बॉबी
एकोणीसशे सत्त्याहत्तर साल होतं. मी नववी इयत्तेत शिकत होतो. फारसं काही कळत नव्हतं, पण दहावी वर्गातील काही मुले कुठेतरी एकांतात चर्चा करू लागली की ही काय बोलत असावी असा विचार यायचा. त्या वेळी वर्गाचा माॅनेटर, जनरल सेक्रेटरी अशा निवडणुका व्हायच्या, मुख्य म्हणजे या निवडणूकीत विद्यार्थ्यांचा प्रचारही वर्गावर्गात जाऊन करत असू. मी आणि मित्र हावभाव करत गाणी म्हणत असल्याने आम्हाला प्रचारासाठी बोलवत.
शाळेतील मोठ्या विद्यार्थ्यांना त्या काळी प्रेम प्रकरणं कळायचं की मीच अनभिज्ञ होतो हे नक्की सांगता यायचं नाही. पण तेव्हाही त्या काळातील गाजलेल्या हिंदी चित्रपटातील duet गाण्यांची मला माहिती होती, दोन दोन कडवी तालासुरात मी गात असे. शाळेत सर गैरहजर असले की कधीतरी अगदी हिंदी चित्रपट गाण्यांच्या भेंड्या आम्ही मुले खेळत असू. मुख्य म्हणजे आम्ही हळू आवाजात भेंड्या खेळायला आमच्या हेडसरांचा आक्षेप नसे. शेजारच्या वर्गाची तक्रार येऊ नये असे त्यांचे म्हणणे असे.
माझा आवाज फार चांगला नसला तरी आम्ही अनेक हिंदी गाणी ताला सुरात म्हणत असू. या गोष्टीचा वापर निवडणूक काळात आपली जाहीरात करण्यासाठी इतर मुले करत.
बॉबी पिक्चर रिलीज झाला तेव्हा त्याची सर्वच गाणी खूप गाजली आणि पाठही झाली. “हम तुम एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाय”, “मै शायर तो नहीं”, “ना मांगू सोना चांदी ना मांगू बंगला गाडी,” “झुट बोले कौआ काटे” सगळी गाणी कोरससह सर्व विद्यार्थी म्हणत. काळे मॅडम रागाने म्हणत “यांना कविता पाठांतर जमत नाही, पण यांची गाणी मात्र एकदम पाठ”.
मॅडम पन्नाशीच्या आणि आम्ही बारा ते पंधरा वयोगटातले. ऋषीकपूर तेव्हा वीस वर्षाचा आणि डिंपल सोळा वर्षांची. राज कपूरने तरूणांची नस अचूक ओळखली. का पिक्चर हिट होणार नाही? हेच ते वेड वय, ज्या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाटू लागते. कुणाशी तरी लाडीक बोलावं, त्याला किंवा तिला मदत करावी, गॉसिप करावं असं वाटू लागते.तेव्हा माझी काय स्थिती होती ते सांगणं तसं खरच अवघडच, आईच छत्र हरपलं होतं मला प्रेम, मैत्रीण याचे त्यावेळी कोणतेही आकर्षण नव्हते, समजही नव्हती आणि माझे एकट्याचे शिक्षण सुरू होते त्यामुळे माझ्या मोठ्या बंधूची माझ्याकडून खूप अपेक्षा होती.
तेव्हा संपूर्ण गावात काही मोजक्या लोकांकडे T.V. ,Tape recoder होते. T.V. वर फक्त शनिवार, रविवार ह्या दोन दिवशी संध्याकाळी पाच वाजता पिक्चर लागत असे, शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी. ज्यांच्याकडे TV होता ते पिक्चर पहायचे पंचवीस पैसे घेत. तेव्हा पंचवीस पैसे देणे सर्वच पालकांना शक्य नव्हते.
मात्र काही मुले touring टॉकीज ला नवीन पिक्चर आला की पहिला शो पहात होती. मुळात बाॅबी पिक्चर आमच्या गावात यायला दोन वर्ष लागली. आमच्या घरी असले चोचले पुरवण्यासाठी पैसे नव्हते मात्र त्या टुरिंग टॉकीजच्या कॅटीनला आम्ही दूध पुरवत होतो. तेव्हा वरळी डेअरी, गोकुळ, महानंदा असली थेर गावात नव्हती. सर्व गावात प्रत्येकाकडे किमान एक दुभते होते. मी त्या कॅंटीनला दूध घेऊन रोज वेगळ्या वेळी जात असे आणि दारावरचा पडदा सरकवून पिक्चर थोडा-थोडा पहात असे. ही माझी लबाडी कॅंटिन मालकाच्या लक्षात आल्यावर त्याने तंबी दिली “वेळेवर दूध आणलं नाही तर दूध घेणार नाही.”
मी काकुळतीला येऊन म्हणालो “दादा हा पिक्चर मला बघायचा होता आता नाही करणार उशीर”. त्याने मला थेटरमध्ये नेऊन बसवलं. पिक्चर सुटला तेव्हा दहा वाजले होते. संपूर्ण अंगात ऋषीकपूर भिनला होता. काय त्याची अदा, त्या गालावरच्या खळ्या, फार गोड दिसायचा. ऋषी,चक्क foreigner वाटायचा, डिंपलच तर काही विचारूच नका ती त्या मिडीच्या पेहरावात झकास दिसायची. अवघी सोळा वर्षांची, नुकतंच तारूण्यात पदार्पण केलेल वय आणि तिच्यासाठी निवडेलेले ड्रेसेस इतके क्यूट होते की वर्षभरात त्याचे अनुकरण झाले. मी बाॅबी पिक्चर पाहून घरी आलो, येताना दूधाचे भांडे कॅंटीनवर विसरलो. घरी उशिराने पोचल्यानंतर काय होणार ते परततांना जाणवलं. वडील वाट पहात होते. त्यांनी डोळे वटारून पाहिले, मी मान खाली घालूनच घरात शिरत होतो तो त्यांनी विचारल “दूधाच भांड कुठे? काय करत होता तिथे?” मी खाली मान घालून पिक्चर पाहील्याच सांगितल, तसं रागावून म्हणाले “पोट भरलं असेल पिक्चर पाहून तर झोप, म्हणजे अक्कल येइल”. मी म्हणालो, “चुकलो पून्हा नाही थांबणार पिक्चर पहायला”. तसं रागावत म्हणाले “उद्यापासून मी दूध देऊन येईन तू कुठेही जायचं नाही. पुढच्या वर्षी बोर्डाला परीक्षेला जायचयं, असल्या म्हारक्या नको. जा, झाकून ठेवलंय ताट जेवायचं तर जेव, नको असेल तर गाय खाईल”.
यानंतर टुरिंग टॉकीज ला जाणं बंद झाले. पण बॉबी स्वप्नात येऊन गेली. सर्व तरुणांच्या दिलाची धडकन बनली. आमच्या वर्गात अशीच एक गोरीगोमटी दोशी नावाची कन्या होती. दिसायला मारू नसली, तरी बरी होती. ह्या मुलीचं आणि दहावी मधल्या मुलाचं येणं जाणं एकाच भागातून होते. त्यामुळे तो मुलगा तिच्यावर लट्टू झाला होता आणि इतर मुलेही त्याला तिच्या नावाने हाक मारत. मुलाने यातून प्रगती करत तिला प्रेमपत्र लिहिले आणि इतर मुलामार्फत तिला देण्याचा प्रयत्न केला. या भीमकार्यात मलाही सोबत घेतलं आणि ही बाब उघड झाल्याने आमच्या P.T. शिक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी आम्हा चार मुलांना ऑफिस मध्ये बोलावून घेतलं आणि हम तुम एक कमरे मे बंद हो च्या चालीवर पट्टीने तडाखे लगावले. मला थांबायला सांगितलं आणि म्हणाले,” ब्राह्मण ना तू ,अभ्यास करण्या ऐवजी असले उद्योग करतोस? उदया तुझ्या घरी कळवतो, पून्हा सापडलास तर नावच काढून टाकीन”. मी निमूट मान खाली घालून उभा. शहाणपणा केलाच होता, आत्ता होईल ती शिक्षा भोगायला तयार होतो. वाईट याचंच वाटत होत माझ्या पालकांना माझ्या चुकीमुळे ऐकावं लागणार होत. पण सरांना दया आली आणि बाॅबी प्रकरण संपुष्टात आलं.
दोन महिन्यांनंतर आम्हाला मिळालेल्या सुत्रांच्या माहिती नुसार त्या दोघांचं चिठ्ठ्या चपाट्या प्रकरण बहरलं. तेव्हा लॅंडलाइनही फारच थोड्या मान्यवर लोकांकडे मग आता जसा मोबाईलने पटकन कळवता येत तसं बोलणं कुठून शक्य असणार? पण त्या बातमी नंतर तिला सर्व बाॅबी म्हणू लागले आणि आम्ही त्या प्रकरणाचा धसका घेतल्याने याची वाच्याताही आम्ही केली नाही.आजही जर या पिक्चरचे गाणे लागले तर आठवतात सरांचे फटके आणि अर्थात Bobby.
ऋषि कपूर वारला तेव्हा पून्हा एकदा तीच गाणी TV वर दाखवली आणि भूतकाळाचा पडदा दूर सारत मी १९७७ सालात पोचलो सरांनी दिलेले फटके आठवले आणि गाणेही. “हम तुम एक कमरेमे बंद हो और चाबी खो जाय”. शाळेतील त्या जोडीने भिन्न जातीमुळे लग्न केले नाही आणि ती बॉबीची जोडी हरवली.
मात्र ऋषि कपूरच्या निधनाने पून्हा आठवणींचा बुरखा फाडत बाहेर आली. बॉबी होय तुझी आजही आठवण आहे.