नातं

नातं

त्याचा मृत्यू झाला तेव्हा अख्ख्या गावावर शोककळा पसरली,. गावातील टोर पोर सगळे त्याच्या घराच्या दिशेने निघाले होते, त्यात भटाबामणापासून हरीजन वाड्यातील म्हाताऱ्या वेणू आक्का पर्यंत सगळे होते. कोण होता तो? का सारा गाव तिच्या घरच्या दिशेने निघाला होता? या पूर्वी अनेक जणांचा मृत्यू या गावात झाला होता पण त्याची गोष्ट वेगळीच होती. त्याच्या मृत्यूने ती हादरली, ती कोणाची बाय, कोणाची आतू, कोणाची मावशी तर कोणाची काकी होती.

कोणी तिला वहिनी म्हणून हाक मारत होतं. तो वारल्यानंतर जमलेला गोतावळा हा तिच्या प्रेमापोटीच जमला होता. नवऱ्यासाठी तिने नशीबाशी झुंज दिली होती. चाळीस पंचेचाळीस वर्षाची सोबत करून आणि मुलं झालं नाही तरी एकनिष्ठ राहात त्यानी तिला आपलंसं केलं होतं. त्यांच्या समाजात हे आक्रीत होतं. त्याने वेळोवेळी गावातील लोकांची सेवा केली होती. कोणाला इमारती लाकूड पुरवून, तर कुणाच्या शेतीची नांगरट करून, कुणाचा टांगा हाकून तर कोण्या शेठ लोकांचे दूध पहाटे मुंबईला गाडीने पोचवून. संपूर्ण गाव त्यांना आदर्श जोडपं म्हणून मान देत होतं आज मोठया संख्येने लोक त्याचा अखेरचा निरोप घ्यायला जमा झाले त्याचे हेच कारण होते.

तिच्या घरा जवळून जातांना, त्याला किंवा तिला हाक न मारता कोणीही जात नव्हते. ती घरात असली तर “ओ” अशी साद देत बाहेर येऊन विचारपूस करत असे. रोज दुपारी किंवा रात्री तिच्या ओट्यावर गप्पांचा फड जमे मग गावात, स्टेशनवर किंवा तालुक्यात घडलेल्या ऐकीव घटनांचा उहापोह होई. तेवढाच त्या सर्वांचा विरंगुळा.





तिला मुलबाळ नव्हतं आणि मुले होण्यासाठी डॉक्टर गाठणं तिला शक्य नव्हतं. कुणी सांगितले म्हणून तिने देवीला नवस केला, भगत गाठून देव देवस्की पाहिली. पैसे खर्च झाले पण कूस उजवलीच नाही. मुले नसल्याचे दुःख ती वागवत होती. ती आणि नवरा अस अवघ दोन जणांचा परिवार असला तरी गाय, बैल, वासरे, बकऱ्या आणि कुत्रा असा तिचा परिवार होता. तिच्या वडिलांची दोन एकर सरकारी शेती होती त्यात ते पावसाळी भात पिकवत होते. मुलांच प्रेम ती प्राण्यांवर उधळत होती. कुत्रा तिच्या सोबत सावली सारखा असे. मग ती कुठेही गेली तरी कुत्रा तिच्या मागोमाग निघे.

गंमतीचा भाग म्हणजे ती गुरुवार उपवास करी म्हणून कुत्रा उपाशी राहून आपली स्वामीनिष्ठा दाखवत असे. तिच्या बाजूस बसूनच तो जेवत असे. पावसाळा सोडला तर ती नियमित त्याला आंघोळ घालून स्वच्छ ठेवी. कुत्र्यासाठी तिचा नवरा नियमित फरसाण घेऊन येत असे. त्याच्यावर ते दोघ पुत्रवत प्रेम करत आणि कुत्राही आपल्या आई वडिलांकडे हट्ट करावा तसा त्यांच्याकडे हट्ट करे. त्यांच्या सोबत रात्री तो अंथरुणात निजे. तिचा उपवास असला की तो उपाशी राहात असे, त्या मुक्या प्राण्यास ते कळे, इतके त्यांचे भावबंध जुळले होते.

एका पावसाळ्यात रात्री कुत्रा तिच्या शेजारी येऊन नेहमी प्रमाणे झोपला. सकाळी ती उठली तरी तो तिथेच झोपून होता, सहसा असे कधी घडत नव्हते. चहा घेतांना तिने त्याला हाक मारली तरीही तो आला नाही म्हणून तिने नवऱ्याला हाक मारून कुत्रा का उठला नाही पाहायला सांगितले. त्याने अंथरूण दूर केले तरीही त्याची हालचाल झाली नाही तेव्हा तो मटकन खाली बसला. आपला जिवाभावाचा कुणी गेल्यावर दुःख होईल इतके दुःख त्यांना झाले, ती तर वेडीपीसी झाली, त्याला गोंजारत म्हणू लागली, “तु गेलास,आता आम्हाला कोण पाहिल?” तिने त्याला स्वतःच्या कुंपणातच मुठमाती दिली. दोन दिवस तिने अन्न घेतलं नाही. शेजाऱ्यांनी कशी बशी तिची समजूत काढली. इतके तिचे भावबंध जुळले होते.

दोघेही कष्टाळू होते. पावसात ते शेती करत तर इतर वेळी तो कधी मजुरीला जाई तर कुणी काही इमारती लाकूड मागितले तर सरकारी जंगलातून तोंडून अंधार पडला की आणून देई. अर्थात हा व्यवहार तसा चोरीचाच कारण सरकारी जंगलातून इमारती लाकूड तोडून आणणे ही तशी चोरीच गणली जाई. लोक त्याने आणलेले सागाचे लाकूड स्वस्तात पदरी पाडून घेत. सर्वच चोरीचा मामला त्यामुळे त्याची वाच्यता फारशी होत नसे. वर्षात एकदा तरी त्याला करड्या सशाची पिल्ले मिळत मग त्या सशांचे कोड कौतुक करण्यात त्यांचे दोन चार महिने निघून जात. त्यांना कवळे गवत शोधून आणणे, बाजारातून गाजरे, कांद्याची पात आणणे त्यांना पाणी भरवणे. लहान असे पर्यंत पिल्ले अंगावर खेळत पण जसे ससे मोठे होत त्या सशांना बंदिस्त जागेत ठेवणे जिकिरीचे होई आणि तो ससे विकून टाके. ती बिचारी ससे विकले तरी कासावीस होई कारण ते ससे तिने कापसाच्या बोळ्यानी दूध भरवून वाढवलेले असत.

ती घरी गावठी दारू गाळण्याचे काम करत असे आणि आजू बाजूचे लोक श्रम परिहार म्हणून गावठी दारू प्यायला तिच्याकडे येत असत. जणू दिवसभराचा थकवा ते दारुत बुडवून टाकत. मागास समाज आज ही त्या दिवसा पुरता जगतो. उद्याची काळजी करत कुढणे त्यांच्या रक्तात नसते. ह्या समाजात दोघेही पितात त्यात लिंगभेद त्यांना मान्य नाही. अगदी स्त्री किंवा पुरुष कोणीही न पटल्यास आपल्या जोडीदाराला सोडून दुसरे लग्न करतात. त्यांना घटस्फोट, दावा, पोटगी मागण असले शब्द माहित नाहीत. कष्ट करुन जगणे. आलेला प्रत्येक दिवस आनंदात जगणे इतकेच त्यांना माहीत.

कधी रोखीने पण बहुधा उधारीवर लोक दारू पिऊन जात. त्याचा हिशोब ती तोंडी ठेवत असे. काळे गुळ आणि नवसागर एकत्र करून ते मिश्रण दोन दिवस चांगले कुजू दिले की फसफसून बाहेर येई असे मिश्रण उच्च तापमानाला उकळवले की आतील द्रवाची वाफ होई. ही वाफ थंड केली की त्याचे द्रवात रूपांतर होई ही उर्ध्वपतनाची पध्दत परंपरेने तिला माहित झाली होती. दारु गाळण्यासाठी तिच्याकडे मडके त्यावर उपडे ठेवायचे भांडे ज्याला एक नळी जोडलेली असे असा संच मांडलेला असे. या भांड्यावर एक ओला केलेला फडका गुंडाळून तो सतत ओला राहण्याची व्यवस्था केलेली असे. या गावठी भट्टीवर पोलीस धाड टाकून दारूचे साहित्य घेऊन जात किंवा मडके फोडून टाकत. तिच्या नवऱ्याला अनेकदा पोलीसांनी पकडून चौकीत नेले होते. पैसे लाच देऊन ती पोलीस स्टेशन वरून नवऱ्याला सोडवून आणे. थोडे दिवस शांततेत जात आणि पुन्हा तोच उद्योग सुरू होई.





या चोरून दारू बनवण्याच्या उद्योगाला ती कंटाळली, त्याला तसेच कारण घडले. एकदा एक पोलीस धाड टाकण्याच्या निमित्ताने तिच्या घरी आला आणि दारू पकडण्याच्या निमित्ताने घरात शिरला. त्या वेळी नवरा घरी नव्हता. पोलिसाला वाटले आपण पोलीस आहोत, शिवाय दारू पकडायला आलो आहोत या बाईशी लगट केली तरी ती काही म्हणणार नाही. त्याने घरात शिरताच पावशेर ढोसली आणि तिच्याशी लगट करण्याच्या प्रयत्न करू लागला. ती त्या प्रकाराने प्रचंड चिडली. तिने त्याचा गळा धरला आणि कोयती काढली. तसं कशी बशी स्वतःची सुटका करून त्याने धूम ठोकली. कुत्र्याने तिच्यावर ओढवलेला प्रसंग पाहून त्याची चांगली पाठ घेतली. तिनेही घरा बाहेर पडत कोयतीसह त्याची पाठ घेतली. सगळे लोक त्या पळपुटया पोलिसांकडे पाहून पोट धरून हसत होते. त्या नंतर कोणी तिच्याकडे वाकडी मान करून पाहण्याचा प्रयत्न केला नाही. या प्रसंगामूळे तिने दारू बनवण्याकडे कायमची पाठ फिरवली.

झाल्या प्रकाराने ती शहाणी झाली. तिने तो चुकीचा मार्ग सोडला आणि सुका लाकूड फाटा जंगलातून जमा करून विकण्याचा मार्ग पत्करला. यातही कधी कधी जंगल शिपाई त्यांनी जंगलातून आणलेली मोळी पकडण्याचे नाटक करत आणि हातावर चार आणे पडले की निमूट निघून जात. समाज व्यवस्थाच मुळी वंचीत आणि शोषितांच्या विरोधात आहे हे पदोपदी जाणवत राही.

तिच्या जवळ शासकीय अनुदानाच्या बकऱ्या होत्या, त्याच्या पालनातून त्यांचे बकरे विकून तिला पैसे मिळू लागले. त्या मुळे तिचा संसार सुरळीत चालू होता. ती संसारी असल्याने चार पैसे गाठीशी बाळगून होती. कुणी गरजू अडीनडीला पैसे मागायला आला तरी त्याला मदत करत असे.
तिचा नवरा उत्तम तारपा वाजवत असे आणि गौरी सण येण्यापूर्वी त्यांच्या घरी ह्या तारपा नृत्याचा सराव सुरू होत असे. घुंगुर लावलेली काठी, ढोलक आणि तारपा यांच्या साथीने सारा पाडा एक लयीत आणि घुंगरू बांधलेल्या पावलांच्या ठेक्यावर देह भान हरपून ते नृत्य करत असत. या वेळी सर्व बायका नवीन साडी किंवा सुडक नेसत डोक्यात शेवंती किंवा अबोलीची वेणी माळत, गळ्यात काळी पोत असलेच तर चांदीचे मंगळसूत्र ज्यात दोन वाट्या चार मणी आणि काळ्या मण्यांचे गंठन असे. पुरुष मंडळी हाफ पॅन्ट किंवा फुल पॅन्ट आणि शर्ट घालत. प्रत्येकाच्या गळ्यात रंगीत रुमाल बांधलेला असे. हातात हात घालून साखळी तयार करत. पुढच्या माणसाकडे तारपा तर मागच्या माणसाकडे घुंगूर काठी असे, पुंगीच आवाज ऐकला की नाग जसा फणा काढून डोलू लागतो, तारपा वाजू लागला की बघे मंडळी त्या तारप्याच्या मोहिनीने तिथे जमा होत. हे नृत्य म्हणजे वेगवेगळ्या भूमितीय आकृत्यांचे आविष्कार असत. कधी वर्तुळात तर कधी नागमोडी वळणे घेत आनंदाच्या बेहोशीत तासभर नृत्य चाले. या आदिवासी पाड्यात फक्त त्यांच्या घरातच गौरी बसत. दोन दिवस सणावाराचे धामधुमीत जात.





गावात गणपती विसर्जन मिरवणुकीत यांचे तारपा नृत्य सर्वात पुढे आपली कला दाखवत असे. दिवस असे जात होते पण ती आता थकली होती. तो पूर्वी दारू पित नसे पण आता दारू त्याला सोडायला तयार नव्हती. या दारूपाई त्याची गावातल्या पाटीलाची उधारी वाढली. ही उधारी भागवण्यासाठी हळू हळू गोठ्यातील बकऱ्या व्यापारी कधी घेऊन गेला त्या ही कळल्या नाहीत. पहाता पहाता भरलेला गोठा खाली झाला. ऐश्वर्य येतांना हळू हळू येत मात्र जाताना वायू वेगात जात. अशा अवस्थेतही ती संसार चालवत होती.

आपल्याला म्हातारपणी कुणी मदतीला हवे म्हणून तिने नंणंदेच्या मुलाला दत्तक घेतले. अर्थात कोणताही सरकारी सोपस्कार न करता तो राहू लागला. असणारी गुरे आणि कशीबशी राखलेली दोन तीन बकरी चारवून आणणे आणि पावसाळ्यात शेतीला मदत करणे एवढच काम असे. उरलेल्या वेळी तो मुलात जाऊन गोट्या, काजू खेळत असे तर कधी तिनपत्ती खेळत असे. या साठी तो हट्ट करून मामीकडे पैसे मागे. ओरडून धिंगाणा घाले.

तो आता तसा लहान राहिला नव्हता. एकोणीस, वीस तरी वय नक्कीच असाव म्हणून त्याला समज यावी याकरता त्यांनी त्याचे लग्न लावून दिले त्यासाठी शेतीचा तुकडा विकला. आता तरी भाचा जबाबदारीने वागेल अशी त्यांची अपेक्षा होती. कमी वयात लग्न झाली तरी हा समाज मोल मजूरी करुन स्वतःच पोट भरतो परंतू तो या गोष्टीला अपवाद होता. मामा मामीच्या छत्राखाली तो निर्धास्त जगत होता.

तिचा नवरा आता थकला होता. या पूर्वी त्याने खूप कष्टाची कामे केली होती पण आता त्याला पूर्वी प्रमाणे जड काम होत नव्हते. एक दिवस सकाळी उठताना त्याच्या लक्षात आले की त्याचा एक हात आणि पाय काम देत नव्हता. त्याला नीट बोलताही येत नव्हते. त्याने जोराने बायकोला हाक मारण्याचा प्रयत्न केला पण तो काय सांगतो ते कुणास कळत नव्हते. त्याचे ते आर्त ऐकून ती घाबरली. नवऱ्याला अंथरुणात साप तर चावला नाही ना म्हणून ती लगबगीने गेली. त्याला हात देऊन उठवायला गेली तेव्हा तिच्या ते लक्षात आले. तो पर्यंत तिचा भाचा आणि सूनही आली. “मामा, या काय झाला. हात क्या हल नी?” अस म्हणत त्यांनी त्याचा हात सावकाश धरण्याचा प्रयत्न केला पण तो निसटून लोंबू लागला तस तिने हंबरडा फोडला. पाहता पाहता सारा पाडा जमा झाला जो तो हळहळ व्यक्त करत होता. पण कोणीच मदतीसाठी काही करू शकत नव्हते.





तिने अश्रू आवरले आणि खंबीर होत त्याला भाचाच्या मदतीने उठवून खुर्चीत बसते केले. त्याला आंघोळ घालून लहान मुलांची तयारी करावी तसे कपडे घालत ती डॉक्टरकडे घेऊन गेली. बऱ्याच चाचण्या झाल्या पण व्यर्थ. तिने हार न मानता त्याला कुणी सांगेल त्या त्या डॉक्टरकडे घेऊन गेली. बरेच पैसे खर्च केले. नवस केले. गावठी उपचार केले. जंगली झाडपाल्याचा लेप करून लावला. पण कोणत्याच उपायाने त्याचा शरीराच्या हालचालीत फरक पडला नाही. तो एक हात व पायाने लुळा झाला तो कायमचा. बिचारी ती, नशीबाला दोष देत त्याच सर्व विनातक्रार करत होती. एखाद्या लहान बाळाचे करावे तसे त्याचे सर्वच न कंटाळता ती करत होती. त्याचं सारं करताना ती थकून जाई. डॉक्टरचे उपचार करता करता गोठ्यातील जनावरे विक्रीस गेली.

भाचेसून चांगली धूर्त होती. इथेच राहीली तर मामामामीचे काम करावे लागेल. शिवाय घरात येणारे उत्पन्न रोडावल्याने, काटकसरीने दिवस काढायची पाळी येईल म्हणूनच तिने नवऱ्याकडे, त्याच्या स्वतःच्या घरी जाण्याचा लकडा लावला. खरं तर त्याला या दोघांना अस अडचणीत टाकून जाणे बरे वाटेना पण बायकोने त्याला हट्टाने एतयार केल. इथेच राहिलो तर कमवून या दोघांना पोसाव लागेल त्या पेक्षा निघालेलं बरं. तिने काहीतरी कारणावरून मौन धरलं. एक वेळ मुद्दाम उपाशी राहिली आणि माहेरी निघून गेली.

भाचेसुनेच्या या वागण्या बाबत तिला खूप वाईट वाटलं,तिच्या गरजेच्या वेळी भाचे सून निघून गेली होती भाचा तरीही मामाची मदत करत होता. पण बायकोला माहेरून आणायला जातो सांगून तो गेला तो परत आलाच नाही. ती एकटी पडली. शेजारी तिला बारीक सारीक मदत करत. आता काहीतरी कमावण्यासाठी पुन्हा तिला घरा बाहेर पडावे लागले.

याच दरम्यान एक दिवस ती नसताना तिच्या नात्यातील एका मुलाने नवऱ्याशी गोड बोलून त्याचा अंगठा घेतला आणि न झालेला आर्थिक व्यवहार झाल्याचे दाखवत आठ गुंठे जागा नावावर करून घेतली. प्रारंभी तिला याचा पत्ताच नव्हता. नवरा आजारी, तो ही जाग्यावर असल्याने शेत तसेच पडून राहून त्यात गवत, रानटी झाडे वाढू लागली.

मोठ्या कष्टाने तयार केलेली जमीन नापिकी होऊ नये म्हणून तिने दुसऱ्या व्यक्तीस शेती करारावर द्यायची ठरवली. तेव्हा आठ गुंठे जागेस कुंपण घातलेले पाहून तिला संशय आला. प्रत्यक्ष कोणताच आर्थिक लाभ न देता त्या जागेची खरेदी तिच्या दूरच्या नात्यातील मुलाने केली होती. केवळ दारू पाजून तिच्या नवऱ्याचा अंगठा तिच्या गैहजेरीत घेतला होता. त्यामुळे ती सावध झाली.या विषयी तिने नवऱ्याकडे विचारणा केली पण तो तर नीट बोलूच शकत नव्हता. तो तिला काय सांगणार.

अखेर तिनेच या बाबत काहीतरी ठोस भूमिका घ्यावी असा निर्णय घेतला . तिने त्या मुलाच्या घरी जाऊन या व्यवहारा विषयी कान उघडणी केली तेव्हा आपण काकाला पैसे दिले आहेत असेच तो म्हणू लागला. शंभर रूपयांच्या स्टँप पेपरवर काही लाख रक्कम रोख दिल्याचे त्याने लिहून घेतले होते. शेवटी तिने शेवटचे अस्त्र वापरले, या बाबत आपण पोलीस स्टेशन आणि मामलेदार यांच्याकडे लेखी तक्रार करणार असे ठाम सांगितल्यावर तो वरमला थोडे थोडे पैसे द्यायला तयार झाला.





या दरम्यान अजून एक व्यवहार उघडकीस आला तिच्या दुसऱ्या नातेवाईकाने त्यांच्या नावावर शेतीसाठी ट्रॅक्टर हवा म्हणून कर्ज प्रकरण केले. या साठी मिळालेल्या पैश्यातून ट्रॅक्टर घेतला त्यास शासनाचे अनुदान होते,ते मिळेपर्यंत ट्रॅक्टर तिच्या दारी उभा होता. त्या नंतर तो ट्रॅक्टर अचानक दुसऱ्या कुणास विकला. या व्यवहारात काढलेले कर्ज तिच्या नवऱ्याच्या नावावर होते. सुरवातीचे बँक हप्ते अनुदानातून भरले,त्या नंतर खाती असणारी अनुदानाची शिल्लक तिच्या नवऱ्याचा अंगठा घेऊन कोणी कधी काढले ते कुणालाच समजले नाही. अर्थात या व्यवहारात बँकमधील कर्मचारी सामील असावा पण व्यर्थ. बिचाऱ्या तिला बँकेच्या जप्तीची नोटीस आली तेव्हा हा व्यवहार कळला. नवरा आजारी असतांना हे संकट खरे तर त्याच्या अज्ञानामुळे अचानक आले होते.

तिने शेजारच्या मुलाची मदत घेऊन,बँक गाठली. नवरा घरी अंथरुणात असल्याने तो बँकेत येऊ शकत नाही परिणामी त्यामुळे हे पैसे तो काढू शकत नाही हे बँक मॅनेजरना सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तिने पोलीस स्टेशन गाठले. सगळी घटना इन्स्पेक्टरना कथन केली, “साहेब माझा नवरा घरी बिछान्यावर गेले आठ दहा महिने आहे. तो चालू फिरू शकत नाही, तो बँकेत पैसे काढायला कसा येईल? ,त्याची परिस्थिती तुम्हीच घरी येऊन बघा. साहेब,माझी विनंती आहे, तुम्ही न्याय द्या.” तिची कथा त्यांनी ऐकली तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टरला तिची दया आली. त्यांनी तिच्या नातेवाईकांना बोलावून घेतले आणि तंबी दिली. “ओ भाऊ,शहाणे असाल तर ऐका, या बाई बाबत जो लबाडीचा व्यवहार केला आहे तो सुधारा, तिचे पैसे निमूट भरा नाहीतर तुम्हाला आणि बँकेच्या मॅनेजरला आत टाकू, काय? डोक्यात आले की नाही?” त्याने मान डोलावली,”हा साहेब मी तिचे पैसे देतो मी, थोडा वेळ द्या.”

दुसऱ्या आठवड्यात तिच्या नातेवाईकांनी कर्ज काढलेले पैसे भरले आणि तिचा कर्ज बोजा कमी झाला. मग तिने उर्वरित पैसे भरून टाकले. आता ती फार सावध वागू लागली. तिला शेत काराराने दिल्याने पैसे मिळू लागले तसा भाचा आणि सून काही निम्मित काढून पुन्हा पुन्हा येऊ लागले. तिच्याकडे पैसे मागू लागले. ती सुद्धा नाते तुटू नये म्हणून कधी मधी त्याला मदत करत होती. तिला मिळणारे स्वस्त धान्य भाचेसून नेऊ लागली. वेगवेगळी कारणे सांगून तिची भाचेसून पैसे मागू लागली.





अचानक तिच्या नवऱ्याची तब्येत बिघडली आणि एक दिवशी तिच्या मांडीवर त्यानी प्राण सोडले. तिचे नवऱ्यावर प्रेम होते. गेले दोन वर्षे लहान बाळाची काळजी घ्यावी तसे ती त्याची काळजी घेत होती. त्याला मोठ्या मोठता डॉक्टरकडे नेऊन उपाय केले होते. वर्षभर मालिश करत होती.तो गेल्याचे तिला प्रचंड दुःख झाले, या पूर्वी जगण्याला काही कारण तरी होते, चाळीस किंवा थोडे जास्त वर्ष त्यांनी संसार केला. आता तिच्या आयुष्यात पोकळी जाणवत होती.

मधल्या काही वर्षांत अति श्रमाने तिलाही संधी वात झाला पण तरीही ती जीवन ढकलत होती.तिच्या शरीरातील सांधे वाताने दुखू लागत. ती कोणा कोणाला विचारून उपाय करत होती. मार्ग काढत होती. शक्य ते डॉक्टर तिने केले पण आजारावर उतार पडत नव्हता. तिला आता खऱ्या मदतीची गरज होती, पण ती एकाकी पडली होती.

तिने या पूर्वी घडले ते विसरून भाच्याला पून्हा बोलावून घेतले, इथे येऊन राहा,तूच घर आणि शेती सांभाळ, आहे ते सर्व तुलाच देणार. सर्व सांगून पाहिले पण त्याला तिची जबाबदारी नको होती. त्याला तिचे फक्त पैसे दिसत होते. तिची भाचेसून वेळोवेळी तिच्याकडे येऊन पैश्याची मागणी करत होती. तिने आणून ठेवलेले रेशन हक्काने नेत होती. आपल्या मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य कपडेलत्ते या साठी पैसे वेळोवेळी मागून नेत होती पण तिच्याकडे राहून तिला मदत करावी, म्हातारपणी तिची सेवा करावी अशी तिची इच्छा दिसत नव्हती. तरीही तिने काही महिने वाट पाहिली. त्यांना तिची परिस्तिथी पाहून दया येईल असा तिचा समज होता पण व्यर्थ, त्यांच्या वगण्यात काही सुधारणा नव्हती.फक्त गरज पडेल तेव्हाच त्याना मामी आठवत होती.

या नात्याला काय अर्थ होता? जो केवळ स्वार्थवर आधारित होता. तिने नाईलाजाने भाच्याला बोलावून घेतले. मामी शेती आपल्या नावावर करणार असे वाटल्याने तो आला. तिने त्याला स्पष्ट सांगितले, अडीनडीला माझे शेजारीच मदत करतात मी आजारी पडले तर तेच मला डॉक्टरकडे नेतात. तुम्ही दोघे फक्त तुमच्या गरजे पुरते येता. या पुढे तुमचा माझा संबंध संपला. मी तुझी कोणी लागत नाही.जे आहे हे सर्व मी दान करून टाकणार आहे. भाचा रागावला म्हणाला “आम्ही असतांना तू दान का करणार? तू माझं लग्न लावलं आहे. माझी जबाबदारी घेतली आहे.”

ती शांत स्वरात म्हणाली, “माझा कुत्रा जेवढं प्रेम आमच्यावर करत होता, आमची राखण करत होता तेवढी काळजी सुद्धा तुम्ही कधी घेतली नाही. मामा आजारी होता तरी तू घरातून निघून गेला. तुझी बायको गरज पडेल तेव्हाच इथे येते, असलं जुलमाच नात काय कामाचं,आज पासून मी तुझी कोणी नाही आणि तुही माझा कोणी नाही. नातं तुटू नये म्हणून मी नेहमीच शांत रहात आली. शक्य तेवढं नरमाईचे धोरण घेऊनही तू आणि तुझी बायको यांच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. यापूढे माझी चौकशी करायला तुम्ही मुळीच येऊ नका माझे शेजारी मला अग्नी देतील.”

भाचा संतापला, तिला अर्वाच्य शिव्या दिल्या. तिने त्याला कोणताच प्रतिसाद दिला नाही. जगात स्वार्थापोटीच नाती निर्माण होतात, स्वार्थापोटीच संपतात. जे नातं भावनिक पातळीवर निर्माण होतं. त्यात स्वार्थ किंवा सहानभूती लपलेली नसते. प्राणी आणि माणूस यात निर्माण होणार नात अद्भुत असत प्रसंगी जीवाला जीव देणार असत. खोट्या नात्याचा मोह बाळगण्यापेक्षा पशू पक्षी,निसर्ग यांच्यावर प्रेम करावं.





मध्यंतरी यू ट्यूबवर एक क्लीप पाहिली, युरोपमध्ये एका बाईंना वाघाचे दोन बछडे मिळाले. ते अतिशय लहान होते बाईंनी त्यांना घरी नेलं त्यांच संगोपन केल जसे ते मोठे झाले, त्यांना घरी ठेवण शक्य नव्हते म्हणून त्यांनी त्या पिल्लांना प्राणी संग्रहालयात पाठवलं. काही वर्षांनी त्या त्यांना पहायला गेल्या आणि त्यांनी त्या पिंल्लांना हाक मारली दोन्ही पिल्ले येऊन त्यांच्या गळ्याला मीठी मारू लागली, त्यांना चाटू लागली.आपल्या उपकारकर्तीला ते विसरले नव्हते. जंगली जनावरे असूनही त्यांनी तिच्यावर हल्ला चढवला नाही तर ममत्व दाखवलं. असे प्रामाणिक आणि जीव लावणारे असतात प्राणी, याउलट मनुष्य कृतघ्न असतो. ज्या आईने वाढवलं तिला पैश्यासाठी घराबाहेर काढायला मागेपुढे पहात नाही. करोना काळात सख्य्या मुलीकडून घराची मालकी मिळावी म्हणून आई वडीलांच्या छळाची कहाणी रविवार लोकसत्तामध्ये वाचली तेव्हा वाईट वाटल. कुठे गेलं मुलीच प्रेम? नक्की माणसांना काय झाल?आई वडीलांच्या जीवावर उठण्याएवढी हीनता कुठून निर्माण झाली? सारेच अनुत्तरित प्रश्न.

तिच्या बाबतीत असच घडत होतं. भाच्याला मामीची संपत्ती हवी होती पण जबाबदारी नको होती. अगदी नाईलाज म्हणून तिने भाच्याशी असणार नातं संपवलं होतं. या पूढे तिच जीवन आणि मरणही तिलाच सोसायचे होते. ज्या नात्यात आपुलकी नाही, प्रेम नाही, दुसऱ्याबद्दल कणव नाही अस नातं हवंच कशाला? त्या दिवसापासून ती गावातील कुणाची आत्या,कुणाची काकी, कुणाची मामी तर कुणाची बहीण म्हणून जगत आहे. जुलमाने जोडलेल्या नात्यापेक्षा हे नात निखळ आहे. इथे ना कुणाची अपेक्षा ना कुणावर बोजा. स्वार्थी व्यवहारातील नातं संपवल्यामूळे आज तिला बरे वाटत होते.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar