आला आषाढ
ज्येष्ठ महिन्याचा ताप, चिकचिके अंग, होतसे संताप
सूर्य, कष्टाने लालेलाल, त्याला लागलीसे धाप
सारे निस्तेज चेहरे, म्लान काळी झाली काया
पाणी किती वेळा प्यावे? जगण्याची गेली रया
रात्री डोळ्याला नाही डोळा, होतो जीव कासावीस
सरो जेष्टाचा हा ताप, मना आषाढाची आस
यावे काळेकुट्ट नभ, यावी नेमेची आषाढी
नको तापाचा संसार, लाव तवनामाची गोडी
वारी चालतसे वाट, विठू हासे कौतुकाने
कसा सोसला यांनी ताप? म्हणे रुक्मिणी मायेने
पडे चोहीकडे पाणी,नाही जीवाला टांगणी
पाय झाले पहा धीट, जाण्या विठ्याच्या अंगणी
सर्वा मुखी, विठ्ठल विठ्ठल, चालण्यास येई बळ
तोच चालवीतो हाते, तोच करीतो सांभाळ
नाथ, तुकोबा, नाम्याची दिंडी चालली, चालली
चोखा, गो-या कुंभाराची सय मनामध्ये आली
माझा,भोळा नरहरी, मुखी म्हणे हरी हरी
महादेव जप मुखी, पाहे विठ्ठल अंतरी
दिंडी चाले रस्त्यातून,आला जनपूर उफाळून
उमटली पदचिन्हे रस्त्यावर, पाणी चुंबते प्रेमान
सारीकडे पाणी पाणी, दिंडी पावसाच्या धारा
चला जाऊ पंढरीस, विनवे रुक्मिणी स्वयंवरा
आता नेत्रात उन्माद, कानी विठ्ठलाचा नाद
सखे फुगड्या घालती, नाचती वारीच्या रिंगणात
दिसे दुरुनी कळस, मन भेटीस आतूर
सरे सावळ्या विठ्याच्या, पायाचे अंतर
मन झाले माझे तृप्त,विठ्ठलाच्या दर्शनाने
गात्रे सुखावली सारी, माझ्या जीवाचे झाले सोने