तुका म्हणे माझा

तुका म्हणे माझा

तुकाराम महाराज यांना कोण ओळखत नाही, वाणी असूनही धन कमावण्याऐवजी ते गरीबाची नड सांभाळून माणूसकी कमवत होते म्हणूनच पत्नी नेहमी त्यांचा उध्दार करीत असे. तुकाराम अभंगाच्या नावाने  वाट्टेल ते लिहुन समाजाला भडकवतात असा उच्चवर्णीयांनी त्यांच्यावर आरोप केला. जनक्षोभ नको म्हणून त्यांनी आपली अभंग वही इंद्रायणीच्या पात्रात समर्पीत केली. अशा ह्या तुकाराम महाराजांचे नाव लावणारी, तुकाराम नावाची व्यक्ती आमच्या आवाठात अवतरली. ते आमच्या गावी निवासास यावे  हे आमचं केवढं भाग्य.

कालांतराने “कुठे ते तुकाराम महाराज आणि कुठे हे!” असं म्हणण्याची पाळी आमच्यावर आली तो भाग वेगळा. तो आला तेव्हा वीस-बावीस वर्षांचा असावा. गावातल्या अशाच एका उमद्या माणसाने त्याला कामाला ठेवला आणि पहाता पहाता तो गावचा झाला.   तुकाराम रंगाने अधीकचा सावळा, कधी कोणी विचारले की म्हणे “पक्को रंग देऊन माका धाडलोहा, रंग गेलो त पैसे परत देवचे लागतीत म्हणान हो एक नंबरी रंग ,वेतळाने दिलोहा. त्याचोव रंग तसलोच, तो चलता ना? आमचो कित्याक नाय चलणा?”  मळकट  रंगाची पँट आणि बुशशर्ट कपाळाला मुंडासे बांधावे तसे टॉवेल, कमरेला बांधलेली आकडी, त्या आकडीत पाजळलेला कोयता या वेशात कुठेही तो  नजरेस  पडे.बऱ्याच वेळा त्याच्या पायातील व्हाणेचे कॉम्बिनेशन चुकलेले असे, कोणी विचारले तर म्हणे, “ती काय शोभेची आसत? पायाक काटो नाय लागलो म्हणजे वेताळ पावलो.”  

पानाची तलफ आली तर तो कोणाकडेही पानाची चंची मागुन पान लावे, तोंडात टाकायला दोन तीन सुपारीची खांड खिशात टाकली की तो  तृप्त. बरं पान मागतो त्याला नाही म्हणायची गावाची पद्धत नाही आणि कोणी चुकून म्हणाला तर म्हणे “रुपायाक धा गावतत, पानांचा कौतिक कोणाक सांगतास?”

आधी तो सडा म्हणजे एकटाच होता. एकटा भाडेकरू म्हणून रहात होता परंतू भूमीहीन म्हणून सहानुभूती मिळवून त्याने गावाकडून जागा मिळवली आणि झोपडी बांधली. कधीतरी त्याला एका दिडशहाण्या माणसाने मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार त्याची झोपडी अचानक आगीच्या भक्षस्थानी पडली, पंचनामा झाला आणि त्याला भरपाई मिळाली. नंतर चर्चा झाली की झोपडी जळाली की…

असे हे तुकाराम महाराज. त्याची स्वतःची शेती नसल्याने तो शेतमजूर म्हणून काम करी. या तुकारामाने आपल्या कामाने आवाठाला आपलेसे केले होते, प्रत्येक मालकाला तुकाराम कामासाठी हवा होता. त्याची लोकप्रियता वाढल्याने त्याच्या लग्नात काही अडचण आली नाही कारण ज्यांनी त्याला गावात आणला ती व्यक्ती म्हणाली “माझे दोन झील थय हो तिसरो”. असा तो उप-या गावात येऊन संसारी झाला. रथाला चार चाकं झाली आणि संसार रथ पळू लागला. लग्न झालं तेव्हा बायको होती तेरा वर्षांची आणि तो होता तीस वर्षांचा. तेव्हा तुकारामचं सगळचं अगदी धम्माली होत हे लक्षात आलंच असावं.

पण त्याच्याकडून घेण्यासारखा एक गुण होता, कोणतंही काम असूद्या तो एका पायावर तयार. चालण्याचा वेगही इतका प्रचंड की लोक विचारत, “तुकारामा, तु जमनीक पाय लावतस काय हवेतसून चलतस?” त्याला काम नाही असा एकही दिवस नाही. चुकून आजारी पडला तरच तो निवांत. त्याला कोणी म्हणायचा अवकाश “तुकारामा, उद्या आमच्याकडे येशीत काय रे? आडो करूचो हा” की त्याने आश्वासन देत म्हणावं, “उद्या मा, सकाळी साडे साताक येतय,काय ती न्यारी करुन ठेव, कोयतो पाजळलेलो हा मां, नायतर माझोच घेऊन येतय.” “तुकारामा नक्की मा? बघ हा मी फाँव करून ठेवतलय,नायतर  फुकट घालवशीत.” तो जरा वरच्या स्वरात म्हणे, “गे तुका कित्याक काळजी, माका लागला! मी साडेसाताक तुझ्या घराकडे हजर”.

ती समाधानाने निघून जात नाही तो त्याच आवाठातल अन्य कोणी त्याच्या दारी हजर, त्या माणसाला किंवा बाईला वाटेला लावायचे की कसे त्याचा निर्णय तो काही वेळात घेई. ती व्यक्ती दारापर्यंत येताच हाक मारी,” गे वयनी, घो आसा ना?” ती सवयीने म्हणे “नाय हत आत्ताच बाहेर गेले, काय काम हां? माका सांगा मी त्यांका सांगतय.” तो पर्यंत त्या व्यक्तीची नजर तुकारामाच्या टायरच्या चपलेवर पडे, ती म्हणे, “गे  खोटा कित्याक सांगतस, ही काय दारात चपला हत, नाय येवचा त नाय म्हणान सांगूचा. बदमाशी कित्याक?” तिचा चढलेला पारा पाहून तो पाठल्या दाराने बाहेर पडून समोर येतो. “काय गे वयनी, काय काम काडल?” तिला सुचेना,  ह्या बदमाशीला काय म्हणावं, पण ती शोभवून नेते, “बाबा, चपली शिवाय सांजचो खय फिरतं, पायाखाली किरडू बिरडू इला तर कितक्याक पडात?” “नाय गे बाहेर गेलेलय, डोंगरात न्हय, आता सांज झाली, बोल काय काम काडल?” “रे मिरग जवळ इलो हा लाकडांचो आजून पत्तो नाय, घरापाठचे दोन चार बीबे तोड. लय लांब जाऊक नको, येशीत मा?”  “उद्याच येवक व्हया काय? उद्या तुमच्याच आवाठात आंबेरकराकडे काम हां, परवा इल्यावर चलात मा?” तिचा पारा चढे ती म्हणे, “तुकारामा, तुका अडीनडीक पैसे मी देतय, आणि माझ्या येळेक नाय उपेगी पडलस तर फायदो काय?” “येतय, अगदी सकाळीच येतय, तिका काय तरी सांगूक व्हया, तु सकाळी नाष्टो करून ठेव. पोळ्यो आणि उसळ कर, तोडकाम लय वायट, तेतूर तो बीबो. अंगावर उडावलो तर चामडा काढीत.” “तर मग नक्की यतलस मा,माझी मेहनत वाया जाता नये. नाय तर तिसरीकडे पशार होशीत, तुझा रे काय?” “गे,आता सांजेक खोटा कित्याक बोलू,बत्तीची शपथ, तू बिनघोर जा,बँटरी बिटरी हाडलस मा, येतय मी सकाळीच.”

अर्थात दुसऱ्या दिवशी हा नेमका कुठेतरी जास्त अर्जंट कामासाठी सकाळीच पसार, या दोघी वाट पाहून त्याच्या घराकडे माग घ्यायला जातात. वाटेतच एकमेकींना भेटतात आणि त्यांच्या लक्षात येते त्यांने दोघींनाही शेंडी लावली आणि तिसरीकडे तो गेला. हात चोळत बसण्या पलीकडे काय करणार? पण तुकाराम नसेल तर अवाठात काम कोण करणार?त्यामुळे न्याहारी, नाष्टा वाया गेला तरी त्याच्यावर रागावणं कोणाला जमत नव्हतं.

त्याच दुपारी तो दत्त म्हणून हजर, “गे बाई, मी इलय, वाईच पाणी हाड, घसो सुकलो,काय ताट निंबार पडला ता बघ, नळे परतण्याचा काम व्हया कोणाक? सकाळी दारावर येऊन आळवो रडाक लागलो, म्हणाक लागलो कायव कर, शंभराक दिडशे घे पण चल. पैशे बा झवले, माणूसकी जपाची लागता म्हणान गेलय.” आता एवढे ऐकवल्यावर समोरचा माणूस वा बाई काय करेल. डोकं आपटेल त्याच्या समोर? “तुकारामा, आता दोपारण्याक तरी येतस मा! का  आंबेरकरणीकडे जातलस?” “गे,आवशी ताच सांगूक इलय, दुपारची विरड तिच्याकडे भरतय, जमात तो आडो करतय आणि सकाळी तुझ्याकडे लाकडा फोडूक हजर. तु काळजीच करू नको, मग तर झाला.” “तुकारामा, तू इल्याशिवाय मी नाष्टो करुचय नाय ह्या लक्षात घे, नायतर आजच्या वरी उद्याव माजी म्हैनत फुकट जाईत,माका नाय जमाचा.” “उद्याची बात उद्या, आजचो नाष्टो हाड तर खरो, घराक नेतय तुझी म्हैनत फुकट जाईत म्हणून वाट वाकडी करुन इलय, टोपातसून दी मगे भांडा उद्या सकाळी घेऊन येतय.” अशी ही अदभुत वल्ली, त्याच्या तोंडून, “नाही” हा शब्दच नाही, अर्थात तो हाती लागेल तेव्हाच खरं, कामाला लागला की मात्र हयगय नाही, तो

एकटा असला तरी मान मोडून काम करणार मात्र त्याच्या पुढ्यात असलेली वस्तू त्याला हवी झाली तर तोंड फोडून मागेल मग ती चप्पल असो की कपडे, कोयता असो की फावडे. जर त्या वस्तूची आपल्याला वेळीच आठवण झाली तर ठीक, अन्यथा तो ती वस्तू गेले दहा वर्ष वापरतो असा आव आणून त्याचा इतिहास सांगेल, तेव्हा तो काम करत असताना जर त्याला दोरी, तार, खिळे, नायलॉन वायर असले काही दिले तर ते कधी नाहीसे करेल ते ईश्र्वरही सांगू शकणार नाही आणि तुम्ही चुकून काही विचारले तर हरिशचंद्राचा अवतार असल्याचा आव आणल्याशिवाय राहणार नाही. “मी कित्याक घेव,असली लबाडीची वस्तू पुरावता काय? खय तरी आरते-पारते पडली असात, जाता खय? हीss न्हय मा?” अस म्हणत दोरीच बंडल समोर फेकेल आणि म्हणेल, मगाशी शिरडा ओडलय ना त्याच्या बरोबर गेली, बरा झाला गावली नाय तर माझ्यावर आळ इलो असतो.” ही मखलाशी नेहमीच्या माणसाला नवीन नसे पण काय करणार? “गरजवंताला अक्कल नसते हेच खरे.”

तुकाराम कामाला येणार म्हटले की आधी सावध व्हावे लागे. गरजेव्यतिरीक्त कोणतीच वस्तू बाहेर रहाता उपयोगी नाही, चुकूनही राहिली तर ती पुन्हा मिळेल याची शाश्वती न बाळगलेली बरी. त्याला कोणतीही वस्तू वर्ज्य नसे, स्टिलचा पेला असो, बल्ब असो, बामची बाटली किंवा विसरुन राहिलेली सामानाची पिशवी, “सोने, नाणे मज मृत्तीके समान.” या न्यायाने तो ती वस्तू घेतो. याला चोरी कशी म्हणाल. कुठेतरी वस्तू पडून राहू नये आणि आम्हाला वस्तू जागच्या जागी ठेवायची सवय लागावी असा विशाल दृष्टीकोन त्यामागे असावा. आमची दृष्टी संकुचित म्हणून आम्ही त्याला चोर ठरवले.

गावातील डोंगर, त्या डोंगरात असलेली झाडे आणि तेथे असणारे रातांबे, काजू, हरडे, जांभळे ही तर त्याचीच. जोपर्यंत  त्याला कुणी पकडत नाही तो पर्यंत तो त्याचा अनभिषिक्त मालक. जेव्हा सर्व दुपारची वामकुशी घेण्यात मग्न असतात तेव्हा हे साहेब एखाद्या झाडावर कार्यभाग उरकत असतात. एकदा तो असेच रातांब्याच्या झाडावर रातांबे पाडताना दिसला, त्याने छोटी गोंणी वर नेली होती, त्यामध्ये तो रातांबे भरत होता. त्याला हाक मारली तर घाबरून पडेल, नको तो प्रसंग येईल म्हणून, त्याची फेमस चपले घरी आणून ठेवली.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो आला, “माजा जुता हय रवला काय ?” त्याने चेहऱ्यावर किती मी गरीब! चा भाव आणत विचारले. भावाने त्याच्या  समोर चप्पल आणून ठेवूनन विचारले “ही तुझी जुती आसत काय?” त्याने ती घातली आणि म्हणाला, “काल मी इसारलय सा वाटता”. भाऊ म्हणाला, “रे ही कासातल्या रतांबी खाली गावली, कोण तरी हलकट रतांबे पाडी होतो, आमच्या हिचो चष्मो घराकडे रवलो त्यामुळे तिका ओळखूक इला नाय”. त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत त्याने चप्पल पायातून काढून भिरकावली, ” छ्या, छ्या ही न्हय माझी, तरीच म्हटला व्हयती पायात कशी नाय रिगणा?” 

भावाने ती पुन्हा पायात घालून दारा समोर ठेवली आणि म्हणाला, “मामा,नक्की तुझी न्हय ना, मग दोपारण्याक वराडकर येतले त्यांका देऊन टाकतय, हेरवी टायरची पायताणा कोण वापरता?” भावाचे वाक्य पूर्ण होताच, तुकारामने चप्पल पायात चढवली, “आताच देवची घाय कित्याक मारतास, माजी जुती मिळापर्यंत रवयनात, माजी जुती मिळाली की सोमती परत आणून देतय.” हसावे की रडावे तेच उमगे ना!

तुमच्या दारी कोणतही फळझाड असो वा फुलझाड त्यावरील फळे किंवा फुले ही आपसूक तुकारामाचे घर गाठत, त्याशिवाय त्याला आणि वस्तूला चैन पडत नसे. इतके असूनही त्याला सर्व घरी प्रवेश खुला होता कारण कितीही अपमान झाला तरी तो मनाला लावून घेत नसे. त्याने संस्कृत वचन,
अपमानं पुरासकृत्य मानं कृत्वा च पृष्ठत:|
स्वकार्यमुध्दरेत् प्राज्ञ:कार्यध्वंसो हि मूर्खता || हे कधी ऐकले नसावे पण तो तसे जगत होता.

मुख्य म्हणजे घरचे काम कितीही नाजुक असो अगदी आंघोळीसाठीचे बाथरुम आणि त्याचे सांड पाणी स्वच्छ करण्यासही तो टाळाटाळ करत नसे. कुणाची गाय, म्हैस अडलेली असली की तो आपल्या बुध्दीने झाडपाला औषध म्हणून घेऊन येणार, स्वतः तो झाडपाला वाटून घोटून देणार, त्या प्राण्याची नीट सुटका होईपर्यंत थांबणार आणि आपल औषध कस जालीम आहे त्याची जाहिरात तोच करणार. असा “आँल इन वन ”  म्हणूनच तुकाराम नसेल तर लोकांची कामे अडून रहात.

कोणी पाहुणे आले, की तो चौकशी करण्याच्या निमित्ताने येई त्याला चांगले ठाऊक असे की आलेले पाहुणे काहीतरी भेटवस्तू देणारच. पाहुण्यांनी काही भेट दिली की म्हणे, “मी खुशाली घेऊक इलय, ह्या कित्याक देऊक व्हया, कदी जातलास? तुमका रसाळ फणस आणून देतय,वगरो खाल्लो तर हाताचो वास जावचो नाय.” पाहुणे म्हणत “कशाला उगाच? भेट नेणार कोण एवढ्या दूर ?” याच उत्तर तयार “मी आसय तो काय? कधी जातलास ते सांगा.” हा खरोखरच जाण्याची वेळ साधून हजर, पाहुण्यांनी पन्नासची नोट ठेवली की म्हणे, “पावण्यानू आणिक एक नोट ठेवा, काय हा घराकडे विचारतली, पावण्यांका सोडूक गेलात ता, माझो कायच प्रश्न नाय पण बाईच्या पावण्यान पन्नास दिले, शोभणा नाय ना म्हणान—-” पाहुणा निमूट पन्नास काढून देई.

हा इरसालपणा त्याच्यात शिगोशीग भरला होता. कधी आपल्याला वेळ नसेल आणि तो बाजारात जातो म्हणून काही वस्तू विकत आणायला सांगितली तर म्हणे,व”एका तिकटीचे पैसे घेव मा! किंवा बाजारातून आल्यावर शिल्लक पैसे देतांना म्हणे मी सरबत खाल्लय मरणाचा गरम व्हय होता. “तुमच्या प्रतिक्रियेची तो अपेक्षा करत नसे. तर दु:ख कशाच करणार?

तुकारामाने कोणासही परके मानले नाही, कोणी तरूण पाहुणा आला की तो खुशाल विचारी, “भाचानू, मुंबई काय म्हणता? ब-या कामाक मा ! पुढच्या वक्ताक येशात तेवा सुनेक घेवनच येवा.” नातं स्वतः जोडण्यात एकदम हुशार. पावणा त्याच्या शब्दात फसला की कधी पाहुण्यांना म्हणेल, “बाजाराक जातास मा, माझा याक वशेद आणूचा होता, त्याचो खोकोच हाडलय, नाव कोणाच्या बापाशीक येता, विसरा नको,वशेद नसला तं डोळो आग आग करता.” अर्थात पाहुणा औषधाचे पैसै कसे मागणार? जात्याच हुशार आपला फायदा करून घेण्यासाठी तो कोणत्याही थराला जाईल, नसबंदी कार्यक्रम सुरू असतांना, त्याने आरोग्यरक्षकाकडे नाव नोंदवले, रूग्णाला आठशे रूपये या नसबंदी नंतर मिळणार होते. जेव्हा तो इस्पितळात पोचला तेव्हा डॉक्टर म्हणाले, “अहो तुमची यापूर्वी नसबंदी झाली आहे, तुम्ही पून्हा का आलाय?” तो काहीच माहिती नाही असा आव आणत म्हणाला,”साहेब म्हणाले, नसबंदी करशात त आठशे गावतीत, माका काय माहीत, पूना नाय करणत ती.” डॉक्टर वेडा व्हायचा बाकी, तेथील परिचारिका पोट धरून हसत होत्या. तो घरी जाताना आरोग्य रक्षकाला रागावत म्हणाला दिवसाची मजूरी बुडवन इलय तिकटाक पैसे तरी देवा.” आरोग्य रक्षकाने त्याच्या हातावर पन्नास रुपये ठेवले, तस म्हणाला,”भाऊ, तुमच्या शब्दाक मान म्हणून इलय, शंभर तरी देवा.” आरोग्य रक्षकाने निमूट अजून पन्नास रुपये काढून दिले.

त्याला तीन मुले,त्याला स्वतःला अभ्यासात गतीच नव्हती, तो मुलांना काय शिकवणार?  पण पैशांचा हिशेब एकदम चोख,घेण अचूक घेणार,पण द्यायची वेळ आली की याचे हात गळालेच समजा. मोठा मुलगा लग्नाचा झाला, तेव्हाची गोष्ट. मुलीकडचे घर पहायला आले, त्यांनी विचारले कामधंदा काय?, यांनी घराकडे उभ रहात खाली बोट दाखवून म्हटलं, “मरणाची शेती पडलीहा, तो डोंगरव आमचो,कायच कमी नाय,तुमी फकस्त पोरगी देवा.” वास्तवतः याच घर आणि आवार सोडल तर याच्याकडे वितभरही जमीन नव्हती पण आव असा आणला जणू तो वतनदार आहे. 

ही “माझं”  म्हणण्याची कला त्याने कुठून मिळवली ती वेतोबालाच ठाऊक.  पण उप-या गावात येऊन त्याने जम बसवला आणि पन्नास वर्ष संसार केला. या पन्नास वर्षात त्यांने किती जणांना टोप्या घातल्या त्यालाच ठाऊक, पण लोक त्याला तुकाराम मामा म्हणत आणि त्याने हातोहात अनेकांना मामा बनवले हेच खरे.

कालांतराने इंदिरा आवास योजनेतून त्याला घर मिळाले, मुलांची लग्न झाली तो आजोबा झाला पण घर संसार ओढण्यासाठी पळत राहिला. तो ब-याच जणांची शेती खंडाने करे, शेती झाली की खंड घरपोच देण्याची पध्दत आहे. शेतात कितीही भात पिकले तरी मालकाला खंड घालतांना इतकी रडारड करत असे आणि काही पिकलेच नाही असे नाटक वठवे की वाटे तुझा खंडही नको आणि मी शेतही तुला देत नाही, पण जमीन पड राहू नये म्हणून तो देईल त्या खंडात लोक शेत त्याला देत. या खंडाच्या शेतीवर तो संपूर्ण वर्षभर भात पुरवून विकतही असे, पण मिळेल ते माझं हेच त्याच जीवनसुत्र होतं. असा ख्यातनाम तुकाराम आजारी पडला तेव्हा तो ज्यांच्याकडे कामाला जात असे त्यांची आठवण काढी आणि भेटायला बोलवी आणि म्हणे, “वैनीच्या हातची माशांची आमटी खायन शी वाटता,अगदी तोंडाक चव नाय रवलीहा.” वैनीला खास त्याच्यासाठी मासे आणून आमटी पाठवून देण्या शिवाय गत्यंतर नव्हते.

तो गेला तेव्हा सारा गाव हळहळला, अनेकांनी वेगवेगळे किस्से ऐकवले, एक म्हातारा ताण हलका करत म्हणाला, “मामाच्या तेराव्याक पिंडाकडे ठेवची यादी केली तर चार पानाव पुराची नाय, कायेव म्हणा, प्रत्येक घरची एखादी वस्तू मामाच्या घराक असतलीच त्यामुळे ते सगळे वस्तू पिंडाकडे ठेवले की कावळो आपसूक पिंड नेईत.” उगाच कोणाच्या सपनात तो येऊक नको. त्यांच बोलण ऐकून स्मशानात हास्याची खसखस पिकली. असा हा मामा,सर्वांना हवाही पण——

तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले आणि आमचा तुकाराम, तो स्वर्गवासी झाला पण आठवणीने इथेच राहीला.आजही शेतात काम करतांना, लाकड तोडताना तो आजुबाजूला वावरतो आहे असा भास होतो.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “तुका म्हणे माझा

 1. Mohanchandra Samant
  Mohanchandra Samant says:

  ?

 2. Mangesh kocharekar
  Mangesh kocharekar says:

  Thanks for complement.

 3. malatya

  malatya malatya malatya malatya

Comments are closed.