फजिती
मे महिन्यात मी गावी गेलो होतो. रोज सकाळी गखा घेऊन काजू काढायला जात असू. तसे त्या दिवशी सकाळी गेलो. एकाने गख्याने काजू काढायचे आणि एकाने ते झाडाखाली निवडायचे म्हणजेच वेचायचे. जर एकट्याने काजू काढून वेचायाचे ठरवले तर निम्मे काजू पताऱ्यात गायब होतात. त्या दिवशी सोबत मोठा भाऊ होता. मी काजू काढत होतो आणि तो झाडाखाली पताऱ्यात काजू वेचत होता. तो काजू वेचण्यासाठी झाडाच्या खोडाजवळ गेला आणि भुर्र असा आवाज करत रानकोंबडी पळून गेली.
भाऊ काजू वेचत खाली गेला तेव्हा ओरडत म्हणाला, “अरे ही बघ कोंबडीची पाच अंडी इथे पताऱ्यात आहेत. मी जाऊन पाहतो तर खरंच तिथे पाच अंडी जमिनीत थोड उकरून घातली होती. त्याच्या आजुबाजूला पानांची बिछायात केली होती. भाऊ म्हणाला फक्त अंडी नेऊन काय करणार आपण? संध्याकाळी उशीरा येऊ आपल्याला कोंबडी आणि अंडी दोन्ही मिळतील. आम्ही आमचं काजू काढण्याचं काम संपवून घरी गेलो पण डोक्यात रानकोंबडी पकडून आणण्याचा प्लॅन तयार होत होता.
संध्याकाळी सात वाजता अंधार पडत असता आम्ही निघालो, एक बॅटरी आणि दांडा व सोबत एक चादर भिजवून घेतली आणि कोंबडी आणि तिची अंडी आणायला पिशवी घेतली. उगाचंच आधीपासून ओरड नको म्हणून घरी सांगायचे नाही असे ठरवले तरी “चांगली चादर भिजवतास कित्याक? खंय चललास सांजचे? रान काडूक नाय ना? असं वैनींने विचारलच. भाऊ तिच्यावर रागावत म्हणाला “विचारलस, नाट लावलस, तूका काय करूचा हां, आमी खयंव जाव”. ती गंमतीने म्हणाली, “जाईनात बापडे, आमका काय,पण वाटप करून ठेव काय? नंतर धांदल मारशात तर अजिबात कायेक करूचय नाय”. “चल रे तिका उत्तर देईत बसलस तर अंधार होइत, मगे पायाखाली काय एक दिसाचा नाय, बॅटरी नेली तरी अगोदर पेटवता नये. नाय तर पळान जातीत” भावाने सूचना केली.
आम्ही ती भिजवून ओली केलेली चादर, बॅटरी, पिशवी आणि बांबूची मजबूत काठी असं शस्त्रसज्ज होऊन मार्गी लागलो. पावलांचा आवाज होऊ नये म्हणून अनवाणीच सावकाश पावले टाकत निघालो. झाडाकडे पोचताच भाऊ त्या झाडाच्या बुंध्याच्या दिशेने ओली चादर घेऊन गेला, तर मी हातात तो दांडा घेऊन तयार राहिलो. जर कोंबडी पळाली तर दांडा कपळात घालायचा असा प्लॅन.
भावाने झाडाच्या बुंध्याकडे जात, जिथे सकाळी कोंबडी बसली होती त्या खड्यांवर चादर टाकली आणि “बॅटरी पेटव रे. पिशवी आण आणि इथे ये” त्यांने मला ऑर्डर सोडली. पण मला आश्र्चर्य वाटलं “अरे, भाई, कोंबडी ओरडली कशी नाही?” तो म्हणाला “ओला कपडा घातलाय म्हणून नसेल ओरडली, तु आधी इथे ये पटकन, मी झाडाच्या फांद्या बाजू करत तिथे पोचलो. भावाने चादर दोन्ही हातांनी जवळ करत घट्ट दाबली पण त्याच्या हाताला काही लागेना. “अरे, ही कोंबडी गेली खय?” त्याने चादर दूर करून पाहिली. ना कोंबडी, ना अंडी. बहुतेक सकाळी आमची जाग लागल्याने कोंबंडीने आपली जागा बदलली. सोबत ती अंडी घेऊन गेली.
