आनंदाश्रम
वृद्धाश्रमात येऊन नक्की किती वर्षे झाली माहिती नाही, आताशी कालगणना करता येत नाही. खोलीतील कॅलेंडरवर नजर पडली आणि त्यावरचे वर्ष दिसले पण २०२१ म्हणजे किती वर्षे पाठी सरली आणि किती वर्ष भोग अजून बाकी आहेत माहिती नाही. कधी कधी सर्व आठवतं तर कधी काहीच आठवत नाही.
हा आजार आहे याची मला कल्पना नाही. बहुदा असावा कारण डॉक्टर म्हणाले विस्मरणात जाणं टप्प्याटप्प्याने वाढत जाते. ही असेपर्यंत प्रत्येक गोष्टीचा गजर करत रहायची त्यामुळे तिच्या कमांड पाळण्याची मेंदूला सवय झाली असावी. ती गेल्यानंतर मलाच माझी शुद्ध नव्हती. एवढी वर्षे तिच्यासाठी जगतांना मी माझ्यासाठी जगायचे विसरून गेलो. मी काही विसरलो की ती म्हणायची, “हल्ली तुमचा मेंदू अधूनमधून रजेवर जातो, पहा बर नाहीतर मी तुमची बायको आहे हेच विसरून जाल.” मी तिच्या बोलण्याला हसून दाद द्यायचो. “तुझी सारखी कटकट ऐकून बहूदा मेंदू स्लो झाला असावा. तू काही वसरू देशील का? अशानच माझा मेंदू काम करेना झालाय.” गंमत म्हणजे कधी कधी मला अगदी लहानपणीची गोष्ट आठवायची. मी ते नातवांना सांगायचो आणि सून म्हणायची, “दादा इतर वेळेस तुम्हाला काही आठवत नाही आणि आता मात्र अचानक सगळं कस आठवतं?” काय उत्तर देऊ, कर्म माझं.
सुरवातीला मी घरात चेष्टा करतोय किंवा आठवत नसल्याचं भासवतो अस आमच्या सूनबाईला वाटायचं. कधी तरी चहा घ्यावा असं वाटायचं तर कधी पुन्हा भूक लागायची. त्या खुळीला वाटायचं मी तिला उगाचच त्रास देतोय. म्हणायची, “दादा, अहो चहा घेऊन अर्धा तासही झाला नाही, अजून भांडी आवरली नाही, तुम्हाला पुन्हा चहा हवाय का?” कधी कधी द्यायची, कधी रागवायची. तिचं चुकतंय कसं म्हणू, शेवटी ती परक्या घरून आलेली.
रिटायर्ड झालो तेव्हा बंगल्यात छोट दुकान काढलं. वेळ जायला साधन हवंच ना? दोन रुपये मिळाले तर मुलांच्या संसाराला उपयोगी पडतील. मी निवृत्त झालो त्याच्या दुसऱ्या की तिसऱ्या वर्षी आमच्या हिला पँरालिसीस झाला. मुलगी डॉक्टर होती, सर्व उपाय केले पण काही उपयोग नाही झाला. उजवा हात आणि पाय निकामी झाला तो कायमचा. मुलं त्यांच्या कामात व्यग्र. घरी ती आणि मी. माझी जबाबदारी वाढली. दुकान चालवून मला, घरातील स्वयंपाक आणि तीच सगळं करावं लागतं होतं. तिला आंघोळ घालण्यापासून ते कपडे घालण्यापर्यंत सगळच कराव लागे. मला तिचं करावं लागत म्हणून तिला वाईट वाटे. अनेकदा म्हणे, “माझ्यामुळे केवढा त्रास होतो तुम्हाला? तरी त्या पांडुरंगाला दया येत नाही.” मी गंमतीने म्हणे,”पांडुरंगाला रखुमाईने घरचं काम दिलय, त्यातून सुटका झाली तर तो येईल ना!”
तिला वाटे मी उपहासाने बोलतोय, ती नाराज होत म्हणे,”माझ्या लक्षात येतय बरं, पण मी जाणून बुजून नाही हो करत. देव तुमची परीक्षा घेतोय, पण आता फार वेळ नाही, तो नक्की माझी विनंती ऐकेल.” मी तिला रागावून म्हणायचो,”मी एकटा मागे राहिलो तर कसा जगू? उगाच काही बाही बोलू नको. मी आहे ना!”
ती घरात एकटी असली की पडून रहायची, तिची चिंता वाटायची. तिला दुकानात आणून बसवली, तिचा वेळ जावा म्हणून STD booth उघडलं. माझी तारेवरची कसरत होती. रोज तिची तयारी करून द्यायची तिला दुकानात आणून बसवायचं आणि माझं आवरून दुकान चालवायचं. मुलं स्वतःच आवरून जायची, पाठी पडलेला पसारा मी दुपारी दुकान बंद केलं की आवरत बसायचो. मुलं घरी असली तर दुकान सांभाळायची पण ती उच्चशिक्षित. ती हे असलं काम कस करणार? तरी कधी कधी मदत व्हायची.
दुकानात सामान संपल तर भरावं लागे, त्यासाठी होलसेल व्यापाऱ्यांकडून सामान आणावं लागे. तिच्यावर दुकान टाकून मी जात होतो. त्या परिस्थितीत आठ दहा वर्षे दुकान चालवलं पण एक दिवस अचानक ती चाळीस वर्षांची साथ सोडून निघून गेली आणि मी पोरका झालो. तेव्हा आजूबाजूला दुकानं नव्हती. बरं चालायचं दुकान. अडीअडचणीला घरगुती सामान घ्यायला शेजारच्या चाळीतील आणि इमारतीमधील माणसं यायची. त्यांच्याशी बोलण व्हायचं. जुन्या आठवणींना उजाळा द्यायचो वेळ निघून जायचा. हा बंगला मी ७६ साली अवघ्या चाळीस हजारात बांधला, तेव्हा माझ्याकडे अवघे पंधरा हजार रुपये होते. हिने आपले दागिने गहाण ठेऊन दहा बारा हजार उभे केले, प्रॉव्हिडंट फंड उचलला, तेव्हा कुठे जुळणी झाली. तेव्हा किती कष्ट सोसलं ते ऐकण्यात कोणाला स्वारस्य नाही.
मुलगा एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता. खूप नसला तरी बऱ्यापैकी पगार होता. त्याला नव्याने काही करायचं नव्हतं. म्हटलं मुलाच लग्न करू म्हणजे येणारी सून घर सांभाळेल म्हणून मुद्दाम गरीबा घरची मुलगी पाहिली. सुरवातीस तिला स्वयंपाक शिकवला, दरम्यान डॉक्टर मुलगी लग्न करून सासरी गेली. म्हटलं बर झालं माझ्या डोक्यावरचा भार कमी झाला. दुसरी मोठया पदावर मल्टिनॅशनल कंपनीत होती. तिची फिरतीची नोकरी. ती आली की मोठा आधार वाटायचा. ती आस्थेने चौकशी करायची, म्हणायची,”दादा आता हे दुकान बंद करा, तुम्हाला दगदग होणार नाही.” पण हे दुकान हाच माझा विरंगुळा होता. मी तिला तसे म्हणालो तर म्हणाली तुमची इच्छा.
