अल्बम
सौरभला दिवाळीची सुट्टी होती. दिवाळी संपली की आठ दिवसांनी मनालीला जायचा प्लॅन त्याच्या डँडीनी केला होता. कधी एकदा दिवाळी संपते आणि आपण मनालीला जातो असे त्याला झाले होते. दिवाळीत कोणत्याही नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडे गेलं की मम्मी, आणि पप्पा त्याच त्याच गप्पा मारत. मम्मी जाईल तिथे आम्ही दिवाळीला पदार्थ केले नाही, तर विकत आणले, किती चविष्ट आहेत, कसे आणले? कुठून आणले किती कष्ट वाचले ते रंगवून सांगे. अगदी मावशीला तेच सांगत होती आणि पप्पा त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा कसा दरारा आहे, सर्व लोक त्यांचा किती आदर करतात ते सांगत होते. यात सौरभ तीचतीच स्टोरी ऐकून कंटाळून जाई. त्याला त्यांच्या स्टोरीत रस नसे. तो आता तो नववीमध्ये होता लहान मुलांच्या खेळात त्याला इंटरेस्ट नव्हता आणि मावशीची मुल लहान होती, त्यांच्या बरोबर काय खेळणार? म्हणून त्याने मम्मी, मावशीकडे जायला निघाली तेव्हा घरीच रहाण पसंत केलं.
पप्पा सकाळी आणि संध्याकाळी एक तास मोबाईल देत तेवढ्याच वेळात तो गेम खेळत असे. मम्मी तो काय खेळतो याच्यावर लक्ष ठेऊन असे. या गोष्टीची त्याला प्रचंड चीड येई. त्याच्या वर्गातील बहुतेक मुले मोबाईल आणत आणि सुट्टीत वापरत पण त्याला मम्मी कधीही मोबाईल शाळेत नेऊ देत नसे आणि टिचरने जप्त केला तर पून्हा कधीच घरी वापरायला मिळणार नाही ही धमकी देई. यावरून त्याचं आणि मम्मीचं अनेकदा भांडण झाले होते. पण पप्पा, मम्मी सांगते ते कसे बरोबर असे काही कनव्हिंस करत की त्याचा नाईलाज होई.
दिवाळीची रजा असूनही मम्मीचा रुल बदलला नव्हता, म्हणे चांगली पुस्तके आणून वाच त्याचा तुला उपयोग होईल. तो मोबाईल तुला काय उपयोगाचा, आपण मात्र तास तास गप्पा मारते ते चालत. पप्पांचं पण तेच, ही मोठी माणसं आपल्या सोईचे बरोबर घेतात, लहान मुलांना मात्र सर्व शिस्तीचे ऐकवत राहतात. त्याला दोघांचा प्रचंड राग येई .
दिवाळीच्या सुट्टीत गोष्टींची पुस्तक वाचावी म्हणून सौरभने या वर्षी शाळेच्या लायब्ररी मधून काही पुस्तके आणली होती. व.पु.काळे, बाबूराव अर्नाळकर, पु.ल.देशपांडे,अण्णाभाऊ साठे किती वाचू आणि किती नको असे झाले होते. तो सारखी गोष्टीची पुस्तके वाचतो म्हणून मम्मी तक्रार करत होती. त्यांच्याकडे एका शोकेसमध्ये जुनी पुस्तके होती. पुस्तके चाळता चाळता त्याला बरेच अल्बम मिळाले त्यात गेल्या अनेक वर्षांपासून काढलेले फोटो होते. सौरभने सहजच अल्बम चाळायला घेतले. अल्बम मधील फोटो यापूर्वी अनेक वेळा त्याने पाहिले होते. त्यात पप्पांचे कॉलेज मधले ग्रुप फोटो, पिकनीकचे फोटो, भाऊबीज करतांना असे अनेक फोटो होते आणि ममाचे लग्नानंतरचे अनेक फोटो होते.
त्यानंतर फोटोग्राफी बदलली आणि फोटो हार्ड कॉपी काढणे बंद झाले म्हणूनच त्याच्या शाळेतून विविध कार्यक्रमात काढले जाणारे विशिष्ट फोटो सोडले तर सर्व फोटो पीसीवर सेव्ह केले होते. या फोटोच्या भाऊगर्दीत एका अल्बममध्ये केवळ एकच फोटो आजोबा आजीचा होता आणि तो ही इतका अस्पष्ट झाला होता की पूढील वर्षभरात त्यावरील चेहरे ओळखण अशक्य होणार होते. घरात याच फोटोवरून बनवलेला आजी आजोबांचा एक फोटो होता. कुणी नवीन पाहुणे आले की या फोटोबाबत विचारत आणि पप्पा तो त्यांच्या आई वडिलांचा फोटो असल्याची माहिती देत.
त्यांनी या बाबत आपल्या पप्पाला विचारल की “पप्पा आजोबा आजीचा एकच फोटो कसा? ” त्याने कसेबसे समजावले आता जसे फोटो काढण्यासाठी मोबाईल किंवा कॅमेरा सहज मिळतो तसा तेव्हा मिळत नसे. गावतही फोटो स्टुडिओ नव्हते,फोटो काढण्यासाठी तालुक्याला जावे लागे. तालुक्याला लोक काही महत्त्वाचे काम असेल तरच जात म्हणून तेव्हा कुणी फोटो काढण्यासाठी मुद्दाम तालुक्याला जात नसे.”
त्याला आश्चर्य वाटले, म्हणून त्याने कुतूहल म्हणून विचारले “पप्पा, हा फोटो आजोबांनी कधी काढला? तुम्हाला माहिती आहे का?” त्याच्या प्रश्नांची उत्तरे देतांना श्रीकांतला आठवले घरात आजोबाआजी सह खाणारी आठ तोंडे होती. वडिलांची तहसील कार्यालयात कारकुनी नोकरी होती. एवढी तोंड पोसतांना फार ओढाताण होत होती. आजोंबाची औषधे वेळेवर आणणे जमत नव्हते.
कुटुंबातील इतक्या जणांना कपडे देणे तर अशक्यच होत. तरीही गावातील वकीलांचे दप्तर सांभाळण्याचे काम ते सुट्टीच्या दिवशी करून संसाराला ठिगळ लावत होते. कमावणारे एकटे आणी खाणारी तोंडे आठ. त्यातही एका बहिणीचे लग्न आणि भावाचे शिक्षण करतांना फंडातून घेतलेले कर्ज फेडतांना हाती पूर्ण पगारही येईना झाला.
श्रीकांतला हे सर्व आठवले. दिवाळीला पहिल्या दिवशी सर्व मित्र नवे कपडे घालून फटाके फोडायला मैदानात येत तेव्हा तो घरात निमूट बसून राही. किती गरीबी होती लहानपणी, तरीही आई दिवाळीचा फराळ करून घर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती, दोन वर्षांनी एकदा कपडे मिळत होते. बाबा सोडले तर चपले कुणाच्याही पायात नव्हती तरी नशीब शिक्षणासाठी नादारी होती म्हणून शिक्षण सुरु होतं. तो विचारात गुंग असताना सौरभने पून्हा प्रश्न विचारला, “पप्पा कधीचा आहे हा आजोबा आजीचा फोटो?”
तो चेहऱ्यावर भाव स्थिर ठेवत म्हणाला, “तो फोटो खुप जुना आहे साधारण चाळीस वर्षांपूर्वीचा ,आजोबा रिटायर झाले तेव्हा त्यांच्या पेन्शन फाईलवर लावण्यासाठी काढला होता.” “म्हणजे किती वर्षांपूर्वी आजोबा रिटायर झाले, तुम्ही किती वर्षांचे होता?” त्याचे प्रश्न संपत नव्हते,”आजोबा ऐंशी साली रिटायर झाले तेव्हा मी सोळा वर्षांचा होतो.” श्रीकांत म्हणाला. “पण आजोबा रिटायर्ड झाले तेव्हा काम कोण करत होत?” सौरभची सरबत्ती संपत नव्हती. “अरे तेव्हा तुझे काका शिकत होते,घरात कोणी कमावत नसल्याने आजोबांनी दुसरी नोकरी मिळवली, आजोबांना मिळणारी पेन्शन अवघी तीनशे रूपये होती आणि तुझे काका शेवटच्या वर्षाला शिकत होते ते कमावते होइपर्यंत, आजोबांना नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता.” “बापरे, पप्पा म्हणजे आजोबांना खूपच कष्ट करावे लागले, खरं ना?” श्रीकांतला मुलाच कौतुक वाटू लागले.किती संमजसपणा!
आपण तर तेव्हा वडील काही देऊ शकत नाही म्हणून किती नाराज असायचो किती त्रास द्यायचो आईला. सर्व मुले मोठे फटाके उडवायचे तेव्हा आपण वडिलांनी आणलेल्या लवंगी फटाक्या आणी फुलबाजे पाहिले की चिडचिड करायचो. सौरभने गेल्या दोन वर्षात फटाके फोडले नव्हते. शाळेत विद्यार्थ्यांनी शपथपत्र भरून “आम्ही फटाके फोडणार नाही. आम्ही प्रदूषण करणार नाही.” अशी प्रतिज्ञा घेतली होती. हे वाचवलेले पैसै आदिवासी भागात दिवाळी भेट देण्यासाठी काही सामाजिक संघटना आग्रही होत्या. सौरभ गेले दोन वर्षे या संघटनेस हे पैसै देत होता. त्याच्या या उपक्रमात आपणही जास्तीचे पैसै देत होतो. पण आपल्या लहानपणी अशी कोणतीही संघटना नव्हती. श्रीकांतला हे सार आठवलं, सौरभच्या प्रश्नांचं त्याला कौतुक वाटत होतं पण आपल्या लहानपणी किती गरीबी होती हे आठवूनही त्याला वाईट वाटत होतं.
लहानपणी अगदी दहावी पर्यंत पायात चप्पल नव्हतेच पण पुस्तकेही कोणाचीतरी वापरलेली वडील आणून देत. तेव्हा ठराविक मित्रांकडे नवीन पुस्तके असायची त्यांना तुळतुळीत खाकी कव्हर घातलेल असायच त्याच्यावर नाव लिहिण्यासाठी रंगीत लेबलही चिकटवलेल असे. या नवीन पुस्तकाचा गंध मला आवडे, नाकाला लावून हुंगावा असे वाटे. नवीन पुस्तके त्याचा तो वेगळा गंध त्याच्या वाट्याला कधी आलाच नाही.
वडील कार्यालयात जात म्हणून त्यांना चप्पल होती. आईला आणि आम्हा मुलांना कधीच चपले नसायची,आईला या बाबतीत विचारल तर म्हणे, “अरे चपले घेतली तरी, ती कधीना कधी झिजतातच पण तुझे पाय कधी झिजल्याचे पाहिलेस का? गरीबाने नसते शोक करू नये.” वडीलांच्या चपलाला किती तरी ठिगळ लावलेली असत. एकदा घेतलेल चप्पल किमान चार वर्षे वापरल्या शिवाय ते टाकून द्यायची त्यांची हिंमत होत नसे.
आई आणि वडीलांनी खूप काटकसर करून संसाराचा गाडा कसा बसा ओढला होता. जेव्हा मोठा भाऊ जयंत ग्रज्युएट होऊन कामाला लागला तेव्हा कुठे घराला बरे दिवस आले पण ते सुख भोगायला वडील राहीलेच नाहीत. सततच्या कष्टाने त्यांचे शरीर पोखरले आणि तापाच निमित्त होऊन त्यांनी अंथरूण गाठलं. औषध उपचार केले पण थकलेल्या शरीराने उभारी घेतलीच नाही. सौरभने अल्बम पहाताना जुना फोटो समोर दिसला आणि काही मिनीटात संपूर्ण जीवनपट त्याच्या डोळ्यासमोर चमकून गेला. किती कष्टाचं जीवन वडील जगले. ना कपडे, ना चपला, ना हौस ना कुठे जाणे येणे. गरीब असणाऱ्या सर्वच पालकांची स्थिती फारशी वेगळी नव्हती पण ज्यांच कुटूंब मोठ होतं, खाणारी तोंड आणि मिळकत याची जुळणीच होत नव्हती त्यांच्या संसाराची दशा खरच खूप वाईट होती. आज सौरभने आजी आजोबांचा जुना फोटो काढला आणि जखमेवरची खपली निघून जखम भळभळ वाहू लागली.
आईनेही प्रचंड दुःख भोगल होतं, तिलाही बिचारीला दोन नववारी पातळं दोन दोन वर्षे पुरवून वापरावी लागत. कधी काही साडीला लागले की धुवून धुवून कोरम झालेली साडी टरकन फाटे, धावदोरा घालून ते लांबलचक शिवाव लागे. कधीतरी मग वडिलांच्या लक्षात येई त्या साडीत शिवण्यासारखं शिल्लकच नसे तेव्हा बारा पंधरा रूपयाची नववारी कोरी पातळ घरी येत. आई ती पातळ धुवून देवासमोर ठेवी आणि म्हणे “ईश्वरा यात तुझच अस्तित्व आहे,ते टिकवण तुझी मर्जी.” त्याला हळद कुंकू लावून मगच घडी मोडत असे. बिचारीला खुपच काटकसर करावी लागली. हे सार आठवुन त्याचे डोळे डबडबले.
आज त्याच्याकडे घर, गाडी, बँक बॅलन्स आणि स्थैर्य सार काही होतं पण आईवडीलांनी भोगलेले दु:ख विसरू शकेल अस औषध बाजारात नव्हतं. या ऐश्वर्याचा उपभोग आई आणि वडीलांना देता आला नाही, त्यांना सुखी पहाता आलं नाही. त्यांच जीवन हाल अपेष्टा यातच संपलं हे आठवलं.त्याच्या डोळ्यात अश्रूचा महापूर होता आणि पप्पा आजोबा आजीचा फोटो पाहून का रडतो हे सौरभला कळत नव्हते.
“पप्पा,काय झालं? तुम्ही असे का रडताय?”
“सौरभ, हा फोटो पाहून तुझ्या आजी,आजोबांची आठवण आली. बिचा-यांनी खूप दु:ख भोगलं,खूप गरीबी भोगली आणि जेव्हा तुझे काका आणि मी कमावते झालो त्या दरम्यान दोघही दूरच्या प्रवासाला निघुन गेले. कोणतच सुख,समाधान आम्ही त्यांना देऊ शकलो नाही.” सौरभही गंभीर झाला, “पप्पा नका रडू, आजोबा आजीची आठवण कायम रहावी म्हणून आपण काहीतरी वेगळ करू. त्यांच्या नावाने दर दिवाळीला आदिवासी भागात जाऊन फराळ वाटू. त्यांची आठवण म्हणून गरीब वस्तीत चपला दान करु,चालेल ना?”
मुलाचे असे जगा वेगळे विचार ऐकून त्याला आश्र्चर्य वाटलं, “सौरभ, हे दान करण्याच तुला अचानक कस काय सुचलं? ,खर तर मलाही अस काहीतरी करावं अस वाटत होते पण नक्की कोणाला द्यायचं आणि आपण गरीब आहोत म्हणून हे लोक येऊन दान करतात अस वाटलं आणि त्यांचा स्वाभिमान दुखावला तर आपली ट्रिप मोफत जायची.”
“पप्पा,परवा आम्ही मैंदानात खेळत होतो, सर्वच मुले होती, त्यात त्या मैदानाच्या शेजारी असणाऱ्या चाळीतील मुले पण होती. एक काका आले आणि कॅडबरी वाटू लागले, मी कॅडबरी घेत नव्हतो तर म्हणाले अरे घे आत्ताच विकत आणल्या आहेत,सर्व मुलांना वाटल्या तू ही घे.” मी विचारले,आजोबा तुम्ही कॅडबरी का वाटता? तर म्हणाले “आज माझ्या मुलाचा वाढदिवस असतो.” मी म्हणालो, “मग त्याला घेऊन का नाही आलात? आम्ही त्याला Happy BirthDay करु.” ते म्हणाले “आता तो या जगात नाही म्हणून त्याच्या आठवणी दाखल त्याच्या Birthday ला मी मुलांना खाऊ वाटून त्याची आठवण ठेवतो.”
“पप्पा हे सांगताना त्यांचे डोळे डबडबले होते. मला खूप वाईट वाटलं. मी विचारले “आजोबा काय झाले तुमच्या मुलाला? किती वर्षांचा होता? ते म्हणाले “एक दिवस रात्री ताप आला, दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे नेणार होतो पण रात्री ताप वाढला आणि तो बेशुद्ध पडला, तो उठलाच नाही, हे जग सोडून निघून गेला. खुप हुशार होता. किती स्वप्न पाहिली होती. पण सारच संपल. त्याची आठवण म्हणून मी दर वर्षी त्याच्या जन्मदिनी चाँकलेट वाटून त्याच्या स्मृती जागवत असतो.” किती चांगला विचार ते करतात. मला त्यांचा विचार आवडला. मी मोठा झालो की असा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करेन, जे दु:ख आजी आजोबांच्या वाट्याला आले ते दु:ख चार कुटुंबातून दूर करण्याचा मी प्रयत्न करेन.”
त्याचे संमजस विचार ऐकून श्रीकांतने त्याला जवळ घेतले, “सौरभ हे तू मनापासून सांगतोस ना?” “होय पप्पा अगदी मनापासून. याची सुरुवात याच वर्षी करु.आपण शहापूर, मोखाडा अशा आदिवासी पाड्यावर भेट देऊन येऊ आणि काय करायचं ते नक्की करु, आपलं मनाली, आता नक्की आदिवासी पाड्यावर.”
त्याचे विचार ऐकून श्रीकांत चाटच पडला. कुठेतरी समाजसेवेचे बी अंकुरत होते हे पाहून त्याला आनंद झाला. जे सुख आपल्या आई वडिलांच्या वाट्याला आले नाही त्याची आठवण मनात ठेऊन त्याच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्या जवळून एखादे समाजोपयोगी काम करणे शक्य झाले, एखाद्या गरीब वस्तीत भेट देऊन त्यांना अल्प प्रमाणात का होईना मदत करणे शक्य झाले तर त्या सारखा दुसरा आनंद नाही. अल्बममध्ये असणाऱ्या आई वडिलांच्या एकुलत्या एक फोटोच्या माध्यमातून जी कहाणी श्रीकांतने सौरभला सांगितली त्यामुळे सौरभ इतका बदलेल अस त्याला खरच वाटेना पण सौरभने मनाली पिकनिक रद्द करून त्या पैशांतून मोखाडा येथील विद्यार्थी आश्रमासाठी शालोपयोगी भेटवस्तू खरेदी केल्या तेव्हा सौरभ आपल्या विचारांशी ठाम असल्याची खात्री श्रीकांतला पटली. एक शुल्लक वाटणारी घटनाही विचारात अमुलाग्र बदल घडवून आणू शकते. सौरभने जूना अल्बम चाळला आणि त्याला मैदानावरील घटना आठवली. आपल्या आयुष्यात कोणती घटना जीवनाला कोणते वळण देईल ते त्या विधात्यालाच माहीत.
छान, कथा आवडली ?
?
अतिशय हृदयस्पर्शी कथा!
अतिशय सुंदर कथा.सर तुमचं लिखाण खूपच छान आहे.
अतिशय सुंदर लेख आहे, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली.
i like this great post
Thanks for comments to my all
reader friends.