फुंकर
“सुरेश एवढा बदलेल अस वाटल नव्हत हो!” नाडकर्णी आपल्या मैत्रिणीला, सामंत बाईंनी सांगत होत्या, दोघी अधूनमधून बाजारात भेटत तेव्हा एकमेकांना आपल्या बातम्या ऐकवत होत्या. मैत्रीण हसून म्हणाली, “अहो आम्ही शेजारी त्यांचे पण आम्हालाही कधी संशय आला नाही. पण अशी गोष्ट काही पहिल्यांदा आणि फक्त बनेंच्याच घरात घडते आहे का? अहो आई बापाने सांगायच आणि मुलांनी निमूट बोहल्यावर चढायचे दिवस केव्हाच संपले.” सामंत बाईंच्या वाक्यानी नाडकर्णी आतल्या आत कोसळल्या, म्हणजे आपण यांना मागासले वाटतोय की काय? त्यांना वाटले ते त्यांनी ओठांवर येऊ दिले नाही. “अहो बाई मला काय म्हणायचय, प्रेम विवाह आत्ताच होत नाही हे खरे पण निदान जात आणि भाषा तरी पहायची, सगळं अगदी सोडून द्यायच म्हणजे!” बाई त्यांच्याकडे पाहून हसल्या, भर बाजारात उभ राहून गप्पा मारण्याचा का हा विषय होता? अगदी सहज म्हणून बाई नाडकर्णींना म्हणाल्या, “अहो नाडकर्णी, आमच्या शेजारचा सुरेश बने आठवतोय का?” तर नाडकर्णींना याची बातमी आधीच लागली होती.
बनेंच्या घरी वातावरण कुंदच होते, मुलाने चक्क मागासवर्गीय मुलीशी लग्न केल ते ही घर सोडून. त्यानंतर, त्याने कधीही घरची चौकशी केली नाही. मिसेस बने दोन महिने कामावरच गेल्या नाहीत, दोन आठवडे घरा बाहेर पडल्या नाहीत. शेवटी घरात स्वतः ला कोंडून तरी किती दिवस घेणार?
मि. बने त्यामानाने लवकर सावरले. पुरुषांच बर असतं सहन झाल नाही तर एखादी सिगारेट शिलगावता येते. एखादा पेग रीचवता येतो. सहन नाहीच झालं तर बायकोवर रागावता येतं. बाईने काय करावं? तिने उदरात गर्भ वाढवला ना? त्याच बालपण दिलं, हाताचा झोपाळा, पदराने वारा दिला. सगळच तर केलं. सुरेश येत नाही, फोनही करत नाही. म्हणून तिचं आतडं तीळतीळ तुटायचं. तिने फोन केला तरी वाजत रहायचा, शेवटपर्यंत ती वाट पहायची पण फोनची रींग बंद झाली की ती निराश व्हायची. “दुसऱ्या समाजातील मुलीशी लग्न करणार असलास तर घराचा उंबरठा तुला वर्ज्य. “वडिलांचे एवढ वाक्य सुरेशला झोंबले. आता तो सत्तावीस वर्षांचा होता. त्यालाही मान अपमान होता. आपल्याला उंबरठा वर्ज्य सांगण याचा अर्थ बाबांना कळूदे असाच पवित्रा त्यांने घेतला.
तो निघून गेल्यावर बनेंनी, तुझ्या लाडामुळे तो बिघडला असा आरडा ओरडा तिच्यावर केला. पण खरच तिची चूक होती का? कोणत्या पत्नीला वाटेल की तिच्या मुलाने नवऱ्याला आवडणार नाही अशी कृती करावी!
दोन दिवस त्या उपाशी होत्या. एकुलता एक मुलगा घर सोडून गेल्याच दुःख होतच, पण त्या ही पेक्षा घर सोडून जातांना, “आई मी येतो ग म्हणण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. याचे त्यांना वाईट वाटले. आपला नवरा रागीट आहे, हट्टी आहे पण समजावलं तर समजूतदार आहे हे तिने गेल्या अठ्ठावीस वर्षात अनुभवलं होत. पुढल्या मार्च महिन्यात रिटायर झालो की आपण गावी जाणार असे अनेकदा तिने त्यांच्या तोंडून ऐकले होते. पण गेल्या वर्षभरात घडलेल्या घटनेने निवृत्त होऊनही बने ना गावी गेले ना त्यांनी गावची आठवण काढली. निवृत्तीला आलेल्या बापाचा एकच ध्यास असतो, मुलगा हाताशी आला की, सन्मानाने निवृत्त होऊन शांतपणे जगावे. तीस पस्तीस वर्षे सतत कष्ट करून संसार उभारल्यावर एवढही सुख मिळण्याचा अधिकार नसावा का?
बाई नाडकर्णींना सोडून रस्त्यातून एकट्या येत होत्या,पण नाडकर्णीना रस्त्यात सोडून आल्यावर असे अनेक बने त्यांच्या भोवती फेर देऊन नाचू लागल्या. मुलांनी स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर स्वतःला योग्य वाटेल असा निर्णय घेतला, जोडीदार निवडला तर चुकलं कुठे? केवळ आई, वडिलांसाठी त्यांच्या समाधानासाठी स्वतःच्या सौख्याची आणि आवडी निवडीची वाट सोडून द्यायला तो थोडीच कथेतील श्रावण बाळ होता!
त्या शाळेतून निवृत्त झाल्या तेव्हा त्यांना सोबत करायला ना नवरा होता ना मुले, एक आजारपणात नवरा अकाली मृत्यू पावला तेव्हा त्यांचं वय होतं अवघ तेवीस, समाज काय म्हणेल या भीतीने लग्न केलं नाही आणि मनातील भीती कमी झाली तेव्हा योग्य जोडीदार मिळाला नाही. मुलगा घर सोडून गेला तर त्याचे चटके, पीडा काय असते हे त्यांना कळणे शक्य नव्हते. पुस्तकातील कथा वाचून ती वेदना रंगवणे किंवा समजणे सोप्पे नव्हते. शेजारी बने वहिनींना तीळ तीळ तुटतांना पाहिले आणि त्यांना वाटले आपल्याला मुलगा नाही हे बरेच झाले, जर त्याने सुरेश सारखे गूण उधळले असते तर आपण खरंच माफ केले असते का? बने वहिनींना सोबत करायला मिस्टर बने तरी आहेत. त्यांचं त्यानाच हसू आलं.
एखादया व्यक्तीला प्रसंगानुरूप दुःख झालं तर कोणी मदत करू शकेल? त्याच्या दुःखावर फुंकर घालू शकेल? कोणी समजावले, सहानुभूती दाखवली तर दुःख हलकं होत का? विरह, आणि जोडीला आपल्या प्रेमात काय कमी राहिली म्हणून ही शिक्षा या विचाराने दुःखाचे चटके कमी होतील की वाढतील? नवरा गेल्यावर त्यांनी दुसरे लग्न करावे असा आग्रह माहेरून आणि सासरकडील मंडळींनी करूनही आणि अनेक स्थळे आली तरी त्यांनी मनाला बजावले हे सुख पुन्हा घेणे नाही. त्यांचे आणि अजितचे संबंध पती पत्नीचे नव्हते, मनोमिलन म्हणजे काय ते त्यांनी लग्नाच्या दोन वर्षांत अनुभवले होते. प्रेम ही भावना काय असते ते When the Heart beats ही कविता शिकवताना अनुभवले होते. कविता केवळ शिकवण्याचा विषय नव्हती तर अनुभूतीचा प्रत्यय घेण्याचे माध्यम होती. जेव्हा जेव्हा त्या ती कविता शिकवत त्या कवितेच्या नायिकेच्या जागी स्वतः आहोत असा भास होई. जगण्यावर नितांत प्रेम करणारे पाडगावकर आणि दुसऱ्या टोकाला बोरकर हे त्यांनी पाहिले होते. अजित आणि त्यांचं लग्न हे मनोमिलन होऊन झाले होते, ठरवून केलेलं लग्न असले तरी दोघे एक भावनिक बंधानी एकत्र आले होते, सतारीच्या तारा नीट लागल्यावर त्याचा मधुर नाद वादकाने पुन्हा पुन्हा अनुभवावा आणि क्षणभर त्याच्या लयीत, संगीतात स्वतःला विसरून जावे असे ते नात होते. अजित हा त्यांच्या जीवनातला नादमय आविष्कार होता. अजितला त्यांनी काळजात जपले होते म्हणूनच त्या वयात वाटणाऱ्या शारीरिक आकर्षणावर मात करत त्या शुद्ध ज्योती सारख्या जळत होत्या. गेले दहा वर्षे ती कविता शिकवतांना त्या मंत्रमुग्ध होत होत्या. माहेर आणि सासर असा भेदभाव त्यांनी केला नाही पण त्या स्वतंत्र राहिल्या. त्या एकट्या कधी नव्हत्याच, त्यांचा अजित सतत त्यांची सोबत करत होता.
यथावकाश त्या निवृत्त झाल्या, त्यांचा निवृत्तीच्या कार्यक्रमाला,निरीप समारंभाला सासर आणि माहेरचे आवर्जून आले होते. सुरेश तेव्हा त्यांच्याच वर्गात बारावीला होता. बाईंच्या भेटवस्तू त्यानीच गाडीत ठेवण्यास मदत केली. तोच गाडीतून घरी आला. सुरेशला जन्मापासून त्या ओळखत, त्याच्या प्रगतीच्या त्या साक्षीदार होत्या. त्याच प्रत्येक यश त्या सेलिब्रेट करत. सुरेश बरेचदा त्यांच्या घरी गृहपाठ घेऊन बसत असे.बाईंची अभ्यासात त्याला खूप मदत झाली. बाई आपले काम करता करता त्याला गृहपाठात मदत करीत,त्यांना काही मदत लागली तर तो नेहमी तयार असे.अगदी स्वतःच्या घरी असला आणि त्यांनी बाईंचा आवाज ऐकला की धावत येई, “सांगा बाई काय आणू?” बाई बाई म्हणता म्हणता तो मावशी कधी म्हणू लागला ते त्यांना कळलंच नाही. सुरेशच्या प्रत्येक स्पर्धेचं बक्षीस प्रथम त्यांच्या घरी येई, बाई त्याला काही ना काही देऊन शाब्बासकी देत. कित्येक एलोकेशन स्पर्धेसाठी बाई त्याला मदत करत. बाई वाट चालत होत्या तरी गेल्या वीस पंचवीस वर्षाचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर सरकत होता.
तो आय आय टी, बी टेक झाला तेव्हा बाईंनी त्याला बक्षीस म्हणून मोबाईल घेऊन दिला. बने वहिनींना गिफ्टचे आश्चर्य वाटले चक्क गिफ्ट म्हणून मोबाईल म्हणजे. पण बाई म्हणाल्या तो का कुणी परका आहे,माझ्या समोर तर मोठा झाला, माझा भाचाच आहे, त्याच यश सेलिब्रेट झालंच पाहिजे. नाडकर्णी बाजारात भेटल्यापासून सुरेशचे विचार त्यांची पाठ सोडेनात, जीना चढता चढता त्यांच्या डोक्यात विचार आला,सुरेशचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्याशी बोलावं का? की तो आगाऊपणा ठरेल? बने साहेबाना काय वाटेल? खरे तर बने उत्साही प्राणी, इमारतीच्या सर्व कामात पुढे मग ती इमारतीची ड्रेनेज लाईन असो की सत्त्यनारायण पूजा, दही हंडीत मुलांसोबत हंडी फोडायला पुढे. घरात मात्र त्यांचं मत म्हणजे अंतिम निर्णय.
बाई जीना चढून वर आल्या, फ्लॅटला चावी लावून दार उघडणार इतक्यात मागून आवाज आला, “मावशी, कश्या आहेत?” आवाज ओळखीचा वाटला म्हणून त्यांनी वळून पाहिलं, विश्वास बसेना,”सुरेश!”त्यांनी डोळे विस्फारून पाहिले.त्यांनी कधीतरी ऐकले होते,ज्या गोष्टी विषयी आपण अंतर्मनाने प्रकर्षाने विचार करतो ती गोष्ट आपल्या आवाक्यात येते, साध्य होते. त्यांनी सामान खाली ठेऊन त्याचे दोन्ही हात हाती घेतले. “मावशी!कश्या आहात तुम्ही?” त्यांच्या डोळ्यातून निघालेले कढत अश्रू त्याच्या हातावर पडले. त्यांनी चमकुन वर पाहिले बाई रडत होत्या. ते पाहून त्याचा कंठ भरून आला, आई नंतर त्याच्यासाठी रडणारी दुसरी व्यक्ती, बाईंचा दरवाजा उघडून सामानाच्या पिशव्या त्यांनी आत ठेवल्या. बाई घरात आल्या,तसा दरवाजा त्यांनी बंद केला आणि बाईंच्या पायावर लोळण घेतली, मावशी मला माफ करा मी चुकलो. प्रेमाच्या स्वार्थी वृत्तीने मी आंधळा झालो होतो.माझ्या कानात तेव्हा फक्त बाबांचा आवाज घुमत होता, घराचा उंबरठा तुला वर्ज्य” त्याचे डोळे डबडबले.
त्यांनी त्याला दोन्ही हातानी धरून उठवलं, त्याचे डोळे स्वतःच्या पदराने पुसले, “सुरेश, आम्ही जुनी खोंड, आमचे विचार असेच असायचे, म्हणून काही रक्ताची नाती तुटतात होय? काय म्हणाले बाबा?” तो लाजून म्हणाला,”नातवाला खेळवतात.” बाई त्याच्याकडे पहात राहिल्या, हसल्या, “अच्छा, शेवटी नातवाने आजोबाचा राग शांत केला तर!”
तो समाधानाने हसला,”मावशी मी तिला घेऊन नंतर येतो, चालेल ना?” त्यानी दटावणीच्या नजरेने त्याला पाहिले, तस तो हसला. “हो जा बाबा,माझ्याकडे सावकाश ये,दोन वर्षांनी घरात आला आहेस, तिथेच थांब आणि हो बाबा काही बोलले तरी वाद घालू नको, तुला आठवते मी म्हणायचे, Wisdom and time is perfect solution to handle the situation.” तो निघता निघता हसला.
सुरेश निघून गेल्यावर त्या स्वतःशी म्हणाल्या, “काय मुलं असतात, उगाच जीवाला चटका लावून जातात.बनेंची गाडी पुन्हा सुरळीत होणार तर,” थोड्या वेळानी बेल वाजली, बने भेटायला आले, “वहिनी,आज दुपारी हिने तुम्हाला जेवायला बोलावलंय. नाही म्हणू नका.” त्या काही म्हणण्याचा प्रश्न नव्हता, त्या बरं म्हणाल्या. बने हसत निघू गेले. अगदी साधा मेनू बने वहिनींनी बनवला होता. चपाती, वालाच्या बिरड्याची उसळ, वरण, भात, चटणी, पापड आणि श्रीखंड. सुरेशची बायको जेवण वाढत होती.त्या तिच्याकडे पाहून डोळ्यातून हसल्या. बने, बाईंना आग्रह करत होते, आणि बाई पुरे पुरे म्हणत असतांना बने सुनेला वाढायला लावत होते. हसत खेळत जेवण आटोपले. सुरेशने आपल्या मांडीवर मुलाला घेतले होते आणि एक हाताने त्याला अधून मधून हलक्या हाताने थोपटत हाता तर मधूनच दोन दोन शिते तोंडात घालत होता. जेवण उरकलं तस जेवण उत्तम झालं म्हणत बाई निघाल्या जेणेकरून त्यांना निवांतपणा मिळावा.
संध्याकाळी साडेसहा सातच्या दरम्यान बने वहिनी सुनेला घेऊन आल्या. बाईंनी जेवतांना सून पहिली होती. ती अगदी गोरी गोमटी,भटा बामणाच्या मुलींना बाजू करेल अशी देखणी आणि गौरवर्णी होती. कुठे जन्म घायवा तिच्या हाती नव्हते. सून पाया पडली, त्यांनी खण-नारळ ओटी काढून ठेवली होती, बने वहिनींना त्यांनी सुनेची ओटी भरायला सांगितली. एक सुदंर साडी तिला दिली. “हं,काय नाव ग तुझं?” त्यानी तिच्या रुपाकडे पहात विचारले. “मोहिनी.” ती बाईंकडे पहात म्हणाली. “छान!,मुलाचं नाव काय ठेवलंस?” “रोहन,म्हणजे पालण्यातल नाव जयेश आहे, सुरेश म्हणाला माझे आजोबा जन्माला आले म्हणून—सुरेश तुमच्या बद्दल नेहमी सांगत असतो. ऑफिसात काही घडलं की तुमच्या नावाशी संबंध जोडतो, म्हणतो बाई मावशी म्हणायच्या आपल्या सभोवती असणारी माणस चांगली असतात आपण ओळखायला शिकलं पाहिजे. “बाई हसल्या.
बने वहिनी नातवाबरोबर टिचकी वाजवत खेळत होत्या. बाईंनी त्याच्या हाती पाकीट दिलं, तसं तो ते रंगीत पाकीट तोंडात घालू लागला. “अरें बाळा,लबाड कुठला,तोंडात नाही घालायचं, काढ पाहू ,हे घे तुझं खेळणं .” असं म्हणत बने वहिनींनी त्याच्या हातातून ते पाकीट काढून सुनेच्या हाती दिल. बने वहिनी नातवाचे चाळे पहात हसत होत्या.
सामंत बाई बने वहिनींकडे पहात म्हणाल्या, “वहिनी प्रत्येक गोष्टीवर काळ हेच अंतिम उत्तर असते,आज मी साठी पार केली. हे गेले तेव्हा अवघी तेवीस वर्षाची होते,अनेकांनी पुन्हा लग्न का म्हणून आग्रह केला. मी काळाच्या चालीने चालले, ना खंत ना उसंत. इतके वर्ष शेजारी आहोत कधी वितुष्ट नाही की विसंवाद नाही, खरं ना!”
बने वहिनी हसल्या, मी सुरेशची नुसती आई, सुरेशचे जे जे काही चांगले आहे ते तुमचे आहे. तुमचे उपकार कधी फीटणार नाहीत.” बाई रागावल्या,”एकीकडे सुरेश तुमचाच म्हणायचा आणि दुसरीकडे उपकाराची भाषा, छे, छे,अहो सुरेश बाबत मी कधी तुमचा माझा असा परकीपणा केलाच नाही. म्हणून जे मला वाटले ते मी केले.सुरेश चांगलाच मुलगा आहे, त्याची प्रगती ऐकून मलाही आनंद व्हायचा, तस अचानक तो निघून गेला तेव्हा दुःख ही झालं.अहो, वयानुसार गैरसमज व्हायचे. मोहिनी ही दुरावलेले नाती तू तुझ्या स्नेहाने जोडायची आहेस. देव तुला यश देईलच, आणि आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच.
दोघी बाळाला घेऊन निघाल्या तसा बाईंनी त्याचा गालगुच्चा घेतला. बाईंना नाडकर्णींचे शब्द आठवले, “गोंडस आणि चांगला मुलगा एवढा बदलेल अस वाटलं नव्हतं!” बाई हसल्या. बदल हिच निसर्गाची प्रकृती, शिशिर येताच पानगळ होणारच आणि चैत्रात हिरवी मखमल पुन्हा येणारच. नवी नाती निर्माण होतांना जुन्या नात्याचे बंध सैल होणारच, प्रश्न उरतोतो सैल झालेले बंध पुन्हा जोडण्यासाठी आपण प्रयत्न करतो की नाही. आज बने,उद्या नाडकर्णी परवा आणखी कुणी व्यक्ती, स्वभाव बदलले तरी संबंधाची नवी समीकरणे जुळली तर माणूसपण उरेल, नाते बहरेल. म्हणून जीवन हेच एक समीकरण, ते सुटाव म्हणून धडपड.
जेव्हा प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नसतात तेंव्हा शांतपणे वाटचाल करीत प्रमाणिकपणे जगाव, we may not have solution for every problem but time and destiny have answer of all unsolved question. हे वाक्य बाई मनात म्हणाल्या आणि मनापासून हसल्या. संध्याकाळची वेळ होती आणि कुठेतरी कोकीळ सप्तकात कुहूsss,कुहूsss ओरडत होता. सुर्यास्त होत असावा पण पोटात अंधकार घालून उशेच्या स्वागतासाठी काळ सरकत होता. त्याच्या उदरात काय आहे अस चेष्टेने किंवा रागानेही अनेकदा म्हणतो पण मुल जन्माला येण्यासाठी नवू महिन्याची प्रतीक्षा करावीच लागते.परिस्थिती बदलण्यासाठी वाट पहावी लागते. बनेसाहेबांची प्रतिक्रिया काय हे पहाव म्हणून बाईंनी कानोसा घेतला, इतक्यात त्यांचा आवाज आला, “अरे लबाडा माझ्या अंगावर सूसू करतोस काय? अग मोहिनी ह्यान माझ्या अंगावर सू केली बघ, ह्याला घे पाहू!” बाई हलक्या पावले परतल्या काळाने बने कुटुंबाच्या नात्यावर हलकेच फुंकर घातली होती.नातवाने आजोबांच्या काळजाच दार अलगद उघडलं होतं.
लय भारी सुंदर
मिलिंद धन्यवाद, मी दर सोमवारी आणि गुरुवारी लेख व कविता पोस्ट करतो.आवडली तर मिंत्राना पाठवा ही विनंती.
Chanach.
भोसले धन्यवाद.