बायको ती बायकोच
अरे राजूss अशी हाक येताच तुम्ही सावध होता आणि आलो म्हणत तिच्याकडे निघता. दरम्यान, पून्हा दोनदा हाक येतेच येते. तुम्ही जवळ पोचताच ती सांगते, “हे बघ तू ऑफिसला निघतोच आहेस तर एक काम कर.” आता आणि ही बया काय काम सांगणार आहे कोणास ठाऊक? या अर्थाने आपण हं अं, अस म्हणण्याचा अवकाश, ती लगेच बरसते, “हे बघ, कपाळाला उगाच आठ्या पाडू नकोस, मी काही वजन उचलून न्यायला सांगत नाही. फक्त हा इडलीचा डबा जाताजाता आईकडे पोचता कर म्हणजे झालं.” आपण बरं म्हणतो आणि आपलं आवरायला जातो तोवर ती पून्हा एकदा सांगते, “हे बघ तुझ्या ऑफिसमध्ये न्यायचा डबा भरून ठेवलाय त्याला प्लास्टिक पिशवी घाल, विसरू नको, नाहीतर सर्व बॅग चटणीने ओली करशील आणि माझं काम वाढवशील. आणि हो! मित्रांना इडली दिली तर बायकोन दिल्यात सांग, बायकोचं थोडं कौतुक केलं तर काही तुला कमीपणा येणार नाही.” तिचं अजून काही ऐकावे लागू नये म्हणून आपण तिथून निसटतो. तिच्या चाणाक्ष नजरेत ते येत. “राजू , हे बघ, निनादला बसवर सोडूनच तुला निघायचं आहे, नाहीतर तुझं नेहमीचं काम माझ्यावर ढकलून मोकळा होशील. तू काय दहा मिनीटात आवरून निघू शकतोस आम्हा बायकांच तसं नसत. I mean आम्हाला तुमच्या सारखे दोनच कपडे अंगावर चढवून चालत नाही, कळतय ना? काही उघड राहिल तर तुम्ही डोम कावळे वाकून काय काय दिसतय, पहायला तयार असताच ना?”
शेवटी आपण वैतागून म्हणतो, “तू बोलत बसलीस तर मी माझं कस आवरू? निनादला आंघोळीसाठी तयार करणं, ब्रेकफास्ट देणं, त्याचा युनिफॉर्म घालून देणं, टाय लावणं.. खरं तर ती अजूनही काही कामे आपल्याला वाढवून सांगणार असते, पण डाव पालटतोय पाहिल्यावर ती रागावून म्हणते, “अरे राजू , तुला उशीर होतोय ना? बोलत काय बसतोस निघ आता.” आपण लक्षात घेतो, दिला तेवढा आहेर पुरे आहे. तर अशी ही सहचरणी, तुमची ,माझी बायको. ग्रेट, She knows how to manage work with you, म्हंटलं तर कोडे! आणि म्हटलं तर सर्व प्रश्नांचं जालीम उत्तर! काय पटतय ना? आजकाल प्रत्येक घरात डबल इंजिन आहे, अहो! हसायला काय झालं? म्हणजे असायलाच हवं तरच कुठे ही संसाररूपी गाडी, “वंदे भारतचा” स्पीड पकडेल. बाय द वे, केंद्राकडून दोन दोन वंदे भारत एकाच दिवशी, एकाच राज्याला कन्सेप्ट कसा काय वाटतोय? तर पंढरपूर आणि शिरडी वारी सुखासीन होणार यात शंकाच नको. फक्त नोटा तयार ठेवा म्हणजे झालं.
साहेब तुम्ही विवाहित आहात का? अस गाडीच्या प्रवासात, शेजारी बसलेल्या सहप्रवाशानी विचारलं की नकळत आपल्या भुवया थोड्या उंचावतात. त्यांना नक्की काय विचारायच आहे? याचा अंदाजही लवकर येत नाही. राशीचक्रकार उपाध्ये प्रमाणे ते आपला स्वभाव किंवा वर्तणूक याचा अभ्यास करत आहेत की त्यांचा आपल्या बाबतीत अभ्यास पूर्ण झाल्यानं आपल्या व्यक्तीमत्वात स्वतःच्या जावयाचा शोध घेत आहेत. नेमक कळत नाही. अर्थात जर ते वृद्ध किमान निवृत्त आणि आपण तारूण्यात असू तरच अशी शंका मनात येण्याची शक्यता अधिक आहे.
जर आपण त्यांच्या वयाच्या आसपास असलो तर आपल्या सोबत बायको नावाची स्त्री नसल्याने, अरे रे! एकटाच म्हणजे सडिफटींग आहे की काय? असाही संशय त्याच्या डोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा मग असही असेल की ते घरा बाहेर पडतांना बायकोने एकटं जाण्यावरून कटकट केली असेल आणि तो राग डोक्यात ठेऊनच महाशय प्रवासाला निघाले असावेत आणि तुमचा हसतमुख चेहरा पाहून, “यांना बरी बायको विना कटकट एकट्याने प्रवास करू देते? आम्ही मात्र जरा बहिणीला भेटून याव म्हंटल की हीची कटकट सुरू होते.” आपला नवाकोरा ड्रेस पाहताच विचारते, “नाही म्हणजे नक्की बहिणीला भेटायलाच जाताय ना? की?” त्या “की?” मध्ये किती गहन अर्थ दडलेला असतो ते ईश्वरच जाणे.
म्हणजे या की चा अर्थ, नक्की बहिणीकडेच की आणखी कुठे? म्हणजे एखादी मैत्रीण किंवा एखादी ऑफिस मेट, त्या “की” चा काहीही अर्थ निघू शकतो. तर पुरुषांने बाहेर पडतांना घरातील बायको नावाच्या मालकीणीने नवरा नावाच्या गृहस्थाला अस विचारलं की त्याच्याही भुवया वर जातात, त्याचा साधा सोप्पा अर्थ असतो, “तुला सांगूनच जायला हवं का?” किंवा, “तू मला विचारणारी कोण?” असा फुत्कारही असू शकतो.
गाडीत दुसरी व्यक्ती ओळख वाढवत हळूहळू आपली माहिती काढू लागते, “काय साहेब एकटेच का?” नाही म्हणजे एवढा दुरचा प्रवास आणि आपल्या सौभाग्यवती, मुलं सोबत नाहीत म्हणून विचारलं. हा खरं तर विचारणाऱ्या व्यक्तीचा तो शाब्दिक गनिमी कावा असतो. म्हणजे आपलं स्टेटस् पाहुन जर तो सुखावला असेल तर आपल्यामध्ये त्याला एक “वर” किंवा यंदा कर्तव्य आहे अस सांगणारा नवरा मुलगा किंवा त्याच्यासाठी जावई तो शोधत असतो. आपली पोरगी म्हणजे कन्यारत्न यांना दिली तर कसं? असा विचार महोदयांच्या मनात येतो. संवाद वाढवण्यासाठी तो रेल्वेच्या व्हेंडरला दोन चहाची ऑर्डर देतो किंवा घरून आणलेला पदार्थ शेअर करतांना, घ्या हो घरचा आहे, आजच सौ ने बनवला आहे अस म्हणतो.
प्रवासात “तो” स्वतः एकटा असतांना आपण एकटेच आहोत का? अशी तो चौकशी करतो तेव्हा नक्की समजून चला की त्यांनी घरा बाहेर पडतांना सौभाग्यवतीचा, अजूनही वर संशोधनाला बाहेर पडत नाहीत म्हणून शाब्दिक नाष्टा यथेच्छ खाल्लेला असतो आणि त्याच्या समाधानाचा ढेकर येण्यापूर्वीच आपण त्याच्या नजरेस पडतो. अर्थात आता ऑनलाइन विवाह साईट निर्माण झाल्याने स्थळाची चौकशी करायला जातो म्हणायला वाव नाही हे ही खरे.
तरीही त्याच्या मनात, याची बायको बरी याला एकट जाऊ देते असा खोचक सवालही येत असतो. किंवा एकट्याने प्रवास करतो म्हणजे हा आपल्या बायकोला घाबरत नसावा असाही विचार येत असावा, किंवा ह्याच्या येण्या-जाण्याने बायकोला काहीच फरक पडत नसावा असाही विचार येत असावा.
तेव्हा प्रवासात एखादी व्यक्ती आपली विचारपूस करू लागली तर नक्की काय उत्तर द्यावे हे मनाशी ठरवावे लागेल, पण गोची तर तीच आहे ना राव! अस ठरवून बोलण्याची कला आपल्याला अवगत नसते मग आम्ही अनाहूतपणे मन की खिडकी खोल देते है। जे सांगायच नसतं, ते ही अनावधानाने खरं म्हणजे खुल्या मनाने बदाबदा सांगून मोकळ होतो. कधी प्रौढी मिरवायची म्हणून तर कधी मनात साचलेल बाहेर काढलं नाही तर स्फोट होईल म्हणून, कधी हे हितगुज दुःखी आठवणींचे असतात तर कधी सुखी जीवनाचेही असतात. आपण सुखी नसलो तरी मी किती भाग्यवान असा स्वतःची फसवणूक करणारेही असतात.
प्रवासात जर कोणी विचारले, “काय आपण एकटेच आहात का?” या प्रश्नामागे अनेक उपप्रश्न असतात किंवा विचार असतात. चला तर बरं झालं हा एकटाच प्राणी आहे म्हणजे निवांतपणे थोड अघळपघळ बोलता येईल किंवा मग थोड सरकून जागा करता येईल. असाही विचार असू शकतो. आपल्याला, आपली कर्मकहाणी ऐकवायला एक श्रोता मिळाला याचा आनंदही या प्रश्नात असतो. तेव्हा एका साध्या वाक्यात आपल्याला जखडून ठेवण्याची किंवा आपले मन फुलवण्याची किंवा आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करण्याची ताकद काय आपण एकटेच आहात का ? या प्रश्नात असते.
तसं एकट्याने प्रवास करणं फायद्याचं असतं, तुम्ही बऱ्यापैकी श्रोते असाल आणि दुसऱ्याला सहन करण्याची काबिलियत तुमच्यात असेल तर तुमच्या ज्ञानात बऱ्यापैकी भर पडू शकते. फक्त हां, असं का? अरे वा!, फारच छान, काय म्हणता! हो का?, असं होय,मला नव्हतं माहीत, तुमच्याकडे बरीच माहिती आहे हो,मला नक्की याचा उपयोग होईल. इतकं संवाद सुरू ठेवण्यापूरत आपण बोललो तर समोरचा फुलतो. काही गोष्टीं रंगवून सांगतो, अगदी पोटातल्या गोष्टी त्याच्या ओठावर येतात. तो आपल्याला सांगत असताना,स्वतःच्या भाव विश्वात रममाण झालेला असतो. त्याच्या बोलण्यातून आनंद घ्यायचा,अनुभव घ्यायचा. चुका करणं टाळायला शिकायचं की अपमान करून घेण्यासाठी तोंड मोकळं सोडायचं हे त्याचं त्यांनी ठरवणं गरजेच आहे.
पण एकट्याने प्रवास करतांना, एकटं न पडण हे सर्वस्वी आपल्या हाती आहे. एकटं आहोत असं स्वतःला न बजावता अरे वा आज आपण कुटुंब सोडून एका वेगळ्या मोठ्या फ्रेममध्ये आहोत अस स्वतःला समजावलं तर कितीतरी नवे अनुभव गाठी जमा होतील. अर्थात तुम्ही एकटे लाख प्रवास कराल पण तुम्ही गाडीत पोचण्यापूर्वी तुमच्या सौ चा फोन येतो “अहो किंवा अरे ! पोचलास का स्टेशनवर? हे बघ तो न्युज पेपर शोधत फिरु नको आधी कोच बघून जागा पकड, रिझर्वेशन नसलेली कोणीतरी, मुला बाळांसह येईल, तुला म्हणेल, भाऊ जरा जागा करता का? उगाच मोठेपण करत जागा देवू नकोस, या बायकांना सवय असते. दादा, भाऊ करतील आणि सीट बळकावतील. मग सगळा प्रवास उभ्याने करावा लागेल. येतय ना लक्षात.” खरं तर हा तिचा स्वानुभव असतो. आपण तिची कटकट ऐकायला लागू नये म्हणून तिला सांगतो, “हे बघ मी गाडी पकडतोय, नंतर फोन कर.” ती नको तेव्हा जास्तच आज्ञाधारक बनते, पाचच मिनिटात पून्हा फोन करते, “सिट मिळाली ना? हे बघ बँग नीट तुझ्या जाग्यावर लावून घे. कोणीतरी तुझ्या लगेजच्या जागेवर बँग ठेवेल मग तुझी पंचायत होईलं, ऐकतोस ना? आणि हो तुझ्या जवळ कोणी बाई नाही ना?” तेव्हा हे लेक्चर पूढे ऐकावं लागू नये म्हणून तुम्ही हँलो,हँलो आत्ताच या नेटवर्कला जायला काय झालं म्हणत फोन बंद करता. तुम्हाला वाटत चला निदान थोडा वेळ तरी संकट टळलं. तासाभराने पुन्हा फोन येतो, “अरे ! चहा घेतलास का?” आपलं हो उत्तर ऐकण्यापूर्वी दुसरा प्रश्न, “सकाळीच उठला आहेस म्हणून निर्धास्त झोपू नको, बॅगवर डोकं ठेव नाहीतर कोणीतरी लंपास करेल. तुझ्या कंपार्टमेंटमध्ये कोण आहेत?” ईश्वराने समस्त महिला मंडळाकडून क ची बाराखडी चांगली खरून घेतली आहे हे तेव्हा लक्षात येत.
बायको ही कुटुंबातील अतिशय जागरूक व्यक्ती असते. कोणतीही कृती करण्यापूर्वी ज्या शक्यता असतील त्याचा विचार तिने आधीच केलेला असू शकतो. म्हणूनच काही व्यक्तींचा प्रवासातील जेवणाचा डबा इतका मोठा असतो की तो चार जणांना शेअर करूनही पुरतो. या गृहस्थांची गृहिणी मोठ्या मनाची आणि दयाळू वृत्तीची असते. अर्थात हे गृहस्थ पत्नीच्या क्रेडीटचा फायदा घेत उंची गाठतात.
तर काही पामर अगदी वडा पाववर निभावून नेतात, समजून जायचं ह्या गृहस्थांच्या घरी असण्याने किंवा नसण्याने सौभाग्यवतीना फारसा फरक पडत नाही. कदाचित डबा करून द्यावा लागेल म्हणूनही ती “अहो किंवा अरे ला म्हणते बारा महिने, तिनशे पासष्ट दिवस माझ्या हातंच खाता, एक दिवस चेंज म्हणून तुला आवडेल ते खां” ही धमकी असते की प्रेमळ अनुमती तिच तिलाच ठाऊक. जर तो मित्रांसोबत पिकनिकला जात असेल आणि त्याची सवय तिला माहिती असेल तर सांगते, “पैसे दिले आहेस म्हणून ताकदीबाहेर ढोसू नकोस. आणि हो उगाच बाहेर चिकन, मटण खाऊ नको. प्यायला की तुम्हाला काय खताय, पिताय शुद्ध नसते अस मी ऐकलंय म्हणून म्हणते.” किती हा सुक्ष्म अभ्यास.
affiliate link
असो तर एकटं प्रवास करण्याचे बरेच फायदे असतात, आपल्या समोर असणारं कुटुंब, आणि अर्थात कुटुंबातील स्त्री,आपण ऐकटे प्रवास करत आहोत पाहून आणि आपली दया येऊन आणलेल्या डब्यातील पदार्थ हात सोडून आपल्याला देते. तिचं त्या पदार्थांबद्दल कौतुक व्हाव अशी तिची अपेक्षा असते. तुम्ही फक्त वहिनीं आंबोळी छान झाल्याय हां, इतकं म्हटलं तर कदाचित अजून एखादी आंबोळी तुम्हाला दिली जाते. कारण स्त्री ही कौतुकाची भुकेली. नवरा नावाच्या प्राण्याने ते पदार्थ कंटाळा येईपर्यंत रिचवलेले असतात, तो स्तुती कशी करणार? म्हणजे आपण एकटे प्रवासाला निघालो तरी दुर्लक्षीत राहण्याची शक्यता कमीच. अर्थात तिचा नवरा सोबत असतांना अशी स्तुती करताना काळजी घेतलेली बरी कारण ती तेव्हाच नवऱ्याच्या कद्रू स्वभावावर तोंडसुख घेत म्हणते, “भाऊ आंबोळी बरी झाली आहे ना?” हो तर वहिनी आंबोळी एकदम सुरेख, बऱ्याच वर्षाने इतकी चविष्ट आंबोळी खातोय.” त्यावर ती म्हणते,” मी केलेली आंबोळी आमच्या माळ्यावर सगळ्यांना आवडते पण आमच्या ह्यांना आंबोळी अजिबात नाही आवडत, कौतुक राहिलं दूर, नुसती नाव ठेवत असतात.”
तो तिचं बोलण निमुटपणे सहन करतो कारण परक्या माणसा समोर अजून बेइज्जत करून घ्यायला नको. यदाकदाचित त्यांनी स्वतःच्या बचावासाठी काही सांगितले तर तिच्याकडे दुसरा बाण तयार असतो. तेव्हा चारचौघात शांत रहाण चांगलं नाहीतर तुमची तुलना अजून एखाद्या नवऱ्याशी झाली म्हणून समजा. तेव्हा प्रवासात स्त्रीला बोलू द्यावे ते बरे. तिची बोलण्याची हौस फिटते आणि आपण एखादं सुन्दर निसर्ग चित्र पाहू शकतो कसे?
अच्छा पण प्रवासात तुम्ही स्वतः एकट रहायचं ठरवलं तर तुम्हाला कोण सक्ती करणार, कोणी काही देऊ केलं तर फक्त एक दोन वेळा म्हणा की मी बाहेरच काही खात नाही. तुम्ही माणुसघाणे आहात हे लक्षात आलं तर कोणी तुमच्याकडे लक्षही देणार नाही, जर तुम्ही सोबत स्वतः पुरत आणल असेल तर ठीक पण तुम्ही बाहेरचे पदार्थ विकत घेऊन खाण्याचा विचारही केला तर तुमच्या हालचालीवर सहप्रवासी लक्ष ठेवून आहे ही भिती तुम्हाला काहीही विकत घेऊन खाण्यासाठी परावृत्त करणार. म्हणजे मी बाहेरच काही खात नाही एकदा म्हंटलत तर कंपलसरी उपवास घडणार हे निश्चित.
जेव्हा तुम्ही सहकुटुंब प्रवास करता तेव्हा तुम्ही बिनपैशांचे ओझेवाले असता, जर प्रवासात तुम्ही सौ कडे बँग दिली तर लोकांची सहानुभूती तिला मिळणार आणि तुम्ही गुन्हेगार ठरणार. बरं या बँगेत फारच फार तर तुमचे दोन जोड्या कपडे असणार आणि बाकी सर्व सामान बाईसाहेबांचच असणार. कमी सामान किंवा कमी कपडे घेऊन प्रवासाला जायची त्यांना मुभा नाही आणि सवय तर नाहीच नाही. तुम्हाला ढीग वाटेल चारच दिवस तर माहेरी किंवा लग्नासाठी बहिणीकडे किंवा भावाकडे जात आहेस एवढे कपडे कशाला हवे? पण जरा शांत डोक्याने विचार केला तर तुम्हालाही पटेल. लग्नकार्यात तीने एकच साडी किंवा ड्रेस घातला तर बेईज्जती तुमचीच होणार. मग साडी नेसायची म्हणजे त्या सोबतच्या accessories आल्याच की, सौभाग्य अलंकार, सँडल, मेकअप सामान आणि बरच काही. म्हणजे बॅगेचे वजन वाढणारच.
affiliate link
गंम्मत पहा, तिचा पेहराव मग साडी असो की ड्रेस आणि तिचं सजण उत्तम झालं तर कौतुक तिचेच होणार पण त्यात काही कमी झाली तर ती म्हणणार, “तरी मी तुम्हाला सांगत होते ती दुसरी साडी घेते, तुम्ही ऐकला नाहीत, एवढ्या दूर लग्नाला येऊन काय फायदा?” तेव्हा राग गिळून शांत राहणं चांगलं, बायकोशी वाद नाही घालायचा नाद नाही करायचा बायको बायको असते.
तुम्ही घरात किंवा एखादया समारंभात तुमचे आप्त, कुटुंबीय एकत्र झाले असताना गंम्मत म्हणून एखादी आठवण किंवा एखादी घटना चार चौघात सांगत असता आणि अचानक तुमची सौ म्हणते, “अलीकडे तुम्हाला काही आठवत नाही, ते तसं नाही झालं, मग पाल्हाळ लावत ती तीच घटना सांगते आणि म्हणते ते हे असं झालं होतं.” नवरोबाचे तोंड पाहावे तो नाईलाजने म्हणतो, “असं का? असेल तू म्हणते तर तसच असेल.” ती शाब्दिक झटापटीत हार मानणार नाही, उगाच आपली बाजू मांडत पंचनामा का करुन घ्या. प्रवासात असो की कौटुंबिक कार्यक्रमात, त्यांनी तिचे शब्द झेलणं अभिप्रेत असतं. तुम्ही तिला चारचौघात मोठेपणा दिला तर तुम्ही किती समजूतदार आहात ते ती मिठ मासाला लावून आपल्या माहेरच्या कुटुंबाला दहा वेळख सांगेल. फक्त तिच्या कोणत्याही योजनेत मोडता घालू नका म्हणजे झालं.
तुम्ही रजेच्या दिवशी पाय मोकळे करायला बाहेर पडण्याच्या बेतात असता इतक्यात ती विचारते, “आता आणि कुठे? सकाळी फिरून आलास ना? बरं, जातच आहेस तर मग सामानाची एवढी यादी वाण्याकडे टाकून ये, आणि लाँड्रीत टाकलेले कपडे तेवढे घेऊन ये.” अर्थात तुम्हाला आता पर्याय नसतो. बायकोने सांगितलेल काम निमुटपणे ऐकावं लागतं. ती कितीतरी आघाड्यावर लढत असते त्यामुळे एखादी आघाडी तुम्ही सांभाळलीत तर बिघडलं कुठे?
तुम्हाला ती सांगते किंवा आग्रह धरते म्हणून नाईलाजाने तिच्या सोबत तुम्ही खरेदीला जाता. तेंव्हा ती सांगते आज मी तुमचं काही ऐकणार नाही. मी म्हणेन ते कपडे तुमच्यासाठी आज घ्यायचेच आहेत. उगाच पैशांची अडचण सांगू नका मी काही मला घ्या अस म्हणत नाही. तुम्ही एखादं साधं म्हणजे खूप झकपक नसलेलं दुकान पाहून त्यात जायचं ठरवता पण तिची पावलं मात्र एका चमचमत्या शोरूमकडे पडतात, ते दुकान नुकतच सुरू झालेलं असतं. खरं तर त्यांच्या शोकेस, त्यातील ती मॉडेल आणि उंची कपडे आणि सेल्सउमन चा थाटमाट पाहून तुम्ही हादरलेले असतात,”अरे बापरे! इथे कपडे घ्यायचे म्हणजे नक्की कितीला बांबू लागेल? कोण जाणे.” पण तुमची सौ अगदी टाँक टाँक करत पायऱ्या चढते. सेल्सगर्ल तिचं हसून स्वागत करतात, तुम्ही तिच्या मागे, बकरा आता कापला जाणार आहे अशा आविर्भावात अनिच्छेने जाता. तुमच्यासाठी अनेक पॅन्ट पीस, शर्ट पीस काढून ती एक एक पीस तुमच्या शरीरावर ठेऊन पाहते, आरशात पहायला सांगते किंवा चेंजिंग रूममध्ये बदलून यायला सांगते. सेल्समन आणि ती अस दोघे मिळून ती दोन तीन पॅन्ट आणि शर्ट पीस सिलेक्ट करते. तुम्ही त्या कपड्याच्या पुठ्ठ्यावरील भाव पाहुनच घामाघूम होता. तुमची चुळबूळ सुरू असते तो वर सेल्समन म्हणतो, मॅडम साहेबांना एखादं झब्ब्याच कापड दाखवू की मग रेडिमेड घेता. पहा मॅडम हा मोरपीशी साहेबांना छान दिसेल की मग टी शर्ट घेताय, तुम्ही तिला खुणेनेच नको म्हणून सांगण्याचा प्रयत्न करताय पण सेल्समनने मॅडमला हरभऱ्याच्या झाडावर बसवलेलं असतं त्यामुळे ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. दोन रेडिमेड टी शर्ट उचलत अंगावर धरून कसे दिसतील ते पाहत सिलेक्ट करते.तो नाराजीने तिच्याकडे पाहतो. तसं ती म्हणते, अहो नाहीतरी तुम्ही स्वतः मुद्दाम खरेदीला येता कुठे? गेल्या दोन तीन वर्षांत तुम्ही कुठे काही खरेदी केलय?” आपली स्थिती अगदीच केवीलवाणी झालेली असते. पूढे अजून काय वाढून ठेवलय त्याचा विचार आपण करत असतो.
तीचा एकंदर मूड बघत सेल्समन तिला गळाला लावतो. “मॅडम, साहेबांना घेतलं पण तुमच्यासाठी काहीतरी घ्या,तुम्ही काहीच स्वतःसाठी घेतलं नाही तर साहेबांना आवडेल का?” आयला इज्जतीचा पंचनामा व्हायची पाळी असते, पण सेल्समन पुन्हा पुन्हा आग्रह करत असतो आणि तुम्ही मनावर दगड ठेऊन सांगता. “घे गं, तुलाही एखादी साडी नाहीतर एखादा सुंदर ड्रेसपीस घे.” ती तुमच्याकडे पहात अतिशय गोड हसते, पडत्या फळाची आज्ञा मिळताच तिचे हात सरसावतात, तो पर्यंत तुमच्यासाठी कोकोकोला आलेलं असतं, तुम्ही ते विष प्यायला दिल्याप्रमाणे दूर करता, पण सेल्समन चिवट असतो,”साहेब कोकोकोला नसेल आवडत तर मँगोला मागवतो.” मनातला राग गिळून तुम्ही म्हणता, “अहो नका मागवू ,चालेल कोकोकोला, आम्ही दोघात एक घेतो.” तो म्हणतो, “अस कसं? मॅडम तुम्हाला काय मागवू, लस्सी मागवतो, चालेल ना?उन्हाळा कडक आहे, लस्सी बरी.” तो समोरच्या मुलाला सांगतो, “बेटा एक लस्सी लाव तो.” तो पर्यंत दुसरा सेल्समन तुमच्या पत्नीच्या समोर वेगवेगळ्या साड्यांचे ढीग लावतो. “मॅडम, ही पटोला, ती जॉर्जेट, नाही आवडली? असुद्या ही कांजीवरम पहा एकदम नवा स्टॉक आहे, नाहीतर अस करा ही इंदोर हँडलूम घ्या, अजिबात गरम होणार नाय, कितीपण वापरा रंग अजिबात नाय जाणार. काय मॅडम शिफॉन दाखवू का?” तुमची पत्नी तुमच्या चेहऱ्यावर बघते तर तो म्हणतो, “मॅडम तीन हजाराची आहे तुम्हाला म्हणून कमी करून देतो, अठ्ठावीश्शे होतील. बघा तुम्ही आपलं नेहमीच कस्टमर म्हणून एकदम दोनशे कमी केले.” ती नकारार्थी मान हलवते तस तो म्हणतो. “तुम्हाला कीतीला परवडते ते सांगा तर खरं, बिझनेस हाय, राग ठेवून कसा चालेल?” ती दोन बोट दाखवत म्हणते, “अहो बरोबर ना?” तुम्ही मान डोलावता तेवढच तुमच्या हाती असतं. सेल्समन म्हणतो मॅडम, एवढ्या स्वस्तात कशी मिळेल आमाला पणं काय तरी सुटलं पायजेल की नाय? चला एक वार्ता करतो, अडीच हजार देऊन टाका,पाचशे कमी केले आता नाय म्हणू नका.”
तिढा सुटत नाही, शेवटी तुम्ही म्हणता, “तुमच नको आणि आमच नको बावीसशे घेऊन टाका.” सेल्समन आढेवेढे घेतो आणि साडी कॅश काउंटर कडे भिरकवतो. “ठीक आहे तुमचं मन ठेवतो, पैसा काय कधीही कमावता येईल, माणुसकी टिकली पाहिजे. साहेब बरोबर ना?” तुम्ही फक्त हसता. मॅडम अजून काही हवंय का, ही मिडी बघा, हवं तर ट्राय करून बघा तुमचं वय कळणारही नाही,साहेबांना घालून दाखवा. फार महाग नाही आहे, फक्त चारशे. लागल्यास आता नका घेऊ पण घालून तर पहा वय दहा बारा वर्षे कमी वाटेल. तो ती मिडी आणि टॉप तिच्या हातात देतो.तीचा नाईलाज होतो. ती चेंजिंग रूममध्ये जाऊन ती मिडी आणि टॉप घालून येते. स्वतःला आरशात पाहते आणि तुमच्याकडे पाहून गाली हसते, तुम्ही तिचा पोरकट लुक पाहून कसनुस हसता. ती मोहरते. खरेदी संपते.
सेल्समन बिल तुमच्या पुढ्यात ठेवतो, “आयला चौदा हजार बिल झालं?” डोळ्यासमोर पुढच्या महिन्यात भरायच्या एलआयसी हप्त्याची रक्कम तरळते. सेल्समन विचारतो साहेब पेमेंट कस कार्ड देताय की कँश. ती पटकन पर्स उघडते आणि गुंडाळून आणलेल्या पाचशेच्या नोटा मोजून पूढे करते. तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसतो. चौदा हजार कॅश तिने वाचवून ठेवलेली असते. दुकानाच्या पायऱ्या उतरतांना तुम्ही खरेदीच्या सगळ्या पिशव्या घेऊन तिच्या मागोमाग चालता आणि थोडं दूर गेल्यावर कौतुकाने तिच्या पाठीवर हळुवार चापट मारता. ती गोड हसते. “तुम्हाला काय वाटलं, तुमचा खिसा कापला?” आपल्याला पटतं, काही म्हणा, ती कधी वड्याच तेल वांग्यावर काढेल तर कधी कपाळावर तेल घालून मालीश करेल, सांगणं तसं अवघडच. मित्रांनो बायको बायकोच असते.भावनेच्या भरात लिहीत राहिलो तर कुठे थांबावं कळणार नाही आणि उगाचच वाईटपणा पदरी पडेल, तेव्हा पुन्हा कधीतरी नव्या विषयासह तो पर्यंत. “काढ सखे गळ्यातील तुझे हे हात.”
़