पडून गेला वळीव
शेखर आणि सीमा हे घनिष्ट बालमित्र-मैत्रीण, पण तसेही शालेय जीवनातील मैत्री पुढे टिकेलच याची खात्री देणे अवघड. संसार म्हणजे काही भातुकलीचा खेळ नव्हे. गोरेगाव पांडुरंग वाडीतच ‘घरकुल’ मध्ये ती तर तो ‘अनुश्री’मध्ये रहात होता. बरेचदा शाळेत निघतांना मागे पुढे असल्याने गृहपाठ किंवा अशाच एखाद्या गोष्टीवर बोलणे होई. सन्मित्र मंडळाच्या शाळेतच एकाच वर्गात दोघे शिकले. दोघेही अभ्यासात हुशार असल्याने त्या दोघांमध्ये कायम स्पर्धा चाले. सिमाची आई शिक्षिका होती त्यामुळे तिला घरूनच मार्गदर्शन होतं. शेखरला त्याचे बाबा फक्त सुट्टीच्या दिवशी मार्गदर्शन करायचे असे असूनही शेखर चार दोन गुणांनी सीमापेक्षा नेहमी पुढे असे. नववी इयत्तेत दोघेही टोकेकर यांच्या क्लासला जाऊ लागले याचे कारण बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळाले तर पुढील शिक्षण सोप्पे होते असा शेखरच्या बाबांचा समज होता.
क्लासमध्ये दर पंधरा दिवसांनी चाचणी घेतली जाई त्यामुळे क्लासचे सर्व विद्यार्थी सतत अभ्यासात गुंतवून घेत. अगदी प्रवासात दोन मित्र येता जातांना एखादा प्रॉब्लेम, एखादी सम सोडवण्यात गुंतलेले असत पण याला शेखर अपवाद होता. तो प्रवासात एकतर हेडफोन लावून संगीत ऐकत बसे किंवा गाडीबाहेरचे दृष्य बघण्यात वेळ घालावी, संध्याकाळी मित्रांसोबत मस्त क्रिकेट खेळून घरी आला की काहीतरी चमचमीत खाऊन अभ्यासाला बसे. त्याच्या पालकांना कधीच अभ्यास करण्यासाठी त्याच्या मागे लागावे लागले नाही. आजवरचा परफॉर्मन्स पाहता तो बोर्ड परीक्षेत शाळेत पहिला येणार याची खात्री शाळेतील शिक्षकांना होती मात्र सीमा शाळेतूनच नव्हे तर बोर्डात पहिली आली. तर तो दुसरा दोघांच्या गुणात अवघ्या दोन गुणांचा फरक होता. त्यालाही आश्चर्य वाटले सीमाला geometry मध्ये त्यांनी अनेकदा मदत केली होती. नेमके त्याच विषयात त्याला कमी गुण होते.शाळेत त्यांचे कौतुक करणारा बोर्ड झळकला. वर्तमानपत्रात बातमी छापून आली.
सगळ्यांना आश्चर्य वाटले. ‘सिमाची आई बोर्डाच्या मॉडरेटर होत्या मग काय!’ अशी कोणीतरी पुडी सोडली. पण शेखरच्या बाबांना बोर्ड निकाल कसा लागतो, याची जाणीव होती. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. शेखरही बोर्डाच्या यादीत झळकला. कुटुंबातून आणि मित्रांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला. शाळेत असतांना, विशेषतः नववी दहावी इयत्तेत दोघे ऐकमेकांना अभ्यासात मदत करत मात्र तोपर्यंत मैत्री पलीकडे दोघांच्या मनात कोणतेच विचार नव्हते. थट्टामस्करी चाले पण त्यात मैत्रीचीच भावना होती.
सीमाला कॉमर्स करायचे होते. डहाणूकरला तिला ऑनलाईन मधून ऍडमिशन मिळाले, तर शेखर रुपारेल कॉलेजमध्ये सायन्स घेऊन जाऊ लागला. कॉलेजला जायला लागल्या पासून सीमा कॅज्युअल ड्रेस घालू लागली. सीमा मुळातच सुंदर होतीच पण गेल्या दोन वर्षात ती अंगाने चांगलीच भरली होती त्यामुळे ती फार सुंदर दिसू लागली होती. शेखरही तारूण्यात पदार्पण करत होता, एप्रिल आणि मे महिन्यात त्यांनी जिम जॉईन केली होती त्यामुळे तो भारदस्त दिसत होता. तारुण्य सुलभ भावनेने शेखर सीमाकडे ओढला गेला नसता तरच नवल.
हल्ली येता जातांना मुद्दाम थांबून हाय हॅलो करताना तिच्याकडे पाहतांना हसत असे, त्याच्या नजरेतील फरक तिला जाणवू लागला तेव्हा ती सावध झाली. शाळेत असतांना तो असे कधीही वागला नव्हता. अनेकदा ती त्याची नजर चुकवू जाऊ लागली. त्यांची चांगली मैत्री होती पण या दृष्टीने तीने त्याचा विचारही केला नव्हता. ती त्याला आपला चांगला मित्र मानत होती, त्यापेक्षा वेगळा विचार तीच्या मनात नव्हता.
सीए व्हायचे तिचे स्वप्न होते त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत उत्तम गुण मिळवत टेम्पो राखायचा तिचा प्रयत्न होता. शेखरने सिईटी साठी क्लास लावला होता, कॉलेजच्या वेगळ्या वेळा आणि क्लास यामुळे ते ऐकमेकांना क्वचितच भेटत. चर्चा होई ती अभ्यास आणि कॉलेजमध्ये चाललेल्या ऍक्टिव्हिटीची. शेखर आपला अभ्यास सांभाळून टेबल टेनिस, क्रिकेट अशा खेळात भाग घेई. तिथेही त्याचे फ्रेण्डस् होतेच त्यात भरपूर गर्लफ्रेंड ही होत्या.
सीमा दर रविवारी त्याला एकदा तरी भेटत असे आणि प्रत्येक वेळेस तो तिच्याकडे त्याच उत्सुकतेने पाहत असे. कसे रिऍक्ट व्हावे तिला कळत नव्हते. तिच्या कॉलेजमध्ये मुली आपल्या मित्रांसोबत कॉलेज कॅन्टीनमध्ये बसून फालतू विषयांवर गप्पा मारताना तिने अनेकदा पाहिले होते पण तिला त्यात कसलाही चार्म वाटला नव्हता. तिने त्यांच्या सोबत जाणे टाळले. सीमाच्या मनात मात्र आता वेगळी हुरहुर वाटू लागली. तिच्यातील हा बदल पाहून शेखर भांबावून गेला. अजूनही ना त्याने आपले मन सीमाकडे उघड केले ना तिने त्याला काही सांगितले.
कॉलेज वातावरणाचा हळूहळू सीमा रमली. जास्त आकर्षक आणि वेगळ्या पॅटर्न चे कपडे घालू लागली, लिपस्टिक लावू लागली. आय ब्रो कोरून घेतले हाय हिल सँडल घालू लागली. जास्त क्यूट आणि बोल्ड वाटू लागली. लवकरच सीमाच्या अनेक मित्रमैत्रीणी झाल्या. कर्नावट क्लास ला ती कोचींगसाठी जात होती तिथे शेखरचेही काही मित्र होते. सीमाची क्लासमधील मित्रांसोबत चांगली मैत्री झाली होती. ते कधीतरी कॉलेज बंक करून एकत्र पिकनिक किंवा मॉलमध्ये जातात ही माहिती त्याला मित्राकडून मिळाली.
ही माहीती मिळाल्यापासून शेखर अस्वस्थ होता. आपल्या मनातील गोष्ट तिला सांगावी असे मनात सतत विचार येऊ लागले, अभ्यासात मन रमेना, अखेर, मनाचा हिय्या करून संडेला त्याने तिला गाठले, आणि तो म्हणाला, “सीमा मला तुला काही सांगायचे आहे, आज तू संध्याकाळी आरेत भेटशील का?” “अरे शेखर! एवढ्या दूर कशाला भेटायचे? मी हवी तर आपल्या नेहमीच्या बागेत येते, तिथे आपण भेटलं तर नाही का चालणार?” “नाही चालणार,मला तुला काही खास सांगायचं आहे , आपल्या या बागेत आपल्या ओळखीचे लोक असतात. प्लीज माझ्यासाठी तुला वेळ काढावाच लागेल.” सीमा त्याच्याकडे पहात म्हणाली, “एवढ सिक्रेट आहे का? मग तर मला आलंच पाहिजे, ठिक आहे मी पाच वाजता तिथे पोचते तू तिथेच मला भेट.” शेखर अस्वस्थ होता, आपले बोलणे ती कशी घेईल? याची त्याला चिंता तर होतीच पण ती काही म्हणाली तरी ओव्हर एक्साईट व्हायचे नाही त्याने मनाशी ठरवून टाकले. तिला नुसतेच भेटावे की तिच्यासाठी काही गिफ्ट घ्यावी हे ही त्याला कळत नव्हते.अभ्यासात लक्ष लागत नव्हते. मुलांची अस्वस्थता, त्यांच्या वागण्यातील फरक पालकांना लगेचच कळतो, आईने विचारले, “शेखर, आज अभ्यासाचा मुड नाही की अभ्यासच नाही.” “नाही,तस काही नाही ,म्हणजे थोडा ब्रेक घेतलाय इतकचं.” “अरे ब्रेक कसला घेतोस? गेल्या पंधरा दिवसात कोणतीही परीक्षा झालेली नाही, किंवा एखादी मोठी गोष्ट घडली नसतांना, तुला अस आताच रिलॅक्स व्हावं अस वाटणं..”
तो हसला, खरं तर मनातून आईवर चिडला होता, तरीही मनावर ताबा ठेवत म्हणाला, तू उगाचच टेंशन का घेतेस? आता अभ्यास नाही केला पण नेहमी तर करतच असतो ना? कधीतरी मुड खराब होतो. मग नुसते वाचून किंवा लिहून उपयोग होत ही नाही. तू उगाचच सारखं सारख बोलू नको,अभ्यास माझा आहे, मी ठरवेन कधी करायचा तो.” तो त्याच्या खोलीत निघून गेला. वडिलांनी आई आणि मुलगा यांच्यातील चर्चा ऐकली होती. एकाच वेळी दोघांनी त्याच विषयावर बोलण योग्य नाही याची समज त्यांना होती.पण आपल्या मुलाच्या मनात काहीतरी शिजतय हे ते समजले. फक्त शेखरला उगाचच तेच प्रश्न विचारून इरीटेट करावे त्यांना वाटेना.
संध्याकाळी तो टापटीप होत चहा न घेताच घराबाहेर पडला, आईने ‘कुठे जातोस ते सांग आणि लवकर ये’ सांगत, त्याच जाणं गृहीत धरले. एप्रिल महिना होता, कडक ऊन होते. अजूनही कॉलेजचा निकाल लागला नव्हता तरीही पुढील वर्षाचे क्लास मात्र सुरू होते. तो बागेच्या प्रवेशद्वाराजवळ पोचला. ती तिथेच एका बाकावर बसून रस्त्याकडेच पहात बसली होती तीने पिंक स्कर्ट घातला होता त्यावर ग्रीन टॉप होता, कानात मोठे एरिंग घातले होते. ती फारच क्युट दिसत होती, पण तिच्या जोडीला एक मुलगी होती. ती तिची मेत्रीण की कुणी अशीच आलेली त्याला माहिती नव्हते. काही प्रतिक्रिया देणे योग्य नव्हते. तो दुरूनच तिच्याशी हसला तशी ती हसली. तो जवळ जाताच तिने दुसऱ्या मुलीची ओळख करून दिली. शेखर माझी मैत्रीण स्नेहा पाटकर माझ्या बरोबर डहाणूकरला आहे, आणि स्नेहा हा शेखर देसाई माझा क्लास मेट.
स्नेहाशी हाय! म्हणत त्याने हात मिळवला.स्नेहा समजुतदारपणे थोड्या दूरच्या बाकावर जाऊन बसली. तसा तो तिच्याकडे पहात थोडं रागात म्हणाला, “मैत्रीणीला बरोबर आणायची गरज होती का? माझ्यावर तुझा विश्वास नाही का?” “अरे एवढ्या दूर एकटीने यायला कंटाळा आला होता म्हणून मी तिला म्हटले, आता ती स्वतः दूर जाऊन बसली ना? तुला काय सांगायचे ते सांग उगाचच रागावत बसू नको, बाय द वे तुझा अभ्यास कसा चाललाय?” हे बघ सीमा तुला मी अभ्यासावर चर्चा करण्यासाठी एवढ्या दूर बोलावलेल नाही. खरं सांगायचे तर तू आज खूप सुंदर दिसतेस, तू मला खूप आवडतेस I love you so much Seema. I desperately remind you. हे सांगण्यासाठी मी तुला एकटीला बोलावल होतं. तर तू क्लासमेटला घेऊन आलीस. बरं ते जाऊ दे, तुझ माझ्या विषयी काय मत आहे, म्हणजे मी तुला आवडतो ना? दुसऱ्या कुणाशी मैत्री केली नाहीस ना? “
क्षणभर ती मूक झाली, कदाचित यासाठीच त्याने बोलावले असावे अस तिला वाटतही असावे पण कस रिअँक्ट व्हावे, तिला कळत नव्हते. एकदम तोडून टाकणेही योग्य नव्हते. तिने मान खाली घालून सुरवात केली. “शेखर आपण लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहोत. आजही आपली मैत्री आहेच पण आपण दोघेही खूप लहान आहोत, सध्या अभ्यासावर माझा फोकस आहे. तुझाही असावा. त्यात तुला इंजिनिअरिंग एंट्रन्स द्यायची आहे. यश मिळवायचे आहे. तू चांगला मुलगा आहेस आताच मी तुला काही सांगावे हे तसे योग्य नाही पण तू मोकळ्या मनाने मला विचारलेस हे मी नक्की लक्षात ठेवेन.”
” हे! म्हणजे, मी काय समजू तुझ माझ्यावर प्रेम नाही अस तुला सांगायचे आहे का? तुझं दुसऱ्या कुणाशी..” “शेखर, प्लीज, प्लीज स्टॉप युअर नॉनसेन्स, मी कॉलेजमध्ये अभ्यास करायला जाते फ्लटर करायला नाही. तू माझ्यावर उगाच काही आरोप केले तर मी खपवून घेणार नाही. माझा बालपणीचा मित्र आहेस म्हणून- नाहीतर – – – ” “नाहीतर, नाहीतर काय केले असतेस? मारणार होतीस ! की help help म्हणून ओरडणार होतीस.” त्याचा आवाज वाढला होता, तिथून जाणारे त्यांच्याकडे पाहत होते, तिची मैत्रीण घाबरली होती. कदाचित ती सीमा सोबत आल्याचा तिला पश्चाताप होत असावा.
सीमाने त्याच्या हातावर हात ठेवत समजावाले, “शेखर, आपण पब्लिक प्लेसमध्ये बसलो आहोत, We must behave. मला काय म्हणायचे आहे ते तुला चांगले ठाऊक आहे. मी आजवर तुला चांगला मित्र समजत होते पण जर तू असाच वागणार असशील तर I am very sorry, it’s better to stop talking.” ती उठली तिने मैत्रीणीला खूण केली तशी मैत्रीण तिच्या जवळ आली.” Sneha, I am very sorry. Let’s go.”
तो तिला समजावत म्हणाला,” सीमा, प्लीज माझं ऐकून तर घे, मी काय सांगतो एकदा ऐक तरी.” “तुला जे काही सांगायचे असेल ते तू फोनवरून सांग, उशीर झाला आहे, मी आता थांबू शकत नाही.” पुढचे काही न ऐकता ती झपझप वाटेला लागली. बरेच अंतर गेल्यानंतर तिने वळून पाहिले, तो मागे येत नाही हे पाहिल्यावर ती स्नेहाला म्हणाली, “खरं सांगू, तो खरचं खूप चांगला मुलगा आहे पण अचानक तो असं वागेल अस मला कधीच वाटले नव्हते. त्याला नक्की झालंय काय ? तेच कळायला मार्ग नाही. मला त्याची चिंता वाटते, अशाने तो अभ्यास करणार नाही आणि त्याचे आयुष्य फुकट जाईल. “
स्नेहा गंभीर होत म्हणाली, ” तू इतकी सुंदर दिसतेस, राहतेस की तुझ्या प्रेमात कोणीही पडावे, तो तर तुझा बेस्ट फ्रेंड आहे . मला ही तो चांगला मुलगा वाटला ,पण तो तुला काय सांगत होता, त्याला तुझ्याकडून काय हवं आहे? “वेडा आहे अगदी , तो मला आताच प्रपोज करत होता, त्याचे माझ्यावर प्रेम आहे म्हणत होता. अग आता कुठे आम्ही बारावीत आहोत, त्याला आयटी करायच आहे, मलाही सिए करायच आहे. उगाच नको तिकडे वाहवत जाऊन चालेल का?” “अग! पण मग तू त्याला नीट समजावले का नाहीस? त्याला सांगायचे होते ना आधी तुझे एज्युकेशन पूर्ण कर मग आपण विचार करू.”
हेच तर मी म्हणाले, “म्हणजे आधी मला शिक्षण पूर्ण करू दे, मी आताच या बद्दल काही सांगू शकणार नाही म्हणाले. तर रागावला, म्हणाला, ‘You don’t love me?’ तूच सांग आता कुठे कॉलेजची पायरी चढतो आहोत ,या बावळट मुलाला झालय काय? आताच नको तिकडे वाहवत जात असेल तर जाऊ दे, उगाचच गैरसमज करून घेण्यापेक्षा त्याचा रस्ता त्याला मोकळा. नाहीतर प्रेमाच्या गंगेत वाहून जायचा, मला माझे करिअर खराब करून नाही घ्यायचे. बोर्डात आलेली मुलगी प्रेमात वाहून गेली ऐकायला मला मुळीच आवडणार नाही.”
खरं आहे तुझं म्हणणं, पण तुम्ही बालपणीचे सोबती होतात, आता तो चुकीच्या रस्त्याने जात असेल तर तुच अडवायला हवं, बिचाऱ्याच आयुष्य फुकट जाईल. तू त्याच्या पालकांना कल्पना देऊ शकतेस. तो वेळीच सावरला तर तुला पुण्य लाभेल.” स्नेहा बोलली.
“पाहू, तशी संधी मिळाली तर मी त्याच्या आईला सांगू शकेन पण त्यांनी गैरसमज करून घ्यायला नको, नाहीतर माझ्यावरच आरोप करायचे.” ती घरी पोचली तेव्हा साडेसात वाजले होते, घरी पोचायला उशीर झाला म्हणून आई रागावली, सीमा किती उशिर केलास? कुठे गेली होतीस?”
अगं ‘आरेत मैत्रीणीसोबत जाऊन आले. बरेच दिवसांनी भेटलो,बोलता बोलता झाला उशीर. तुझ काही काम असेल तर मला सांग.” “माझं कसलं काम असणार ? मगाशी शेखरच्या वडीलांचा फोन आला होता. तुझी त्याची भेट झाली का? “
सीमाच्या पूढे प्रश्न उभा राहिला,खोटं सांगितले तरी पंचायत, खरं सांगू शकत नव्हती. शेखर दिसला पण तो सस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होता आमचं काही बोलण झाल नाही. पण त्याच्या वडिलांचे माझ्याकडे काही काम होते का?” “नाही, ते तस काही म्हणाले नाहीत.पण तू ही घरी नाहीस त्यामुळे शेखर तुझ्या बरोबर असावा असं बहुधा त्यांना वाटले.” सीमाच्या मनात विचार आला की आईला सगळं सांगून टाकावे, पण अगोदर आपण आईशी खोटं बोललो आता पुन्हा काही वेगळे सांगितले तर,आपण आईच्या मनातून उतरून जाऊ. म्हणुन ती म्हणाली, “आई, शेखर माझ्याकडे कशाला येईल? त्याचे कॉलेज वेगळे कलिग वेगळे, तो इथेच कधीतरी भेटतो. हाय हॅलो करतो. मुळात त्याला वेळ असतोच कुठे खूप बिझी झालाय तो.” “हे बघ ,देसाई काका काळजीत होते, तो घरी आला का? फोन करून विचार त्याला.” “अग! काकांचा फोन त्यांनी उचलला नव्हता म्हणजे त्याचा फोन डेड झाला असेल, आणि तो काही कुकुल बाळ आहे का? येईल तो घरी.”
ती तिच्या स्टडी रूममध्ये गेली, पण तिच्या मनात मात्र वेगळेच विचार येऊ लागले, “तो घरी का परतला नाही? त्याने आपला नकार ऐकून जीवाचे बरेवाईट केले तर नसेल ना? जर चौकशी झाली, तर आपण त्याच्या सोबत बसलो होतो हे एखाद्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाले नसेल ना? पोलीस आपली चौकशी तर करणार नाहीत ना?’ ते विचार येताच तिचा घसा कोरडा पडला. तिने किचनमध्ये जाऊन घटाघट पाणी प्यायले. नेहमी भावाच्या खोड्या काढणारी, अभ्यास करता करता किचनमध्ये डोकावणारी, डबे उघडून काहीतरी तोंडात टाकून वाटेला लागणारी सीमा आज शांत शांत वाटत होती.
रात्री तीचे जेवणात लक्ष नव्हते, ती गोष्ट तिच्या आईच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. सीमा नेहमीपेक्षा लवकर जेऊन निघून जाऊ लागली तसे तिचे बाबा वसंतराव आपल्या पत्नीला म्हणाले, ” सुधा, सीमाचे कोणाशी काही झालंय का?” तरीही ती काही बोलली नाही. “काही कळायला मार्ग नाही, समीर थोड्या वेळाने तू तिच्या बेडरूममध्ये जाऊन विचार तिला.” वसंतराव आपल्या मुलाकडे पहात म्हणाले.
ती मनातून इतकी घाबरली होती की कुणाशी काही बोलावे, काही सांगावे असे तिला वाटत नव्हते. ती उगाचच इकॉनॉमिक्स घेऊन बसली होती पण तिचे वाचनातही लक्ष नव्हते.ती संध्याकाळी घडलेल्या प्रकारचा विचार करत होती, खरे तर तो तिच्या भोळ्या मनावर आघात होता. शेखरच्या घरून फोन आला नाही त्या अर्थी तो घरी पोचला असावा असा अर्थ तिने काढला. समीर तिच्या खोलीत आला तेव्हा ती छातीवर पुस्तक उघडे ठेऊनच झोपली होती.
सकाळी ती बरीच उशिरा उठली. आई नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागली होती. बाबा त्यांचं स्नान आटोपून पूजापाठ करत होते. तिने स्वतः चे आवरले, किचनमध्ये जाताच आईने तिला चहा दिला. “सीमा, बाळा आता तरी काय झालं सांगशील का?हे बघ तुझी घुसमट पाहवत नाही, तुला कोणी रागावणार नाही, तू चुकीचे वागणार नाहीस याची आम्हाला खात्री आहे. जे काही घडले असेल ते सांग, तुझे बाबा रात्री झोपू शकले नाहीत.” शेखरला त्रास व्हावा, त्याची कोणी खरडपट्टी काढावी असे आताही तिला वाटेना, तिने निर्धार करत सांगितले, ” काही घडले नाही, थोडा अभ्यासाचा ताण जाणवला म्हणून लो फिलिंग वाटले असावे. तुम्ही उगाचच काळजी करू नका.”
ती आपल्या बेडरूममध्ये गेली, तिथेच अभ्यास करत बसली. त्यानंतर नेहमी प्रमाणे ती तिच आटोपून क्लासला गेली.वडील कामावर निघून गेले होते. समीर मुलांसोबत खेळायला सोसायटीत ग्राऊंडवर निघून गेला. तिने जाताजाता अनुश्री सोसायटीच्या दिशेने पाहिले, सोसायटीच्या गेटवर मुलांच्या घोळक्यात शेखर गप्पा मारत असतांना तिला दिसला. तिला हाय से वाटले. म्हणजे त्याने चुकीचा काही विचार केला नाही एवढेच तिच्यासाठी पुरेसे होते.
ती निश्चिंत मनाने क्लासला गेली. त्या दिवसानंतर ती शेखर बाबत सारं विसरून गेली. ती नेहमीप्रमाणे हसून खेळून वागतांना पाहून आईने निश्वास सोडला. पण काहीतरी नक्कीच घडून गेलं असावे याची खुणगाठ आईने मनाशी बांधली. त्या दिवसानंतर शेखरचे आणि तिचे बोलणे बंद झाले. ती अगदी समोर दिसली तर कधीतरी हॅलो म्हणत असे तर कधीतरी आपण तिला पाहिलीच नाही असा ड्रामा करत तो निघून जायचा. तो अस का वागतो? तिने कधी विचारलं नाही. मनातून ती दुखावली गेली. एकेकाळचा आपला मित्र आपल्यापासून दुरावला याचे वाईट वाटणे स्वाभाविक होतेच. कधीतरी आई शेखर बाबत तिच्याकडे चौकशी करत असे, पण ती हल्ली तो खूप बिझी झालाय, त्याची माझी भेट होत नाही म्हणत सीमा त्याच्याविषयी बोलायच टाळत होती.
पहाता पहाता पाच वर्षे निघून गेली. ती ग्रँज्यूऐट झाली, सिए च्या टर्म तिने क्लिअर केल्या. अधूनमधून शेखरच्या बिल्डिंग मधल्या मैत्रीणीकडून शेखरची प्रगती तिला कळत होती. तो विवेकानंद कॉलेजमध्ये B.E. IT करत होता. टेबल टेनिस मध्ये त्याने इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये बक्षीस मिळवले होते. त्याचा निकाल लागला की तो M.Tec साठी प्रवेश घेणार होता. गेल्या चार वर्षात एकदाही दोघे समोरासमोर भेटली नव्हती जणू त्याने तिचे नाव आपल्या मनातून पुसून टाकले असावे. मात्र तिच्या मनात त्याच्या विषयी कडवटपणा नव्हता.
एक दिवशी शेखरच्या वडीलांची, देसाई काकांची आणि तिची वाटेतच भेट झाली, त्यांनी तिची चौकशी केली ती सिए करत असल्याचे ऐकून त्यांनी आनंद व्यक्त केला. शेखर एम टेक करण्यासाठी पुण्यात असल्याचे तिला समजले. नेमके त्याच दिवशी संध्याकाळी ते पुन्हा आई आणि ती बाजारात जात असताना भेटले. तिच्या आईने शेखरची आस्थेने चौकशी केली आणि तो आम्हाला पूर्ण विसरल्याची तक्रारही केली. ते हसत हसत म्हणाले, “मुले मोठी झाली की त्यांचे स्वभाव बदलतात, सीमाची भेटही आजच बऱ्याच वर्षांनी अचानक झाली. ती सिए पार्ट दोन करतेय ऐकून आनंद झाला. हिच्या वडलांना मी विचारले म्हणून सांगा.” दोघानी निरोप घेतला.
त्या दिवशी सीमाच्या मनातील दडलेला विचार पुन्हा उफाळून आला, काय चूक होती माझी? त्या वेळी मी त्याला Yes, I love you, म्हणायला हवं होत का? कस शक्य होतं, एवढ्या लहान वयात कुणी असा डिसीजन घेत का? मुर्ख, मनात अढी धरून बसलाय. धरू दे त्याला विनंती करायला मी काही जाणार नाही. My foot, जगात तो काही एकटाच चांगला नाही. विचाराच्या तंद्रीत असतांना आई अचानक तिच्या रूममध्ये आली. “काय गं, कोणाशी आणि काय बोलत होती का?” ती चपापली, “कुठे काय? काहीच तर नाही.” आई हसली तिला वाढत्या वयात मुलं कशी वागतात ते चांगले माहिती होते.
एखाद्या मुलाशी मैत्री झाली असावी आणि भांडणही. कधीतरी आपणच सांगेल, आताच का विचारा? ती मनातच म्हणाली. “बरं सीमा, तुझ्या आतेभावाचं लग्न चार पाच दिवसांवर आले आहे, तू ड्रेस घालणार की साडी, आताच ठरवं, म्हणजे कपडे इस्त्रीला टाकता येईल आणि यावेळेस तुला यायचच आहे तेव्हा काही कारण काढू नकोस. पंचवीस वर्षांची झालीस आता तुझ्या लग्नाचे पहावे लागेल.” “अगं, तू काय बोलतेस कळतयं का तुला, अजून माझा फायनल रिझल्ट आलेला नाही, जॉब चा पत्ता नाही आणि तू मला लग्नाच्या बोहल्यावर बसलेली पाहायला उत्सुक आहेस? तू शिक्षक असून अशी कशी वागू शकते?” “जॉबची तुला ऑफर आली आहे, म्हणजे मिळल्यात जमा, त्याचे काय टेन्शन घेतेस? कोणतीही कंपनी तुला सहजच घेईल.” “आई तू खोट्या भ्रमात आहेस, सध्या कॉम्पिटीशन किती वाढली आहे माहिती तरी आहे का? आता पासूनच लग्नाचा धोशा लावू नकोस, मी दोनचार वर्षे मस्त एकटी फिरणार आहे, जीवनाचा आनंद घेणार आहे. लग्न करून आता पासून मला घुसमट सहन करायची नाही. तुझ्या सारखं एकलकोंड मला जगायचं नाही, कळलं का?” सीमा ने विषयाला पूर्ण विराम दिल्याचे त्यांच्या लक्षात येताच, त्या “कधी या मुलीला शहाणपण येणार?” असे बडबडत स्वयंपाक खोलीत निघून गेल्या.
काळ सरकत होता. सीमाला Hong kong बँकेत लागून तीन वर्षे झाली तरी ती लग्नाचे काही बोलत नव्हती. या तीन वर्षात तीने एकटीने राजस्थान, उत्तराखंड, काश्मीर, केरळ, पुद्दूचेरी, अंदमान अशा आंतरराज्यीय सोलो ट्रीप पूर्ण केल्या होत्या. प्रत्येक वेळेस आई तिच्या एकटीने प्रवास करण्यावरून प्रचंड चिडचिड करत असे तर बाबा मात्र तिला शिंगे फूटल्यात काय करायचे ते करू दे, नंतर बापाच्या नावाने शंख करायला नको असे म्हणत विषय अर्ध्यावर सोडून द्यायचे. अगदी याच गोष्टींचा ती फायदा घ्यायची. दर वेळेस प्रवासाला निघतांना खूप कपड्यांची खरेदी करायची आणि परततांना तेथील वस्तूंची खूप खरेदी करून यायची. मैत्रीणींना नातेवाईकांना आणि अगदी घरकामासाठी येणाऱ्या बाईंना वाटून टाकायची. त्यावरून आई जवळून वारेमाप पैसे खर्च करते म्हणून ओरडून घ्यायची. म्हटले तर दिवस आनंदात जात होते पण सीमाच्या वाढत्या वयोबरोबर दिवसेंदिवस घरातील वातावरण गंभीर बनत होते. बाबा मात्र लेकीला काही बोलत नव्हते. त्यांना माहिती होते की उगाचच बोलून घरातील वातावरण बिघडवण्यापेक्षा शांत राहिलेले बरे.
दिवस पुढे सरकत होते शेखरसुध्दा सिईटी देऊन रँकमध्ये आला, त्याला सोमय्याला प्रवेश मिळाला. गोरेगाव ते विद्याविहार प्रवास करावा लागणार म्हणून तो नाखूष होता, मुख्य म्हणजे त्याच्या वर्गातील एकही फ्रेंड त्याच्या बरोबर नव्हते. शेखर बाबांकडे मोटरसायकलची मागणी करत होता. बाबा म्हणाले, “गोरेगाव ते विद्याविहार मोटरसायकल प्रवास तो ही पिक अवर्सला मुळीच नाही. तू फर्स्ट क्लास पास काढ आणि जा.” तिथे सिट नाही मिळाली तरी comfortable उभ राहता येईल. पुढल्या वर्षी बाईक शिकून घे, मग आपण बाईक कधी घ्यायची ते पाहू.” समिरचा हिरमोड झाला, काही मुले नवी मुंबई तर काही ठाण्यातून बाईक ने येत होती, पण बाबांनी एकदा नाही म्हटलं म्हणजे पुन्हा विचारायचा प्रश्न नव्हता.
पहाता पहात चार वर्षे निघून गेली, कॉलेज लाईफ इतके हेक्टिक होते की फारसा मोकळा वेळच नसे, त्यात क्लासचे लेक्चर बंक केले की घरी फोन ठरलेला, त्यामुळे कॉलेज लाईफ एन्जॉय करणं शक्य झालेच नाही. कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्ह्यूत चांगली कंपनी आणि पॅकेज मिळाले, खरे तर MS करायचे मनात होते पण पण समीधाच कॉलेज सुरू होते. Educational loan काढून जाता आले असते पण डेरिंग नाही झाली. या चार वर्षात सीमा अनेकदा दिसली पण तिने भाव दिला नाही, जणू ती मला ओळखत नसावी, खरं तर खूप राग आला होता. CA करते तर जणू आभाळालाच हात टेकले, तू नही तो कूच गम नही, अपने नशीब मे कोई होगी और सही.
एक दिवस त्यानी उडत उडत बातमी ऐकली की तिला C.A. ला All India level ला third rank मिळाली, job offer sixty lakhs per annum. तिचा हेवा वाटला, त्यानी पंचवीस लाखाला भोज्जा केला नव्हता. ती काही आता आपल्याला धूप घालणार नाही अस सहजच त्याला वाटून गेले . या वर्षभरात अभ्यास करून गेट देऊन इथून निघून जावं, कुठेतरी दूर जिथे तिची आठवण येणार नाही. तो स्वतः शीच बोलला. त्या दिवशीपासून तो कमालीचा बदलला. ईर्षा उत्पन्न झाली की ती कोणत्याही थराला जावू शकते.
एके दिवशी संध्याकाळी फोर्ट वरून सिमा चर्चगेट स्टेशनशनला चालत येत होती. चर्चगेट स्टेशनजवळ एका एका बुट स्टाँलवर तो तिला दिसला, बहुधा पुस्तक खरेदी चालली होती. चांगलाच रोडावला होता. दाढी वाढवली होती. खर तर तो हँडसम होताच पण दाढी त्याला शोभत होती. हाक मारावी की नाही या संभ्रमात असतांना ती त्याच्याकडे पोचली. हाय शेखर ! त्याने झटकन वळून तिच्याकडे पाहिले. त्याचा विश्वास बसत नव्हता की ती त्याच्या समोर उभी राहून हाक मारत होती. त्याने तिला शेकहँड केले. Seema hearty congratulations, for your grand success. ती चमकली ,अजूनही शेखरने तिचा हात सोडला नव्हता. “ Thank sameer. “ तो हसला. आज त्याला खूप खूप बरं वाटत होते. जवळजवळ चार पाच वर्षांनंतर सिमाने स्वतः त्याला हाक मारली होती. त्याच्या समोर असलेली पुस्तके पहात ती म्हणाली, “तू पुस्तक घेऊन काय करतोस, आता पुन्हा परीक्षा देण्याचा विचार आहे का?”
काय उत्तर द्यावे त्याला कळत नव्हते पण पुस्तक पाहून ती समजली, “गेट देतोस का? एवढ्या उशिरा!” त्याने सिलेक्ट केलेल्या पुस्तकांचे पैसे पे केले.तिच्या सोबत चालता चालता तो म्हणाला, “सिमा खरं तर तू इथे अशी अचानक भेटशील असे कधीही वाटले नव्हते. सिमा मी तुला कधीही विसरू शकलो नव्हतो पण तुझ जग वेगळ होतं, त्यात मी कुठेही नव्हतो. आता तर तू माझ्या पासून इतक्या दूर निघून गेली आहेस तिथे पोचणे मला शक्यच होणार नाही. म्हणूनच तुला विसरून जाण्यासाठी तुझ्यापासून दूर निघून जाण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.”
तिने रागाने त्याला चिमटा काढला, “इडियट, मला सोडून तू दूर जाणार होतास, शेखर मला तू समजू शकलाच नाहीस, तू नको त्या वयात प्रेमात पडून तुझ्या ध्येयापासून दूर जाणार होतास. माझा त्यालाच विरोध होता. अरे वेड्या इतके वर्षे आपण एकत्र असूनही तू मला ओळखू शकला नाहीस. जर तेव्हा मी तुला प्रतिसाद दिला असता तर कदाचित तू तुझे ध्येय गाठण्यात अपयशी ठरला असतास म्हणून मी तुझ्या पासून दूर, दूर रहात होते.” सिमाचे बोलणे ऐकताच त्याचे डोळे पाणावले, “ Seema you are too nice, I am really fool I can’t understand your sentiments.”
तो बोलता बोलत वाटेतच थबकला त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले, नकळत आकाश भरून आले आणि वळीव बरसला. गैरसमजाचे ढग विरून गेले. जवळजवळ चार पाच वर्षानी ते ऐकमेकांना कधीही नव्हे इतक्या आनंदाने डोळे भरून पहात होते. वळीव अचानक कमी झाला आणि सूर्यकिरण चमकू लागले. शेखर आनंदात न्हाऊन गेला. सिमा लटक्या रागाने त्याला म्हणाली, “मग आताही तुझा MS साठी बाहेर जाण्याचा निश्चय पक्का आहे ना?” त्याने तिचा दंड घट्ट धरत तिला स्वतःकडे ओढले Oh seema, you naughty girl. I love you so much. तिला अचानक बारावीत असताना त्याने भेटण्यासाठी बागेत बोलावल्याचा प्रसंग आठवला. किती अँग्रेसिव्ह झाला होता आणि आज किती मॅच्युअर वाटतोय.