जोगवा त्याच्या नावाने
माई बोलायच्या थांबल्या तसा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. माईंनी आपल्या भाषणांने सभागृह जिंकले होते यात वादच नव्हता कारण भाषण संपले तरी सभागृह एकदम शांत होते. जणू सर्वांच्या जाणीवाच सुन्न झाल्या होत्या. नव्हे नव्याने जाणीव मनात घर करत होती. मी आणि माझं असा विचार करणा-या या दुनियेत जिथं स्वत:च्या मुलांचं सावरणच कठीण होत तिथेच अनेक मुलांच्या संगोपनाची आणि त्यांचं मातृत्व स्विकारण्याची हिंमत एका अशिक्षित बाईंनी दाखवावी म्हणजे सामान्य धैर्य नव्हत.
माईंनी सभागृहावर नजर फिरवली आणि आपल्या नऊवारी साडीचा पदर समोर धरत त्या ठाम आणि धीरगंभीर स्वरात म्हणाल्या. “ही माई, शेकडो-हजारोंची आई तुमच्यासमोर पदर पसरून मागणी मागत्याय कुणाच्या दुधासाठी, कुणाच्या अन्नासाठी, कुणाच्या औषधांसाठी तर कुणाच्या शिक्षणासाठी मला तुमची मदत पाहिजे, मला माहित आहे या मातेची ओटी तुम्ही आता नारळांनी नाही पण नोटांनी भरून नक्की घरी पाठवाल. मी शारदेच्या मंदिरात म्हणजे माहेरीच आले आहे. मला तुम्ही निराश करणार नाही याची मला खात्री आहे. माईंच्या शेजारी एक तरुण उभा होता, त्याला काय बोलावे ते सुचत नव्हते. माईंनी ज्या प्रकारे, ज्या शब्दात त्याची ओळख करून दिली त्यामुळे त्याच्या आत्मसन्मानाला ठेच तर लागली नसेल ना?
माई त्याची ओळख करून देताना म्हणाल्या, “मला एक मूल एका भिकारी बाईच्या कुशीत निजलेले दिसले, ती बाई शेवटच्या घटका मोजत होती. माय तर गेलीच होती तिच मूलं तरी जगवू म्हणून मी कुशीतल मूल उचललं. या मुलाला कापसाच्या बोळ्यांनी दूध पाजले, न्हाऊ-माखू घातले, शिकवले. आज तो वकील आहे.सतीश बाळा इथे ये”. तो पुढे आला, माईंच्या पाया पडला. “हाच तो मुलगा ज्याची ओळख मी तुम्हाला सांगितली”. सतीश माईंच्या शेजारी हात जोडून उभा होता. माई अद्यापी उभीच होती. “सहानुभूतीने पोट भरत नाही आणि गरजाही भागत नाही. मला मदत हवी, माझी मुलं जगवण्यासाठी त्यांना सन्मानाने जगता यावं म्हणून शिक्षण देण्यासाठी”.
सभागृहातील काही प्रतिष्ठित सभासद पुढे आले त्यांनी माईंच्या ओटीत काही नोटा टाकल्या आणि तदनंतर सभागृहातून पैसे देणा-यांची रिघ लागली. प्रत्येक जण स्वेच्छेने आपल्या ऐपतीनुसार माईंच्या ओटीत रूपये टाकत होता. थोड्या वेळातच माईंची ओटी भरून गेली तरी ओघ थांबला नाही. “देण्या-यांचे हात हजार,, दुबळी माझी झोळी गं” चा प्रत्यय माईला सभागृहात आला. माई कुणाच्या कपाळावर हात ठेऊन आशिर्वाद देत होती तर कुणाचे हात हातात घेत होती. कोणी माईंचे हात हाती धरून “माई, आम्ही आहोत ना” अशी ग्वाही देत होते.
कोण कुठल्या माई, पण त्यांचं सामाजिक कार्य ऐकून त्यांना संस्था वक्ता म्हणून बोलावते काय! आणि आपल्या ओघवत्या वाणीने आणि विचारांनी सभागृहाला मंत्रमुग्ध करतात काय आणि सभागृह जिंकून घेतात काय! सारंच अनाकलनीय. चार इयत्ता शिकलेल्या माईला समाजाचे चटके खावे लागले आणि त्यांचं अनुभवाचं भांडवल समृध्द झालं. कष्ट सोसता सोसता बहिणाबाईच्या ओव्या, बहिणेची गीते कधी तिची झाली तिला कळलंच नाही. तुक्या, नाम्याचे अभंग तिच्या वाणीतून प्रसवू लागले आणि तिच्या शब्दांना एक ओजस रूपडं आलं. कधी बहिणेच्या कविता तर कधी नाम्याचा अभंग तोंडी लावून ती जीवनाचं रहस्य सांगते. सारच आक्रित, घरादाराने नाकारलेल्या बाईने लहान अनाथ मुलांना आणि समाजाने नाकारलेल्या महिलांना आजोळ आणि माहेरही दिलं.
माईला समजला माणुसकीचा धर्म. जगवण्यासाठी जगण्याचा, जगण्यासाठी झुंजण्याचा आणि झुंजताना आपल्या जवळ असणा-या वाणी आणि अनुभवाच्या पोतडीतील ज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करण्याचा. ज्या घरातून माईंची ओटीपोटात गर्भ असतांनाच हाकलपट्टी झाली, त्या निष्पापाच काय होईल हा विचारही घरच्यांना शिवला नाही. नव-याला सुचला नाही. त्या नव-याला त्यांच्या वार्धक्यात म्हणाल्या, ” माझ्या सोबत यायचं असेल तर नवरा म्हणून नाही तर माझं बाळ होऊन ये आता मी कोणाची पत्नी नाही, शेकडो मुलांची आई आहे.” हे सांगण्याच धाडस आणि विवेक तिला नियतीने शिकवल.
भिक मागता मागता आपण अनुभवाची शाळा समृध्द केली असं सांगताना न लाजणारी माई त्याच मुखान, “भाषण करो दाम मिलेगा रे बाबा” अस सांगायला लाजत नाही. परिस्थितीच भान सुटू न देता, “जीने के लिये अंगार पर चलना पडे तो भी चलूंगी, माई को मरने के लिये फुरसत नही”. अशी पुस्ती जोडते. चौथी शिकलेल्या माईने बहिणाबाईंच्या अहिराणी भाषेतील प्रचलीत गाणी उचलून त्यांना स्वत:च्या गळ्याचा सांज शृंगार चढवला की ती तत्वचिंतक वाटू लागते.
समाज मला देईल की नाही याचा विचार आणि चिंता ती करत नाही. “मांगने से सबकुछ मिले, रोनेसे मिले लात, अगर चुप रहे तो कभी न बनेगी बात.” असं तत्त्वज्ञान त्या सांगतात. मागायचच आहे मग लपून,आडून का मागू? असं म्हणत ती भाषणाच्या अखेरीस आश्रमातील मुलांच्या आठवणी सांगत मदतीची याचना करते.
माईला मरायलाही वेळ नाही, फुरसत नाही. माईंची मुलं तिला मरू द्यायला तयारच नाहीत. मुलं माई बाहेर निघताना दिवा लावतात आणि ती परतेपर्यंत दिवा विझणार नाही याची काळजी घेतात. कारण मंदपणे जळणारा दिवा, दिवा नसतोच मुळी. तो असतो माईंचा आत्मा. त्या आत्म्याच्या प्रकाशात मुलांना माईंच्या गैरहजेरीतही सुरक्षित वाटत.
माईला तिच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. काही दात्यांनी मदतही केली पण शासनाने कधीच मदत केली नाही याची खंत ती व्यक्त करते. माई म्हणते “मी पेशेवार भिकारी, पण भिक मागायचीच आहे तर शासनाऐवजी मी थेट जनताजनार्दनाकडे मागेन, राज्यकर्त्यांकडे कशासाठी मागू”.
ज्या जगवण्याच्या ओढीने तिने स्वत:चा गर्भ जगवला, वाढवला त्याच आंतरिक ज्योतीने तीने रस्त्यावरची अनाथ मुले वाढवली त्यांना छत्र दिले. अनेक दिवे उजळले. त्यातील काही मुले समाजात मानाच्या पदांवर आहेत. याच समाधान तिला आहेच मात्र तिच्या कार्याकडे अलिप्तपणे पाहताना एकच वाटते, ज्या मुलांना तीने माय ममतेने वाढवल, शिक्षण दिलं समाजात जगण्याचं भान आणि ज्ञानही दिलं. मात्र स्वत:च्या पोटच्या मुलांप्रमाणे वाढविलेल्या या मुलांना समाजासमोर असे पेश करून त्यांना आश्रमात वाढवल्याची आणि शिकवल्याची गुरूदक्षिणा त्यांचा तेजोभंग करुन जनतेकडे जाहीरपणे मागू नये.
त्या मुलांच्या आत्मसन्मानाला तडा जाईल अशा प्रसंगाची आठवण त्यांच्याच समोर मांडून मदत मागू नये. त्यांना भूतकाळ आठवायला भाग पाडू नये, त्यांचे भविष्य त्यांच्याकडून हिरावून घेऊ नये. प्रारब्ध म्हणून त्यांनी भिकारी बाईच्या पोटी जन्म घेतला असेलही परंतू तुमचा परिसस्पर्श झाल्यानंतर सोनं झालेल्या मुलाला तो कधी लोखंडाचा तुकडा होता ही जाणीव सर्व श्रोत्यांसमोर करून देताना त्याला किती दु:ख होत असेल याचा विचार व्हावा हीच विनंती.
जर परीसान माझ्यामुळेच तूला सुवर्ण झळाळी मिळाली अस सतत टोचणी लोहाला लावली तर परीसाचे तेज काय कामाचे? म्हणून एकच विनंती. स्वत:च मोठेपण जपतांनाही दुस-यास हिनता येणार नाही याच भान त्यांनी सुटू न द्याव तरच मातृत्व अमर होईल. माई आपण हजारो मुलांच्या पोशिंद्या आहात. पण मुल तुमच्याकडे केवळ पोशिंदी म्हणून पहात नाही तर ज्या दुर्दैवी मातेचा चेहराच कधी पाहिला नाही आणि ज्या बापाने कच-यात टाकून दिल्या नंतर आपल्या मुलाचं लचक कुत-यांनी तोडले तर नाही ना हे पाहण्यासाठी वळूनही पाहील नाही अशा दुर्दैवी आई-बापाची सावली त्यांच्यावर पडू नये म्हणून तुम्ही प्रेम दिलत म्हणून त्याची वाच्यता कृपया करूच नका, तरच माई मधली आई आजही जिवंत आहे याची खूण सर्वांनाच पटेल.