ऋत्वी

ऋत्वी

अडीच वर्षांच्या ऋत्वीला kindergarten मध्ये घालायचं ठरवलं तेव्हा आजोबा कळवळून मुलाला म्हणाले, ” रत्नाकर एवढ्या लवकर तिला शाळेत कशाला घालताय? तुला आम्ही सहाव्या वर्षी शाळेत घातलं होतं, तरीही तू शाळेत जायला कंटाळा करायचास? ” रत्नाकर काही बोलला नाही, पण रेश्मा सास-यांकडे पहात म्हणाली, “आप्पा, तीस वर्षात सगळं काही बदललंय बरं, तुम्ही यांच्या वयाचे होतात तेव्हाच तुमचं घर आणि आता ह्यांनी स्वत:च्या कष्टाने घेतलेलं घर ह्यात फरक आहेच ना? सुनेचा प्रश्र्न बिनतोड होता, त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं. महानगर पालिकेत कारकुनाची नोकरी करून चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरापेक्षा आप्पा काय घेऊ शकले असते? खरं तर ते घर घेतांनाही बरीच ओढाताण झाली होती. सुनेचा खोचक प्रश्र्न आप्पांच्या जिव्हारी लागला, त्यांना वाटत होतं चांगलं सटपटीत उत्तर द्याव. कारकुनाच्या पगारात तुझ्या नव-याला इंजिनिअर केलं हे काय थोडं झाल! पण ते तसं नाही बोलले. ते हसत हसत म्हणाले, “तु म्हणतेस ते ही खरंच म्हणा,तेव्हा कुठे होती अडीच वर्षांच्या मुलांना गोठवायची सोय?”. रेशमाच्या डोक्यात आप्पांच्या शब्दांची तिडीक गेली, “आप्पा एकदा kindergartenला भेट देऊन या म्हणजे कळेल तिथ मुलं गोठवतात की काय करतात ते! उगाच चाळीस हजार घेत नाहीत आणि इतके पैसे द्यायला पालकही मॅड नाहीत,”. तिच्या उत्तराने आप्पा गोठले, खरं तर आप्पांचच चुकलं होतं बोलता बोलता शब्द सुटून गेला होता. 

“सूनबाई मला तसं नव्हतं म्हणायचं, पण एवढ्या लहान वयात तिथं नेऊन कोंडायच म्हणजे —-” त्यांचं वाक्य  पूर्ण व्हायच्या आत ती समोर येत म्हणाली, आप्पा मग इथे घरी ठेऊन काय करु म्हणता?, कोण तिला पाहील, आम्ही दोघंही कामावर जातो, तुमच्या सहवासात सात-आठ तास ठेवायचं म्हणजे!”

“अगं पण ह्या पूर्वी ती माझ्याकडेच तर रहात होती, तुम्ही दोघ कामावर गेल्यावर मीच तिला काय हवं नको ते पहात होतो, मग आत्ताच काय झालं?”. “आप्पा तेव्हा ऋत्वी लहान होती, आता ती मोठी होताना जर काही तिने ऐकू नये असे शब्द तुम्ही बोलाल तर ती लगेचच उचलेल आणि तिच्या अंगवळणी पडले मग?”. आप्पा रागाने म्हणाले, “सुनबाई तुझ्या नव-याला आम्हीच वाढवले, त्यांने नाही ना काही अपशब्द घेतले आमच्याकडून आणि लहान मुलीसोबत काय बोलावं ह्याच तारतम्य आहे माझ्याकडे”. आता खरं तर तिने बोलण्या सारखे काहीच नव्हतं तरीही ती म्हणाली, “आप्पा  तिला अंगणवाडी आणि मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं नाहीये मला, आणि तुम्हांला तसलं इंग्रजी ——–“

आतापर्यंत रत्नाकर  शांतपणे ऐकत होता पण आता त्याचाही संयम सुटला, “रेश्मा माईंड युवर टंग, यू नो ही रोट ए बुक ऑन ऑफिस किपिंग अँड ऍडमिनिसट्रेशन फाॅर वेलफेअर ऑफिस!”  रेश्मा पाय आपटत बेडरुमकडे निघून गेली. रत्नाकर आप्पांकडे पहात म्हणाला ” आप्पा एक सांगू का, प्लीज आमच्या निर्णयात इंटरफेअर करु नका, उगाचच भांडण होण्यापेक्षा शांत रहाल तर मलाही बरं आणि तुम्हालाही.”

आप्पांना भडभडुन आलं, रत्नाकर अप्रत्यक्ष रहायचं तर शांत रहा नाहीतर ——, असंच जणू म्हणाला होता. रत्नाकरला ते काही सांगणार होते तद्पुर्वीच तो बेडरूमकडे निघून गेला. आप्पांना अगदी एकटं एकटं आणि असहाय्य वाटू लागलं.

पाच वर्षांपूर्वी साधा ताप आला आणि सुमीने भरलेल्या संसारातून त्यांचा कायमचा निरोप घेतला. तेव्हा आप्पांनी संसाराचा भार स्वत:च्या खांद्यावर घेतला. आईच्या मृत्युनंतरही मुलीचं लग्न थाटामाटात लावून दिलं. रत्नाकर आणि ते दोघेच असतांना रत्नाकरला डबा करून दिला. त्याला कामावर जातांना काय हवं नको ते आईच्या मायेने पाहिल आणि रत्नाकरने फ्लॅट घ्यायचा विचार केला तेव्हा फारसा विचार न करता पागडीची खोली विकून दहा लाख रुपयांची मदतही  रत्नाकरला केली. क्षणात त्यांना सार आठवल. खूपचं एकाकी वाटू लागलं. ते गॅलरीत जाऊन आरामखुर्चीत डोळे मिटून पडून राहिले.

 तो दिवस शांत शांत गेला बिचा-या ऋत्वीला कळेना रोज आपल्याला खाली खेळायला नेणारे आजोबा इतके शांत शांत का?

“आजोबा, चला ना खाली जाऊ, पहा सगळी मुलं आल्यात खाली”. आजोबा काही सांगण्यापूर्वीच रत्नाकर म्हणाला “बेटा, आज आजोबांना बरं वाटतं नाही, मी नेईन हो तूला खाली”. आप्पांना वाटल रत्नाकर आपल्या पत्नीला रागावेल, जवळ येईल आणि म्हणेल, “आप्पा, माझ चुकलच , मला माफ करा.” तसं काही झालं नाही.आप्पाचा डोळ्याला डोळा लागला नाही. मुल मोठी झाली की दिवस कसे बदलू शकतात त्याचा अनुभव घेत होते.

सोमवारी ऋत्वी शाळेला जायला निघाली तेव्हा आप्पा पहातच राहिले, रंगी बेरंगी युनिफाॅर्म, पायात मॅचींग साॅक्स आणि शुज, पाठीला छोटी सॅक ,हातात वॉटरबॅग,आणि गळ्यात Angel child चा आय डी. घालून ऋत्वी शाळेत जायला तयार झाली.

बिल्डिंगखाली शाळेची बस येणार होती असं ते ऐकून होते. शाळेत जाण्यापूर्वी ती वाकून 

आजोबांच्या पाया पडली. आप्पांनी तिला छातीशी धरलं, तसं रेश्मा दारावरूनच ओरडली, “ऋत्वी कम ऑन वी आर गेटींग लेट.” तिने आजोबांच्या हातून सुटत धाव मारली. “बाय बाय आजोबा”.

ऋत्वी गेली त्या वाटेवर आजोबा गॅलरीतूनच पहात बसले. मोठी गोड पोर, ह्या बावळटांना काय झालंय इश्र्वर जाणे? तिच बालपण संपवायचे ठरवलंय जणू, ते मनातच बोलले. तीन तास ते गॅलरीत ये-या झा-या घालत होते. सकाळी आठ वाजता गेलेली ऋत्वी साडेअकराला घरी आली. गाडीच्या केअर सेंटरच्या महिलेनं तीला आणून दारात सोडली. ती एकदम आनंदी दिसली. कपडे काढायच्या अगोदर ती आप्पांच्या मांडीवर बसली आणि शाळेतील गंमती जमती सांगू लागली. रत्नाकर आणि रेश्मा कामावर जातांना वार्निंग देऊनच गेले होते.ऋत्वीच टाईम टेबलच त्यांनी आप्पांना दिलं होतं त्यानूसार तिला शाळेतून आल्यानंतर अर्ध्या तासांनी लंच द्यायचा होता. आप्पा स्वत:शीच हसले. होय आता त्यांना ऋत्वीच्या आयाचा रोल निभाऊन न्यायचा होता. त्यांनी ऋत्वीचा युनिफाॅर्म काढला. तिचे घरातील कपडे घातले आणि डायनिंग टेबलकडे नेत म्हणाले “बेबी,आर यू रेडी फाॅर लंच?”

ऋत्वीला कळेना आजोबाला झाले तरी काय? “आजोबा, तू असं काय करतोस? मला बेबी काय म्हणतोस?”. त्या लहान बाळीला काय आणि कसे सांगणार, की बेटा तुझा आजोबा हुकमांचा  ताबेदार आहे. आजोबाच लक्षच नाही हे पाहून ऋत्वीने आपल्या इवल्याशा हाताने एक घास आजोबांना भरविण्याचा प्रयत्न केला आणि आप्पांमधला आजोबा जागा झाला.ऋत्वीला जवळ घेऊन ते धाय मोकलून रडले. “बेटा, माफ कर मला तुझ्या आजोबालाच कळेना, तो नक्की कोण? मुलाचा बाप? सुनेचा सासरा, की नातीचा आबोजा”. ऋत्वीला कळेना आपला आजोबा का रडतोय? ती समजावण्याच्या स्वरात म्हणाली, “आजोबा, तू का रडतोस? माझी शाळा चांगली आहे, आमच्या मॅम खूप चांगल्या आहेत आणि तिथे ना साॅंग शिकवतात, डान्सपण घेतात. तु ये हा उद्या माझ्या बरोबर मी मॅमला सांगते तूला शाळेत घ्यायला मग तर झालं”. आप्पांना कळेना या मुलीला काय म्हणावं त्यांनी तशाच उष्ट्या हातांनी तिचे मुके घेतले. ऋत्वी मोठी झाली होती, आई-बापा पेक्षा मोठी, तिला आजोबांचं दु:ख जणू कळलं होतं. आप्पांनी स्वत:ला समजावलं असा त्रागा करून नाही घ्यायचा हया अश्राप जीवाला आपल्या मतभेदाचे चटके बसणे बरं नव्हे. काल जे घडलं ते एक वाईट स्वप्न होतं अस म्हणत त्यांनी ऋत्वीला खेळणी काढून दिली आणि म्हणाले बेटा खेळ हो तो पर्यंत मी जेवून घेतो मग आपण खेळू”. ती सगळी खेळणी काढून आजोबांची वाट पहात बसली. आजोबाना ऋत्वीने आपल्या लाडीक शब्दांनी कालची घटना विसरायला भाग पाडल होत.आजोबा मनाशीच म्हणाले हाच संमजसपणा आमच्यात आला तर —–.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

4 thoughts on “ऋत्वी

  1. सुधीर माने
    सुधीर माने says:

    Superb

  2. Malankar

    सद्याच्या पिढीला स्वतः मध्ये डोकावून पाहता येण्या सारखे लिखाण

  3. Pradeep Karmarkar
    Pradeep Karmarkar says:

    लेख खूप छान

  4. Sergio

    You actually make it appear really easy together with your presentation but I in finding this topic
    to be really one thing which I feel I’d never understand.
    It kind of feels too complicated and very broad for
    me. I’m having a look forward on your next publish, I will attempt to get the
    hold of it!

Comments are closed.