा, वाचतांना डोळ्यात उमटणारी वेदना, विरह किंवा दु:ख सांगून जायचा.किती बोलक आणि सशक्त माध्यम आम्ही हरवून बसलो आहोत.पत्र आल नाही म्हणून लागलेली आस,केवळ दारी कावळा ओरडला किंवा दुरून पोस्टमन दिसला तरी पत्र काय असेल ह्या बाबत वाटणारी हूर हूर आणि हातात पत्र पडताच, त्या पत्रातील ओळखीच अक्षर पाहून ते माझ्या लाडक्या व्यक्तीच आहे ह्याच समाधान शब्दात मांडण शक्यच नाही ! ज्या मागच्या पीढीन आपल्या लाडक्या व्यक्तीला पत्र लिहील आहे त्याला  हे नक्की कळेल नव्हे त्याच्या स्मृती जागृत होतील. “जाने कहा गये ओ दिन, लिखते थे तुम्हारी याद मे, इश्क फर्माते थे इंतजार मे” |  “सख्या किती वाट पाहू तुझ्या उत्तराची, नित्य बरसात होते रात्रीत आसवांची” अशा हळूवार  भावनेत चिंब भिजलेल्या आठवणी ह्या पत्राच्या अगदी लहान थोरांच्या नक्कीच असतील.पत्राच्या प्रकारावरून त्याच्यातील मजकूर कोणासाठी त्या मजकुराचा आशय काय हे लक्षात यायच.मुख्य म्हणजे पोस्टमन दादा ते पत्र ज्याच्यासाठी,किंवा जिच्यासाठी आल असेल नेमक त्याच्याच हाती ठेवायचा.पत्रावरच नाव पाहून किंवा अक्षराच वळण पाहून ते कोणाच्या हातात पडण योग्य ठरेल हे ओळखण्याचं कसब त्याच्या  पेशान त्याला शिकवलं असाव. ह्या पोस्टमन दादा बद्दल म्हणूनच सगळ्यांनाच आपुलकी होती.कोणाच पत्र कोणासमोर द्यायचं नाही हे त्या दादाला चांगलच अवगत होत . 
  पत्र, ४ बाय ६चा खाकी जाड तुकडा,एका बाजूनी अर्धी जागा,पत्त्यासाठी ओढलेल्या चार ओळी आणि भारतीय डाक सेवेचा शिक्का. पण ह्या पत्रान आपल सगळ जगण व्यापून टाकल होत. चाकरमान्यांच्या बायका डोळ्यात प्राण आणून ह्या चतकोरभर कागदाच्या तुकड्याची वाट पाहात,डोळ्यात आसव आणून पोस्टमन दादासाठी खोळम्ब्लेल्या असायच्या.त्या काळी चित्रपटात “फुल तुम्हे भेजा है खत मे,फुल नही दिल मेरा है| पासून लिखे जो खत तुझे ओ तेरी याद मे  पर्यंत.” आणि मैने सनम को खत लिखा पासून आपका खत मिला आपको शुक्रिया पर्यंत असणारी गीत लोकांच्या ओठावर असायची.सायकलवर टांग मारून येणारा पोस्टमन पहिला कि राजेश खन्नाच्या डाकिया डाक लाया ची आठवण   व्हायची. कोकण,कोल्हापूर,विटावा,सांगली सातारा येथली बरीच चाकारदार मंडळी न चुकता दहा तारखेला आपल्या घरी मनी ऑरडर करायची,गावची मंडळी ह्या दहा तारखेपासून पैसे मिळे पर्यंत पोस्टमन दादाची आतुरतेने वाट पहायची. 
   सगळ्यात हॉरिबल विषय हा “तार” ह्या शब्दाचा होता. “पोस्टमन——–  , तार” असे शब्द जरी घरातल्या मंडळींना ऐकू आले कि पुढे होवून तार घेण्याऐंवजी घरात रडा रड सुरू व्हायची. तार आली म्हणजे कोणा आप्ताच्या निधनाची बातमी आली असा साधा सोप्पा अर्थ त्या टपाल तारेचा होता.म्हणुनच तार शब्द ऐकताच मनात   धडकी  भरायची. येणाऱ्या दु:खाची जाणीव व्हायची . त्या वेळी क्वचित प्रसंगी सरकारी नोकरी, कोर्टाचे समन्स,राज्यसरकार किंवा केंद्र सरकार यांच्या जवळुन प्रदान होणारा  पुरस्कार या साठी तार पाठवली जायची. मोबाईलच्या येण्यान सुखद वार्ता आणि दु:खी घटना ह्या दोन्ही प्रसंगातल काव्य संपल, थरार संपला. मोबाईल आणि त्याच्या वापरा विषयी कितीही बोलल तरी कमीच. ह्या आधुनिक साधनान जगाला वेड लागल, आणि वेड लावलं देखील अस म्हटलं तर वावग ठरणार नाही. त्याचा विवेकी वापर केला तर माहितीच मोठ जग तुमच्या समोर उभ राहील पण —–, ह्या पण शब्दानेच घात करायचा ठरवल तर तुम्ही आम्ही काय करणार हो ! काय करणार, मुलगा आमच ऐकतच नाही, मोबाईल नसेल तर मी कॉलेजला जाणार नाही अस आमची सोनल म्हणाली अस जाहीर पणे पालक एक मेकांना सांगतात. मुख्य म्हणजे तासान तास त्या मोबाईल मधेच काही मंडळी गुंतून पडतात.

 मोबाईल कशासाठी वापरावा ह्याच भान दुर्दैवान काही मुलांना नाही. रस्त्यावरून चालतांना संभाषण चालू असतच,प्रवासात इअर फोन कानालाच असतो. माझ्या अवती भवती जग आहे ह्याचा ह्या मोबाईलग्रस्त मुला, मुलींना इतकच नव्हे अगदी साठी पार केलेल्या आणि स्वतःला मी आधुनिक विचार सरणीचा आहे अस दाखवण्याचा सोस असणाऱ्या व्यक्तीना अजिबात पत्ता नसतो. मोबाईलवर कोणत्या पट्टीत समोरचा बोलतो हे ऐकुन तो कोणाशी बोलत असावा ते ओळखता येत. प्रेयसी,अथवा गर्लफ्रेंडशी बोलतांना त्याच्या आवाजात असणारी मृदुता आणि पत्नीने कुठे आहात? विचारल्यावर त्याच्या बोलण्याच्या पट्टीतला स्वर लगेचच ओळखता येतो.काही बहाद्दर मोबाईलवर धड-धडीत खोट बोलतात.विक्रोळी पार करण्यापूर्वीच मी माटुंग्याला आहे, पोचेन आत्ता अस सांगून मोकळे होतात. मोबाईलवर पाठवल्या जाणाऱ्या शुभ संदेशान मन जोडली जातात हे जितक खर तितकच मोबाईलचा गैर वापर केल्यास मन दुभंगली जाण्याची शक्यता दाट इतकाच नव्हे तर चुकीचा वापर केल्यास फौजदारी कारवाई होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.स्पाय क्यामेरा सारखा मोबाईलचा वापर करून नको ती दृश्य चित्रित करून दुसऱ्या व्यक्तीला त्रास देण्याचे कृष्ण कृत्य काही व्यक्ती करतात. 

स्वतःच्या वेदना,संवेदना जागवणारा,आणि स्मृतिकोषात क्षण साठवणारा मोबाईल माणसाचा खरा मित्र आहे,एकाच वेळेस अनेकांना नाव वर्षाचे शुभेच्छ्या संदेश पाठवणारा मोबाईल हा दुसऱ्या व्यक्तीसाठी शत्रू ठरू नये अस वाटत असल्यास त्याचा विवेकी वापर न झाल्यास त्याच्यावरच अफसाना लिख रहा हू म्हणण्याची  पाळी आल्यावाचून राहणार नाही. दुसऱ्याच्या भावनांचा आदर करायचा  कि दुस-याला त्रास होईल असे वर्तन करायचे हे आपल्यावर आहे कारण  इटस ऑन  युवर  फिंगर टिप्स.मोबाईलवर सुखद गाणी ऐका, मित्रासाठी शुभसंदेश पाठवा,एखादा प्रसंग चित्रित करा,पण चुकुनही दुस-याला मारक ठरेल अशी  कृती नकोच नको .

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar