ssc

एस.एस.सी निकाल लागला, आता पूढे…

काही दिवसांपूर्वी राज्याच्या माध्यमिक परीक्षा मंडळाचा  एस. एस .सी. चा निकाल लागला. करोनाच्या गोंधळात भूगोल विषयाचा पेपर घेता आला नाही, त्यामुळे इतर विषयाचे गुण लक्षात घेऊन सरासरी गुण त्या विषयास द्यायचे धोरण मंडळांनी ठरवले आणि न भूतो न भवीष्यती असा निकाल लावला. आज पर्यंत कधी नव्हे इतका उच्चांकी ९५.३० टक्के निकाल आणि २४२ विद्यार्थ्याना १००टक्के गुण हे ह्या वेळच्या निकालाचे वैशिष्ठ्य. त्यातही लक्षणीय म्हणजे ज्या लातूर पॅटर्न चा नेहमी उदो उदो केला जातो त्या लातूरचे १५० विद्यार्थी १०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सर्व जिल्ह्यामधील शिक्षण बुद्धिवंतांनी या लातूर पॅटर्न चा अभ्यास केला पाहिजे.

निकाल तर लागला आता आव्हान आहे ते प्रवेशाचे आणि योग्य शाखा निवडीचे. विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या सुविद्य पालकांनो, आपल्या पाल्याला किती टक्के गुण मिळाले यावर प्रवेश कोणत्या शाखेला घ्यायचा हे कृपया ठरवू नका. त्याचे गुण पाहण्यापेक्षा त्याचा कल कोठे आहे, त्याची आवड काय आहे हे तुम्ही पहा. पाल्य आणि पालक या दोघांनी विचारपूर्वक प्रवेशाचा निर्णय घ्या. म्हणजे शाखा निवडीचा विचार करतांना केवळ पारंपरिक Art, Commerce, Science याच शाखा आहेत असे नाही हे लक्षात ठेवा.

तसेच त्याला मिळालेले गुण यावर फक्त त्याची शाखा किंवा अभ्यासक्रम ठरवू नका, त्याचा किंवा तिच्या मित्रमैत्रिणी कुठे प्रवेश घेत आहेत तिथेच आमचा प्रवेश, असा आग्रह धरू नका, कारण बारावी नंतर किंवा उच्च शिक्षण घेतांना तुमचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. जीवनातील प्रत्येक निर्णय हा तुमचा स्वत:चाच असणार आहे. तेव्हा मित्र किंवा मैत्रीण प्रवेश घेते म्हणून मी पण तिथेच प्रवेश घेणार असा चुकीचा निर्णय तुमच्या पुढील शिक्षणात बाधा आणू शकतो. तुमच्या भविष्याला कलाटणी देऊ शकतो. तेव्हा सावधपणेच निर्णय घ्या.





आता आपण काय शिकावे, कुठे प्रवेश घ्यावा ते पाहू.
केवळ एखादे काॅलेज नावाजलेले आहे म्हणून तेथे प्रवेश आग्रह धरणे योग्य नव्हे, तर आपणास ज्या शाखेत आणि विषयात स्वारस्य आहे तेथे त्यासाठी निष्णात फॅकल्टी आहे का? योग्य सुविधा आहेत का? हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर ते प्रवासासाठी सोइचे आहे का? जर येण्याजाण्यातच वेळ वाया जात असेल तर अभ्यासाचा उत्साह राहणार नाही. केवळ मित्र प्रवेश घेतो म्हणून मी तिथेच प्रवेश घेतो हे सूत्र योग्य नाही.

बऱ्याचदा असा समज असतो की आर्टसला प्रवेश घेतला म्हणजे आयुष्य वाया गेले, वास्तवतः आर्टस किंवा कला शाखेत प्रवेश घेवून, पत्रकार होता येते, वकील होता येते, वृत्त निवेदक म्हणूनही वाहिन्यांवर आपले स्थान मिळवू शकता. कला शाखेत शिकताना एक बाहेरील भाषा जसे फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इंग्लिश अशी एखादी भाषा निवडून आपण त्यात प्राविण्य मिळवले तर दुभाषी म्हणून आपणास चांगल्या आस्थापनात किंवा केंद्र सरकारच्या उपक्रमात संधी मिळू शकते. याशिवाय जर आपण इंडियन सोशल सर्विस म्हणजे एम.पी.एस.सी किंवा यु.पी.एस.सी.परीक्षेची तयारी केली तर आपण सरकारी उच्च पद मिळवू शकता.

आपणास इतिहास व संशोधन यात रुची असेल तर आपण केंद्र सरकारच्या पुराण वास्तू संशोधन व जतन विभागात संशोधक म्हणून कार्य करू शकता. जर आपणास शिकवण्यात रुची असेल तर आपण एम. ए, बीएड, एम फिल, PhD धारण करून अर्थशास्त्र सारखा विषय निवडून शिकवू शकता किंवा कंपन्यांना सल्ला देण्याचे काम करू शकता. तेव्हा कमी गुण म्हणून कला शाखेत प्रवेश हे धोरण योग्य नव्हे एवढे खासे समजून चला.

आता आपण वाणिज्य शाखेच्या बाबत विचार करू, बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना असे वाटते की बी.कॉम झाले की बँक मध्ये चिकटता येते.  तिथे आरामाची नोकरी, भरपूर रजा, चांगला पगार म्हणून कॉमर्स केले की मस्त मजा, शिवाय कॉलेज अर्धाच वेळ म्हणजे भरपूर मोकळा वेळ. हा समज चुकीचा आहे वाणिज्य शाखा निवडली तर  C.A. होता येत, असे काही समज फिट डोक्यात बसलेले असतात. मित्रानो कॉमर्स ग्रॅज्युएट होण्यासाठी अगणित शाखा आहेत जसे १) Travels and Tourism

 २) कंपनी सेक्रेटरी ३) कंम्प्युटर अकांउटींग ४) फायनान्स अँड इनव्हेस्टमेंट ५) फायनान्स अँड अकाउंटीग.  तेव्हा जसे बँकेत नोकरी मिळवता येते तसे वरीलपैकी एका क्षेत्रात प्राविण्य मिळवल्यास H.D.F.C. ,American Express, India Bull, SBI, UAE Exchange, HCL, Oracle, Dell, Infosys. Hind Times, Suzuki अशा विविध आस्थापनात चांगल्या पोस्टवर नोकरी मिळवू शकता.





दरवर्षी इंडस्ट्रीच्या मागणी प्रमाणे नवंनवीन शाखा निर्माण होत असते. Bachelor in Management studies, Bachelor in Business Administration, Dip. in Taxation अशा अगणित शाखा आहेत. याशिवाय त्या त्या क्षेत्रातील वकीलही होता येते. तेव्हा तुम्हाला कोणत्या बाबतीत करिअर करायचं आहे हे निश्चीत करा, कोणता व्यवसाय करणे तुम्हाला आवडेल ते ठरवा त्या करता आवश्यक ती पूर्व तयारी केल्यास यश अगदी नक्की मिळेल.स्वत:चे मार्केटींग नेटवर्क उभारून किंवा एखाद्या वस्तूची डिलरशीप घेऊनही तुम्ही पैसा आणि प्रसिध्दी मिळवू शकता.शेवटी काय करायचे? नोकरी, व्यवसाय, उद्योग, कन्सलटन्सी हा निर्णय तर तुमचा असेल.

मात्र इतक्या शाखांचा विचार करुन गोंधळून जावू नका. तुमच्या परिचीत, मित्रपरीवाराकडून भविष्यातील संधीचा वेध घेऊनच क्षेत्र निवड करा.

शास्त्र शाखेची निवड करताना आपणास तांत्रिक गटात स्वारस्य आहे की वैद्यकीय क्षेत्रात आपण करीयर करू इच्छिता हे ठरवले पाहिजे. त्या नुसार दोन्ही अभ्यासक्रमाची प्रवेश फेरी ही वेगळी असते.ती राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर अशी भिन्न असते. JEE, AIEEE अशा भिन्न परीक्षेतील गुणांवर आपला प्रवेश निश्चित होतो. या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क इतर अभ्यासक्रमापेक्षा बरेच जास्त असते.

 वैद्यकीय क्षेत्राची निवड करायची असेल तर आपल्याला जीवशास्त्र ह्या विषयात अभिरुची असली पाहिजे. त्यातील विविध जैविकक्रिया त्याचा परस्पर संबंध, शरीरशास्त्र समजुन घेता आले पाहिजे. त्याचबरोबर मन खंबीर पाहिजे कारण वैद्यकीय अभ्यास क्रमात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यावर भर दिला जातो. हा अभ्यासक्रम एकूण पाच वर्षांचा आहे. मेडिकल क्षेत्रासाठी AIIMS  व MHCET मार्फत प्रवेश परीक्षा द्यावी लागते, या परीक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे आपली All India Rank किंवा राज्यातील रॅंक ठरते व त्यानुसारच प्रवेश ठरतो.

मेडिकल क्षेत्रातही विविध शाखा आहेत.जसे MBBS, BDS, हे दोन प्रमुख अभ्यासक्रम आहेत. दोन वर्षांच्या समान अभ्यास क्रमा नंतर आपण प्रसूती तज्ञ होणार, की अस्थी तज्ञ, स्किन स्पेशालिस्ट, की कान, नाक, घसा तज्ञ, हृदयरोग तज्ञ हे ठरते. हे केवळ उदाहरण म्हणून दिले आहे. मुंबई मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेज, टोपीवाला मेडिकल, लोकमान्य मेडिकल कॉलेज ह्या  प्रथितयश संस्था आहेत. याव्यतिरिक्त किंग एडवर्ड, HBT MEDICAL, PODDAR, SOMAIYA ह्या संस्थातून वैद्यकीय अभ्यासक्रम शिकवले जातात. अर्थात ह्या अभ्यास क्रमाचे शिक्षण शुल्क तुलनेने जास्त असल्याने त्याचे आर्थिक नियोजन असणे गरजेचे आहे.

OPTOMETRY, DIALYSIS TECHNICIAN, MEDICINE AND HEALTH SCIENCE असे paramedical अभ्यासक्रम पूर्ण करूनही स्वतःचा व्यवसाय सुरु करता येतो. या व्यतिरिक्त वैद्यकीय क्षेत्रातही अनेक संधी आहेत जसे आपण मेडिकल लॅब सुरू करून स्वतःसह इतर मित्रांना व्यवसाय किंवा नोकरीची संधी देवू शकता.





तांत्रिक शिक्षण घेऊन स्वत:चा पाया मजबूत करता येतो. इयत्ता अकरावी प्रवेश घेतांना व्होकेशनल शाखा निवडल्यास विज्ञान शाखा शिकतांना बायलाॅजी ऐवजी  एक व्यावसायिक विषय निवडून दोन वर्षे अभ्यास केला की त्या व्यावसायीक अभ्यासक्रमाचा पाया पक्का होतो. इयत्ता बारावी केल्या नंतर विद्यार्थी सीईटी एन्ट्रन्स टेस्ट किंवा IIT, JEEदेऊन इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इंडंस्ट्रियल इलेक्ट्राॅनिक्स, कंम्पुटर, इन्फरमेशन टेक्नाॅलाॅजी, एरोस्पेस, प्लास्टिक टेक्नाॅलाॅजी इत्यादी क्षेत्रात पदवी पूर्ण करू शकतात. मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, बंगळूरू अशा एकूण सात भारतीय तंत्र संस्था मधून BTech, Mtech विशेष अभ्यासक्रमासह पूर्ण करून मान्यवर संस्थेत उच्च पदाची जबाबदारी सांभाळता येते.

काही आयआयटी स्नातक या नंतर MBA करून विशेष पदावर कार्यरत असतात किंवा देशाबाहेर संधी शोधतात. आपल्या देशात IIM अहमदाबाद, दिल्ली, हैद्राबाद, कोलकत्ता, दुर्गापूर, बँगलोर येथे आहेत. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे येथे MBA इन्स्टिट्यूट आहेत. वेलिंगकर, एस.पी. जैन, नरसी मेहता, Sydenham, somaiyaa इत्यादी संस्था वेगवेगळे अभ्यासक्रम राबवतात. MBA पूर्ण केलेला उमेदवार MNC कंपनीत चांगल्या पॅकेज वर नोकरी मिळवतो.   

दहावी नंतर पदविका पूर्ण करून पदवी अभ्यासक्रमाच्या दुस-या वर्षास प्रवेश मिळवू शकतात. आत्ता बी.व्होक अभ्यासक्रम मुंबई तसेच इतर युनिव्हरसीटी यांनी सुरु केले आहेत. या अंतर्गत बी.एस.सी ( आय.टी.), बॅचलर इन ओडिओलाॅजी अँड स्पिच थेरेपी, बॅचलर इन रॅडिएशन, बॅचलर इन मेडिकल लॅब टेक्निशियन, बीएससी अग्रीकल्चर अशा अनेक शाखांचा समावेश केला आहे.