वाचणा-या मित्रांना आश्र्चर्य वाटेल. पण कोंबडी आपली चोच आणी गळा यांच्या आधाराने अंडी घेऊन जातांना मी पाहीली आहे. तरीही पाच अंडी एक एक करून तीने दुसरीकडे नेल्याने आमची पार निराशा झाली. घरी आलो, आमची वहिनी आमची चाल पाहून काय समजायचं ते समजली. पण भाऊ तिच्यावरच ओरडत म्हणाला, “जातानाच नाट लावलस, कशी गावातली शिकार, तुझा तोंडच तसला”. ती रागावली नाही, तिने ते हसण्यावर नेलं आणि म्हणाली, “माझा तोंड आसा ता आसांदे, आता या वाटपाचा काय करू तितक्या सांगा?” भाऊ पाय आपटत निघून गेला. त्याला माहित होते की, ही काही वाटपाच्या भानगडीत नुसती पडणारच नाही.
आम्हाला रान काढुन काही मिळाले नाही ही गोष्ट कोणीतरी अवाठात पोचवली आणि कित्येक दिवस कोणी दिसेल तो एकच विचारी “खयं चललास, रान काडूक की काय?” आमची खिल्ली उडवायला विषय मिळाला होता. वास्तवतः जर ती रानकोंबडी विचक्षणा नसती तर ती आमच्या हव्यासी वृत्तीची बळी ठरली असती. अर्थात गावी कवडे, रानकोंबड्या, ससे यांची शिकार करणं यात काही पाप करतो अस कोणी मान्यही करत नाही, आणि कदाचित आम्हाला रानकोंबडी अंड्यासह हाती मिळाली असती तर तिची सागुती खाऊन तृप्तीचा ढेकरच दिला असता. शिवाय येणा-या जाणा-या पै-पाहुण्यांना रानकोंबडी कशी धरली, ते तिखट मीठ लावून नक्कीच सांगितलं असतं.
दुसरा प्रसंग असाच गंमतीशीर आहे. मे महिनाच होता.मी एका रातांब्याच्या झाडावर चढण्यासाठी शिडी बुंध्याला लावली आणि थोडे वर चढून गेलो तर पिल्लांचा आवाज आला. पिल्लांचा आवाज येत होता तिथे लक्ष गेलं, बुंध्याला मध्यावर एक ढोल होती. तिच्या खोलीचा अंदाज येईना म्हणून घरून बॅटरी आणली त्यात अतिशय गोजिरी पिल्ले होती. गावच्या भावाने ती पोपटाची पिल्ले आहेत म्हणून खात्रीने सांगितले.
माझे रातांबे पाडायचे काम संपवून मी खाली उतरत होतो तेव्हा पुन्हा कानोसा घेतला तर मला ढोलीच्या तोंडावर पोपटाची शेपटी दिसली. त्याचा अंदाज खरा होता. मी घरी गेलो तर भाऊ पोपटाच्या पिल्लांना ठेवण्याची व्यवस्था कशी करायची ते शेजारच्या बाळ्याशी बोलत होता. मी त्याला म्हणालो, “अरे पिल्ले छोटी आहेत ती त्या पोपटा शिवाय कशी राहतील? थोडी मोठी झाली की आपण आणू” त्याला काही ते पटेना.
न आणलेल्या पिल्लांची वाटणी देखील झाली. एक दूर राहणाऱ्या बहिणीला, एक बाळ्याला आणि दोन आम्हाला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे शेजारचा बाळा पिल्ले काढण्यासाठी आला. त्यांने भावाला हाक मारली. “ओ, भाई, निशाण खय हा, चला बेगीन. वायच उजवडला आणि जाग लागली तर पोपट हातीत गावाचो नाय, आणि व्हयतो पिंजरो नाचवू नको, मोठीशी रवळी आणि ओलो फडको घे”. भाऊ बाहेर आला, “होय इलय. चाय घे, घसो गरम कर, मगे जावया”. बाळाने चहा दोन घोटात संपवला, तो शिडी घेऊन वाटेला लागला त्याच्या पाठी भाऊ आणि मी सगळा सरंजाम घेऊन झाडाकडे पोचलो. बाळाने चपलांचा आवाज होऊ नये म्हणून अगोदरच चप्पल दूर काढून ठेवली आणि अलगद शिडी लावली. एक मोठा ओला फडका ढोलीच्या तोंडाजवळ डाव्या हाताने धरला आणि उजवा हात सावकाश ढोलीत घातला. ढोल चक्क रिकामी!! आश्र्चर्य, काल संध्याकाळीपर्यंत ढोलीत पिल्ले होती आणि आज सकाळी ढोल रिकामी. बहुदा माणसाचा तेथे झालेला स्पर्श पोपटाला जाणवला असावा किंवा दूर वरून पोपटाने आम्हाला ढोलीशी पाहिले असावे. आपला निवारा सुरक्षित नाही ह्याची जाणीव झाल्याने त्याने आपली पिल्ले सुरक्षित स्थळी हलवून आम्हाला गुंगारा दिला होता.
किती स्वार्थी होतो आम्ही, आमची करमणूक व्हावी म्हणून त्या पिल्लांची आणि आईची ताटातूट करुन, त्यांचे स्वातंत्र्य आम्ही हिरावू पहात होतो. हे उशिराने आलेलं शहाणपण आहे. तेव्हा तरी ‘जर पिल्ल मिळाली तर आपण त्यांची काळजी घेऊ त्यांना घरातल्या माणसांची नावं शिकवू, लोक त्या पोपटांच्या पिल्लांच कौतुक करतीलl’अशी स्वप्न आम्ही रंगवत होतो..तेव्हा तरी आम्ही त्यांच स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत हे कुणी समजावलं असतं तरी ते कदाचित मान्य केलं नसतं. जेव्हा आपल्या विचारस्वातंत्र्यावर कोणी घाला घालत तेव्हाच आपल्याला त्याची जाणीव होते, अन्यथा “मला काय त्याचे?” या न्यायानेच आपण सर्व जगत असतो.
या दोन्ही प्रसंगात आमची फजिती झाली. कदाचित देवाला तेच मान्य असावे.
तिसरा प्रसंग असाच आमच्या समोर घडला. एक सुके चुडत, म्हणजे माडाचे झावळे खाली पडले त्या पडलेल्या झावळावर एक गवताचे घरटे होते. त्या घरट्यातून पिल्लाचा आवाज आला म्हणून मांजर तिथे धावत पोचली. मांजर का धावते ते पाहायला मी आणि माझा भाऊ तिथे पोचलो. पाहतो तर त्या घरट्यात एक छोट्या कोंबडीच्या पिल्लाच्या आकाराचे पिल्लू होते. मांजर झडप मारण्यापूर्वी आम्ही घरटे उचलले आणि घरी आणले. मांजर आमच्या मागे मागे फिरत होती त्यामुळे आम्ही पिल्लाला घरट्यातून बाहेर काढू शकत नव्हतो. शेवटी मांजरीला एका खोलीत कोंडून आम्ही पिल्लाला अलगद बाहेर काढले. साधारण राखाडी-तांबूस छटा असलेले ते पाखरू होते. आता त्याला निवारा कसा द्यायचा हाच प्रश्न होता. आमचा हा उपक्रम चालेतो मांजर घराच्या पाचगळी वर चढून धाव मारत आमच्या पर्यंत पोचली. तीची शिकार आम्ही तिच्यापासून हिसकावून घेतली होती.
त्या पिल्लाला आम्ही दूध भरवण्याचा प्रयत्न केला, कसे तरी अर्धा चमचा दूध त्याने पिले, ते त्याच्या आईसाठी चिरक्या आवाजात ओरडण्याचा प्रयत्न करत होते तसा मांजराला चेव येत होता. मांजर सारखे मोठ्या आवाजात ‘म्यावं म्यांव’ चा पुकारा करत घुटमळत होते.
अंधार पडला तसे आमचे लक्ष माडाकडे गेले. एक पक्षीणी त्या माडांच्या झावळ्यात शोधाशोध करत होती. सारखी या झावळावरून त्या झावळावर अशी तिची धडपड आणि शोधाशोध सुरू होती. आता या पिल्लांला वर कसे सोडावे. जे घरटे झावळासह पडले त्याची मोडतोड झाली होती.आम्ही मांजराला एका मोठ्या टोपली खाली झाकले आणि पिल्लाला घेऊन माडा जवळ गेलो. शिडी लाऊन आता ते तुटके घरटे दुस-या चुडतावर निट ठेवायचे असा विचार करुन पिल्लाला तिथेच जमिनीवर ठेवले. ती पक्षीणी माडापासून दूर जाऊन ओरडत होती, आता त्या पिल्लांला बहुदा तिने पाहिले होते आणि ती त्याला साद घालत होती. आम्ही मात्र पिल्लांला उडता येत नाही म्हणून त्याची व्यवस्था लावण्यासाठी शिडी माडावर लावत होतो. इतक्यात काय झाले न कळे त्या इवल्याशा पिल्लांने पंख पसरले आणि हवेत झेप घेतली.
दूर वरून पक्षीणी बहूधा त्याला साद देत होती, हिम्मत देत होती “उठ झेप घे तुला नक्कीच जमेल” आणि तिच्या त्या बोलावण्याला प्रतिसाद म्हणून पिल्लांने सर्व शक्ती एकवटून हवेत झेप घेतली. थोड्या दूरच्या माडावर जाऊन तो विसावला, सोबत ती विचक्षणी होती. मातृत्वाच्या हाकेत कोणती अशी ताकद होती की त्या शक्तीने पिल्लांला झेप घेण्यासाठी बळ दिले.
मित्रांनो आपण मात्र आपले बाळ चालताना पडले तर लगेचच त्याला उचलून जवळ घेतो. सांत्वन करतो त्याला उभे राहण्याची प्रेरणा देत नाही हाच फरक आपल्यात आणि प्राण्यांत आहे. म्हणून प्राणी लवकर सावरतात, परिस्थितीशी झगडून प्रतिकूल परिस्थितीत जगायला सक्षम होतात. मला वाटते आपणही या पशू, पक्ष्यांकडून शिकण्यासारखे बरेच आहे.
आमची फजिती भले होऊद्या पण प्रत्येक फजितीने आम्हाला जगण्याचा एक नवा आयाम शिकवला हे नाकारून कसे चालेल? फारशी बुध्दी नसतांना पक्षी आपलं आणि आपल्या कुटूंबाचं जतन, संगोपन आणि संरक्षण करू शकतात आणि आपण? खरेच आम्ही बुध्दीजीवी आहोत का? मग संकट आले की हार का मान्य करतो? का प्रतीकुल परिस्थितीला घाबरतो? तसे असेल तर माणूस श्रेष्ठ कसा? तेव्हा एवढे तरी या फजितीतून शिकता येईलच कि दुस-या प्राण्यावर अहंकाराने सत्ता गाजवण्यापूर्वी या अहंकाराने आपलाच विनाश ओढवू शकतो याचे भान प्रत्येक माणसाने राखले तर त्याच्या बुध्दीजिवी म्हणण्यास काही अर्थ असेल.
तेव्हा विनयाने म्हणावेसे वाटते थोडेसे गमावून भविष्यासाठी खूप काही मिळवले तर ते गमावणे सार्थकी लागले म्हणायला हरकत नाही. आमची फजिती झाली पण जीवन जगताना प्राणिमात्रांच्या हक्कावर त्यांच्या जीवनावर आघात करणे योग्य नाही हे शिकायला मिळाले. म्हणून म्हणावेसे वाटते.
न स्वल्पस्य कृते भुरि नाशयेन्मतिमान्नर: |
एतदेवात्र पाण्डित्यं यत्स्वल्पाद भुरि रक्षणम् ||