मुलगा कधीतरी दुकानात बसायचा पण त्याला आवड नव्हती. उलट म्हणायचा आपला बंगला आहे, तुम्ही हे फुटकळ दुकान चालवता लोक हसत असतील. मी त्याला म्हणालो जे हसतात ते काही आपल्याला देत नाहीत आपण दुर्लक्ष करावं. त्याने दुकानाकडे दुर्लक्ष केलं. सुनेने दोन तीन वर्षात घराचा ताबा घेतला आणि तिच्या दयेवर जगण्याची पाळी आली. आधी मी सकाळी उठून हाताने चहा करून घ्यायचो. सून म्हणाली, “दादा, मी तुम्हाला चहा देईन तुम्ही का करून घेता?” काय सांगू, सांगाव वाटलं, “बाई ग, माझी सकाळ पाचला होते तुमची सातला, मला उठलो की चहा लागतो.” पण नाही बोललो, न जाणो नाही आवडलं तर?
affiliate link
जुने दिवस आठवले, तेव्हा आम्ही विक्रोळी इथं राहायला होतो. भांडूप येथे मी गेस्ट किन विल्यमसन्स् म्हणजे GKW या कंपनीत मशिनीस्ट म्हणून लागलो होतो, ती भांडूप येथे राहात होती. गाडीने जाता येता तिची ओळख झाली. ती मंत्रालयात कारकून होती. ओळखीच रुपांतर प्रेमात झाल आणि आम्ही लग्न करायच ठरवलं. तो काळ स्वस्ताईचा होता. सोनं तीनशे रुपये तोळा. मला सातशे रुपये पगार होता. कॅन्टीन अगदी स्वस्त, पन्नास पैश्यात बिर्याणी मिळायची. आमचं लग्न झालं तेव्हा पाच तोळ्यांच मंगळसूत्र केलं होतं. माहेरून तिला पंधरा तोळे दागिने घातले होते. विक्रोळी टागोर नगर येथे बैठ्या खोल्यात रहात होतो. वडील म्हणाले लग्न झालं आहे, आता घराच कुठे तरी पहा. आम्ही विक्रोळी, भांडूप, मुलूंड शोध घेत डोंबिवली येथे पोचलो. पागडीच घर मिळाल. डिपॉझिट चार हजार आणि भाड पंचवीस रूपये.
छान संसार सुरु झाला. ही पहिल्यांदा प्रेग्नंट होती तेव्हा डिलीव्हरीला माहेरी गेली. नंतर मात्र मी तिच्या आईला हिच्या बाळंतपणात बोलावून घेतलं. त्यांना विनंती केली, मदतीला कुणी विश्वासू बाई मिळेपर्यंत थांबा. माझी धावपळ पाहून शेजारी राहणाऱ्या काकू म्हणाल्या मी मुलं पाहीन त्यांना पाळणाघरात नका ठेऊ. मुल लहान होती, हिची नोकरी मंत्रालयात त्यामुळे कामावर निघण्यापूर्वी मुलांना काकूंच्या घरी सोडून ती निघायची. बारा पंधरा वर्षे त्या काकूंनी आम्हाला चांगली मदत केली. तिची सरकारी नोकरी सोडावी तरी पंचाईत अगदी तारेवरची कसरतच. मुल समजूतदार होती हळूहळू स्वतःची तयारी करुन घेत.
दरमहा आधी दोनशे रूपये आणि जेव्हा मोठी मुलगी बारा वर्षांची झाली तेव्हा पाचशे रूपये त्यांना दिले. त्या मुलांना शाळेत घेऊनही जात आणि आणून सोडत. मला जनरल असल्याने मी पाच वाजता घरी पोचत होतो.
आमच्या कंपनीत येणाऱ्या एका आगरी मित्रांने बंगल्याची जागा मला घेऊन दिली. डोंबिवलीत आल्यावर पंधरा वर्षांत आम्ही स्वतःच्या घरात या बंगल्यात रहायला आलो. तिच्या संमतीने घराच नाव “स्वप्नशिल्प” ठेवल. गृहप्रवेश केला तेव्हा स्वस्ताई होती. माझ्या कंपनीतील पंचवीस मित्र आणि तिच्या ऑफिसमधून दहा मैत्रिणी आल्या होत्या. आमच्या दोघांच्या घरातील मंडळी अशी शंभर माणसे होती. ही मोरपंखी शालू नेसली होती.खूप दणक्यात कार्यक्रम केला. मुल या नवीन घरात एकदम खुश होती. ज्या काकूंनी मुलांना एवढे वर्षे सांभाळले त्यांना छानपैकी साडी दिली, त्यांनी भरपूर मदत केली.
पाच हजार जागेचे आणि चाळीस हजार बांधकामाचे पण त्या वेळचे हो म्हणजे आताच्या हिशोबात एक कोटी नक्कीच होतील. हे पैसे तिच्या काटकसरीने आणि साध्या रहाणीमानामुळे जुळवण शक्य झाल नाहीतर माझ्या सारख्या कामगाराला बंगला बांधण्याच काम म्हणजे दिवास्वप्न.
आज हे सर्व आठवायचं कारण तसच घडलं, पंचवीस तीस वर्षांचा एक मुलगा आपल्या लहान मुलाला घेऊन आमच्या वृद्धाश्रमात आला. सोबत पत्नी आणि चार वर्षचा गोड मुलगा होता. प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी करत होता. प्रत्येकाला भेट म्हणून त्याने फळे आणि एक मफलर दिला. त्या लहानग्याचा वाढदिवस होता. बापाने एक चांगली प्रथा म्हणून त्याचा वाढदिवस इथे भेट देऊन साजरा केला. ज्यांना चांगल्या गोष्टीच्या निर्मितीचे डोहाळे लागतात ते असेच वेगळे असतात. तो माझ्या जवळ बसला आणि गप्पा मारत होता, विचारपूस करत होता. मी माझ रडगाणं ऐकवले. सांगितले की मन हलके होते अस म्हणतात..तो गप्पा मारत असतांना त्याचा धाकटा म्हणाला, “डॅड हे सर्व आजोबा इथे का राहतात त्यांना घर नाही का?” ते ऐकून काळीज पिळवटून निघालं.
affiliate link
इथे येण्याचा निर्णय हा माझाच होता. मी काही मागितले की सून म्हणायची “अहो दादा सारखी भूक भूक का करताय? तुम्हाला इतकं देते ते जात कुठे?” अस म्हणतं वारंवार माझा पाणउतारा करू लागली आणि आमचे चिरंजीव तिची बाजू घेऊन मला समजावू लागले. तेव्हा लक्षात आलं आपला मुक्काम हलवण्यात शहाणपण. लहान मुलगी नोकरी निमित्ताने सतत दौऱ्यावर आणि ती ही एकटी. मग माझं लोढण तिच्या गळ्यात अडकवण योग्य नव्हतं म्हणून मी इथे. त्या लहान बाळाचे शब्द ऐकून उलघाल झाली एवढच पण मी स्वतः इथ आलो होतो. कोडग बनून ऐकण मला जमल नसत. मी मशीनीस्ट होतो, कोणताही पार्ट योग्य बसावा या करता त्यावर प्रक्रिया करून त्याला योग्य आकार देण माझ काम होत. माझी अवस्था त्या तरूणाला कळली असावी.
“बरं, बाबा काळजी घ्या, हा माझा नंबर कधी मन मोकळ करावं वाटल, कधी एकट एकट वाटलं तर हे माझं कार्ड, त्यावर माझा फोन नंबर आहे, फोन करा. नाहीतर मी अस करतो मीच येत जाईन चौथ्या शनिवारी.” तो निघून गेला. कोणाचा कोण? त्याचे माझे काय ऋणानुबंध? पण तरी आशा लावून गेला. गेल्या सहा वर्षात या वृद्धाश्रमात खूप मित्र झालेत. आम्ही एकत्र गप्पा मारतो, भजन करतो. कधीतरी डॉक्टर येऊन तपासणी करतात. कधी कोणी पुढारी भेट द्यायला येतो. काही भेटवस्तू देऊन आमच्या बरोबर फोटो काढून घेतो. आता कशाचच दुःख होत नाही आणि सहकारी मित्रांसोबत एकटेपणा वाटत नाही. कोणाला बरे नसल्यास आम्ही सर्व एकमेकांची काळजी घेतो. जगायला अजून काय पाहिजे?
माझ्या खोलीतील कॅलेंडर वर मी प्रत्येक दिवसांवर फुल्ली मारत चौथ्या शनिवारची वाट पहात बसतो.तो येतो आणि पाया पडून म्हणतो, “बाबा कसे आहात? त्याची नजर फुल्ली मारलेल्या कॅलेंडरवर जाते आणि तो माझ्या जवळ बसत म्हणतो, “मला ठाऊक आहे तुम्ही माझी वाट पहात होता. तुम्ही माझ्या घरी येता का? मला नक्की आवडेल.” मी त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो,”नाही रे बाळा, घर सोडले ते पुन्हा कुठे नव्याने गुंतण्यासाठी नाही, तू शब्द दिल्या प्रमाणे आलास बरे वाटले.” त्या नंतर तो न चुकता येत राहिला,भेटत राहिला.
हळू हळू असे अनेक तरुण वेगवेगळ्या सणवारी येऊन आमच्यासाठी करमणूक कार्यक्रम तर कधी गप्पाष्टक तर कधी मेडिकल कॅम्प घेऊ लागले. कधी स्वतःच्या वाढदिवशी तर कधी मुलांच्या वाढदिवशी येऊन वाढदिवस आमच्या सोबत साजरा करू लागले. त्यामुळे आमच्या वृद्धाश्रमातील मरगळ जाऊन आनंदी वातावरण तयार झाले. एक वेगळा बंध प्रत्येकात निर्माण झाला.आपण कोणाच्या उपयोगी नाही ही भावना हळूहळू कमी झाली.
एक दिवस तो तरुण पत्नीसह आला आणि म्हणाला, “बाबा आम्ही तुम्हाला दत्तक घ्यायचं ठरवलय, तुमची काही हरकत नाही ना?” मी काय बोलावे या संभ्रमात असताना आमचे चिरंजीव आले आणि म्हणाले, “दादा हे कोण? यांचं आपल काय नात?” तो तरुण पहात राहिला, “अच्छा म्हणजे हे तुमचे वडील आहेत का? बरेच झाले आपली भेट झाली,मी यांना दत्तक घ्यायचे ठरवले आहे, आपली काही हरकत?”
माझा मुलगा माझ्यावर रागावत म्हणाला, “दादा हा काय तमाशा? अस विचारण्याची यांची हिम्मत कशी झाली.” तो तरुण शांतपणे म्हणाला, “कोणाला पित्याची गरज नसते तर कोणी या नात्यासाठी भुकेला असतो. मी यापूर्वी अनेकदा आलो पण आपली आजच भेट झाली. मी त्यांना दत्तक घेत आहे जेणेकरून त्यांना समजून घेणं आम्हाला जमेल. उद्या आम्ही वृद्ध झालो तर आमच्या मुलांनी आम्हाला वृद्धाश्रमात आणून सोडू नये यासाठी हा खटाटोप अस समजा.”
माझा मुलगा रागावून म्हणाला, ” How dare you? I will complain with trust. You should not interfere in our family matter.” त्या तरुणांची पत्नी म्हणाली,”मिस्टर, We have no right to poke into your personal matter पण, जर हाच खंबीरपणा आपण घरी दाखवला असता तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. माफ करा, आपली आम्ही रजा घेतो.” ते तरुण जोडपं निघून गेले. त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची सून मला घरी नेण्यासाठी आली. मला रागावली.म्हणाली, “दादा लोकांना खोट नाट सांगू नका. तुम्ही हट्टाने इथे आलात. लोकांना वाटेल आम्ही तुम्हाला येथे भरती केलय, ते काही नाही. झाला तेवढा तमाशा पूरे. तुम्ही आजच घरी चला. आम्ही तुम्हाला न्यायला आलोय.” कसे कोणास ठाऊक पण माझ्या सहकाऱ्यांना ते समजलं, आश्रमातील माझ्या सहकारी मित्रांनी मला घेराव घातला आणि म्हणाले, “गेले सहा वर्षे आपण इथे आहात, आता पुन्हा आपण घरी गेलात तर आपल्याला करमेल का?”
मी सुनेला नम्रपणे घरी येण्याबद्दल नकार कळवला. आता वृद्धाश्रम हेच माझं सेकंड होम झालं आहे. कोणत्याही नात्यात पुन्हा गुरफटून घेण्यात अर्थ नाही. त्या तरुणाने गेल्या काही भेटीत आपल्या सारखे अनेक मित्रांचा गट तयार केला आहे. हा गट आम्हाला एकट वाटू नये म्हणून वेळोवेळी भेटी देतात.
अनेकदा आमच्या सोबत राहतात, आमच्या सोबत जेवण घेतात. आम्ही एकट पडू नये याची पूर्ण काळजी घेतात. इथे आमच्या समविचारी मित्रांसोबत मी आनंदी आहे. आम्ही सकाळी व्यायाम करतो. कोवळ्या उन्हात बसतो, हास्यक्लब चालवतो. वर्तमानपत्र एकत्र बसून वाचतो चर्चा करतो, अगदी क्रिकेट आणि फूट बॉल देखील खेळतो. योगासने करतो. दिवस कधी संपला ते कळतही नाही. दर गुरुवारी डॉक्टर येऊन आमची आरोग्य तपासणी करतात. स्वयंपाक करणाऱ्या मावशींना मदत करतो. आम्ही एकमेकांची काळजी घेतो. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो असल्याने आता एकटेपण संपले आहे.
कधीतरी कुलकर्णी ताई, कदम, सामंत यांना किंवा मलाही अगदी एकट आणि उदास वाटतं, नेहमीच एकत्र उठबस असल्याने आम्हाला ते कळतं. आमच्या परीने आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो अर्थात तो प्रयत्नच असतो कारण आम्ही त्यांच्या अवतीभवती असलो तरी त्यांच्या मनाची उदासी घालवू शकत नाही. मला कधी हिची आठवण होते तर कधी सुनेच बोलण आठवत.
माझी सोनुली मला भेटायला येते, खुप काही आणते अगदी सगळ्यांना पुरेल इतकं. तास दोन तास थांबते, विचारपूस करते आणि माझ्या इतर सहकाऱ्यांना माझ्याकडे लक्ष द्या सांगून निघून जाते. खर तर तीने लग्न न केल्याने तिच पूढे कस होणार ही चिंता मला दुःखी करते पण ती मात्र या विषयी बोलायला उत्सुक नाही. तिच्या मनात काय आहे तिलाच ठाऊक. माझं बरच उपभोगून झाल पण या सोनुलीने काहीच तर पाहिले नाही. “दादा, आता अस इथ रहाणे पूरे चला माझ्या ब्लाँकवर रहा, मी तुमची काळजी घ्यायला माणूस ठेवते.” मी तिची समजूत काढतो, सोनुले इथ आता मला सर्वांचा लळा लागलाय,आता इथून जायाच ते थेट परमात्म्याकडे, तेव्हा उगीच आग्रह करु नको. मी इथे खुशाल आहे.” बिचारी!
आमच्या सारख्या वृद्धविषयी आस्था असणारी, वैचारिक वारसा घेऊन आमच्या वृद्धाश्रमास भेट देणारी, आमचे भावविश्व फुलवण्यासाठी झटणारी पिढी स्वतःहून तयार होत आहे. त्यांच्या वैचारिक वारसा भविष्यात या आश्रमाची गरज ठरवेल. वृद्धांशी जवळीक बाळगणारी पिढी निर्माण झाली तर कदाचित वृद्धाश्रमाची गरज राहणार नाही आणि कौटुंबिक मतभेदांमुळे तशी परिस्थिती ओढवली तरी अशा तरुण सामाजिक पिढीमुळे आश्रमातील जगणेही सुसह्य होईल.
