प्रकोप

प्रकोप

अवघा विदर्भ, खानदेश, मराठवाडा टाकतोय भितीने धापा
तुझा निरोप घेता घेता हे विपरीत काय केलस रे बाप्पा?

आम्ही तुझ्याकडे सौख्य शांती मागितली अन तू दिलं गुलाब
नाव सुंदर पण लक्षण खोट हा कसा तुझा उफराटा हिसाब?

बिड, उस्मानाबाद, यवतमाळ सगळ्यांचीच उडवलीस दैना
नको तितका गुलाब बरसला, सोसावी कशी आम्ही वेदना?

तुझी आम्ही यथासांग पूजा केली, केली मनापासून सेवा
सारेच की रे पडले उघड्यावर आत कोणाचा करावा धावा?

हाता तोंडाचा घास नेलास, गेले किडूक मिडूक वाहून
काय भोगायचं शिल्लक ठेवलस, उगा विघ्नहर्ता होऊन?

तूच सांग, उघडा संसार आम्ही आता सावरायचा कसा?
चिल्ली पिल्लं गोठलेत भितीने, पूराचा मनी त्यांच्या धसका

कधी अवर्षण कधी बुडीत, नेहमीच का आमच्या नशिबी?
धरणातलं पाणी सुसाट सुटत, करीत भविष्य आमचं जायबंदी

विकासाची गोड फळ चाखता चाखता, हे काय विपरित घडलं?
कोकण, सांगली,कोल्हापूर, तर आता विदर्भ धाय मोकलून रडलं

चार वर्षे झाली, हेच भोग, हे दुर्दैव सांग संपणार तरी कधी?
महाराष्ट्राच्या कष्टकरी जनतेन नुकसानीची करावी कशी यादी?

सरकारला करतो विनंती मायबाप जगण्याची तरी द्या हमी
सरकार म्हणत कस लावावं ठिगळ? आवकच झाली कमी

सांग बाप्पा सामान्यानी या अस्मानी संकटात कस जगावं?
सणवार जाऊदेत पण वर्षभर कुटुंबाच्या पोटाला काय द्यावं?

कशासाठी भजावे तुला? कसे म्हणावे आम्ही तू दुःखहर्ता?
रोज एक नवे संकट, नवे आव्हान, तू खरंच आहेस ना सुखकर्ता?

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “प्रकोप

 1. Milind Chavan

  Satya paristhiti

  1. Kocharekar mangesh
   Kocharekar mangesh says:

   मराठवाड्यात कधी इतका पाऊस पडल्याच ऐकल नव्हत,उस्मानाबाद आणि बिड हे तर दुष्काळी जिल्हे पण निसर्गावर आम्ही अतिक्रमण करत असल्याने सर्वच बदलत आहे.त्याची कडू फळ पुढील पिढीला भोगावी लागणार.
   अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

Comments are closed.