जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
“अहो, ऐकताय ना,हा तुमचा जेवणाचा डबा, हा रुमाल आणि हे तुमच पाकीट. “हं निघा आता लवकर नाहीतर उशीर होईल. “अग इकडे ये, लवकर ये,मला उशीर होतोय.”, ” हं आता आणि काय राहिले सर्व दिलं की तुम्हाला तरी मी म्हणते रोज रात्री तयारी करायला तुम्हाला काय होतं? बोला लवकर, घरात किती काम पडल्यात, काय हवं?” तो तिचा हात धरत म्हणतो, “अग अशी इकडे ये, अंssssमू —-“, “शी, हे काय ते! तुम्हाला मेलं कसला धरबंधच नाही, कुणी बघेल तर काय म्हणेल?” , बघा आठवून, किमान पहिले काही वर्षे, अगदीच नाही तर, काही महिने किंवा दिवस कमी जास्त प्रमाणात अस घडलच असावं पण आता—-, तो किंवा ती कोणीही दाराचा लँच लागता लागता ओरडून सांगतो किंवा सांगते, “अरे किंवा अग ऐकतेस ना, जरा माझा मोबाईल दे, अग चार्ज करत ठेवला तिथेच राहिला, Please hurry, I am getting late.” ती किंवा तो थोड रागानेच सांगते, “असं विसरायला काय झालं? एरव्ही अगदी “तिथं” जातानाही तुम्हाला मोबाइल सोबत लागतो. आता ह्या “तिथं” चा उलगडा झालाच असेल, तर असे हे घरोघरी होणारे संवाद. परवा मी आमच्या सोसायटीतल्या सभासदांना फोन करून, करून कंटाळलो, त्यांची भेट झाली तेव्हा विचारलं तर म्हणाले, “अहो टॉयलेटमध्ये पडून त्याची स्क्रीन गेली त्यामुळे कोणाचा कॉल आला ते कळत नाही.” आता ते वयाने जेष्ठ असल्याने टॉयलेट मध्ये मोबाईल का नेता? असं विचारू शकलो नाही. असो तर हा मोबाईल स्वयंपाक घर ते टॉयलेट असा सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. इतकेच काय तर तो जागेपणी आणि झोपेतही आणि कधी कधी अचानक नको तेव्हा अस्तित्वाची खूण पटवत पाठलाग करतोच आहे.
असो,तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो सुद्धा, तर हा मोबाइल आता तुमचा,माझा सर्वांचा इतका चाहता झालाय की जणू तो हृदय क्रमांक दोन बनला आहे. आणि हृदय दुसरीकडे ठेऊन कसं चालेल? ते स्वतःकडे हवे. म्हणून प्रत्येक जण मोबाइल सोबत बाळगतो अगदी झोपतांना देखील. बर हृदय बंद पडून देखील चालणार नाही बंद पडले तर संपलेच की सारे ! म्हणून मग त्याला जागते ठेवण्यासाठी चार्ज करावे लागते. सध्या शहरात सोडा अगदी ग्रामीण भागातही एकही व्यक्ती नसेल ज्याच्याकडे मोबाइल नाही. सरकारने मोबाईल नंबर आधार कार्ड ला संलग्न केल्यापासून प्रत्येकाने मोबाइल अनिवार्य असल्याप्रमाणे त्याचा वापर आणि वावर सुरू ठेवला आहे.
आता e-ticket,e-railway pass, e-reservation, e-bank book and statements, gas booking, police complaint, driving licence अस सगळंच e. Operated झाल्यापासून एकवेळ “ही” किंवा “ती” ला सोबत नाही नेलं तरी चालेल पण मोबाईल सोबत नसेल तर कालत्रयी चालणार नाही. काही करायला जा, मग ते आधारकार्ड असो, रेशनकार्ड असो की पासपोर्ट तुमचा मोबाईल जवळ हवा. OTP सांगितल्या शिवाय तरणोपाय नाही. म्हणजे OTP सांगायचा तर मोबाईल हवाच की. ” चांगली पाचर मारून ठेवली, बोबंलायला वाव नाहीच.” , ह्याला म्हणतात डोक्यालिटी.
सरकारने, शेतकरी, महिला बचतगट, अपंग व्यक्ती, वृद्ध व्यक्ती यांना द्यायचं अनुदान त्यांच्या खत्यात जमा करायचं निश्चित केल पण त्याचा मेसेज येणार तो मोबाईलवर. म्हणजे दोन हजार रुपयांचे वार्षिक तीन हप्ते आले की नाही हे पाहण्यासाठी सक्तीने मोबाईल वापरावा लागणार. सरकार किती चतुर आहे.
काहीही जाहिरात न करता त्यांनी मोबाईल कंपनीचा फायदा आणि नेटवर्क पुरवणाऱ्या कंपनीचा फायदा कोणाला पत्ता न लागू देता करून दिला. ह्याला म्हणतात साळसूद लूट. ते अनुदान मिळणार म्हणून तुम्ही वर्षभर मोबाईलवर खर्च करत राहणार. सांगा आहे की नाही चतुराई?
मोबाईल किती रुपयांचा आणि कोणत्या कंपनीचा हे महत्वाचं बर का? अहो त्यामुळे तुमचं स्टेटस ठरत ना! तुमचा मोबाईल Apple चा आहे Huawei, sony, Samsung, की मग HTC, Motorola, Lenovo का Nokia यावर तुमची पत ठरते. Apple असला तरी तो Note I की अजून कोणता? तुम्ही मुलांच्या किंवा मुलींच्या ग्रुपमधल Conversation ऐकलय का? त्यांना standard Mobile हवा असतो आणि त्यासाठी Mummy ला काहीही करुन राजी करायला लावतात. त्यांना क्लासच्या नोट्स त्याशिवाय कळत नाहीत. मित्र मैत्रीणींमध्ये मी कशी मोठी? दाखवण्यासाठी कोणत्याही थराला जायची आजच्या पिढीची तयारी असते. हे काही मुलांपुरतं मर्यादित नाही बरं, कामावर जाणारे बहुतांश तरूण, तरूणी चांगल्या कंपनीचा आणि latest model mobile वापरासाठी आग्रही असतात. तो हातातच वागवतात. अगदी लोकल पकडतांना देखील. लोकल प्रवासात कधी कधी मोबाईल चोर
आपल्या हातावर काठीचा जोरदार फटका मारून विचारतात बाळगशील हातात मोबाईल? का पून्हा हवे? काही कळायच्या आत दहा विस हजारांचा मोबाईल गायब झालेला असतो. कंपलेट दिली तर पहिल पोलस हद्दीवरून कंपलेट कोणी नोंदवायची यावरून घोळ घालतात आणि एवढ करून तो पुन्हा
मिळण्याची हमी १% देखील नाही. पोलीस त्या मोबाईलचा जन्म दाखला, अर्थात खरेदी पावती मागणार. एवढा दणका बसल्यावर आम्ही सुधरू याची काही हमी नाही. इतकी या मोबाईलची क्रेझ डोक्यात फिट्ट बसलेली आहे.
बरेच महाभाग स्कूटर चालवताना, उजव्या हाताने स्कुटर किंवा बाईक हँडल तर डाव्या हातात मोबाईल अशी स्कूटर किंवा बाईक चालवतात जेव्हा स्पीड ब्रेकर येतो तेव्हा गाडी वेगात असेल तर दुसऱ्या हाताची गरज असते आणि वेळीच बाईक कंट्रोल झाली नाही तर दुसऱ्या गाडीवर आदळते. दोन मिनिटे रस्त्याच्या बाजूस थांबून कॉल घेता येतो किंवा, नंतर कॉल करता येतो पण मोबाईलचा कॉल तक्षणी घेतला नाही तर अघटित घडेल अशा अविर्भावात बोलण सुरू असत. कधी कधी, मान एक बाजूस वाळवून खांद्याच्या आधाराने मोबाईल कानाला लावला जातो आणि रस्त्यात पडून त्याचा मेंदू बाहेर येतो.पश्चात बुद्धी काय कामाची. हल्ली टू व्हीलर पाठी बसून बहुतांश मुली मोबाईलवर पहात असतात किंवा बोलत असतात. स्पीड ब्रेकर आला आणि पाठची व्यक्ती सावध नसेल तर अपघात घडू शकतो. पण आम्ही मोबाईल पाहण्यात इतके मश्गुल असतो की दुसऱ्या क्षणी काही घडू शकते इतकेही लक्षात घेत नाही.
वाहन चालवताना कान बंद बंद करून चालवणे धोक्याचे पण बहुतांश वेळा हेडफोनने कान बंद करुन घेतलेले असतात. या मोबाईलचा आणि हेडफोनचा क्षणभराचा विरह त्यांना सहन होत नाही. किती गुलाम झालो आहोत आपण या यंत्राचे!
आता तर सर्व मुलांचा अभ्यासही Online, अगदी Jr.KG पासून PG पर्यंत. आताची सहा, आठ महिन्यांची मुलसुध्दा मोबाईलसॅव्ही झाल्यात, त्यांच्या आईकडे मुलांसाठी वेळ नाही, स्तनदा माता सोडल्या तर जी मुलं बाटलीने दुध पितात त्यांच्या एका हातात दुधाची बाटली आणि दुसऱ्या हातात मोबाईल देऊन त्यांना सोडल म्हणजे आई उरलेल काम करायला मोकळी. तो मऊ खिमट, खिचडी, भात खायला लागला तरी हा घास चिऊचा, हा घास माऊचा हा घास कुतूचा करायला आईकडे वेळ नाही आणि चंदा मामा आकाशात बाळ जेवे ऐटीत अस गाणं म्हणत घास भरवण्यासाठी कुणालाही वेळ नाही. गमतीचा भाग म्हणजे आठ दहा महिन्याच्या बाळाला मोबाईल कसा सुरू होतो आणि ते त्याला भुरळ घालणारे गेम कुठे आहेत ? त्यासाठी कुठची कळ प्रेस करावं ते ही कळत अशी ही supersonic पिढी.
आता टी.व्ही. वर सिरीयलच पिक आल्यापासून आजोबा आजीकडे वेळ नाही परिणामी लहान छकुल्यांचा मोबाईल हाच सोबती. त्यामुळे या लहान बाळांसाठी एक Extra Mobile ठेवावा लागतो आणि हो तो स्टर्डी हवा. बाळाचं बिनसल तर तो कुठे भिरकावून देईल त्याच काही खरं नाही. अस हे सगळ मोबाईलवर सुरू असल्याने नेटवर्क कंपन्यांना फार चांगले दिवस आलेत. Jio ने सर्व अबाल वृद्धांना नादावून टाकलं. “जीये तो जीये कैसे बिन आपके.” हे नेटवर्क साठी म्हणतात की “ती आणि तो” एकमेकांसाठी हेच कळत नाही. अब दुनिया मुठ्ठी मे अशी जाहीरात किती कल्पकतेने केली ते पटते.
घरातील मिरची, कोथंबीर, आल संपल तर शेजारी मागता येत, नेटपँकच तस नाहीना ! बरेच सज्जन हे समजूतदार झालेत. एकदा Router आणि पुरेसे Gb डेटा घेतला की सोन्या पासून आजी आजोबा सगळ्यांचीच सोय. आता मोबाईल जवळ घेऊन आजोबा तू माझा सांगाती अस म्हणत असतात कारण आजीला त्यांच्यासाठी वेळ कुठे असतो? रेसीपी YouTube वर पाहून त्या करून पाहण्यात ती दंग असते आणि उरलेला वेळ ती लग्न झालेल्या मुलीला नवीन केलेल्या पदार्थांच रसभरीत वर्णन करण्यात गुंग असते. आता देवळात जायला तशीही करोनाने बंदीच मग भजनही You Tube वर ऐकल तर बिघडल कुठ.
हे मोबाईल वेड जस मुलांच, तरूणांच तस त्यांच्या आजी आजोबांचसुध्दा. मध्यंतरी पेन्शनचे पैसे काढायचे आहेत अशी सबब सांगून आजोबा जात होते तर कधी माझा LIC हप्ता भरायचा आहे म्हणत होते. नातवानी App डाऊन लोड केल्यापासून बँकेचे पैसे घरबसल्या मिळतात आणि हप्ता Online भरता येतो. साहजजिकच त्यांना बाहेर काही कामासाठी जाऊन येतो म्हणायची संधीच मोबाईलने घालवली. आजोबांचा तरी या मोबाईलमुळे तोटाच झाला. मध्यंतरी आजोबा जेष्ठ नागरीक कट्ट्यावर जात होते किंवा मंदिरात दर्शन करून येत होते. हा करोना उपटल्यापासून जेष्ठ नागरीक कट्टा बंद झाला आणि मुलांने त्यांना बाहेर जाऊन नसत संकट घरात आणू नये म्हणून Zoom App Download करून दिलं, तेव्हापासून आजोबा रोज पाच ते सात या वेळेत जेष्ठ नागरीक कट्टा, Zoom meeting वर Enjoy करतात.
गंमत म्हणजे कधी भावनाविवश होऊन बोलतात,तर कधी “एक नंबरचा हरामखोर आहेस तू.” अस म्हणतात, तर कधी,” अरे! टपरीवरचा चहा पिऊन किती महीने लोटले,आठवण येते रे.” अस मोठ्या आवाजात सांगतात. त्यांना किती वेळा समजावलं की आप्पा मोठ्ठ्याने बोलायची गरज नाही, त्यांना ऐकू येतय, त्यांना बोलायला वेळ तर द्या, तर म्हणतात, “Sorry बेटा अरे मी हळूच बोलतो, माझ्या नकळत कधी आवाज वाढतो कळतच नाही.” त्यांच बोलण सुरू झालं की आजी कटकट करते, “अहो किती वेळ बोलताय? मोबाईल तापून फुटेल की, ठेवा आता मला लेकीला फोन करूदे.” स्वतः मात्र लेकीशी बोलायला लागली की तासभर बोलत बसते.
कोणाजवळही दुसऱ्यासाठी वेळच शिल्लक नाही. बिचारे सर्वच जण घरात एकाकी जगत असतात. मोठी माणस त्यांच्या कामात, Office Online meeting मध्ये, ममा घरी आली की तिच्या मैत्रिंणीबरोबर Gossip करण्यात व्यस्त आणि आजी आजोबा त्यांच्या मित्र, मैत्रिणी आणि त्यांचे जेष्ठ नागरीक क्लब मिटींग. मग आम्ही कोणा बरोबर बोलणार? मित्र कधी कधी एवढे पकाऊ असतात की वैताग येतो, शेवटी मोबाईलशी मैत्री करावीच लागते. तोच तर असा मित्र आहे जो मला हवं ते चुटकीसरशी देतो मग मी त्यालाच पार्टनर बनवून Chase , cricket, Carrom, Rummy, Badminton, Table Tennis काही खेळतो. बर इतर मित्रासारखा तो रडीचा डाव खेळत नाही आणि कंटाळा आला आणि मध्येच गेम आवरला तरी आदळा आपट करत नाही. सांगा मला, Dad ला Mamma ला, आणि आजी, आजोबांना Comfortably सोबत करेल असा घरात तरी कुणी मेंबर आहे का ? हे कसल घर ही तर प्रत्येकाची Water tight Compartment.
आजोबा म्हणतात या पूर्वी त्यांच्याकडे आणि त्यांच्या मित्रांकडे एक अतिशय छोटी पॉकेट डायरी असायची ज्या मध्ये अनेकांचे फोन बाराखडी प्रमाणे लिहिलेले असायचे आणि त्यातील नंबर पाहून तर फोन करायचो. एवढच काय लक्षात रहावं म्हणून नात्यातील अगदी जवळच्या जीवलगांचे जन्म दिनांक लिहून ठेवलेले असायचे आणि आजीने आठवणीने आणा म्हणून सांगितलेली सामानाची यादी सुध्दा त्यात लिहिलेली असायची. आता मात्र सर्व मित्र, मैत्रिणींचे Birthday, wedding anniversary, इतकच काय तर आता आमचं जनरेशन, म्हणजे तरूण मुलं Break up anniversary celebration सुध्दा मोबाईलवर स्टोअर करतात आणि “तो” पठ्ठा बायको आठवण ठेऊन सांगते तस reminder पाठवतो.
बायकोसुध्दा अगदीच काही तातडीने आणि बारगेन करून आणायच असेल तर Whatsapp करते. त्यामुळे सतत मोबाईलवर पहाव लागत. बीप वाजला किंवा टोन आला की लगेच त्याला हाती घेऊन पहाव लागत, त्याच्यावर नवऱ्याचा/बायकोचा, Boss चा, Friend चा कोणाचाही मेसेज असू शकतो आणि जर त्याला immediate response दिला नाही तर काही घडू शकत अगदी डिव्होर्स सुध्दा, मग सगळ एवढं Sensational झाल असताना तुम्ही त्याच्याकडे कस नजर अंदाज करू शकाल!
मोबाईलवर येणारे मेसेज किती महत्त्वाचे असतात म्हणून सांगू. भाव भावनांचे तरंग ह्या मेसेजवर अवलंबून असतात. आपल्याला होणारा आनंद, दुःख, राग, तिरस्कार, हे येणाऱ्या मेसेजवर अवलंबून असते. ज्यांचे शेअर ब्रोकर चे व्यवहार असतात त्यांना कधी कधी सतत लॅपटॉप बाळगणं शक्य नसत पण शेअर वाढला, पडला. सवरला हे कळणे फार महत्वाचे असते हे अपडेट मिळाले तर धोरण आखता येत. सांगा बर मोबाईल दूर ठेऊन परवडेल का? महिन्याची कोणती तारीख आहे त्यानुसार येणारे Calls, Whatsapp, messages यांचे विषय भिन्न असू शकतात, जसे Salary झाल्याचा मेसेज, loan sanction massage, Loan Installment message, Furniture installments message. कदाचित मित्रमैत्रिणींचे messages, तेंव्हा सतत Be in touch हे सुत्र लक्षात ठेऊन वागाव लागत. एवढच नव्हे तर जे आपल्याला जवळचे समजतात त्या मित्र, मैत्रिणींचे स्टेट्स पहाण आणि त्याला respond करण ही सुद्धा मोठी जोखीम असते. यदा कदाचित आपण स्टेट्स पहायला विसरलो तर! “तू कसला मित्र? संपली आपली मैत्री, तुला दुसऱ्यांची आठवण बरी ठेवता येते, कळली बर तुझी मैत्री.” इथपासून ते काहीही ऐकायची तयारी ठेवावी लागते, मला सांगा एवढ अपडेट रहायच म्हंटल तर मोबाईल कुठेतरी ठेऊन जमेल का?
मी कुठेही निघालो, अगदी सोसायटीचे महत्त्वाचे काम असेल म्हणून घराबाहेर पडलो की आमची डॉली, अहो बायको हो, विचारते, “मोबाईल घेतलास ना, नाहीतर विसरशील, अगदी मोठया आवाजात, सोसायटीच्या सगळ्या मेम्बरना कळलं पाहिजे हिचा नवरा धांदरट आहे. वरून पुस्ती जोडते, तुझ्या मित्र मंडळीचा फोन घ्यायला मी मोकळी नाही, आणि समजा मी फोन घेतला तर त्यांना काय उत्तर देऊ.” तिच्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा मोबाईल सोबत घेतलेला बरा. तेव्हा तो काळजाप्रमाणे सोबत असला म्हणजे काळजी नसते. कुठे शासकीय कामासाठी गेल की तुम्ही जे सोबत नेल नसेल तेच नेमक विचारतात, सोबत मोबाईल असला की घरी फोन करून सांगता येत, “अग जरा आधारकार्डचा, पॅन कार्डचा, फोटो पाठवते का?” म्हणजे केवळ तेवढ्यासाठी तुमचं काम थांबत नाही तर असा हा बहुगुणी मित्र मोबाईल.
पण याच्या अंगी नाना कळा, कधी कोणाला बेसावध क्षणी फोन लावायला जावं आणि ज्याला फोन करायच मनात नाही त्यालाच फोन लागतो मग वेळ मारून नेताना अगदी कानकोंड व्हायला होतं,काय कारण सांगणार त्याला? एखाद्याचा फोन आपल्याला घ्यायचा नसतो आणि नेमक आपण फोन जवळ नसल्याने, ती मोबाईल घेऊन येते आणि म्हणते, “अरे धर त्या ठाकुरांचा फोन आलाय.” आता आली न पंचायत झक मारत फोन घ्यावा लागतो.
या मोबाईलने आपला जणू ताबाच घेतलाय, रिकामं बसलं की हात वळवळू लागतात आणि मग कुठे Youtube वर पहा, कोणाचे आलेले मेसेजेस वाच, जुने फोटो पहा. किमान पक्षी, आलेले मेसेज डिलीट कर असे उद्योग सुरू होतात. हात शांत राहत नाही आणि डोळेही त्या चित्रांचा, व्हिडिओचा पाठलाग करू लागतात. रिकाम डोक सैतानाच घर अशी सार्थ म्हण आहे त्याचा प्रत्यय येऊ लागतो. Whatsappच्या ग्रुप वर चर्चा घडू लागते आणि chatting सुरू होत, ठोशासठोसा या न्यायाने एकाने एखाद्या मुद्यावर मत मांडायचं आणि मग एक एकाने प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करायची. पाहता पाहता गट तट पडून ती chatting विकोपाला गेली की हळू हळू अंग काढून घ्यायचं. किती वेळ गेला आणि त्याच फलित काय कोणालाच माहीत नाही, पण लढा दिल्याचा आनंद. तर मोबाईल नावाच्या ब्रह्म राक्षसाने आपला आणि मनाचा संपूर्ण ताबा घेतला आहे म्हणायला वाव आहे.
काय म्हणता? मोबाइल बिघडला! चालतांना हातातून सटकला आणि सगळे भाग सुटे झाले! अरेरे ! फारच वाईट झाल, आता कस व्हायच? एक वेळ ठेच लागून अंगठा फुटला असता, पडून हात Fracture झाला असता, कमरेत लचक भरली असती ठीक होत पण चक्क मोबाईल खाली पडला!फुटला? अरे रे!
“दिल के टुकडे हजार हुये एक यहा गिरा एक वहा गिरा.” अशीच अवस्था झाली असेल? तरी सांगत होतो त्याला दोरी बांधा म्हणजे जान्हव्या प्रमाणे लटकवला असता. आता सगळच ठप्प, ना मिंत्राशी बोलण, ना पिझ्झा मागवण, ना कुणाला पैसे पाठवण, ना टाईम पास. “जीये तो जीये कैसे बिन आप के” अशीच वेळ की हो आली. शत्रूवरही एवढी वाईट वेळ येऊ नये.
कोणीतरी सांत्वन करत. कुणीतरी विचारत, “आप्पा कितक्याचा होता हो फोन? सातआठ हजारांचा असेल तर जाऊदे, किती दुःख कराल? घेऊन टाका एखादा, हाय काय आणि नाय काय! शेवटी पैशांचा उपभोग नाही घ्यायचा तर मग पैसे हवेच कशाला?” आप्पा गहीवरत, “नाही हो,माझ्या चिमणीने वाढदिवसाला दिला होता चांगला एकोणीस हजारांचा होता, तिला वाईट वाटेल.”
अस्स अस्स! म्हणजे मोबाइल तर गेलाच उपरसे डाट खानी पडेगी. कधी कधी वाटत कशाला सतत जवळ बाळगायचा, त्यातून आता करोना आहे म्हणून ठीक, म्हणजे करोना असू दे अस मी म्हणत नाही हो, तर करोनामुळे गर्दी कमी झाल्याच म्हणतोय, त्यामुळे मोबाईल ढापण्याचे किंवा चोरण्याचे प्रमाण थोड कमी आहे. अहो मागे आम्ही गप्पा मारत गार्डनमध्ये बसलो होतो, गप्पा चांगल्या रंगात आल्या होत्या, बापटांनी मला टाळी द्यावी म्हणून मोबाईल जवळच बाकावर ठेवला आणि बापटाला कुणीतरी हेरून, “बापट” की हो बनवल, बिचारा ढसा ढसा रडला, चौकीत जाऊन तक्रार नोंदवावी म्हणून गेलो तर तो सिंचा साहेब म्हणतो,” परचेस पावती आहे का?” , काय सांगणार, मोबाईल सोबत कोण पावती घेऊन फिरतो का? शेवटी तक्रार रखडली. बापटांना समजूत घालून घरी पोचवलं आणि घडली हकीगत मुलाला सांगितली. आमच्या समोर त्यांना काही म्हणाला नाही हेच नशीब, असो, तर म्हणून म्हंटल मोबाईल चुकून खाली राहीला, किंवा खिशातून पडला तर Lift me, Lift me, don’t leave me alone अशी ट्यून वाजली म्हणजे सावध राहू अर्थात आमच्या वयाच्या लोकांचे कान संपावर गेले नसतील तर, नाहीतर बोंबच की.
तुकाराम सार्थ म्हणाले, “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.” कल्पना करा, मी म्हणतो फक्त कल्पना करा, तुम्ही ट्रेकवर आहात, एकटे आणि अचानक तुमचा मोबाईल हरवला,आणि जवळपास कुणी नाही, वाटेत तुम्हाला एक खेडूत दिसतो त्याच्याकडे एक छोटा नोकिया हँडसेट आहे , तुम्ही त्याचा मोबाइल दोन मिनिटं मागता पण ओ गॉड ! हे काय तुम्हाला या क्षणी कोणाचाच नंबर आठवत नाही. कोण कस मदत करणार? किती असाह्य, आज तुमच्या लक्षात आलं मोबाईलने तुम्हाला किती परावलंबी बनवलं. असो किती लिहिलं तरी मांडता येणार नाही असा विश्व व्यापुनही दशांगुळे उरला तो हा चैतन्य रुपी ठेवा. मोबाईल, जगाची बित्तंम बातमी झटपट तुमच्याकडे पोचवणारा, तुम्हाला हवे ते पुरवणारा अल्ला उद्दीनचा जादुई चिराग.
हो, हो, पण हा जादूचा दिवा हाती असला तरी त्याचा योग्य वापर करता आला नाही तर! तुम्ही ऐकल असेल की आपल्याला आलेले काही मेल हे फेक असतात ज्यात अतिशय चलाखी दाखवून आपली माहिती विचारली जाते आणि जर त्यांना आपल्याकडून ही माहिती अनावधानाने दिली गेली तर हातोहात काही मिनीटात तुमचे बँक खाते रिकामी होते, जेव्हा तुम्हाला मेसेज येतो तेव्हा तुम्ही असाह्य असता. आणि त्वरित तक्रार केली तर कदाचित नुकसान टळेल मात्र होणारा ताप आणि संताप महाभयंकर असेल. पौगंडाअवस्थेतील मुलांकडे हे खेळणं असेल तरी त्याचा गैर वापर होऊ शकतो यावरही घरातील मोठ्यांच लक्ष हवंच.
हल्ली वेग वेगळे ऑनलाइन गेम मोबाईलवर खेळले जातात,जर झटपट श्रीमंत बनण्याचं स्वप्न मनी बाळगत कोणी ह्या online game च्या नादी लागलं तर तुमचं बँक खाते कधी रिकामे झाले हे कळणार देखील नाही. खरेदीचेही तेच एवढ्या विविध ऑनलाइन सेल्स जाहिराती मोबाईलवर दाखवल्या जातात की त्याची तुम्हाला सहज भुरळ पडते. ऑफर आहे हे पाहून त्या वस्तूची मला खरी गरज आहे की नाही हे न लक्षात घेता आपण खरेदी करून मोकळे होतो. जेव्हा वस्तू हातात येते तेव्हाही ती जशी अपेक्षा होती किंवा जशी मोबाईलवर दिसत होती तशी नसल्याने ती वस्तू परत करणे किंवा असू दे म्हणून समाधान करून घेणे असे दोन पर्याय असतात. तरीही वेळ वाया गेला तो गेलाच. मोबाईलवर किती आणि कसा वेळ गेला,त्यातील आपल्या भविष्यासाठी उपयुक्त किती? आणि अनावश्यक किती? याचा फारसा विचार कोणी करत नाही.
मोबाईलवर असणारी उपयुक्त माहिती शेती, उद्योग, व्यवसाय, शिक्षण याच्या विकासास साह्यभूत ठरू शकते. छोटे मोठे Online अभ्यासक्रम आपण घर बसल्या पूर्ण करू शकतो. संस्कृती दर्शन, विविध देश, तेथील परंपरा, संस्कृती तेथील पदार्थ, आयात निर्यात यांची माहिती आपल्या व्यवसायाला पूरक ठरू शकते.अर्थात दृष्टिकोन तसा असेल तर. तेव्हा मोबाईल हे एक विद्यापीठ आहे जेथे तुम्ही स्वतः शिष्य आहात आणि गुरू सुद्धा. निवड तुम्ही करायची. “समद्रातून वाळू काढायची की मोती निवडायचे हे आपल्या हाती आहे.”
तेव्हा हा सांगाती, “म्हटले तर सूत नाहीतर भूत.” असा आहे. त्याला आज्ञा तुम्हीच देता, अर्थात तो तुमचा सेवक आहे. ही सेवा त्याने कशी करावी ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. त्याला देव बनवायचं की चाळेगत ते आपल्याच हाती. हा विषय एवढा खोल आहे, “पाहता पाहता वाढे, भेदीले शून्य मंडळा.” असो निरूपण सुरू केले की कथेतून कथा जन्म घेते. सबब कुठेतरी पूर्ण विराम हवा म्हणूनच थांबतो. बाकी पुन्हा कधीतरी, जेव्हा लेखणी म्हणजे, हा कीबोर्ड साद घालेल तेंव्हा. अर्थात बहुसंख्य मोबाइल धारकांना कधीतरी अनुभव आलाच असेल तेव्हा तू माझा सांगाती म्हणण्यापूर्वी सावध पवित्रा घेणे हितकर….
आजच्या परिस्थितीचे सुंदर अवलोकन।अगदी वास्तविक कथा!
तहसीलदार धन्यवाद.
सद्यस्थितीचे यथार्थ वर्णन!
मिश्रा मॅडम धन्यवाद
Satya paristhiyi , mast , lay bhari
मिलिंदजी धन्यवाद.
खूपच छान.थथार्थ वर्णन सद्यपरीस्थितीचे.
मोबाईल किती महत्वाचा आहे?
आमच्या घरी मदतनीस बाईंचा मोबाईल माझ्या मोबाईलपेक्षा खूपच भारी आहे.म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती काय आहे आणि आपण मोबाईलवर किती खर्च करतो याचे पण भान नाही.
नमस्कार मॅडम, आपण नेहमीच अभिप्राय पाठवून लिहिण्यास उत्तेजन देता. लेख आवडला कळवल्या बद्दल धन्यवाद.
तहसीलदार धन्यवाद.