मी कुणाला काय शहाणपण शिकवणार पण माझी सर्वांना विनंती प्रत्येक व्यक्तीने आपल्या तारुण्यात अशा वृद्धाश्रमास भेट दिली तर वृद्ध व्यक्तींच्या समस्या त्यांना कळतील . भविष्यातील नियोजन करणे सोप्पे होईल. वृद्धपकाळात अचानक जोडीदार गेला आणि कुटुंबात मतभेद झाले तर कुटुंबात भार होऊन उपेक्षित जीवन जगण्यापेक्षा आपल्याकडे असणाऱ्या पैश्याचं योग्य नियोजन करून समवयस्क मित्रांसोबत राहता येईल.काही दिवस बदल म्हणून कुटुंबात सन्मानाने चार दिवस राहून परतता येईल.हा रस्ता मात्र मोकळा ठेवण सर्वस्वी तुम्ही कुटुंबाशी कसे संबंध ठेवता त्यावर आहे.
आजच्या व्यस्त जीवनात तरुण मुलांना आणि लग्न झाल्यावर त्यांच्या पत्नीला वृद्ध व्यक्तीला पाहण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी वेळ नाही. जर ते वेळ देऊ शकले नाही तर मग माझ्या सारख्या वयोवृद्धांची चिडचिड सुरू होते,आपल्याकडे कुणी लक्ष देत नाही ही भावना दृढ होते त्यापेक्षा स्वतः कुटुंबात दुरावा न होऊ देता निर्णय घेतल्यास ते अधिक योग्य.
सुरवातीला मला मुलाचा,सुनेचा राग यायचा,ज्यांना मोठ करण्यासाठी मी कष्ट केले त्यांनी मला अशी वागणूक द्यावी या बद्दल माझा संताप व्हायचा पण हळूहळू मी मनाची समजूत घातली. लग्न ,संसार, मुल ही आपली तेव्हाची गरज होती ती आपण स्वतः ठरवली होती तसच मुलांची गरज आणि प्राथमिकता भिन्न असू शकते त्यामुळे त्यांना स्वतःचे कुटुंब आणि जबाबदाऱ्या असतांना आपला भार त्यांच्यावर टाकणे तितकेसे योग्य नाही. त्यांना आपली अडचण होऊ नये म्हणून आपण त्यांना स्वतःचा स्वतंत्र संसार उभारू द्यावा. जर त्यांना घराची अडचण असेल तर आपण शक्य असल्यास अशा आनंद आश्रमाचा मार्ग शोधावा. येथे माझा विसराळूपणा आता सगळ्यांना माहिती झाला आहे. कोणिही त्याबद्दल चर्चा करत नाही.सर्व मला समजून घेतात. आधी इथेही मी हे सर्व मुद्दाम करतो की काय असे सर्व आनंदाश्रमाला वाटे पण सत्य समजले आणि माझी अडचण संपली.खरेतर इथे आल्यानंतर माझा आजार कमी झाला. एकटेपणा गेला.अजून काय हवे.
हे लिहीणे सोप्पे आहे. स्वतःची नाळ तोडून स्वतंत्र जगणे कठीणच. पण केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. मी या मार्गाने जाताना चुकत चुकत सावरलो. तुम्हालाही नक्की जमेल. मायेचे पाश तोडण तस अवघडच पण करेन म्हटले की मार्ग सूचतो आणि सापडतो. मी माझा अनुभव म्हणून सांगितले. मार्गदर्शकाच्या भुमीकेत कधीच नव्हतो पण या आनंदाश्रमाने स्वतंत्र होऊन जिद्दीने जगण्याचा धडा शिकवला हाच ठेवा इतरांना उपयोगी पडेल.
Dard bhari….. Khup kahi peksha sarwach swikarnyasarkh…. 💯👌