गुरूदक्षिणा
त्याचे नाशिकच्या सुरगणा येथे प्राथमिक शिक्षण झाले. सुरगणा आणि पेठ हे तसे दुर्गम तालूके येथे भरपूर पाऊस पडतो पण डोंगराळ भाग जास्त असल्याने लागवडीसाठी योग्य जमीन कमीच. त्यांची वडिलोपार्जित अवघी एक एकर जमीन होती. पावसाळी पीक घेतले की उरलेल्या वेळी त्यात हरभरा, बाजरी असे पिक वडील घेत पण तीन भावंडे आणि आजी आजोबा, आई वडील अशी खाणारी सात आठ तोंडे होती. म्हणूनच शेतीचे काम नसेल तेव्हा वडील मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतीवर मजूरीला जात. तो चवथीत असतांना वडील त्याला म्हणाले, “परशा,आता शालेन जाण्यापेक्षा गुरा घेऊन जा हो, तवडीस माना मदत होईल.”
त्याला निमित्त मिळाले, तो गुरं घेऊन चारायला नेऊ लागला. एक दिवस त्यांचे भंडारी गुरूजी सकाळीच घरी आले, तो गुरं सोडतच होता इतक्यात हाक ऐकू आली, “परशुराम, ए परशूराम, कुणी आहे का घरात?” त्याचा बाबा बाहेर गेला, “गूरूजी, तुमी सकाळीच कायला आला? काय निमित्त काहाडल? या कांबळ्यावर बसा.” त्याने कांबळे झटकून ओसरीवर घातलं. भंडारी गुरूजी संकोचले, तिथेच उभे राहिले, तस, पावरा म्हणाले, “बसा की गुरुजी, सकालीच आला चा घेऊन जा. नायतर दूधच देतो तुमाला.” “पावरा, दूधाच राहू दे तुमचा परशुराम कुठे आहे, गेले चार दिवस शाळेत आला नाही.” भंडारी म्हणाले. “गुरूजी आथा तो शालेत नाही यायचा, तो गुरांशी जातो. शिकून काय करल, पूढ शिकवाय पैस नको? गरीबाला शाला काय कामाची? शिकून तो काय सायेब होईल काय?” “हे पहा परशुरामाचे बाबा तो हुशार आहे, शिकला तर उद्या खरच साहेब होईल. तुमच्या घराच नाव काढेल.” भंडारी गुरूजी समजावत म्हणाले.
“गुरूजी, नग नग, आता पूढ शिक्षाण द्यायला नाय परवडायच, मोठ्या शालेन घालाय पैस बी नाय, न त्याची कापड, पुस्तक खर्च काय थोडा हाय, आमा गरीबाला नाय जमायचं. उद्या चार बुक शिकला त मंग गूर कोण सांभाळल, रानात कोण जाल?” “पावरा, ते सर्व माझ्यावर सोडा, मी खर्च करीन. मी मोठ्या शाळेत पाठवीन पण आधी चवथी तर पूर्ण करुदे, मुलगा हुशार आहे. स्काँलरशीपला तयारी करुन घेतली तर तालुक्यात पहिला येईल. शाळेच नाव होईल.”
“गुरूजी तुम्ही म्हणताय ते खर हाय, पर ती कलरशीप आमाला नग. आमच पोर तिकड तालुक्याला गेलं आणि हरवलं म्हणजे सोदणार कोण? आमी अडाणी कवा शाळा बी बगितली नाय. आमच काय अडल काय? परशा शाळा शिकून सायेब झाला त उद्या आमाला विचारल कशावरून? नग नग तुमी उगाच गळ घालू नका. आमाला आमच्या वाटेन जाऊ दे.” पावरा वेड वाकड तोंड करत म्हणाला.
भंडारी गुरूजींना कळेना,एवढ समजावून पावरा काही ऐकायला तयार नव्हता, ते ऊठता ऊठता म्हणाले, “पावरा, उद्या जज सायबाला कळवतो तुम्ही मुलाला शाळेत पाठवत नाही, मग जज पोलीसांना पाठवतील मग तुम्ही द्या उत्तर, कदाचित पकडूनही नेतील, त्यांना माहिती पडलय तुम्ही मोहाची दारू गाळता म्हणून.”
ते ऐकताच पावरा एकदम नरमला, “गुरुजी ते वरच्या सायबापर्यंत कशाला जायच, मी पोराला पाठवतो अगदी आथा पासून शाळेला येईल.” गुरुजी तरीही म्हणाले, “एवढा वेळ तुम्ही वाया घालवला, मी निघालो, तुम्ही परशुरामला शाळेत आणून सोडा. हयगय केली तर जजचा पोलीस आणि तुमी हव ते करा.”
गुरूजी शाळेत आले,ते शाळेत पोचले सर्व मुलांनी गुरूजींना एकसाथ नमस्ते केल. “राष्ट्रगीत सुरू”, भंडारी गुरूजी खुर्ची समोर उभे रहात म्हणाले. मुलांनी राष्ट्रगीत सुरू केली, “जन गण मन अधी नायक जय हे भारत भाग्य विधाता ———जय हे जय हे जय जय जय जय हे.भारत माता की जय.” आवाज वर्गात घुमला. गुरूजी खुर्चीवर बसले आणि मुलांना म्हणाले, “हजेरी द्या रे, काथोड!” “गुरूजी sss हजर” , “मानकर!”, “हजरsss” , “परेड!”, गुरूजी हज्जरsss, सर्व मुलं जोराजोराने हसू लागली.”गप्प बसा रे! प्रार्थना सुरू करा.” “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दीन पद दलीत तया जाऊन उठवावे ——-.” प्रार्थना संपली. सर्व मुलांची हजेरी झाली तसा भंडारी गुरूजींनी पट लिहीला. पाण्याचा पेला तोंडाला लावला तोच दरवाजातून आवाज आला.
“गुरुजी परशाला आणल, ते आपल दारूच जज सायबाला नका कळवू. पोलीस कुट कुट कुटतात, तुमी सांगलय परशाला, तो रोज शाळेत येल. तुमी करतान तसाच करा पण माझेपाशी पैस नाय तितक ध्यानात घ्या.” परशुरामाला पाहून मुल ओरडली, “ये परशा माझ्याकडे बस, दुसरा म्हणाला, तुझ्याकडे का म्हणून परशा माझा जीवाचा मैतर हाय ये रे फरशा माझ्याकडे बस.” “मुलांनो गप्प बसा नाहीतर छडी बसेल.”अस म्हणत गुरूजींनी छडी टेबलवर आपटली तशी मुल चिडीचूप झाली. गुरूजींनी परशुरामला बोलवले, हे बघ तू रोज शाळेत आलास तर तुला मी गोष्टींची पुस्तक देईन, आला नाहीस तर तुझ्या बाबा ला पोलीस पकडून नेतील काय येशील ना रोज?” त्याने मान डोलवली, “माझा बाबाच बोलला शाळेत नको जाव, गुरांशी जा. आता रोज येन, माझ्या बाबाला पकडून नाय ना नेणार?” “बरं मी सांगतो त्यांना, पण दांडी नाय मारायची, काय?” गुरूजी त्याच्यावर करडी नजर रोखत म्हणाले. परशुराम नियमित शाळेत येऊ लागला. तो हुशार होताच, पोरग फुकट जाऊ नये आणि शाळेच नाव व्हावं ही गुरूजींची तळमळ. जळगाव वरून गुरूजी इथ आले होते.
उद्या चांगला शेरा मिळाला तर मागतील तिथे बदली मिळण्याची शक्यता होती. हाच तो गुरूजींचा स्वार्थ.
परशुराम बरोबर पाच मुलांची त्यांनी स्काँलरशीपची तयारी करून घेतली. शाळा सुटली की गुरूजी तास,दिडतास मुलांचा अभ्यास घ्यायचे. स्काँलरशीपच पुस्तक दिंडोरी वरून मागवलं होत. मुलांचं गणीत, विज्ञान, सामान्य ज्ञान, बुध्दीमापन त्यांनी करून घेतलं होतं. परीक्षेला स्वतः मुलांना एसटी ने तालुक्याला घेऊन गेले. दोन तीन महिन्यांनी निकाल आला, परीक्षेला बसवलेल्या पाच मुलांपैकी चार पास झाली. परशुराम पावरा तालुक्यात पहिला आला होता. गावात आणि तालुक्याला त्याची आणि गुरूजींच्या नावाची चर्चा झाली. गावाच्या सरपंचांनी शाळेत येऊन गुरूजींच अभिनंदन केलं. आमदार गावीत साहेबांनी स्वतः गावात येऊन दोघांचे कौतुक केलं. जागोजागी आमदार साहेब आणि परशुरामचे फोटो लागले. ज्यांनी पदरमोड करत त्याला मार्गदर्शन केलं ते भंडारे गुरूजी दूरच राहीले. पण त्यांना आनंद झाला तो त्यांच्या शाळेचा मुलगा तालुक्यात पहिला आला याचा. गुरूजींनी चारही मुलांना घरी बोलावून मुलांना गोडाचे जेवण घातले, भेट म्हणून गोष्टीचे पुस्तक दिले.
त्यांच्या प्रयत्नांना यश आले. परशुरामचा उत्साह वाढला. मग परशुरामाने मागे वळून पाहिलं नाही गुरूजींच्या मार्गदर्शनामुळे दिंडोरी येथे सरकारी वसतिगृहात राहिला, गुरूजींनी त्याची व्यवस्था लावून दिली. त्याच्या वडीलांचा आधी ठाम नकार होता. गुरुजींनी त्यांना वसतिगृह आणून दाखवल्यावर त्यांचा विरोध मावळला. ग्रामीण भाषेमुळे मुलं त्रास खूप त्रास देत, टिंगल टवाळी करत, तिकडचे अधीक्षक मेहतर हे त्याची समजूत घालत. इतर मुलांना रागावत त्यामुळे हळूहळू त्याचा त्रास कमी झाला. गुरुजी महिन्यात एकदा तरी त्याला भेटून जात. आपुलकीने घरून काही बनवून आणत. तो स्कॉलरशिप परीक्षेत पहिला आल्यापासून त्यांच्या गावातून दर वर्षी एक दोन मुले तरी परीक्षेला बसत त्यामुळे भंडारे गुरूजींना लोक तालुक्याला ओळखू लागले. ते परशुरामला भेटायला आले की मेहतर सर त्यांचे स्वागत करत.
भंडारे गुरुजी त्याला भेटायला आले की त्याला आनंद होई.तो त्यांच्या पाया पडून आशिर्वाद घेई. त्याचे वडील कधीतरीच भेटायला येत पण भांडारे गुरुजींची खेप चुकत नसे, एक दिवशी ते त्याला भेटायला आले तेव्हा त्यांनी त्याला बरीच पुस्तके आणली होती. इतकी पुस्तके पाहून त्याला आश्चर्य वाटले. “गुरुजी,इतकी सगळी पुस्तके मला एकट्याला!” “हो! आता माझी बदली माझ्या गावाकडे झाली आहे. आता तुला भेटायला मी येऊ शकणार नाही. म्हणून माझ्याकडे असलेली चांगल्या लेखकांची पुस्तक तुला भेट द्यायची ठरवली आहेत. यात खांडेकर, फडके, अत्रे , मिरासदार अशी चांगल्या लेखकांची पुस्तके आहेत.वेळ मिळेल तशी तू वाच यांचा तुला खुप उपयोग होईल.”
“गुरूजी तुम्ही दुसऱ्या गावी गेला त मला कोण बघेल, माझे बाबा तर दोन दोन महिने येत नाहीत. तुमी मदत केली म्हणून या शाळेत आलो पण तुम्ही दुसऱ्या गावी गेलात की माझा बाबा मला परत गावाकडे नेईल मग पून्हा गूर राखावी लागतील.” त्याचे डोळे भरून आले, तो रडायचाच बाकी होता. गुरुजींनाही खुप वाईट वाटलं, गेले चार पाच वर्षे ते आपल्या मुलाला भेटायला जाव अशा ओढीने त्याला भेटायला जात असत त्यांची पत्नी त्याच्यासाठी आवडीने डबा पाठवत असे, पण इलाज नव्हता. बरेच वर्षे प्रयत्न केल्यानंतर त्यांना बदली मिळाली होती. खर तर ते गाव त्यांना सोडायला तयार नव्हते. गावातील लोक त्यांना शेतातील ताजी भाजी, खरवस, भुईमुगाच्या शेंगा असं आणून देत. त्यांनाही गाव आवडू लागले होते. मेहनती आणि मुलांची अभ्यासाची तयारी करून घेणाऱ्या शिक्षकाला कोण सोडेल? पण त्यांनीच गावातील सरपंचांना विनंती केली. “सरपंच ! बरेच वर्षे माझ्या गावापासून दूर आहे, इतर शिक्षकही मेहनत करतातच आहेत. आता आग्रह नका करु.” तेव्हा कुठे त्यांच्या बदलीला काही देणं घेण न करता मुहूर्त मिळाला.
गुरूजींनी त्याचा निरोप घेतला. त्याला पन्नास रूपये देत ते म्हणाले, हे ठेव अडी अडचणीत उपयोगी पडतील, मेहतर सरांशी मी बोललोय ते तुझी काळजी घेतील.” दोघांनाही निरोप घेणे जड गेले. तो रडतच म्हणाला, “गुरूजी तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहिच नाही.” गुरूजी मंद हसत म्हणाले, “अरे तू आनंद दिलास की, अजून काय हवे? देणारच असशील तर वचन दे की कितीही अडचण आली तरी तू शिक्षण सोडणार नाही. देतोस ना वचन!” गुरूजींनी हात पूढे केला. परशूराम अवघा तेरा चवदा वर्षांचा पण त्यांनी गुरूजींना वचन दिल, “गुरूजी दिलं वचन काही झालं, कितीही अडचण आली तरी शिक्षण अर्धवट सोडणार नाही.” दोघांचेही डोळे भरून आले.
त्यानंतर न चुकता गुरूजींची पत्र येत राहीली. तिथेच तो जिल्हापरिषद शाळेत SSC झाला. शाळेत पहिला आला. आता त्याची भाषा आणि देहबोली सुधारली. पुढील शिक्षण होईपर्यंत वसतिगृहात राहण्याची सोय झाली. गुरूजींनी त्याला मेहतर यांच्या मदतीने कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. मेहतर सरांनी त्याची शिफारस केल्यामुळे त्याला शिष्यवृत्ती मिळू लागली. कधीतरी गुरूजी वसतिगृहात फोन करून त्याची चौकशी करत. त्या नंतर काळाच्या ओघात दोघाचं पत्र संभाषण खुंटल.
वर्षे पाठी पडली भंडारे गुरुजी मुळचेच मेहनती विद्यार्थी प्रिय. दर वर्षी ते मूल स्कॉलरशिपला बसवत, त्यांची तयारी करून घेत. तो त्यांच्या कामाचा भाग होता.आपण काही जास्तीच करतो असा त्यांचा अविर्भाव कधीच नव्हता त्यामुळे आपल्याला कोणी पदक द्यावं, कौतुक करावे असा आशावाद ही नव्हता. पण एके दिवशी त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे सकाळचा पेपर वाचत असतांना धावत त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “बाबा ही बातमी वाचा.”
ते म्हणाले, “अरे माझा चष्मा टेबलावर आहे तूच सांग काय बातमी आहे, एवढा कसला आनंद झालाय तुला?” “अहो तुम्हाला राज्यसरकारचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालाय, आहात कुठे!” “महेश ,चेष्टा पुरे हां, जा बघू मला बागेला पाणी घालू दे, मला हे आवरून शाळेत जायचय, उगाच माझा वेळ वाया नको घालवू.” “अहो बाबा, अस काय करताय, तुमची गंमत करायला मला वेड लागलय का? मी अगदी दोन वेळा खात्री करून घेतल्यानंतर तुम्हाला सांगतोय.”
आता आश्चर्यचक्कीत व्हायची पाळी त्यांची होती, त्यांनी झाडाला पाणी घालायची झारी खाली ठेवली आणि म्हणाले,”अरे कस शक्य आहे? मी त्या पुरस्कारासाठी अर्जही केला नाही. आणि त्या अर्जावर नगरपालिका प्रतिनिधी किंवा आमदार यांची शिफारस लागते. त्यानंतर तो जिल्हा शिक्षणाधिकारी, राज्य शिक्षण खाते यांच्या माध्यमातून जातो.” बाबा तुमचं म्हणणं अगदी बरोबर पण गेले तीस बत्तीस वर्षे तुम्ही मुलांसाठी अनेक उपक्रम राबवत असता, स्कॉलरशिप,अंगण बगीचा, स्वच्छता मोहीम, साक्षरता अभियान, काही ना काही उपक्रम वर्षभर सुरू असतो. त्याची नोंद कुठेतरी होत असणारच, तुमच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी तुमची शिफारस केली असेल.”
“महेश तू म्हणतो तस असेलही पण मग आमचे चौधरी साहेब गेल्या महिन्यात येऊन गेले ते काही तस म्हणाले नाहीत. माझी शाळा दाखवायला कोणा अधिकाऱ्यांना घेऊन आले होते. त्यांनी शाळा आणि उपक्रम नोंदवही पाहून कौतुक केलं खरं.” त्यांचं बोलणं ऐकून महेशची आई सावित्री बाहेर आली, “महेश कोणा विषयी बोलताय तुम्ही? ,कोणाला पुरस्कार मिळाला?” “अग,बाबांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. शिक्षक दिनाला राज्यपालांच्या हस्ते देणार.” “अरे! खरं की काय? यांना पुरस्कार मिळणार आणि मला साधं कोणी बोललं देखील नाही, काय हो गुरुजी, तुम्ही सुद्धा अगदी पत्ता लागू दिला नाही,बरेच की आहात.” “सावित्री अग मलाच माहिती नाही, आता पेपरमध्ये छापून आलं म्हणून खर मानायचं, माझा तरी अजून यावर विश्वास नाही, कधी या संपादक लोकांजवळून चूका होतात. त्यांना दिलगिरी व्यक्त करायला वेळही लागत नाही. असो तू माझा डबा तयार केलास ना? आणि महेशराव आपण ऑफिसमध्ये जाताय ना?”
त्यांचं बोलण सुरू असतानाच त्यांच्या घरासमोर दोन गाड्या येऊन उभ्या राहिल्या, एका गाडीतून त्यांचे जिल्हा शिक्षण अधिकारी चौधरी साहेब उतरले, दुसऱ्या गाडीतून सुटा बुटातील कुणी दुसरे अधिकारी उतरले. त्यांना उतरतांना पाहून महेश घरातील आवरायला आत गेला. भंडारी गुरूजींची गडबड उडाली, ते अनवाणी चोधरी साहेबांकडे गेले. “या साहेब,आज माझ्या घरी सकाळीच येण केलत,अलभ्य लाभ, सावित्री आमचे साहेब आलेत जरा चहा टाक गं.” चौधरी साहेबांच्या हातात फुलांचा पुष्पगुच्छ होता, त्यांच्या बरोबर दुसरे अधिकारी होते त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीच्या हातात पुष्पगुच्छ आणि एक पिशवी होती. गुरूजींनी बैठकिच्या खोलीत त्यांना नेल. त्या दुसऱ्या व्यक्तीकडे पाहून महेशने त्यांना नमस्कार केला. साहेब आपण!
त्यांनी खुणेने महेशला शांत राहण्याची खुण केली. महेशने टीपॉयवर पाणी आणून ठेवले. चौधरी साहेब, त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्ती बसल्या. चौधरी साहेबांनी ओळख करून दिली. सर, हे आपले जिल्हाधिकारी पवार साहेब,मुद्दाम आपलं स्वागत करायला आलेत. पहिला पुष्पगुच्छ पवार साहेबांनी दिला आणि ते गुरुजींच्या पाया पडू लागले तस गुरुजी संकोचले, महेशलाही आश्चर्य वाटले. पवार साहेब तरीही गुरूजींचे पाय धरत म्हणाले,”गुरूजी मला आपण ओळखल नाही, मी तुमचा परशुराम. गुरूजी मध्यंतरी मी आपल्या संपर्कात नव्हतो त्याबद्दल क्षमा मागतो, तुम्ही नेहमीच मला वडीलांच्या जागी होता.आजही आहात. मला क्षमा करा.”
गुरुजींनी त्यांना हात धरून उठवले, अलिंगन देत म्हणाले “परशुराम तू ! माझा परशुराम.” त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती गुरू शिष्याची भेट पाहून चोधरी साहेब हेलावून गेले. महेशच्या आईला हाक मारत गुरुजी म्हणाले, “अगं ! बाहेर ये, बघ कोण आलय,ओळख पटते का पहा.”
सावित्री बाहेर आली,डोळे बारीक करून पाहू लागली, “माफ करा हं मी आपल्याला नाही ओळखल.आता वय झालय, चष्म्याशिवाय नीट नाही दिसत.” पवार साहेब पूढे होत म्हणाले, ” काकू मी तुमचा परशुराम ज्याला तुम्ही अनेक वर्षे गुरूजींसोबत डबा दिला तोच परशू.” पवार साहेब तिच्या पाया पडले. चौधरी साहेब आणि त्यांचे सहकारी अवघडून उभे राहिले होते.
सावित्रीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, “परशुराम केवढा रे मोठा झालास?, यांची निवड चुकायची नाही हो. मला नेहमी म्हणायचे आमचा परशुराम शंभर नंबरी सोनं आहे.गुरूजींची आठवण ठेवलीस हो.आज जेवल्याशिवाय जायच नाही.” महेश जाग्यावरच चुळबूळ करत होता.”अगं आई माझे साहेब आहेत ते, कलेक्टर साहेब, ते बिझी असतात तू उगाच काहीतरी हट्ट करु नको. त्यांचा वेळ किती महत्त्वाचा असतो तुला नाही कळायचं”
“होय रे परशुरामा, तुझे गुरूजी मुद्दाम वेळ काढून दिंडोरीला तुला भेटायला जायचे डबा घेऊन मी या हातान बनवून द्यायचे, आठवतय ना? आता यांच्या घरी आलास तर न जेवता जाणार म्हणजे —” “महेशजी तुम्ही आमच्या भांडणात नका पडू, काकू आज मी नक्की जेवायला येईन पण आधी चहा तर द्याल की नाही.” पवार म्हणाले. गप्पा टप्पा झाल्या.चौधरी साहेबांनी गुरूजींच अभिनंदन केल.चहापाणी झाले, सावित्री बाईंनी चहा बरोबर उत्पीठ केल होत. मात्र गुरूजींना या पावरा आडनावाच पवार कस झालं कळेना.
शब्द दिल्याप्रमाणे पवार साहेब दुपारी जेवायला घरी आले. सावित्री बाईंनी आनंद झाला, पण गुरुजी मात्र आपल्या नेहमीच्या वेळेवर शाळेत गेले होते. शाळेतही जल्लोष होता. मुलांनी आणि गुरूजींच्या सहकाऱ्यांनी शाळा सजवली होती. प्रार्थना संपली आणि गुरुजींचा मुलांनी सत्कार केला. झाडून सर्व विद्यार्थी पाया पडले.तिकडे सावित्री काकूंच्या हातच जेऊन परशुराम आणि महेश पुन्हा ऑफिसमध्ये आले. महेश जिल्हापरिषद मध्ये सिव्हिल इंजिनिअर होता. आज महेशचा रुबाब काही और होता. तो राज्यपाल उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा एकूलता एक मुलगा होता.
त्यानंतर गुरुजींचे सत्कार होत राहिले पण परशुरामाने घरी भेटून दिलेला सुखद धक्का नक्की मोठा होता. जिल्ह्याचा कलेक्टर एका झेडपी शिक्षकाच्या घरी येऊन अभिनंदन करतो ही गोष्ट सामान्य नव्हती. दुसऱ्या दिवशी लोकमत वर्तमानपत्रात त्यांच्या भेटीचे रसभरीत वर्णन छापून आले. सावित्रीबाईंना अत्यानंद झाला. जन्माचे सार्थक झाले. त्यांनी ती गोड बातमी आपल्या माहेरी कळवली. भंडारी गुरूजींवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.तेहतीस वर्षे नोकरी केली. ते भरून पावले. शब्द दिल्याप्रमाणे परशुरामने उच्च शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा दिली आणि तो पहिल्या प्रयत्नात आय. ए.एस झाला. पण पावरा च पवार का केलं हे मात्र कळलच नाही.
दोन महिन्यांनी पुण्यात बक्षीस समारंभ झाला त्याला परशुराम पवार स्वतः हजर होता. गुरुजींचे कुटुंब हजर होते. परतीच्या मार्गावर परशुरामाने स्वतः गुरूजींची गाडी चालवली. गुरूजींना आपल्या शेजारी बसवून गप्पा मारल्या. तो म्हणाला, “गुरूजी मी महाविद्यालयात शिकत असताना मला खूप वाईट अनुभव आला. माझे मित्र माझ्या आडनावामुळे मला टाळायचे, माझी थट्टा मस्करी करायचे. मला खूप वाईट वाटायचं पण मी दुर्लक्ष करायचो. ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर अपमान गीळावा लागतो.यु पी एस.सी. चा अभ्यास करतांना माझ्या लक्षात आलं. मी माझे आडनाव बदलू शकतो म्हणून मी ते नाव बदललं. आजही नावामूळे समाज कशी वागणूक देतो ते मी पाहतो तेव्हा वाईट वाटतं. लोक अंगच्या गुणांचा विचार करत नाहीत पण आडनावावरून जात ठरवतात. गुरुजी तुम्ही मला सन्मानाची वागणूक दिली हे मी विसरणार नाही.”
गुरूजी म्हणाले, “परशुराम, अरे! वाल्मिकींची जात कोणी पाहिली होती का? माणूस त्याच्या कर्माने ओळखला गेला पाहिजे. तू कोणती जात आणि कोणता धर्म घेऊन जन्माला येतोस ते तुला ठाऊक नसत. समज आल्यावर स्वतःला सिद्ध करण आपल्या हाती असत. मला रास्त अभिमान आहे तू स्वतःला सिद्ध केल्याचा.”
गप्पागोष्टीत वेळ निघून गेला. त्यांनी एका मोठ्या स्टोअर जवळ गाडी थांबवली, “गुरूजी चला.” “अरे कुठे घेऊन जातोस? आपण घरी निघालो आहोत ना!” “गुरूजी, काकूंना आणि तुम्हाला कपडे घ्यायचे आहेत.”
“परशुराम,तू गळ घातलीस म्हणून मी तुझ्या गाडीने निघालो पण आता हे कपडे खरेदीच मला पटत नाही आणि तुझ्या काकूलाही नाही पटायच. तेव्हा गळ घालू नको.” “गुरूजी, तुम्ही माझ्यासाठी केल त्यापुढे हे एकदीच शुल्लक आहे, ते ही माझ्या समाधानासाठी मी करतो, प्लीज नाही म्हणू नका, महेशजी तुम्हीच बाबांना सांगा.”
“बाबा,मला वाटत ,सर एवढ आग्रह करतात तर जा त्यांच्या सोबत.” “महेश, तू हे म्हणतोस? तुला माझा स्वभाव ठाऊक असून, आजवर कोणाकडून काही घेतल नाही, अगदी ताठ मानेने जगलो, आता माझी तत्व मी गुंडाळून ठेऊ!” “बाबा, तुमचे आणि सरांचे संबंध वेगळे आहेत ते फक्त गुरू शिष्याचे नाहीत, तुम्हाला काही खरेदी करून दिल्याने त्यांना आनंद होत असेल तर थोड त्यांच ऐकावं.” “अहो! मला मेलीला राहवत नाही म्हणून मी बोलते, परशुराम तुम्हाला परका का आहे, तो एवढा आग्रह तर ऐकाव त्याच, मात्र परशुराम तुला ही माझ ऐकाव लागेल, एक दिवस सुनेला घेऊन घरी जेवायला याव लागेल, कबूल?” “हो काकू नक्की येऊ आम्ही ती मला नेहमी गुरूजींबद्दल विचारत असते.”
गुरूजींचा नाईलाज झाला. परशुरामनी गुरुजी आणि सावित्री काकूंसाठी कपडे घेतले. चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवू घातले. आणि घरी सोडले. “गुरुजी या जन्मात तुमचे उपकार फिटणार नाहीत पण मला स्वतः ला
समाधान मिळावं म्हणून हा प्रयत्न. तुम्ही पुरस्कारासाठी अर्ज करणार नाही हे मला चौधरी यांच्याकडून कळाले म्हणूनच मी स्वतः शिफारस केली. आगावूपणा केल्याबद्दल माफ करा.” गुरूजींनी त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, “परशुराम जशी माझी आठवण ठेवलीस तशी तुझ्या गावाची आणि घरच्या मंडळींची ठेव. तुझ्या बाबांनी तुला शाळेत पाठवलेच नसते तर— तेव्हा त्यांचे अनंत उपकार आहेत हे लक्षात घे.”
“होय गुरूजी मी त्यांची काळजी घेतो. तुमचे शब्द मी नक्की लक्षात ठेवेन.” परशुराम जातांना दोघांच्या पाया पडला. “चला काकू काही चुकल तर तुमच्या परशुरामला माफ करा.” सावित्रीबाई त्यांच्या जाणाऱ्या गाडीकडे कितीतरी वेळ पहात होत्या. काही दिवस जणू एक स्वप्न त्या जगत होत्या. याच साठी केला होता अट्टाहास असच त्यांना वाटल. गुरूजीच म्हणाले “सावित्री चल आता.” तेव्हा त्या भानावर आल्या.
तो पुरस्कार जरी शासनाने दिला असला तरी गुरुजींच्या कामावरील निष्ठेची आणि अथक परिश्रमाची पावती म्हणून त्यांच्या शिष्याने दिलेली गुरुदक्षिणा होती.