तुम्हीच व्हा सुर्य उद्याचे

तुम्हीच व्हा सुर्य उद्याचे

अंधार फार झाला, आता सुर्यास जाग आणा
वस्त्र फाटले काळजाचे, माणुसकी थोडी विणा।

चला करु नेक विचार मन, मनात जागवू आशा
चेतवा स्फुल्लिंग काजव्याचे, पाहूया उद्याची उषा॥

गेला आठवडाभर दर दुसऱ्या दिवशी खोट्या लसिकरणाची बातमी वृत्तपत्रे आणि यूट्यूब चॅनल वर नाचत होती. कांदिवली, अंधेरी, पवई आणि ठाणे या भागात काही मोठ्या रहिवासी संकुलात, कंपनीमध्ये, मान्यवर हॉस्पिटलचे नाव घेऊन किंवा अन्य मान्यवर कॉलेजचे नाव घेऊन covaxine आणि covishield या लसी ऐवजी सलाईनचे पाणी टोचून लसीकरण करण्यात आले. यात डॉक्टर दाम्पत्याचा सहभाग होता ही दुर्दैवी बाब.

लोकसत्ताच्या दुसऱ्या बातमीत व्यक्त केलेल्या भितीप्रमाणे महाराष्ट्र आणि इतर राज्यात लाखो खोट्या लसीचे डोस देण्यात आले असावेत असा संशय आहे. या खोट्या लसीमुळे जर जीवीतहानी झाली तर त्याची जबाबदारी कोणाची? खरे तर हे लसीकरण १००% शासकीय यंत्रणेमार्फत होणेच योग्य होते. पण केंद्रसरकारच्या आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ह्या लशीचा कोटा खाजगी रूग्णालय आणि काही समाजसेवी संस्था यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पोचला. या निर्णयाचा फायदा घेऊन काही समाज कंटकांनी लसीकरण करण्याची स्वतंत्र मोहीम राबवली. या समाजकंटकाना कोणाचा आशीर्वाद होता न कळे. परंतू काही मान्यवर डॉक्टर त्या मोहिमेत सामील झाले. डॉक्टर पेशा स्विकारलेल्या या सुशिक्षितांची कुठे गेली मानवी नैतिकता? कुठे गेली घेतलेली शपथ? जी डॉक्टरी पदवीदान समारंभात घेतली होती. ज्याने वाचवावे तोच यमदूत झाला तर मग जीवदान कोण देणार? पराकोटीचा श्रीमंत बनण्याचं हव्यास आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी! ही श्रीमंत बनण्याच आसच माणसाला सैतान बनवते.

मध्यंतरी जेव्हा रेमडिस्वेअर किंवा काही अन्य करोनावरील औषधे दुर्मिळ झाली होती तेव्हा तीन चार हजाराचे इंजेक्शन पंधरा वीस हजार रुपयांना काळ्या बाजारात मिळत होते. तेव्हाही या औषधाच्या नकली कुप्या बाजारात विकल्या गेल्या आणि गरजवंताने त्या जास्त पैसे देऊन विकत घेतल्या.

पैसे मिळवण्यासाठी काहीही करण्याची वृत्ती, कोणी जगो अथवा मरो आम्हाला पैसे मिळण्याशी मतलब. हीच गत हॉस्पिटलमध्ये, पेशंट अत्यावस्थ असतांना, आधी पैसे भरा नंतर उपचार सुरू करू असे म्हणणे किंवा पेशन्ट दगावल्या नंतर त्याच्या उपचाराचे पैसे पूर्ण भरले नाही म्हणून त्याचे शव देण्यास नकार देणे हे कोणत्या तत्वात बसते? परंतू आर्थिक गणितापुढे मानवता थिटी पडते हेच खरे. कुठे डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग यांचा मेळघाटातील सेवाभावी उपक्रम आणि कुठे शहरातील लुटणारी हॉस्पिटल?

दोन दिवसापूर्वी अमूलच्या दुधात भेसळ करून दूध विकणारी टोळी सापडली. विलायती दारूच्या नावाखाली, भेसळयुक्त दारू विकली जाते. काही आठवड्यापूर्वी कोकणात गोव्यातून मुंबई दीशेने जाणारा ट्रक पकडला त्यात आशीच डुप्लीकेट दारू होती. याच बरोबर खोपडी विकून अनेकांचे बळी घेतले जातात. असे प्रकार अनेक राज्यात घडतात. या गोष्टी नवीन नाहीत.आजही हा प्रकार वेगवेगळ्या राज्यात सुरु आहे. लेनदेन करून आयत्या वेळी घेतलेले वकिलपत्र सोडून देणे, साक्षीदार तपासण्यात किंवा आशीलाची केस चालवण्यात टाळाटाळ करणे, दिरंगाई करणे, असे विविध अनियमित आणि अनैतिक प्रकार करून जर वकील पैसे कमावताना एखाद्या अशीलाचा विश्वासघात करणार असतील तर त्यांनी वकिली नव्हे अन्य पेशा स्वीकारावा.

खोट्या मुलाखती घेऊन नोकरी देण्याचे आश्वासन देऊन किंवा ज्या सदनिका त्यांच्या स्वतःच्या नाहीत त्या दाखवून एक सदनिका एका वेळेस अनेकांना विक्री केल्याची व लाखो रुपयांना गंडा घेतल्याची देखील अनेक उदाहरण आहेत. अर्थात असे गैरव्यवहार करणारे पुराव्या अभावी निर्दोष सुटतात ही शोकांतिका आहे. गुन्हेगार समोर असुनही साक्षीदार साक्ष देण्यासाठी तयार नाही म्हणून न्यायालय आणि न्यायाधीश पीडिताला योग्य न्याय देण्यास हतबल आहे.

तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे? या बातम्या आम्ही रोज वाचतो, ऐकतो, पाहतो सुद्धा, हेच ते ! आम्ही दिवसेंदिवस नपुंसक होत आहोत. आम्हाला या घडणाऱ्या घटनेची चीड येत नाही. जो पर्यंत ते माझ्या बाबत घडत नाही, जो पर्यंत त्या घटनेची झळ मला लागत नाही मी काहीच बोलणार नाही, मी प्रतिक्रिया देणार नाही.

गिरणीच्या आवारात बलात्कार झाला, कोवळ्या मुलीचे लचके तोडले गेले, दिल्लीतही तेच घडले,अशा असंख्य घटना घडूनही गुन्हेगाराला वेळीच शिक्षा होत नाही आणि काही बाबतीत शिक्षा झाल्या नंतर गुन्हेगारी मानसिकतेत फरक पडत नाही, ती माझी बहिण, पत्नी असती तर! हे मी मला केव्हा विचारणार? माझ्यातील माणूस कधी जागा होणार? न्यायालय केवळ वस्तुस्थिती आणि पुरावा यावर न्याय देतं. भावनेच्या आहारी जाऊन न्याय दिला जात नाही. तरीही एखादा गून्हा घडल्यानंतर ती घटना प्रत्यक्ष पाहिली तरी साक्षिदार म्हणून साक्ष देण्यासाठी उभ राहण्याची आपण हिंमत दाखवणार नाही तो पर्यंत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार नाही.

सर्वात वाईट बातमी म्हणजे ई.डी.ने आपले माजी आणि पदच्युत गृहमंत्री यांच्या घरी जप्ती वॉरंट बजावले. निवृत्त पोलीस अधीकारी शर्मा आणि निलंबित अधिकारी वाजे यांनी गृहमंत्र्यांसाठी चार कोटीहून अधिक रक्कम जमा करून खाजगी सचिव पलांडे आणि स्वीय सह्ययक शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे सांगितले. ज्या पोलीस खात्याने जनतेचे रक्षण करायचे तेच मुबंई मधील हॉटेल,बार,पब यांच्याकडून हप्ते वसूल करत होते. संपूर्ण जगात पोलीस खाते आणि गृह खाते बदनाम झाले. कुठे आहे नैतिकता? ज्यांनी गुन्हे रोखायचे तेच गुन्ह्याला संरक्षण देण्यासाठी खंडणी जमा करत असतील तर न्याय देणारा सूर्य कोठून शोधायचा?

“उष: काल होता होता पुन्हा रात झाली.”, असं म्हणताना तुमच्या हृदयातील, तुमच्या निबर मनातील, मशाली पेटण्याची वाट कुठवर पहायची? तुमच्या मनातला सूर्य कायम अस्ताला गेला आहे का? त्याला उषेची स्वप्न पडत नाहीत का? एखादे दैदिप्यमान काम करून चारी दिशा उजळवून टाकूया असे वाटत नाही का?

हवालदार ओंबळेंने कशाच्या जीवावर नराधम कसाबवर झेप घेतली? त्यांनी मी मेलो, शहिद झालो तर! हा प्रश्न स्वतःला केला की राष्ट्राचा विचार केला? गलवान खोऱ्यात चीन सारख्या प्रबळ आणि शक्तिशाली शत्रूवर, बोटावर मोजता येतील एवढे निशस्त्र सैनिक सीमा रक्षणासाठी तुटून पडले, ते त्यांच्यातील देशाभिमान सूर्य तेवत होता म्हणूनच ना? त्यांनी आपल्या कुटुंबाचे काय? असा स्वार्थी विचार केला नाही ना!

कोविडच्या महामारीत जे डॉक्टर आणि ज्या परिचारिका सेवा देत होत्या त्यातील काही डॉक्टर आणि परिचरिकाना सेवा देताना करोनाची लागण झाली. उपचार घ्यावे लागले पण बरे होताच ते पुन्हा कामावर रुजू झाले. त्यानी विश्रांती घेतली नाही की लंगडी सबब सांगितली नाही. जीविताचे संकट असूनही ते डॉक्टर, त्या परिचारिका कर्तव्य भावनेने लोकांचे जीव वाचावे, त्यांची शुश्रूषा करावी ह्या भावनेने पुन्हा कामावर रुजू झाले. अशी सेवा देणाऱ्या परिचारिकेत एक सात महिन्याची गरोदर परिचारिका होती. ती प्रसूती रजा घेऊ शकत होती पण तिचे सहकारी अहोरात्र झुंजत असतांना घरी आराम करावा तिच्या मनाला पटेना म्हणून ती ड्युटी बजावत होती. त्यांनाही मृत्यूची भीती होती पण त्याच्या हृदयी सूर्य प्रकाशित झाला होता त्याच्या तेजोमय किरणांनी त्या कोविडग्रस्त व्यक्तीला प्रकाशित करणार होत्या त्याला सुखरूप घरी पाठवणार होत्या.

प्रत्येक व्यक्ती, वैमानिक, सैनिक, डॉक्टर, न्यायाधीश, वकील, पोलीस, किंवा रुग्ण वाहन वाहक बनू शकत नाही. प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे, प्रत्येकाची भूमिका वेगळी. तुमच्याकडे जे समाजाला देण्यासारखे आहे ते १००%देण्याचा प्रयत्न करा. समाजाला कोणती सेवा देता, ते महत्वाचे आहेच पण त्यात प्रामाणिकपणा आणि समर्पण हा भाव आहे का? जर तो असेल तर तुम्हाला समाज सेवेसाठी वेगळे कष्ट घेण्याची गरज नाही.

माझ्यातील सूर्य मला ओळखता आला पाहिजे, या सूर्याला कोणतेही आमिषाचे, भीतीचे, स्वार्थाचे ग्रहण लागणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. या सूर्याची किरणे ज्याच्यावर पडतील त्याचे जीवन प्रकाशित करून एक नवीन सूर्याला ते जन्म देतील ही भावना मनी पाहिजे. या नवीन सूर्याचा प्रवास देखील अंधकार हटवण्यासाठी प्रकाशाच्या वाटेवरून असेल. म्हणून म्हणतो सूर्य होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा चांगला विचाराने प्रेरित समाजातील असे असंख्य सूर्य तळपू लागतील तेव्हा समाजातील विविध क्षेत्रातील तम, अंधकार हटवायला उशीर होणार नाही. अर्थात हे कोण्या एकाचे काम नसले तरी मीच का सूर्य होऊ? म्हणणे अयोग्य आहे. असंख्य तारे आकाशात लखलखु लागले की नभोमंडल उजळून निघते तसाच हा प्रकार आहे. प्रत्येक माणसात एक विश्वास नांगरे पाटील, एक तुकाराम मुंढे लपलेला आहे त्याला जागे करा. मी सुर्यवंशी आहे म्हणण्यात काय अर्थ , सुर्यपुत्र व्हा, नवा सुर्य व्हा.

माझ्यातील सूर्य प्रकाशित होताना मला दिसत आहे. आ हा हा ! दस दिशा उजळत असताना किती आनंद होत आहे. परिघातील कोपरा कोपरा प्रकाशित झाला आहे, समस्त प्राणिमात्र उल्हसित आनंदित दिसत आहेत. हे ईश्वरा माझी दुसऱ्याला आनंद देण्याची प्रेरणा टिकवून ठेव. जर प्रत्येकाने याच भावनेने स्वतःची भुमीका निभावली तर ! या तरच, ऊत्तर तुमच्या प्रत्येकाकडे आहे. एकदा सुर्य होऊन पाहू, केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “तुम्हीच व्हा सुर्य उद्याचे

 1. Keshav Samant
  Keshav Samant says:

  Good one

  1. Mangesh kocharekar
   Mangesh kocharekar says:

   Thanks for comments

Comments are closed.