दिवाळी पन्नास वर्षापूर्वीची
आज दिवाळी, प्रभू रामचंद्र यांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केला तो दिवस. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येत घरोघरी तोरणे बांधली होती. दुष्ट प्रवृत्तीवर विजय व्यक्त करण्यासाठी आपण हा सण साजरा करतो. गेले हजरो वर्ष ही प्रथा आपण आनंद उत्सव म्हणून साजरी करत आहोत. याचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. प्रारंभी या सणाला पणती मधील दिव्याची रोषणाई केली जात होती,आजही अयोध्येत लक्षावधी दिव्यांची रोषणाई केली जाते. पण शहरात विद्युत दिव्यांच्या रोषणाईची जादू वेगळीच असते. संपूर्ण शहराला लक्ष लक्ष तारकांचे तोरण बांधल्याचा आभास होतो. याच बरोबर फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण शहर दणाणून जाते. वातावरणात या फटाक्यांचा धूर भरून संपूर्ण शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडत. या ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा लहान मुले आणि वयोवृद्ध यांच्या आरोग्यवर अनिष्ठ परिणाम होतो हे दुर्दैवाने आम्ही लक्षात घेत नाही.
उत्सव जरूर साजरे करावे पण ते प्रदूषण मुक्त असावे. काही जागरूक संस्था फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी गेले आठ दहा वर्षे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना हळू हळू यश येत आहे. काही सामाजिक संस्था खेड्या पाड्यातील गरीब वस्त्यांमध्ये जाऊन दिवाळीचा फराळ आणि कपडे वाटप करून गरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहेत. या उपक्रमात तरुण तरुणींचा सहभाग आहे ही चांगली बाब आहे. सामाजिक भान निर्माण होईल तशी जागृती होईल. मी पेक्षा आम्ही,आपण ही संकल्पना आता विश्वात्मके देवो या ज्ञानेश्वरांच्या पसायदानाकडे नेणारी आहे.
जेव्हा मी माझ्या बालपणीची दिवाळी आठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सत्तरच्या दशकात पोचतो, मी सात आठ वर्षांचा असताना दिवाळी कशी होती? ते नजरेसमोर येते. शाळेत पाटी पूजन झाले म्हणजेच दसरा संपला की आम्ही दारासमोर ओटी तयार करायचो. ओटी म्हणजे दारासमोर आठ बाय दहा आकाराचे अंगण अस समजा. ही ओटी तयार करण्यासाठी शक्यतो मुरूमाची माती किंवा लाल माती खणून आणावी लागे. आम्ही मुले टोपली अथवा घमेल्यातून ही माती दारासमोर आणून टाकत असू. दारा समोर चौरस खणून त्यावर लाल मुरूम आणि लाल माती पसरून चांगली भिजवून ठेवली की दोन दिवसांनी तिला चोपण्यानी चोप देऊन एकजीव केली जाई. चार सहा दिवस सकाळी सहा पूर्वी आणि संध्याकाळी सात नंतर तिला हलक्या हाताने पाणी मारून चोप दिला की ओटी तयार होत असे. ह्या ओटीला शेण आणि रेवा याने निगुतीने सारवले जाई. सारवणे हे कलाकृतीचे काम असे.अर्ध वर्तुळाकार कमानीचे सारवण अतिशय देखणे वाटे. आईने या ओटीवर कुंचला फिरवून कलाकृती काढल्याचा आभास होई.
या ओटीवर दिवाळीत आठ दिवस ठिपक्यांची रांगोळी काढली जाई. वर्तमानपत्राला एक सेंटीमीटर अंतरावर उभी आडवी भोके जळत्या अगरबत्तीने पाडली की आमचा ग्राफपेपर तयार होत असे. हा पेपर रांगोळी काढायच्या जागी पसरून यावर नाजूक हाताने ठिपके काढले की या ठिपक्यांची मदत घेऊन रांगोळी काढता येई. मग त्यात कल्पनेप्रमाणे किंवा पुस्तकातून हवी ती रांगोळी काढता येई. अशी आखीव रेखीव रांगोळी छान दिसे.तास तास लावून रांगोळीचे रंग भरणे चालू असे. ताई आणि तिच्या मैत्रीणी हे काम करत. एकमेका साह्य करु या नियमाने रांगोळ्या काढणे, दिवाळीचा फराळ, लोणचे, पापड, कुरड्या, गोधड्या शिवणे असले उपक्रम चालत. तेव्हा इमारती नव्हत्या आणि घराचे दार रात्रीखेरीज सताड उघडे असायचे. मनही मोकळी असायची, भांडण झाले तरी दोन दिवसात दोन्ही घरे चुक मान्य करून मोकळी व्हायची, गरीबी असली तरी एवढा मनाचा मोठेपणा होता.
दसरा संपताच आईची दिवाळीसाठी वाण्याकडून खरेदी सुरू होई. रवा, मैदा, गुळ, साखर, पिठीसाखर, चणे, चणाडाळ, उडीद डाळ, मुग डाळ, गरम मसाल्याचे सामान, किशमिश, चारोळी, उटणे, अशी सामानाची यादी असे. मग दोन दिवस चकलीची भाजणी, बेसन भाजणे,रवा भाजून ठेवणे अनारसे बनवण्यासाठी तांदूळ भिजत घालणे, चणे जात्यावर भरडून गुळाच्या करंज्यासाठी साठा तयार करणे, चारोळी वेचून ठेवणे अशी कामे आवरून घेई. गुळाच्या करंज्याचा साठा करण्यासाठी गुळ आणि भाजलेल्या चण्यांचे पिठ चांगले फेसावे लागते. त्यात गोळे रहाता उपयोगी नाही. दोन्ही हातांनी ते चोळले की एकजीव होते. यामध्ये आवडीप्रमाणे वेलची, चारोळी, तीळ, काजूचे तुकडे घातले की साठा तयार होई.
दोन दिवसांनी दुपारी शेजारच्या काकूंना बोलवून करंज्या करण्याची धांदल उडे, करंजीचे पातळ गोल लाते करून त्यामध्ये भाजक्या चण्यांचे पीठ, गुळ, तिळ, वेलची, चारोळी याचा खमंग साठा भरून त्याच्या सभोवती कापसाच्या बोळ्याने दुध लावले की दुमड घालून चिकटवले जाई आणि चिरण्याने अर्धगोलाकार कापले की छान आकार येई. ही करंजी कढईत उकळत्या डालड्यामध्ये होडी सारखी तरंगत राही. त्यावेळी वनस्पती तुप विकणारी डालडा ही कंपनी होती पण या वनस्पती तुपालाच लोक डालडा म्हणू लागले.करंजी थोडी लालसर भाजली की छान घमघमाट सूटे. पहिले तळण बाहेर आले की त्यातील दोन करंज्या देवापुढे ठेऊन कधी एकदा चव पाहातो असे मला होई. भाजलेली करंजी खुसखुशीत झाल्याय ना? अस चार वेळा तरी आई विचारुन घेई. आहा हा! काय त्या करंजीचा स्वाद, ती उन उन करंजी खातांना होणारा आनंद शब्दात मांडण कठीणच.
या करंजीच्या डालड्यामध्ये शंकरपाळे तळले जाई, शंकरपाळ्याच्या मैद्यात मुठभर बारीक रवा टाकला आणि ही कणीक तुप, साखरेच्या कोमट पाण्यात चांगली मळून घेतली की शंकरपाळी उत्तम होत. या शंकरपाळ्या करतांना मोठी थोरली जाडसर पोळी लाटली की त्यातून पतंगाकृती शंकरपाळ्या कापणे माझे काम, कातणीने कापून त्या सुट्या कराव्या लागत. या शंकरपाळ्या कधी जाड तर कधी अनेक पदरी तर कधी बटराप्रमाणे फुगलेल्या असत. आवडी प्रमाणे, खारट, जीरे घातलेल्या किंवा गोड ही असत. जीभेवर ठेवल्यावर शंकरपाळे विरघळले तरच मजा येई.
मग चकल्या, त्याच पीठ मळताना कोमट तुपाच मोहन घालाव लागे. पीठ मळल्यावर त्यात मीठ, मसाला योग्य झाला की नाही हे पाहण्याच काम माझंच, जर कमी अधिक मिठ, मसाला हवा असेल तर मी सांगत असे आणि विश्वासाने आई बदल स्विकारत असे. पीठ भिजवून तासभर वेळ गेला की तळणावर राखण लागे. चकल्या तेलात तळताना त्यातून बाहेर पडणारे बुडबुडे मी दुरून पहात असे. पहिलं तळण झऱ्यावर आलं की नेहमी प्रमाणे आधी देवाला आणि नंतर पोटाला. चकली तोडांत घातली की कुरकुरीत झालीत का रे? असा प्रश्न येई आणि मी मान डोलवली की तिला आनंद होई, म्हणे कष्ट कारणी लागले. चकली होता होता शेवटच तळण कडबोळ्यांच असे, का ते कळल नाही, विचारलही नाही.
नंतर, क्रमाने बेसनचे, रव्याचे लाडू, भाजक्या पोह्यांचा चिवडा असे पदार्थ डब्यात अलगद ठेवले जात. चिवड्या करीता आई भिजत घालून फुगवलेले भात कढईत भाजून उखळात मुसळाने कुटत असे. हे श्रमाचे काम होते. पण त्या वेळी पोहे गीरण फक्त पालघर येथेच होती, त्यामुळे हे श्रम केले तरच मनाजोगते पोहे तयार होत. या पोह्यांना कष्टाचा स्वाद होता. आता असले श्रम कोणी करणार?
फराळ डब्यात ठेवण ही सुद्धा कला आहे. तेव्हा पत्र्याचे भिस्कीटचे चौकोनी डबे यायचे, या डब्यात न तोडता, करंज्या, चकल्या आणि लाडू ठेवणे हे जोखमीचे काम माझ्याकडे असे. अर्थात कितीही काळजी घेतली तरी एखाद्या करंजीच टोक तुटायचं आणि आई रागावून म्हणे, “मेल्या करंजी तोडलीस ना! सर्व निट भरली की ती तुला खा हो.” त्या मेल्या शब्दातही प्रेमळ भावना असे. फराळाचे डबे भिंतीला लावलेल्या फळीवर शोभून दिसत, आई त्याच्यावर दगडी पेन्सिलने पदार्थांची नावे लिहून ठेवी.
बाबा आकाशकंदील बनवण्यासाठी बांबूच्या लवचिक काठ्या घेऊन येत. दादा सुटीच्या दिवशी ह्या काठ्या मापात चाकू ने कापून स्वच्छ करुन त्याची षटकोनी बांधणी करत असे. यावर पातळ रंगीत पेपर चिकटवला की कंदीलतयार होई. हा आकाशकंदील त्यामध्ये विजेचा दिवा बसवून खळ्यात किंवा ओटीवर उंच झाडाला बांधला काम फत्ते होई.
या दरम्यान आमच्या ओसरीला आम्हा मुलांचा दिवाळी किल्ला त्यावरील बुरूज, मावळे, हत्ती, तोफा, यासह तयार होई. रात्री त्यावर पणती पेटवून आम्ही उजेड करीत असू.या अनेक मिळमिळण्या पणत्याने आसमंत आणि किल्ला लख्ख प्रकाशाने उजळून येई.
नरकचतुर्दशीच्या आदल्याच दिवशी रात्री दुधात उटणे भिजत घातले जाई. भल्या पहाटे उठून आई आंघोळीसाठी गरम पाणी चुलीवर तापत ठेवत असे. सर्वात पहिली आंघोळ अर्थात आमचे वडिल तीन साढे तीनला करत, आंघोळी पूर्वी आई त्यांना उटणे लावी.देवासमोर पाटावर बसवून आई आम्हालाही उटणे लावत असे. तेव्हा थंडी दिवाळी पूर्वी सुरू होत असे त्यामुळे त्या कोमट उटण्याचा स्पर्श सुखावून जाई. त्यानंतर गरम गरम पाण्याने आम्ही फाथरीवर बसून आंघोळ करत असू. घरात बाथरूम हा कन्सेप्ट नव्हता. हवेत बराच गारवा असे त्यामुळे अंगावर पाणी घातले की बाष्प हवेत फिरत राही. तुळसी वृंदावनात ठेवलेले चिरोटे फोडतांना वडील गोविंदा, गोविंदा अशी आरोळी मारत ती गावाच्या वेशीपर्यंत गुंजत राही. गावातील माधव पाटील, वालावलकर काका, भांडारकर डॉक्टर, पाटकर असे काही जेष्ठ याच दरम्यान गोविंदाचा गजर करत. अर्थात हा गजर लवकर उठलो तर ऐकायला मिळे. चिराटे डाव्या पायाच्या अंगठ्याने फोड असा आईचा आग्रह असे. वडिलांच्या नंतर तासाभराने आम्ही अभ्यंगस्नान आवरून चिराटे फोडत असू. आम्हीही आई सांगते म्हणून तुळशी समोर ठेवलेले चिराटे फोडून त्यातील दोन बीया तोंडात घालत असू. ते चवीला अतिशय कडू लागे. चिराट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करून दिवाळी पाहिल्या दिवसाची सुरवात होई.
सकाळी सात साडे सातला फराळ तयार असे, यासाठी आई आणि ताई सकाळी स्वतःचे आवरून सर्व पदार्थ करत. तिखट पोहे, दही पोहे, दडपे पोहे, उसळी आणि संपूर्ण फराळाचा नैवेद्द देवाला दाखवून आम्ही शेजारी फराळाचे ताट पोच करत असू. आमच्या घराभोवती आठ दहा आदिवासी कुटुंबे रहात त्यांनाही खाण्यापूर्वी फराळ पोच केला जाई, आई म्हणे, “या गरीबांना दिलं तर पूण्य लागत. ज्यांचे दोन वेळी भागणे कठीण त्यांची कसली दिवाळी? त्यांचे रोजचेच दिवाळे. म्हणून त्यांचे तोंड गोड केल पाहिजे.” या दिवशी आमच्या गाईलाही फराळाचे पान मिळे. मुक्या प्राण्यांनाही आजचा दिवस आनंदाचा जाई.
नरकचतुर्दशीच्या दिवशी बुधवार, शुक्रवार किंवा रविवार असला तर बाबा मार्केटमध्ये जाऊन मासे आणत.दुपारी फराळावर उतारा म्हणून तिखट जेवण असे. सकाळचा फराळ आणि त्यावर दुपारी मासे यावर आडवा हात मारल्याने दुपारी मस्त झोप येई.
दुसऱ्या दिवशी पाडव्याला आम्ही गाईंना आणि तिच्या गोऱ्याना फुलांच्या माळांनी, शिंग गेरूने रंगवून सजवायचो आणि गावाच्या मध्यभागी तयार केलेल्या पेंढ्याच्या शेकोटीवरून घेऊन जायचो. गावातील अंदाजे शे दिडशे गाई, बैल, म्हशी, त्यांची वासरे यांची मिरवणूक गावाच्या वेशीपर्यंत जायची. या शेकोटीत पेंढा पेटवलेला असल्याने गुरे घाबरून इतस्ततः पळायची. फार गंमत यायची.अर्थात या गुरांना या शेकोटीची भिती वाटत असावी हे कधी लक्षातच घेतल नव्हते. आता हे उशिराने लक्षात येतय.
दुपारी जेवणात सांजोऱ्या किंवा धोंडस हा गोड पदार्थ असायचा. तेव्हा आतासारखा रेडीमेड पदार्थांचा काळ नव्हता. घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थातून गोडधोड बनवले जाई. अगदी श्रीखंड ही घरीच बने. दिवाळी पाडव्याला आई बाबांना निरंजन ओवाळून औक्षण करत असे. आई आणि बाबा यांचा प्रत्यक्ष संवाद मी कधीच ऐकला नाही. अगदी सणवार असला तरी बोलण हे फक्त व्यवहार होण्यापूरते असे. पाडव्याला बाबांनी आईसाठी काही भेट घेऊन दिल्याचे कधी पाहिले नाही.तेव्हाच्या स्त्रिया खरंच अतिशय सोशिक होत्या, अगदी आईसारख्या ना नाराजी ना रुसणं फुगणं. काटकसरीने घर कसे चालवावे याच आई मूर्तिमंत उदाहरण होती.
आई दिवाळीसाठी लागणारी भाजणी, पिठीसाखर याचं दळण जात्यावर दळत असे. ताई तिला दळण दळायला, पदार्थ बनवण्यासाठी मदत करे. लहान वयापासून ताई आईच्या प्रत्येक कामात हातभार लावत असे. आई म्हणे मुलींनी या गोष्टी स्वतः वेळेत शिकून घ्याव्यात म्हणजे भविष्यात अडचण वाटत नाही.
आमचे वडील ज्यांना आम्ही काका म्हणत असू ते शासकीय नोकरीत होते पण तेव्हा पगार तुटपुंजे होते म्हणून त्यांची खर्च भागवताना कसरत होई. दिवाळीला ते मोजके फटाके आणत.स्वतःला सुतळी बॉम्ब जो नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे वाजवत. आम्ही केपा,फुलबाजे, डांबरी आणि लवंगी फटाके, भुईचक्र,अनार यावर खुश असू. न फुटलेल्या फटाक्यांची दारू एकत्र करून आम्ही ती कागदाची सुरळी करून त्यात भरत असू मोठी गंमत येत असे. फुलबाजा पेटवण्यापूर्वी त्याची तार वाकवून त्याचा आकडा केला आणि पेटता फुलबाजा समोरच्या झाडावर भिरकावला की फांदीवर अडकून पेटत राही मोठी गंमत येत असे.
आमच्या घरापाठी आदिवासी वस्ती होती. ते लोकांच्या शेतावर मजूरी करत. ते बिचारे ह्या दिवाळी किंवा अन्य सणाला फारस काही करु शकत नसत. तेव्हा त्यांच्या घरात मिणमिणते रॉकेलचे दिवे होते. आकाश कंदील ,फटाके असले चोचले त्यांना परवडणारे नव्हते. आमचे वडील आणि मोठा भाऊ कामाला होते त्यामुळे आमची परिस्थिती त्यांच्यापेक्षा बरीच म्हणायची. कोणताही सण असो आई घरात असेल त्यातील गोडधोड पाठवायची.वाटून खाण्याची सवय कधीही चांगलीच. माझी आई म्हणायची परिस्थिती आपल्या पेक्षा गरीबाची पहावी आणि सद्गुण चांगल्या माणसाचे घ्यावे.
भाऊबीजेला ताई आम्हा चार भावंडांना एकाच ठिकाणी ओवाळत असे. मोठा भाऊ कामाला लागल्यानंतर तो भाऊबीज म्हणून दहा रूपये घालत असे. ताई औक्षण करतांना आम्ही त्या आरतीच्या दिव्याकडे पहात फिरवल्या जाणाऱ्या तबका बरोबर मान उगाचच फिरवत बसत असू. आमच्याकडे आईच एक एक रूपया देई तोच आम्ही बहिणीला भाऊबीज म्हणून घालत असू. बहीण आम्हाला ओवाळून करंजी, शंकरपाळे भरवत असे. तेव्हा बहिणीने भावाला रिटर्न गीफ्ट देण्याची पध्दत नव्हती.
दिवाळीचा तो आठवडा पंख लाऊन निघून जाई पण दिवाळीसाठी बांधलेला किल्ला अजूनही त्या दिवसांचा साक्षिदार म्हणून उभा असे. आज वर्षांचे तिनशे पासष्ट दिवस घरात कोणत्या ना कोणत्या निमित्ताने दिवाळी वातावरण असल्याने दिवाळीला लहानपणी जशी मजा यायची, अप्रूप वाटायचे तसे आता वाटत नाही.आता थंडीही सिमेंट काँक्रीटच्या घराच्या आत शिरण्यास धजावत नाही. इमारतीत दारासमोर लाईटची तोरणे आकाशकंदील असा झगमगाट असतो पण ही दारे मात्र बंद असतात. फारच थोड्या घरात फराळाची देवाण घेवाण होते.एखाद्या घरी फराळ द्यावा की नाही हे ठरवता येत नाही. त्या काळी, “काकू तुमच्याकडला चिवडा छान झालाय.” असं म्हणायचा अवकाश, काकू मुद्दाम वाटीभर चिवडा देताना म्हणत, “वहिनी ही वाटी तुमच्या विलाससाठी माझा चिवडा आवडला हो त्याला.” असं सगळं दिलखुलास वागणं असे.
आता दसरा दिवाळी सणाला कोणी कोणाच्या घरी भेटायला जात नाही. एकाच शहरात असतील ते जात असतीलही पण पंचवीस वर्षांपूर्वी एखादा भाऊ आपल्या बहिणीला भाऊबीजेच निमित्त साधून एसटी ने पाच पन्नास किलोमीटर, अगदी दूर गावी जात होता. भेटीत सुखदुःखाच्या गप्पा मारून मन मोकळ करून येत होता. एवढ्या दुरून बहीण देइल तो फराळ आवडीने आणत होता. आता फराळ देण्यापूर्वी भाऊ बहिणीला सांगतो, ताई फराळ बिराळ काही देऊ नकोस हा, घरी डबे भरलेले आहेत, मुलं खात नाही. तसही दुसऱ्या घरात फराळ देण योग्य वाटतही नाही, न जाणो तो फराळ वाया जायचा. “गेले ते दिन गेले.” अस म्हणून शांत रहायचं. कधीतरी आठवणींना कढ येतो, लिहिल्यावरच बरं वाटतं पण मन शांत होत की अस्वस्थ हे अजूनही कळलेलं नाही. हा अनुभव काही माझा एकट्याचा नसावा, कुणी सांगत, कुणी मनातच घुसमटत. आठवून पहा तुमच बालपण, सल मनात असेलच, फक्त सांगता आला नसेल. असो दिवाळी आहे प्रथम एन्जॉय करा. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो फराळाला जरूर या. परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, त्यामुळे बंधन पाळत आपल्या आप्तांना भेटायला हरकत नाही, प्रत्यक्ष भेटीत जो स्नेह आणि आपुलकी आहे, जी attachment आहे त्याला व्हिडिओ कॉलची सर येईल का? शिवाय प्रत्येकाच्या हातच्या चवीचा एखादा पदार्थ असतोच की नाही? गेले दोन वर्षे हा बॅलन्स वसूल करायचा आहे.तेव्हा या दिवाळी सुटीत मोका आहेच आणि फुरसत पण. एकदा सोमवार उजाडला की उसंत कुठली, काय खर ना? अर्थात फराळ डब्यात असेपर्यंत कधीतरी घरातल्या महिलांना नाव ठेवत तोंड हलवायला काही हरकत नाही.
Chan…… Diwalichi maja…. Balpan aathvle.
भोसले सर नमस्कार, प्रतिसादाबाबत धन्यवाद