या क्षेत्रातील अनुभव घेण्यासाठी म्हणजे  एन्ट्रनशीप करीता वेगवेगळ्या कंपन्या व आस्थापना स्वत: महाविद्यालयात येऊन उमेदवारी देत  आहेत. 

वेगळ्या वाटेचा विचार करतांना मरीन इंजिनिअरिंग, एरोस्पेस, एनव्हायरल स्टडिज या सारखे अभ्यासक्रमही फारच उपयुक्त ठरत आहेत. तेव्हा आपणास ग्रॅज्युएशन सह एखादा व्यवसायिक अभ्यासक्रम निवड ही आता काळाची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणात यांचा पुरस्कार केला आहे.

जर आपल्याकडे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ देणे शक्य नसेल तसेच आर्थिक तरतूद नसेल तर आपण औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणजे आय.टी.आय. येथील अनेक कौशल्य अभ्यासक्रमापैकी आपणास आवड असेल अशा एका अभ्यासक्रमाची निवड करु शकता.

Automobile मॅके. डिझेल व पेट्रोल इंजी.मॅक,इन्स्ट्रूमेन्ट मॅक.इलेक्ट्राॅनिक्समॅक,  मेकॅ. ड्राप्समन आय.टी, फिटर, टर्नर, वेल्डर, शिट मेटल मेकॅ, x-ray टेक्निशियन असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सदर सर्व अभ्यासक्रम हे दोन वर्षांचे असून, शासकीय औद्योगिक केंद्रात प्रवेश online सुरु आहेत.

नजीकच्या तालुका औ.प्र.केंद्रात आपण प्रवेश घेऊ शकता‌. दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर आपणास वेगवेगळ्या आस्थापनात शिकाऊ उमेदवारी करता येते. येथे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवताना विद्या वेतन मिळते. L&T, महिंद्रा, गोदरेज, सिमेन्स, भारत बीजली, रेल्वे वर्कशाॅप, बेस्ट, एस.टी.महामंडळ अशा सर्व आस्थापनात शिकाऊ उमेदवारी online पद्धतीने मिळते. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना लवकर स्वावलंबी व्हायचे असेल तर यांच्या साठी हा सोप्पा व सहज मार्ग आहे. आय.टी.आय पूर्ण करताच जर आपणास चांगले गुण असतील तर पदविकेच्या दुस-या वर्षास प्रवेशही मिळतो. म्हणजेच उच्च शिक्षणाची संधी प्राफ्त होते. महाराष्ट्रात किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणात राबविले जातात, एकाच वेळेस बारावी आणि व्यवसाय कौशल्य मिळवता येते. यात तंत्र गटात इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, ऑटो असे तर वाणिज्य क्षेत्रात बँकिंग आणि इन्शुरन्स, auditing and accounting, वैद्यकीय क्षेत्रात मेडिकल लॅब असिस्टंट असे अभ्यासक्रम, बेकरी उत्पादने, Fishry असे अभ्यासक्रम आहेत.याच बरोबर व्यवसाय शिक्षण मंडळाचे कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम आहेतच हे अभ्यासक्रम आपण करू शकता.

आता नक्की कोणते शिक्षण घ्यायचे ते तुमची गुणवत्ता, तुमचा ठाम निश्चय, जिद्द आणि झोकून देऊन अभ्यास करण्याची तयारी यावर सारे अवलंबून आहे. आपण ज्यासाठी प्रवेश घ्यायचा आहे तो अभ्यासक्रम गुगल केल्यास सर्व पर्याय, संस्थांची नावे, शिक्षणाचा कालावधी, संस्थेचे मानांकन याच बरोबर त्याचे शैक्षणीक शुल्क, अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मिळणा-या संधी यांची माहिती बसलेल्या जागीच मिळू शकेल. तेव्हा कुठेही प्रवेश घेण्यापूर्वी तुमची गुणात्मक क्षमता आवड, योग्य शैक्षणिक संस्था याची खात्री करूनच पाऊल टाका.

चला तर मग भविष्याची वाटचाल करायला सिध्द होऊ जीवनाला एक नवा आयाम देऊ.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar