आनंदाचे विरजण

आनंदाचे विरजण

म्हणतात युध्दात आणि प्रेमात सगळंच असतं माफ
म्हणूनच का पत्नीने सांडावं सासरी भरलेलं माप
घरात प्रवेश करतांना लक्ष्मी पाऊल उमटवत येते
येतांना स्वतःबरोबर चैतन्य आणि समृद्धीही आणते

ती येताच सासूला आई, सासऱ्यांना मामाच म्हणते
नणंद तिची ताई, दिराचा उल्लेख भावोजी असा करते
म्हणता म्हणता भोवती नात्याची सुंदर गुंफण विणते
सासूच्या हाताखाली शिकता शिकता सुगरण बनते

लाडावलेल्या नवऱ्याला संयमाने हळूच शिस्तही लावते
नवनवीन अनुभव घेत घेत संसाराचे विरजण घालते
आधी असतोच थोडा रुसवा फुगवा मग चांगली मुरते
कडू गोड अनुभव, अश्रू डोळ्यात, त्याच्या मिठीत शिरते

दोन चार महिने रुळायला लागतातच मग गाडी धावते
घरी येणाऱ्या पाहुण्यांना आत्या, मावशी, मामा, काका म्हणते
त्यांचे स्वागत करतांना हातचं न राखता मनमोकळी वागते
तिच वागणे, गोड हसणे, टापटीप राहणे, यामुळे लाडकी बनते

कष्टाचे तिच्या कौतुक, तिची हुशारी, गोड स्वभाव, घर भुलते
तिचे कौशल्य, नम्रता, तिचा ध्यास, सहवास ती रक्तात भिनते
सासूसासरे यांची सेवा, हवं नको पाहता पाहता बरीच थकते
सासू तिच्या अपरोक्ष तिचे कौतुक करते, तिची कळी खुलते

सरकत जातो काळ, मंदावती तिची पावले, वेलीवर फुलं फुलते
सुखाचा तो काळ, आईच्या प्रेमाने, तिचा सांभाळ, सासूच करते
सासरचं बनते माहेर, तेव्हा सुखाचा पूर, स्वर्ग दोन बोटे उरते
तिच्या आईला याचा हेवा, राहो आनंदाचा ठेवा, सारे स्वप्नच वाटते

भरली ओटी सातव्या महिन्यात सासू घाले सुनेवर मायेची पखरण
नणंद, दीर, दर आठवड्यात वेळ काढून रिझवू लागले तिच मन
सासरे उत्साही त्यांनी लावल्या चंपा, चमेली झाले प्रफुल्लित वातावरण
नवरा रोजच फिरतांना तिची क्षणोक्षणी करू लागला पाठराखण

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar