आनंदाच्या शोधात

आनंदाच्या शोधात

लहान मुलांना आनंद कशाने होत़ो? , अचानक मिळालेल्या चॉकलेटने, ध्यानी मनी नसतांना आई किंवा बाबा यांनी आणलेल्या कपड्यांनी, वाढदिवशी आणलेल्या नावाच्या केकने, आवडीचे खेळणे बाबांनी न कूरकूरता खरेदी करून हाती दिले तर, शाळा सुटल्यावर बर्फाचा रंगीत गोळा आईने घेऊन दिला तर! मामाच्या गावाला रेल्वे गाडीने जातांना विंडो सीट मिळाली तर! ही यादी मोठी असेल. नक्की नाही ना सांगता येणार? आनंद शोधण्याच माध्यम वेगळे असू शकेल पण आनंद होणं ही नैसर्गिक उर्मी आहे. तो सांगून किंवा जबरदस्तीने होत नाही. झोपडीत रहाणाऱ्या मुलांचा आनंद आणि सुखवस्तू घरात राहणाऱ्या मुलांचा आनंद याचे कारण भिन्न असेल पण आनंदाने होणारी भावना सारखीच असेल.

पन्नास वर्षांपूर्वी आम्ही शाळेतून परत आलो की पिशवीतलं दप्तर टाकून शाळेचे कपडे बदलले की आई देईल तो चहा अगदी उभ्या उभ्या पिऊन खेळायला मैदानावर जायचो. येथे अंधार होईपर्यंत लगोरी,उभा खो खो, बैठा खो खो, लंगडी, आबाधुबी, असे वाट्टेल ते खेळ खेळायचो. अंगातून घाम निथळला कधी आणि सुकला कधी हे पाहण्याचे भान नसायचे. टेनिसच्या चेंडूने बॅट बॉल खेळायचो.कधी कधी प्रत्येकाला बॅटींग नाही मिळायची. अंधार पडला की बॉल हरवण्याची भीती, कधीतरी बॉल झुडपात हरवायचा, तासभर शोधून सापडत नसे आणि अचानक झाडावरून खाली पडायचा पण त्यावेळी होणारा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत.

रस्त्यावर एक चिंचेच खूप मोठं झाड होत,हिवाळ्यात ही चिंच तयार होत असे. अर्धवट पिकलेल्या चिंचेला आम्ही “गोरमली” चिंच म्हणायचो, त्या चिंचा नजरेने किंवा नख लावून हेरना यात धम्माल असायची.पॅन्टचे दोन्ही खिसे भरेपर्यंत आधाशीपणे आम्ही चिंचा काढायचो आणि वाटायचो. त्या चिंचा वाटताना किती आनंद व्हायचा तो सांगता येणार नाही.आमच्यापेक्षा लहानमुले “ए दादा मला दे रे” म्हणायची तेव्हा मूठभर चिंचा त्याला दिल्या की तो खुश व्हायचा.

कधी नेम धरून कैऱ्या पाडणे तर कधी विलायती चिंचा तर कधी विलायती आवळे. सब हमारे बाये हात का खेल था. या टग्या आहारानी पोट भरत असे. ना बिस्किटे, ना बटर ना ब्रेड, भिस्कीट अगदी मिळालीच तर बाबांचा महिन्याचा पगार होईल त्या आठवड्यात, ती ही बटण बिस्कीट, गोड, खारी किंवा ग्लूकोज, पण त्यातही आनंद होता आई म्हणायची, “आपली परिस्थिती पाहताना गरीबाकडे पहाव आणि प्रगती करताना आपल्यापूढे गेलेल्या यशस्वी माणसाकडे पहाव.”



affiliate link

पावसाळ्यात पाण्यात पाय आपटत चपक चपक करत चालण्याची मौज आणि लाकडी दांड्याची कमळाची चोवीस कांड्याची छत्री गोलाकार फिरवत पाणी उडवण्याची गंमतच वेगळी. या छत्रीत माझ्या सारखे लुकडे तीन आरामात मावयाचे . आताच्या छत्र्या म्हणजे भारी गंमत, लेडीज छत्रीचं तर विचारूच नका फक्त डोक भिजत नाही यातच सुख, सरळ पावसाळी टोपी डोक्यावर घ्यावी. छत्री असूनही भिजण्याचा आणि आपल्या सोबत पार्टनर असतांना एकाचा डावा खांदा आणि तिचा किंवा त्याचा उजवा खांदा छत्रीखाली भिजवण्याचे सुख वेगळेच, भिजूनही आनंदच, ते काय म्हणतात ते “दिल मांगे मोर” असं म्हणत मोर आणि लांडोर दोघही भिजतात अगदी दिमाखात.

पावसाळ्यात गावाकडे आम्ही मोठाली डबकी शोधून पोहायचो, ती आमची पोहण्याची प्रायमरी, तुम्ही म्हणाल, “शी, डबक्यात?” अहो तेव्हा त्या डबक्यातलं पाणी एकदम निर्मळ आणि हो तेव्हा आता सारखा भिजून ताप वगेरे काही नाही यायचा. झालीच सर्दी तर आई सफेद कांदा, बेल, तुळस गवती चहा, अडूळसा यांचा काढा करून द्यायची की सर्दी गायब.

मग वय वाढलं तस ओहोळ आणि तुडुंब भरली विहीर अशा पुढील यत्ता पास झालो. ना प्रशिक्षक ना लाईफ जॅकेट. पोहायला किती गंमत यायची. कधी सूर मारून, कधी पाठीवर पडून, कधी हात किंवा पाय न हलवता. बुडालो नाही मेलो नाही म्हणून लिहितो. कधी कधी पाण्याच्या दाबाने हाफ पॅन्ट वर वर व्हायची तर कधी मासे हळूच गुदगुल्या करायचे.भारीच गंमत. किती आनंदी दिवस होते. आता “जाने कहा गये ओ दिन” अस दिनवाणे म्हणावेसे वाटते. आजही पाणी पाहिले म्हणजे उलाघाल होते, नदीत उतरून दोन हात मारतो पण आमची ही, “अहो। पाठी फिरा, पाठी फिरा म्हणते ना,आता तरुण राहिला नाहीत, वाहत जाल आणि मी पाण्यात उतरू शकत नाही, फुकट मराल.” म्हणजे हिला काळजी तिच्या ड्रेसची, साडीची किंवा आपण पोहू शकत नाही याची. असो तुमचं काहीसं असेच असेल, कोणी बोलतं कोणी नाही बोलत स्वभाव ज्याचा त्याचा.

पाऊस कमी, कमी होत धूक सुरू व्हायचं, ते धुके हळूच झाडावर, गवतावर उतरायचे. रस्त्यावर असंख्य गांडूळ किंवा गोगलगायी यायच्या नाही म्हटलं तरी पायाखाली यायच्याच त्यांचा तो बुळबुळीत थंड स्पर्श विचित्र वाटायचं. कधीतरी साप वेटोळे करून उब घ्यायला रस्त्यावर बसायचा. साप दिसल्यास चार दगडात मुल ठेचून टाकायची. कधी एकाच वेळेस सात नानेटी यायची, मुले त्यांना शेपटी धरून गरगर फिरवून दूर फेकायची. आता त्यांच्या संरक्षणाचं महत्त्व कळतय. त्या धुक्यातून जायची गंमतच मोठी.गवताच्या पात्यावर सकाळचे किरण पडले की गवतावर जमा झालेल्या पाण्याच्या थेंबातून प्रिझम मधून निघतात तशा रंगीत शलाका बाहेर यायच्या. गंमत वाटायची.

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा ठेवा, ना चिंता ना चिंतन सारेच जपूया बालपण. या आठवणी मनोहर असतात.जर तुमच्याकडे वीस तीस वर्षांपूर्वीचा अल्बम असेल तर तो काढून आताही निवांत वेळी बसा. पहा किती आठवणी त्या फोटोभोवती जाग्या होतील. त्या प्रत्येक फोटोमागचा इतिहास जागा होईल.
काही गमती जमती आठवतील.त्यात तुमच्या मुलांचे किंवा नातवाचे लहान असतानाचे किंवा तुमच्या लग्नातील फोटो पाहाता पाहता तुम्ही आठवणीत हरवून जाल. स्वतःशी हसाल. जवळ नात असेल तर विचारले आज्जी एकटीच का हसतेस सांग ना? अर्थात ती गंमत कदाचित नातीला सांगण्यासारखी नसेल आणि तुम्हाला काय सांगावे हे न कळून हसूच येईल. आठवणीतही आनंद लपलेला असतो.



affiliate link

कोणी कशात आनंद शोधायचा ? हे ज्याने त्याने ठरवाव. वर्गात, शाळेत किंवा परीक्षा मंडळात प्रथम आल्याने होणारा आनंद भिन्न कसा असेल? आनंद कदाचित किती झाला आहे हे समजण्याचं काही परिमाण असल्यास मी तरी अनभिज्ञ आहे. एखाद्या तासाला शिक्षक गैरहजर आहेत आणि धम्माल करायला मिळणार एवढ फुटकळ कारणही आनंदाची पखरण करू शकतं. वर्गात सर्वात जास्त गुण मिळाले किंवा कमी फटके मिळाले तरी आनंद होतो. शिक्षकांचा फटका चुकवला तरी आनंदच होतो. माझ्या आनंदाचे कारण काय असावे? हे कोणीही ओळखू शकणार नाही हेच सत्य. आनंद कोणाला आणि कशामुळे होतो हे कोणी ठरवू शकत नाही. आणि कोणाला होत नाही असे काही ठरवता येत नाही. ध्यानस्थ साधू डोळे मिटून हसत असेल तर त्याच्या आनंदाचे कारण कसे कळणार ? पण सामान्य माणसाच्या अपेक्षा मर्यादित असतात. तर सुखवस्तू माणूस कदाचित कशानेही आनंदी होऊ शकणार नाही.

देवळा बाहेर, मशिदी बाहेर किंवा गुरुद्वारा बाहेर बसणाऱ्या गरीब भिकाऱ्याला एखाद्या भक्तांनी चक्क १००ची कोरी करकरीत नोट दिली तर त्याला आनंद होईल की नाही? आनंदाने त्याला हसू येईल की नाही? कोणी भिकारी लंगडत लंगडत भीक मागत तुमच्याकडे आला आणि थोड्या वेळाने तुम्ही पाहिले की तो मस्त दोन्ही पायावर आरामात चालत निघाला आहे तर तुम्हाला त्याने मूर्ख बनवल्या बद्दल हसू येईल की नाही? मनात नक्की म्हणाल साला मूर्ख बनवून गेला. वास्तविक असे बरेचजण आपल्याला हातोहात मूर्ख बनवतात मग तो साडी विकणारा सेल्समन असेल किंवा फळ विक्रेता असेल. खऱ्या बाजार भावाच्या दोन पट किंवा अडीच पट भाव सांगून तुम्ही बार्गेन करत ती वस्तू खरेदी करता तेव्हा त्याला भरपूर प्रमाणात नफा झालेला असतो, तो आढेवेढे घेत इतकी कमी किंमत नाही हो परवडत अस म्हणून ती वस्तू तुम्हाला बऱ्याच कमी किमतीला विकतो. तुम्हाला वाटत मीच म्हणून किंमत इतकी कमी केली. तो तुम्ही दुकान सोडताच मित्राला म्हणतो, “साला मॅडमको एकदम फुलं उल्लू बनाया. पचास टक्का प्रॉफिट कमाया.” तुम्हाला वाटते किंमत बरीच कमी झाली. तुम्ही ही खुश. अज्ञानात सुख असते ते असे.

एखाद्या भिकाऱ्याला श्रीमंत भक्ताने दहाची नोट त्याच्या भांड्यात टाकून आठ रुपये परत घेतले तर हसू येईल की नाही. एखादा भक्त पाकिटात फारच शोधाशोध करून नाईलाज म्हणून पन्नास किंवा शंभर रुपयांची नोट टाकत असेल तर पुजाऱ्याला, अरे रे ! बिचाऱ्याचा नाईलाज झाला असे वाटून हसू येईल की नाही किंबहुना शंभर रुपये पाहून आनंदही होईल. तुम्ही खरेदीला गेलात आणि काही खरेदी केल्या नंतर वाण्याने तुम्हाला सुट्टे
देताना चुकून तुम्ही दिले होते त्यापेक्षा जास्त रक्कम परत केली तर तुम्हाला आनंद होईल की नाही? तुम्ही लोभी नसाल तर त्याचे अधिकचे पैसे परत करतांना तुम्हाला आनंद होईल की नाही? तेव्हा तुमच्यावर कोणाचा किती प्रभाव आहे? तुम्ही कसा विचार करता यावर तुमची कृती अवलंबून आहे. तुम्ही चांगल्या संस्कारात वाढला असाल तर कोणाचे फुकटचे पैसे तुम्ही लाटणार नाही. पैसे परत करतांना तुम्हाला आनंदच होईल.

एखादे व्यंगचित्र पाहिल्यावर मनास आनंद होतो की नाही ? चार्ली चॅप्लिन याचा मुकपट पाहून हसायला होते की नाही? पुणेरी पाट्या आणि त्यांचा चिंगूस स्वभाव ऐकून हसू येते की नाही. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, यांचे कॉमेडी चित्रपट पाहून हसू फुटते की नाही. किंवा अनेक विनोदी वक्ते आणि त्यांच लकबीसह केलेल भाषण हसायला भाग पाडत की नाही, तेव्हा लेको मन मुराद हसा कारण रडण्यासाठी किंवा गंभीर राहण्यासाठी संसार, ऑफिस इथे अनेक अप्रिय घटना आहेतच. तेव्हा उर्मी न दाबता आनंद व्यक्त करायला शिकूया. चि.वी.जोशी, वि.आ. बुवा, मग पू.ल, अत्रे, नगरकर इत्यादी लेखकांची पुस्तके वाचू. चार्ली चाप्लीनचा मुकपट पाहू वा काही वात्रटिका ऐकून पाहून हसू . बबन प्रभू आणि याकूब सैद यांचं हास परिहास आठवा, आताची हास्य जत्रा किंवा चकटफू अर्थात भाऊ कदम यांचं त्याच पठडीतील काव्य फिक वाटते. या सगळ्या मागे दडलाय आनंद.

असं म्हणतात रोज खळखळून हसल तर आयुष्य वाढतं. बरं हसायला पैसे नाही लागत. तरीही काही जणांचा चेहरा असा लांबट असतो की कोणत्याही विनोदावर हसत नाहीत. जणू मी हसणार नाही अशी शपथ घेऊन आले असावेत किंवा जर हसले तर त्यांचा मेक अप जाईल किंवा काही नुकसान होईल.अशा लोकांच्या सानिध्यात शंका येते, विनोद झालाच नाही की यांना कळला नाही. असो अशा लोंकाची किव करावीशी वाटते. उत्स्फूर्त दादा देण्यात कसली कंजूषी करावी. मग आनंद कसा होणार?

पण काही व्यक्तींना मात्र हसण्यासाठी फारसं काही कारण लागत नाही. अशा व्यक्ती चांगल्या गोलमटोल असतात. ते हसताना त्यांच्या शेजारी बसणं म्हणजे स्प्रे पेंटिंग करून घेण्या सारख असत. तर काही व्यक्ती एखाद्या किंवा प्रत्येक विनोदावर द्या टाळी किंवा घ्या टाळी म्हणून हात पूढे करतात आणि इतक्या जोराने टाळी देतात किंवा जोराने त्याची मांडी थोपटतात की विनोदावर हसण्या ऐवजी डोळ्यातून पाणी यावं. पण एखाद्या प्रसंगी शेजारी ओळखीच्या कुणी बाई बसल्या असतील आणि जोक ऐकल्यावर ह्यांनी नेहमीच्या सरावाने मांडी थोपटण्याचा प्रयत्न केला तर!. काही व्यक्ती तोंड न उघडता म्हणजे दात दिसणार नाही अशा बेताने हसतात. म्हणजे फक्त चेहऱ्यावर हसू आणल्या सारख करायच पण हसायच नाही. ही कसली सभ्यता. खळखळून किंवा गडगडाटी हसणे ही विनोद समजल्याची पोचपावती. तोंड न हलवता चहा पिणारे किंवा काही खाणारे अति संयमी असतात. चहा पितांना भले फुरssss आवाज नका काढू, ते ही चांगलं नाही पण तोंड न उघडता हसायचं म्हणजे थोड अतिच झाल. कोणत्याही गोष्टीचा आनंद घ्यायचा तर समरस व्हाव लागत आणि आनंद झाला तरी हसायचं नाही म्हणजे शिक्षाच की.

कायम ड्रेस मध्ये वावरत असलेली मुलगी जर नववारी किंवा सहावारी साडीत वावरण्याचा प्रयत्न करू गेली तर तिची जी फजिती होईल, त्याने बघे एन्जॉय करतील की नाही. जर अचानक साडी सुटली तर गोंधळ होईल की नाही? खेडे गावातून शहरात आलेल्या मुलीला अचानक मॉडर्न ड्रेस आणि उंच टाचाच्या सँडल दिल्या तर तो ड्रेस सावरताना किंवा चालतांना जो गोंधळ उडेल तो पाहून हसू येईल की नाही. अशा गावातील मुलीला चायनीज नूडल्स स्टिकने खायला सांगितल्या आणि त्या खाताना तिची जी भावमुद्रा होईल ते पाहून गंमत वाटेल की नाही. अशा कित्येक गमती जमती घडत असतात, तुम्ही डोळे उघडे ठेऊन पाहिलत तर असे अनेक प्रसंग आपल्या भोवती घडत असतात. आपल्याला खळाळून हसायला भाग पडतात. ग्रामीण आणि शहरी भाषा आणि त्यातील लकबी याचा पुरेपूर वापर दादा कोंडके करत. म्हणून दादा कोंडके यांनी सोंगडया सारखे चित्रपट फक्त मनोरंजनासाठी काढले. ना उपदेशाचे डोस, ना भारदार संवाद तरीही प्रेक्षकांना धरून ठेवण्याची क्षमता या चित्रपटात होती. अर्थात कमरेखालील विनोद म्हणून त्यांची हेटाळणी झाली.
काहीजण हसताना अख्ख शरीर गदागदा हलवतात. किंवा हातवारे करुनही हसतात ज्याची त्याची मर्जी. आनंद व्यक्त करायचा तर गडगडाटी हसल नाही तरी चेहरा बोलला पाहिजे.
शाळेत असताना आम्हांला खानदेशातील एक शिक्षीका नव्याने आल्या होत्या. त्या गणीत विषय शिकवत आणि गुणीले म्हणण्या ऐवजी गुणीला म्हणत. आमच्यासाठी हा उच्चार नवीन होता, सगळी मुलें मान खाली घालून त्यांच्या गुणीला शब्दावर खुसखुसत, पण एकदा अस करतांना एका मुलाला ठसका लागला आणि सर्व मुले जोराने हसायला लागली. बाईंना कळेना ठसका लागला तर त्यात हसण्यासारख काय आहे? का हसताय रे पोट्यांनो अस त्या म्हणताच पाठीमागच्या बाकावरून एक मुलगा ओरडला. बाई गुणीला. सर्व मुल जोराने हसू लागली पण बाईंना, तरीही आपले काही चुकले असे वाटेना तो शब्द त्या सरावाने तसाच वापरत होत्या. त्यांनी त्या मुलाला जवळ बोलावून विचारलं तेव्हा तो म्हणाला, तुम्ही गुणीले न म्हणता गुणीला म्हणता म्हणून मुलं हसतात. तेव्हा कशामुळे विनोद घडेल ते सांगता येत नाही. विनोद बुद्धी असेल तर कोणत्याही प्रसंगी माणूस सावरू शकतो पण विनोद बुध्दी नसेल तर प्रसंगी अपमान नाट्य रंगू शकत.

आनंदी रहाणं ही काही कुणाची जहागीरी नाही, त्यामुळे आनंद श्रीमंतांना होतो आणि गरीबास होत नाही असही नाही. आनंदाचे कारण, आनंदाचा प्रसंग वेगळा असेल पण आनंद झाल्यावर त्याचे प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटणार यात शंका नाही. धष्टपुष्ट माणसाला नाष्ट्याला छोट्या प्लेटमध्ये उपमा किंवा पोहे दिले किंवा लहान मुलांसाठी किंवा लग्न समारंभात बनवतात तसे मीनी बटाटेवडे दिले तर त्याची प्रतिक्रिया काय असेल? त्या प्लेटकडे पाहून तो हसेल की नाही. त्याने तो मीनी बटाटा वडा शेंगदाणा तोंडात टाकावा असा टूणकन आपल्या तोंडात टाकला तर ज्यांच्या घरी तो पाहूणा म्हणून गेला असेल त्या महिलेची प्रतिक्रिया काय असेल. कोल्हापूरची व्यक्ती पूण्याला आपल्या नातेवाईकांना भेटायला आली आणि जेवतांना लिज्जत पापड आकाराच्या चार पाच पोळ्या वाढल्या नंतर त्यांनी त्या दोन घासात संपवल्या तर पूणेरी गृहिणीची प्रतिक्रिया काय असेल? तो पाहुणा त्या पोळ्या पाहून हसून काय म्हणेल? स्वयंपाक करण्यापूर्वी एखाद्या पाहुण्यांना गृहिणीने विचारले, भावोजी तुम्ही किती चपात्या खाणार ? तर त्याची प्रतिक्रिया काय असेल? गावाकडून आलेला पाहुणा दुपारी वामकुक्षी साठी झोपल्यावर तार सप्तकात घोरू लागला आणि टॅक्सी चढणीला लागल्यावर जसा आवाज करते तसे अधून मधून घोरण्याचे गियर पडू लागले तर घरातील इतर मंडळींची अवस्था किंवा त्याच्या बरोबर आलेल्या महिलेची अवस्था काय होईल?





रातराणीने प्रवास करताना पहाटेची गार झोप लागलेली असते आणि इतक्यात एखादा प्रवासी अन्साउंसमेन्ट नीट न ऐकता लगबगीत सामानासह उतरतो. आणि उतरल्यानंतर लक्षात येते की तो चुकीची अनाऊन्समेंन्ट ऐकून उतरला होता. जेव्हा तो त्याच लगबगीने पून्हा एसटीत चढेल तेव्हा आतील प्रवाशांची प्रतिक्रिया काय असेल. किंवा पून्हा चढताना भलत्याच एसटीत चढला तर ? एसटीत ने प्रवास करतांना झोप अनावर झाली आणि अनाहूतपणे शेजारी बसलेल्या श्रीमती पेसेंजर यांच्या खांद्यावर तुम्ही सहज डोके ठेवले आणि राग येऊन श्रीमतींनी श्रीमुखात भडकावली तर! किंवा या उलट घडले आणि तुम्ही डोळे मिटून घेतले आणि अचानक श्रीमतींना जाग आली आणि त्यांनी तुम्हाला सॉरी म्हटले तर ? चालतांना एकाच जागेवर थोड्याच अंतराने कोणी घसरून पडले तर किंवा एखाद्या महिलेच्या अंगावर घसरून कोणी माणूस पडला आणि तिने काही जाणून न घेता त्याच्या श्रीमुखात दिली तर बघे काय करतील? तेव्हा अचानक घडणाऱ्या कृतीतुन हास्य निर्माण होत असते. किंवा नकळत घडणाऱ्या संवादातून हास्य निर्मिती होते. एका सहा वर्षाच्या खेडूत मुलाने आपल्या आई जवळून ऐकले होते, की त्यांची गाय लवकरच बाळ देणार आहे, आत्ता ती गाभण आहे. त्यांनी परिचयाच्या एका काकांना विचारल. काकू कुठं आहेत? त्यांनी सांगितलं ती माहेरी आहे, तिला बाळ होणार आहे? त्या मुलांनी विचारल काकू गाभण आहेत का? काकांना हसावं की रडाव कळेना. तेव्हा तरी ते हसले.

तेव्हा हास्य आणि आनंद ह्या एक नाण्याच्या दोन बाजू आहेत. काही विनोद घडला तर हसू येणारच आणि अर्थात आनंदही होणार यात काय शंका! कधी कधी घाई गडबडीत टी शर्ट उलटा घातला जातो तर गडबडीत कधी पॅन्टची चेन लावायची राहून जाते.बर निघण्याच्या घाईत ती गोष्ट त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. तो अवतार पाहून जाता जाता अनेक जण त्यांना हसतात आणि आपलीही अशी फजिती कधीतरी झाली होती हे आठवून पुन्हा हसतात. त्यांना हसताना पाहून तिसरी व्यक्ती मनाशी म्हणते बहुतेक पागल दिसतो, उगाचच हसतोय. त्याने का मोठ्याने म्हणावे, “अहो काका तुमची चेन उघडी आहे त्यातून नाडी लोंबते, आधी लावा ती चेन” पण कोणीतरी खुणेने काकांना पॅन्टकडे हात नेत सुचवतो आणि काका जेव्हा हात लावून पाहतात टपाल पेटी उघडी पाहून स्वतः खुदकन हसतात. अरेच्चा अस झालं होय! बरं हा किंवा या सारखा प्रसंग कोणाच्याही बाबतीत अनावधानाने घडतो. दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत घडला की त्याला आठवण होते. तेव्हा गंभीर प्रकृतीची माणसेही अशा प्रसंगी मनमोकळे हसतात. जो माणूस स्वतःच्या कृतीवर हसू शकतो त्याला विनोदबुद्धी आहे असं म्हणायला हरकत नाही.

मोकळ्या मनाची माणसं आनंदी असतात किंवा विनोदबुद्धी असणारी माणसं आनंदी राहू शकतात आणि आनंद पेरतात.शिरीष कणेकर यांचं खुसखुशीत लेखन वाचतांना कुणाला हसू फुटणार नाही किंवा व.पू काळे यांचं लिखाण कोणाला आनंदित करणार नाही? वऱ्हाड चाललं लंडनला फेम लक्ष्मण देशपांडे यांचे हावभाव किंवा वाचन कोणाला हसविल्या शिवाय थांबेल का? सहजगत्या किंवा नैसर्गिक लिखाणातून होणारा आनंद वेगळाच असतो. कोणाच्या व्यंगावर बोट दाखवून हसणे अयोग्य.जो संगीताचा शौकीन आहे तो अगदी प्रवास करतानाही पायावर ठेका धरतो किंवा गुणगुणतो हाच ठेका त्यानी टकलू मित्राच्या डोक्यावर धरला तर. किंवा शौचालयात जर तो “आजा आजा” गुणगुणत असेल तर?

तेव्हा विनोद निर्मिती करणारा आनंद देऊ शकतो, तुमच्या प्रापंचिक अडचणी दूर ठेऊन जर तुम्ही विनोद बुद्धी असणाऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात वावरलात तर तुमच्या निम्म्या व्यथा दूर होतील. दुःख ,व्यथा सगळीकडे आहेत त्यांना कुरवाळत बसलो तर आपण त्यातुन बाहेर पडणार नाही,आणि आपल्या सोबत असणाऱ्या सोबत्याला आनंदी ठेऊ शकणार नाही, म्हणून मनमोकळे बोला. प्रतिष्ठा, शिक्षण, संस्कार, समाज यांची चौकट थोडी दूर सारून मोकळे जगा तरच आनंदी राहता येईल. मनमोकळ हसता आल तर स्वभावात आपोआप बदल होतो. व्याधी कमी होतात किंवा सुसह्य होतात.

अगदी मृत्यूच्या दारात उभा असलेला माणूसही म्हणतो, “माझा नंबर तर आहेच पण यमाला, यामिनी भांडीकुंडी आवरून जा अशी ताकीद दिली आहे त्यामुळे उशीर झाला असेल, आमच्या हिला विचारून पहा मला ही कधीकधी ऑफिसमध्ये जायला व्हायचा उशीर, नाही का ग.” त्यावर ती खळाळून हसत म्हणायची, “हो तर ! तुम्ही शेजारच्या घरचीही भांडी उरकून जात होता, मला मेलीला माहीत नाही की काय ? पण तुमच्या नाष्ट्याची भांडी मी कामावरून येई पर्यंत टीपॉयवर असायची बर.” अर्थात विनोद बुद्धी असली तरच हे जमेल. तेव्हा जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुसडा, घुमा स्वभाव उपयोगाचा नाही हेच खरं. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या च्या धर्तीवर, विनोद घ्या मिश्किल व्हा, हसा, हसवा आणि आनंदी रहा.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “आनंदाच्या शोधात

  1. Bharat R Kale

    Khup chan lekh vachun anand zala

    1. Mangesh kocharekar
      Mangesh kocharekar says:

      धन्यवाद भरतजी.

Comments are closed.