तांबू
“काकी,ए काकी, गूरा सोड”, अशी हाक आली की आई घरापाठच्या गोठ्यात जाऊन गुरांची दावणी एक एक करून सोडत असे आणि गूरे गोठ्या बाहेर पडता पडता शेपटी वर करून वाटेतच मलमुत्र विसर्जन करत असत. सारे शेण एकत्र करून गोठ्यात टाकले आणि गोठा झाडून काढला की आई कामातून मोकळी होत असे. कधी कधी शेण जमा करून त्याच्यात भाताचे तुस घालून शेणी आणि गोवऱ्या थापत असे.
नेहमीप्रमाणे आज आई गोठ्यात गेली आणि गोठ्यातून ओक्साबोक्शी रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मी आणि बहीण घरापाठच्या गोठ्यात गेलो. तिथले दृष्य भयानक होते, गाय जमिनीवर पडली होती, जीभ बाहेर काढली होती. चारही पाय ताणले होते. आई तांबुच्या गळयात हात घालून रडत होती. आम्ही जवळ जाताच ती हात धरून मला म्हणाली, “बाळा,आपली तांबू गेली रे!”
इथे असा प्रकार घडला होता आणि आम्हाला पुन्हा त्याची हाक ऐकू आली “ए काकी गूरा सोड, आधीच उशीर झालाय, सगली पुढ गेल्यान.” त्याची हाक ऐकून आई मला म्हणाली, “जा बाबा, त्याला सांग,आज गुरं नाही न्यायची.” मी आईचा निरोप त्याला सांगितला तसं तो प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला, मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करण्याऐवजी मी भोकांड पसरले, “खुन्या दादा आमची तांबू गेली.” “काल तं बरी होती,तीला काय झाला मराय?” अस म्हणत तो गोठयाकडे आला, तांबूला त्या अवस्थेत पाहून तो ही हादरला, “काल संध्याकाली शाप बरी त होती, हिला काय झाला, दाव्याचा फास नी न लागाय?”त्याने खाली वाकून दावे पाहिले. दावे अगदी सैल होते, आई त्याच्याकडे पहात राहिली, “खुन्या काय झालं रे माझ्या तांबूला? बघ बिचारं वासरू कस बघतंय?”
“काकी तू जगनला बोलव, माना वाटतय यीला जनावर चावेल हाय, न नीट नांग गवतान असला तं तूमानाव चावल. या दोघांना रानान नेव का?,” क्षणभर ती विचारात पडली आणि म्हणाली, “नको न्हेऊ आज राहू दे त्यांना, आज त्यांची आई गेली. डोळे भरून पाहूदे त्यांना.” आमच्या बुध्या आणि काळ्याच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. सात महिन्याच्या ढवळ्याला आपली आई गेली आहे हे कळत नव्हते. तो बिचारा तिचे तोंड चाटत होता. आईने दूध काढायला आणलेली चरवी आणि तांब्या गोठ्याच्या दारावर पडून होता. खुन्या निघून गेला.
माझ्या ताईने आईला पाणी दिले तिने ते हातानेच दूर केले. आई भानावर आली तिने गाईची दावण सोडली. वासराला दूर नेऊन बांधले. वासरू गाईकडे जायला गळ घेऊ लागले. मला बोलवून म्हणाली, “बाळा कपडे काढ आणि देवाजवळचे पंचफळ आणि पंचपात्र घेऊन ये. तुळस आण.” मी सहा वर्षाचा असेन त्यामुळे लाज लज्जा असले शब्द पन्नास वर्षांपूर्वी आमच्या मनात नव्हते. मी आई म्हणाली त्या प्रमाणे पंचफळ,पंचपात्र घेऊन आलो. आईने गाईला हळद पिंजर लावली.
तुळशीने गाईच्या तोंडात पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. आम्हाला तुळशीने पाणी तोंडात घालायला सांगितले. तांबूच्या तोंडातील पाणी खाली ओघळले. मला म्हणाली, “बाळा जा, मन्या आणि जगन काकाला बोलावून आण.” जगनने गाय पाहिली आणि म्हणाला “काकी, हिला जनावर चावेल हाय.” आईला आश्र्चर्य वाटले तिने विचारले, “कशावरून सांगतोस तू ? ” , तस त्याने गाईच्या सभोवार पाहिले आणि पायाकडे पहात म्हणाला, या पाय, या पायाला रगत लागलाय.” आईने पाहिले खरच तिच्या पाठच्या पायाला थोडेसे रक्त लागले होते.तिने मन्याला काथोडी पाडा लोडखडला निरोप घेऊन पाठवले परंतु सापाने दंश केलेले जनावर त्यांच्या काही उपयोगाचे नव्हते म्हणून त्यांनी नकार दिला. त्यांनी उलट निरोप पाठवला, पन्नास रुपये देतीन का? तं आमी नेऊन टाकू” मन्या बिचारा कसा काय निर्णय घेणार, तेव्हा मजूरी तीन ते चार रूपये असावी, त्याने आईला हकिगत सांगितली, “काकू ते नेया तयार नी, पन्नास रुपये मांगतान.” आई म्हणाली ” अरे माझी नक्षत्रा सारखी गाय गेली पण पन्नास रुपये खूप होतात मी कुठून देऊ?”
मन्या काका थोडा संमजस होता तो आईला म्हणाला “काकू तू आमाना तिस रुपये देस, आमी नेऊन शेरीन टाकताव, पावसाला हाये, शेरीन होलाचा पानी भरतय कुजला का व्हावून जाल.” आई तयार झाली, पन्नास रुपये देण्यापेक्षा हा व्यवहार ठिक होता. तिने मन्याला, त्याच्या बरोबरच्या माणसांना बोलवायला सांगितले. तिने बहिणीला सांगितले, “बेबी’ जा बाई, चहा ठेव त्यांना, घोट घोट घेऊदे. पावसाचे दिवस आहेत, त्या चिखलातून हे वजन घेऊन जायचय त्यांना.”
थोड्या वेळाने बारक्या, मना, लख्या, कंबा आले. आईने त्यांना चहा दिला. त्यांनी आईकडून दोरी मागून घेतली, एक दणकट लाकूड शोधून काढले, गाईचे मागचे पुढचे पाय बांधून त्या मधून ते लाकूड सरकवले आणि अलगद तांबूला ऊचलून ते वाटेला लागले. ते शिडशिडीत बांध्याचे होते पण काटक होते.
ते वाटेला लागताच आईने पत्र्याची ट्रंक उघडली, बसक्या पितळेच्या डब्यात ठेवलेले पैसे तिने मोजले. त्यात पाच,दोन आणि एक रूपयाच्या नोटा त्यात होत्या. आईने दुसरा डबा काढला त्यात दहा रूपयांच्या आणि विस रूपयांच्या नोटा होत्या. त्यातल्या काही नोटा काढून त्या ताईकडे देत म्हणाली, “तांबूच्या दुधाचे हे पैसे आहेत, मी ते बाळाच्या शिक्षणासाठी ठेवले आहेत. तुमच्या वडिलांच्या पगारातून काही शिल्लक रहात नाही, नाईलाजाने याला हात लावला. तिचे होते तिच्यासाठी खर्च केले. या पैशांना काही झाले तरी हात लावायचा नाही.
थोड्या वेळाने जगन आणि मित्र आले. आईने त्यांना पून्हा चहा दिला, “बरं झालं बाबानो माझ्या वेळेला देवासारखे धावून आलात.” “काकू ,जाम वजन होथा,न शेरीन नुसता चिकोल हाय,पाय उचलव नी,कार जगन,जाम भारी पडला.” मन्या म्हणाला. जगनने त्याच्या बोलण्यावर मान डोलवली. आईने मन्याच्या हातात पैसे ठेवले. “बरं झालं बाबानो घरीच सापडला नाहीतर मला हे संकटच होते.”
ते जायला निघाले तेव्हा जगन म्हणाला,”काकू या गवतान नी त लाकडान जनावर असल हो लक्ष ठेव.” आई त्याला “बरं ” म्हणाली ते निघून गेले आज त्यांचा दिवस बरा जाणार होता ते ही अवघे तासभर काम करून, मजुरीच्या तीप्पट पैसे प्रत्येकाला मिळाले होते. अर्थात हे काम दुसरे कोणी केलेही नसते.
ते जाताच आई कामाला लागली तिने वासराला घरच्या पडवीत आणून बांधले. गोठा झाडून काढला. दोन पाडे दावणीला होते त्यांना गवत घातले. आईचे लक्ष कामात लागत नव्हते. एकीकडे साप अद्यापही गोठ्यात असेल ही चिंता आणि दुसरीकडे आम्ही शाळेला जाणार म्हणून जेवण वेळेत करायला हवे ही चिंता. तशात फिरत्या नोकरीमुळे वडील घरी नव्हते. ही गाय एका आदिवासी कुटुंबाकडून वडिलांनी पंच्याण्णव रूपयांना आणली होती. गाय खरोखरच गुणी होती कोणिही दूध काढले तरी शांत उभी रहात असे,याला अपवाद आमचे वडील होते. जेव्हा तिला वासरू होई तेव्हा ती वडिलांना अजिबात जवळ उभ करत नसे,आठ पंधरा दिवस झाले की ती शांत होई तो पर्यंत आई किंवा मी दूध काढत असू. “माझ्या मोडक्या संसाराला तिने आधार दिला.” अस आई नेहमी म्हणे.
आम्हाला ही गाय आणल्या पासून कधीही दूध विकत आणावे लागले नाही. ती गाभण असली तर विण्याअगोदर महिनाभर दूध बंद करे. आई या काळात कोरा म्हणजे बिन दूधाचा चहा आम्हाला देत असे. कुणी पाहुणे आले तरच आम्ही दूध विकत आणत असू तेव्हा दूध डेअरी नव्हती आणि दुधाच्या पिशव्या ग्रामीण भागात नव्हत्या. तिने दहा वासर दिली त्या पैकी तीन कालवडी म्हणजे गाय वासरे. जन्मानंतर महिना दोन महिन्यात मेली. या वासरांना आम्ही स्वतः खड्डे काढून चिरविश्रांती देत असू एवढ दु:ख या वासरांच्या जाण्याने आई आणि आम्हाला होई. तिचे गोऱ्हे म्हणजे बैल आम्ही चार वर्षे वय झाले की विकत असू पण त्यांची बोळवण आई त्यांना गोडधोड घालून करत असे. आई म्हणे माझ्या शरीरात जो आत्मा आहे तोच त्याच्या शरीरात आहे. मला वेदना किंवा दु:ख होतं तसं त्यालाही होतं. प्राण्यांकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन असा विशाल होता.गाय घरी आल्यानंतर तिचे शेण,मुत्र यांचा उपयोग पावसात ल भाज्यांची अळी करण्यासाठी होऊ लागला. भरपूर भाज्या घरी होऊ लागल्या म्हणून ती आमच्यासाठी कामधेनू ठरली होती.
आईने जेवण केले पण आज तिच्यात नेहमीचा उत्साह नव्हता. ताई जेवून शाळेला गेली. माझी शाळा जवळ होती. घंटी वाजली की मी दप्तर घेऊन पळत असे. दोन वाजता दुपारची सुट्टी झाली की गरमा गरम जेवून जात असे. त्या दिवशी मी घरी आलो तर आईने जेवण गरम करून वाढायला घेतले होते पण एकच ताट होते. मी जे काही समजायचे ते समजलो. मला भूक तर लागली होती पण आई तांबूच्या दु:खामुळे जेवणार नव्हती म्हणून मला रडू येत होते. “आई तू जेवणार नसशील तर मलाही नकोच.” असे म्हणत मी दूर उभा राहिलो.
“तू अजून लहान आहेस तुला नाही कळणार आई का नाही जेवत ते, तू उगाच वेड्या सारखा हट्ट करू नको. तू जेव आणि शाळेत जा.” आईच वाक्य ऐक मला जास्त दु:ख झालं आणि रडुसुध्दा आलं. मी तिच्या लेखी अज्ञानी होतो. मी तिच्याकडे पहात म्हणालो “तांबू तेवढी तुझी आणि आम्ही तुझे कुणीच नाही का?”
तस आई जवळ घेत म्हणाली,”बाळा तुला नाही ते कळणार, तू तर माझा आहेसच,अरे गेले अकरा बारा वर्षे या तांबूने मला आधार दिला. अन्यथा वडिलांच्या सव्वाशे दीडशे रूपये पगारात संसार चालला असता का? तू बस मी तुला भरवते.” असं म्हणत तिने जेवण वाढले आणि भरवायला सूरवात केली. मी आईचा हात तिच्याच तोंडाकडे नेत तिला घास भरवण्याचा प्रयत्न केला. तसे तिच्या डोळ्यांना धार लागली तिच्याच्याने जेववेना. तिने मला भरवले आणि जेवण चुलीच्या पाट्यावर ठेवले, शाळेची घंटा वाजली तशी मी धूम ठोकली.
संध्याकाळी शाळा सुटली तरी आम्ही शाळेच्या मैदानावर खेळत असू परंतु आज मुड नव्हता. मी मित्रांचा निरोप घेऊन घरी आलो. दप्तर बाजेवर भिरकावून मी हाक मारली ,”आई ! ऐ आई ! आईची जाग नव्हती, मी घरा पाठी गोठ्यात गेलो, पाहीले तर आई छोट्या वासराला बाटलीने दूध भरवत होती. वासरु सात महिन्याच होते पण आई त्याला कधी ताक, कधी पेज तर कधी किराईत काढा भरवत असे.
रोज संध्याकाळी गूरे घराच्या जवळपास आली की आमच्या गुरांचा राखण्या, खुन्या ओरडून सांगत असे, “काकू गूरा आली हो,बांध त्यांना.” आजही नेहमी प्रमाणे त्याने हाक मारली, तशी आई कुंपणाच्या झाप्याकडे गेली आणि तिच्या लक्षात आलं, आज तर गूर सोडलीच नव्हती आणि तिची तांबू या जगात नव्हती. वासराला गुरांच्या खुरांचा आवाज आला तसा त्याने हंबरडा फोडला, हम्म—-हम्मा ते ऐकताच आई गोठयाकडे गेली आणि ढवळ्याच्या बाजूस बसून तीने त्याच्या गळ्यात हात घातला आणि म्हणाली, “ढवळ्या, पोरा,तुझी आई गेली रे!” तीने वासराला गोंजारले.ते पाहून माझे डोळे भरून आले,मी आईच्या कुशीत शिरुन रडू लागलो. तिने स्वतःला आवरले.
तिने गोठ्यातले काम आवरले आणि ती घरात आली. चुलीवरची दूधाची पातेली माझ्यासमोर ठेऊन म्हणाली “हीशेवटची खरवडणी,या नंतर तुझ्या नशीबात दूधाची साय आणि खरवडणी आहे की नाही ते त्यालाच ठाऊक!” मला तेव्हा तिच्या वाक्याचा अर्थ नाही लागला परंतु मी ती पातेली घेतली आणि वासराच्या पुढ्यात ठेवली. वासराने ती चाटून पुसून खाल्ली.
आई माझ्या पाठीमागे उभी राहून ते दृष्य पहात होती. तिने मला उचलून जवळ घेतले,”बाळा, दुसऱ्याचे दुःख समजून घेता आले तर माणूस म्हणून जगण्याला अर्थ, मोठा हो पण माणूस हो.स्वतः साठी सगळेच जगतात तुला दुसऱ्यांसाठी जगता आलं पाहिजे.” तेव्हा मला काहीच कळलं नव्हतं, पण आता त्याचा अर्थ कळत आहे. माणूस म्हणून जगण्याचा आणि दुसऱ्याच दुःख हलकं करण्याचा प्रयत्न मला नक्की जमेल. देव बनून देव्हाऱ्यात बसण्यापेक्षा माणूस बनून दु:खी माणसाची सेवा करणं नक्कीच चांगलं.
इतर कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हृदयस्पर्शी चित्रण! खूप छान!
Harshada Mam, Thanks for Complement.
अत्यन्त हृदयस्पर्शी कथा. खूपच छान सर.