भातूकली
देवगडातल्या चौसोपी वाड्यात आजी एकट्याच रहात होत्या, हो एकट्याच. म्हणजे बापट आजोबा जाऊन दहा वर्षे झाली तेव्हापासून त्या एकट्याच ह्या आठ खणांच्या वाड्यात रहात होत्या. नाही म्हणायला घरकामाला पार्वती आणी बाग शिंपायला तिचा नवरा यायचा. रात्री त्यांच्या सोबतीला पटवर्धन यांची सून यायची पण इतर वेळेस एवढ्या मोठ्या वाड्यात त्या अगदी एकट्या असायच्या.त्यांना कोणी विचारलं, आजी तुम्ही एकट्याच एवढ्या मोठ्या वाड्यात रहाता! तर बोलता बोलता म्हणायच्या, “या वाड्यात मी भुतासारखी रहात असतांना येईलच कोण?” त्यांना तिन मुले, मोठी झाली आणि पंख फुटताच घरटे सोडून उडूनही गेली. सणावाराला त्यांना मुलांची आठवण यायची. तिनही मुलांचा सणावारालाफोनही यायचा. पण ती आपल्या संसारात गुंतली आणि मग फोन येणही कमी होत गेलं.
मोठा मुलगा रोहन मुंबईत वरळीला रहायचा आणि धाकटा रत्नाकर अमेरिकेत, दोघांच्या मधली मुलगी रेवा पुण्यात चिपळूणकरांकडे दिली होती. मोठा मुलगा, सुन आणि नातू तिची विचारपूस करायचे. लहान मुलगा आठ, पंधरा दिवसांनी फोन करायचा पण सणावाराच त्याचा अजिबात लक्षात नसे. गेले अनेक वर्ष, मुलांच्या शाळांना रजा पडली की रोहन आणि रेवा पंधरा दिवसांसाठी देवगडात डेरेदाखल व्हायचे. त्यांच्या मुलांच्या आवाजाने वाडा अगदी गजबजून जायचा. माडीवर चढताना लाकडी जिना दणदणत रहायचा. दोघांची मुल मोठी झाली आणि त्यांच येण कमी झाल.
आता रोहन कधीतरी अचानक येतो, येताना आईसाठी बरेच काही घेऊन येतो. आणत नाही तो वेळ, आला की चहा घेता घेता आणलेल्या वस्तूंचा पसारा मांडून आईला एक एक वस्तू दाखवतो त्या वस्तू तिच्या सुनेने मुद्दाम तिच्यासाठी कश्या घेतल्या त्याचे रसभरीत वर्णन करतो आणि बोलता बोलता हे ही सांगतो की, “आई परवा संध्याकाळी मी निघणार आहे बर.” , तो आला आहे, खास तिच्या भेटीसाठी, हे सुखही तिला पोचेपर्यंत त्याने जाणार आहेचा मिठाचा खडा टाकून त्या सुखाचे दूध नासवून टाकलेले असायचे.
आईला त्याचे, परवा मी जाणार आहे एवढेच शब्द ऐकू येतात आणि आई मनातून खट्टू होते. तिला मुलाने आणलेल्या वस्तू दिसतच नाही त्या जागी दिसतात डबडलेल्या डोळ्यात जमा होणारे स्वतःचे एकलेपणाचे दुःख. रोहन आईकडे पहातो आणि म्हणतो, “आई तू एकही वस्तू हातात घेऊन पाहिली नाहीस की त्याबद्दल काही म्हणाली नाहीस.” ती ओघळणारे अश्रू पदराने पुसते आणि म्हणते, “अरे तू आणल्या आहेस ना,आणि सूनेनी माझ्यासाठी घेतल्यात तर त्या चांगल्याच असणार. बरं मला सांग माझा नातू स्वप्निल काय म्हणतो. त्याला का नाही आणलस?”
“अग आई तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि इथे येऊन त्याचा वेळ उगाचच फुकट नाही का जाणार ? येईल की पून्हा कधीतरी.” रोहन आईची समजूत घालतो.त्याचा वेळ उगाचच फुकट नाही का जाणार? या वाक्याचे काटे तिच्या मनावर ओरखाडे उमटवून जातात.
affiliate link
आजही अगदी तसेच झाले, रोहन कोकण कन्येने कणकवलीत उतरून आठ वाजताच घरी हजर झाला. ती दारासमोर प्राजक्ताची फुल वेचीत होती. परडीत पोवळ्याच्या रंगांचा नाजूक देठ असणारी शुभ्र फुल लगटून बसली होती. तो येणार असल्याचा फोन कालच आल्याने ती अधिरतेने वाटच पहात होती. त्याची चाहूल लागताच तिने साद दिली, “आलास का रे सोन्या?” त्याच त्यालाच हसू आलं. पन्नासाव त्याला नुकतच लागल होतं आणि आई मात्र “सोन्या” म्हणून हाक मारत होती. पायरी जवळच्या सिमेंट चौथऱ्यावर गरम पाण्याची बादली भरून ठेवली होती. त्याने त्या कडथ पाण्याने पाय धुतले. सर्व आवरून तो स्वयंपाक खोलीत आला. चहा पाणी झाल्यावर नेहमी प्रमाणे रत्नाकर,रेवा यांच्या फोनची चौकशी करून झाली. आठवण झाली तशी त्याने सुटकेस समोर आणून उघडली आणि आणलेल्या वस्तू बाहेर काढून पसारा मांडला.
नेहमी प्रमाणे त्या वस्तू बायकोने तुझ्यासाठी कुठून कशा आणल्या त्याच रसभरीत वर्णन केलं. तिने त्या वस्तूंवरून नजर फिरवली. “अरे मी एकटी बाई, हे एवढ सगळ दरवेळेस कशासाठी आणतोस, तुम्ही सर्व रहायला येता तेव्हा ठिक आहे, मला काय वाटत, एवढ उगाचच आणू नको.” रोहन रागावत म्हणाला, “तिने एवढ आवडीने पाठवल पण तुला त्याच आहे का काही कौतुक?” “अरे रोहन, सोन्या, तू कधी चार दिवस थांबतोस का? आईची खुशाली घ्यायची म्हणून येतोस आणि पाहुण्यांनी रहावं तस एक रात्र थांबून निघून जातोस मग ह्या आणलेल्या वस्तूंच मी एकटी काय करणार? तुझे पैसे फुकट जाऊ नये असे वाटते रे.”
“आई, उद्या संध्याकाळी मी निघणार आहे बरं, मला सुट्टी नाही पण धावती भेट द्यावी म्हणून आलो.” त्याचे शब्द ऐकून ती थबकते. “पाहिलंस, तुझ हे असं आहे. उगाच नाही मी म्हणत येताना “जातं” घेऊन येतो. तू येऊच नकोस मुळी, तू जाणार हे आठवून मन कावरबावरं होतं. तुझ्या येण्याच कोतूक नको आणि जाण्याच दुःख ही नको. जा बाबा जा, तिथे तुझी बायको मुलं आहेत, इथे आहेच कोण? का थांबशील इथे?”
तो काही न बोलता, तिच्याकडे पहात रहातो, तिचा राग अगदी योग्य आणि सात्विक आहे याची त्याला कल्पना असते. पण! या पण च उत्तर त्याच्याकडे नसत. ती आधार घेत उठते रोहनने आणलेल्या वस्तू आवरते आणि स्वयंपाक खोलीत जाता जाता विचारते, “बरं मला सांग तुला स्वयंपाक काय करू, वालाच्या डांळीब्याची उसळ आणि वरण भात चालेल की शेवग्याच्या शेंगाच पिठल आणि डाळीची आमटी.”
affiliate link
“आई, सहज काय होईल ते कर, मला तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत उगाच जेवणात नको अडकू.”, “असं कसं म्हणतोस? अरे वर्षानी एकदा येतोस तर तुला काहीतरी करून मी कशी वाढू? अस करते डाळींब्यांची उसळ आणि वरण भात करते आणि उकडीचे मोदक करते, लहानपणी किती आवडायचे, तुला, आठवते? कधीकधी रत्नाकरला एखादा जास्त दिला तरी तू माझ्यावर रूसून बसायचा.” ती त्या जुन्या आठवणीत रमते.
रोहन आपण तिच ऐकतोय हे कळावं म्हणून हो हो करत असतो पण त्याच सगळं लक्ष आणलेला तरूण भारत वाचण्यात असतं. “अरे! तू काहीच म्हणत नाहीस मी आपली एकटीच बडबड करत्याय, ऐकतोस ना?” “हो ग आई, पण आता तू मोदक नाही केले तरी चालतील. म्हणजे मी हल्ली फारसे नाही खात, वजन वाढते ना!” तिच्या उत्साहावर पाणी पडते. तरी ती म्हणते, “अरे एका नारळाचे होतील तेवढे, आपली पार्वती आणि नरसू आहेत की, त्यांनाही दोन दोन दिले की झाल.”
“बर तुला करायचे तसे कर, आई, मी थोड बागेत फिरून येतो, तोवर मला आंघोळीच पाणी ठेऊन दे.” “अरे रोहन, तू येणार म्हणून सकाळीच पाणी तापत ठेवलय बरं, चांगल घंगाळभर पाणी घेऊन अंग शेक, प्रवासाचा शीण निघून जाईल हो !” बागेत जाता जाता त्याच्या कानावर आईचे घंगाळभर हे शब्द कानी पडतात.
माडीवर कितीतरी तांबे, पितळेची भांडी पडली होती. त्यांना गेल्या कित्येक वर्षात कुणी हातही लावला नव्हता. आईने का म्हणून ती अडचण ठेवली असावी? असा विचार त्याचा डोक्यात आला आणि त्याला अचानक आठवले रश्मीने निघतांना त्यांच्या घरातील जूनी चांदीची भांडी आणायला सांगीतली होती. तो बागेत जाता जाता पून्हा घरात आला, “अगं आई, आपल्या कपाटाच्या चाव्या देतेस का? त्यातल्या काही वस्तू हिने आणायला सांगीतल्या आहेत.” “अरे कपाटात भरपूर अडचण आहे तुला काय हव ते सांग मी देते, तुला शोधूनही सापडायचं नाही हो.” “आई मला चांदीची भांडी पहायची होती, ही म्हणाली येतांना अत्तरदाणी। आणि तबक तेवढ घेऊन या, नाहीतरी इथे ती पडूनच आहेत तर त्याचा मुंबईत वापर तरी होईल.”
आजीच्या मनी आले, आमच्या ह्यानी खास रत्नागिरी वरून देवाची पूजेची भांडी आणि हळदी कुंकू समारंभासाठी ही अत्तर दाणी, कुंकवाचा करंडा आणि तबक आणले होते. या त्यांच्या आठवणी या वाड्यात जपायच्या की पूसून टाकायच्या पण त्या काही बोलल्या नाही, त्या रोहनला म्हणाल्या, “तू ये हो बागेतून, मी चांदीची सर्व भांडी काढून ठेवते.”
रोहन बागेत पहायला गेला त्याच्या मागोमाग, नरसू त्यांचा विश्वासू जुना नोकर त्याला बाग दाखवत होता. “काका, माडांचा पाडा झाला का?” रोहनने विचारले. “झाला की रोहन बाबू, चार हजार नारळ मिळाले, खोलीत आहेत, व्यापारी येतो म्हणाला.” नरसू म्हणाला. “काका, अहो एवढे नारळ, खोलीत अडचण का ठेवता? देऊन टाकायचे, काही जनावर मध्ये शिरल तर?.” “रोहन बाबू , थोडे थोडे नारळ विकले तर व्यापारी नीट भाव देत नाही म्हणून माई टेम्पोभर नारळ एकदम देतात.” नरसू म्हणाला. “काका, आईकडून चावी मागून आणा खोलीची. “रोहन पासष्ट वर्षांच्या नरसूला म्हणाला. “या रोहन बाबू, खोलीला कुलूप नाही, बागेत पडलेले नारळ रोज जमा करून खोलीत टाकायला लागतात म्हणून माई कुलूप लावत नाही.” नरसूने खोलीची कडी काढली, खोली, असोल्या नारळाने गच्च भरली होती. रोहनने नारळाने गच्च भरलेल्या खोलीचे दार लावून घेतले.किती धांदरट आहे माई? खोलीला कुलूपही लावत नाही. तो मनात म्हणाला.
नरसूने त्याला बाग फिरून दाखवली, नवीन लावलेल्या नारळाची रोपे डुलत होती, उंचच उंच वाढलेल्या नारळी, पोफळी आणि नारळाच्या खोडावर लगटून चढलेल्या मिरवेली. अतिशय प्रसन्न वाटत होते. त्याने उगाचच मीरवेलीची दोन पाने चुरडून नाकाला लावली. त्याचा तिखट गोड वास नाकात भरून घेतला.
“रोहन बाबू मीरी काढलेली आहेत बर, माईकडे मागून घे.”
चालत चालत ते जुन्या विहिरी जवळ आले. विहिरीचा कठडा एका ठिकाणी तुटला होता, त्याच्याकडे बोट दाखवत नरसू म्हणाला, “रोहन बाबू माई म्हणते ही विहीर आत्ता आमच्या सारखी म्हातारी झाली, वादळात फणस कुपळून विहिरीवर पडला तेव्हा कठडा तुटला आहे, मोटरच्या केबीनच पण नुसकान झालय, माई म्हणाली रोहन आला की दुरूस्ती करून घेईल. रोहन बाबू करायची ना दुरूस्ती?” अचानक आलेल्या प्रश्नांनी तो गोंधळला, “हो हो, करूया की, जरा मोठी सुटी मिळाली की नक्की करूया.” त्याने वेळ मारून नेली. “बरं काका, लक्ष ठेवा, अशी बारीकसारीक दुरूस्ती तुम्हीच का करून घेत नाही. आईला मी सांगतो पैसे द्यायला.” “रोहन बाबू हे काम जरा जोखमीच, मालकांनी करुन घेतलेल बर असते, खर्च केलेला पैसा कारणी लागय नको का?” त्याने मान डोलवत नरसूचा निरोप घेतला, पण दुरूस्तीच कोणतच आश्वासन न देता तो माघारी फिरला. नरसूला वाईट वाटलं, तरीही तो रोहन मागोमाग चालत राहिला, “रोहन बाबू, तू आहेस ना चार दिवस सकाळी शहाळी काढून ठेवतो.” “काका, कशाला करताय एवढी दगदग, म्हणजे मी उद्या संध्याकाळी निघणार आहे आणि इथून शहाळी मुंबईला न्यायची म्हणजे —-” “तू नेल्याशीवाय मुलांना कसं मिळणार. मी चांगली तासून तयार करतो. मुलाला गाडीवर पाठवतो की.”
रोहनला नरसू काकाला नकार देण जड गेलं. तो लहान असल्यापासून नरसू आणि त्याची बायको पार्वती कामला आहेत. पार्वतीच्या खांद्यावरच तो लहानाचा मोठा झाला पण आता ते संदर्भ आठवून फक्त त्रासच झाला. त्याने परसदारी चक्कर मारली तिथूनचं शेजारी पटवर्धन काकांच्या घरी गेला. काका त्यांच्या आराम खुर्चीत बसून पेपर वाचत होते. त्याला पाहताच पेपर बाजूला ठेऊन त्यांनी हाक मारली, “रोहन कधी आलास बाबा? सर्व कुशल आहे ना ?” तो त्यांच्या पाया पडता पडता म्हणाला,”सकाळी कोकणकन्येन आलो, तूम्ही कसे आहात काका? काकू काय म्हणतात?”
affiliate link
त्यांनी आतल्या खोलीकडे पहात हाक मारली ,”अहो! पाहिलत का, बाहेर या पहा कोण आलय, मग रोहन, आता राहशील ना आठवडाभर?” काकानी विचारलं. “नाही हो काका, उद्या संध्याकाळी निघीन म्हणतो, परवा ऑफिसमध्ये मीटिंग आहे. आणि मला हजर राहणं गरजेचं आहे.” रोहन म्हणाला.
“अरे हो तू कंपनीत Director झालास म्हणें, सिंधू वहिनी सांगत होत्या, तुला कसा वेळ मिळणार म्हणा? कंपनीचा director म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का? असो बायको, मुले कुशल आहेत ना, नाही म्हणजे बऱ्याच महिन्यात आली नाहीत म्हणून म्हणतो हो, बिचाऱ्या वहिनी वाट पहात असतात.”
“मुलाचे इंजिनिअरिंग सुरू आहे त्यामुळे, नाही वेळ मिळत, पण दर आठवड्यात खुशाली घेत असते ती.” रोहन म्हणाला.
पटवर्धन काकू एक हात कमरेवर ठेवत बाहेर आल्या आणि त्याच्या हाती दुधाचा पेला देता देता म्हणाल्या, “घे आमच्या नंदिनीच आहे हो. सकाळीच मोरेश्वर धार काढून गेला.” ते गरम दूध तोंडाला लावता लावता रोहनने विचारले, ” काकू, दिलीप कसा आहे? गेल्या सहा महिन्यात त्याचा फोन नाही.” “अरे! तुला माहिती नाही का? , चार महिन्यांपूर्वी त्याची एन्जोप्लास्टी झाली आहे. तू नाही का त्याला फोन करत? असे कसे रे तुम्ही शेजारी? पटवर्धन काकू बोलल्या.
काका म्हणाले, “अहो! तुम्ही इथे रिकाम्या, बिनकामच्या आहात, पूण्यामुंबईत कोणाला गप्पा मारायला वेळ आहे का? दोन डोळे एकमेकांना भेटत नाहीत मित्र कुठून भेटणार? त्यातून आपला रोहन बडा साहेब आहे, वेळ असायला नको. अर्थात ही शाल जोडीतून मला उपरोधिक टोचणी असावी.” “मला कुणी हाक मारल्याचा आवाज येतोय हो, बहुतेक सिंधू वहिनी! तुझी आई हाक मारत असावी, सावकाश जा हो. जमलं तर राहा दोन दिवस, तेवढं सिंधू वाहिनीच मन रमेल. बिच्चारी! एकटी असते.”
त्याने ऐकून न ऐकल्या सारख केलं, “काका येतो हो.” , निघता निघता तो काकूंच्या पाया पडला. त्यांच्या हाती पाचशे रुपये ठेवत म्हणाला, काकांसाठी काही आणलं नाही.”, “अरे रोहन हे कशाला? उगाच आपलं काहीतरी, नीट जा हो.” रोहन घरी आला, “अग मी शेजारी गेलो होतो, काका काकूंना भेटून आलो,
हं सांग, का हाक मारत होतीस? आणि दिलीपच ऑपरेशन झाल्याच म्हणाली नाहीस ते? निदान फोन तरी केला असता ना”
“म्हणजे, दिलीपचं ऑपरेशन झाल्याचं तुला माहीतच नाही की काय? रोहन कमाल झाली हो, अरे मुंबईमध्ये राहता, एकमेकांना फोन तरी करत जा. ते आपले शेजारी आहेत, गेले दहा वर्षे त्यांच्या भरवश्यावर इथं एकटी राहते, रेणू रात्रीची सोबतीला येते म्हणून मला झोप तरी लागते नाहीतर या एवढ्या मोठ्या घरात मी एकटी,—-” “बरं, वेळ मिळाला की दिलीपला भेटून येईन मी, तू काय सांगत होतीस ते सांग.आणि ते एवढे नारळ तसेच उघडयावर टाकले कोणी नेले तर?” रोहन म्हणाला.
“कोणी नाही हो नेत, पुढच्या आठवड्यात व्यापारी यायचा आहे, देईन हो मी. तू म्हणालास ती चांदीची अत्तर दाणी आणि हे तबक काढून ठेवलं आहे. सूनबाईला म्हणावं, मोड म्हणून देऊ नको, ह्यांची आठवण आहे. माझी हौस म्हणून चांदीची भांडी घेतली होती.” “आई, तिनेही हौस म्हणूनच ही भांडी मागितली, मी तिला नवीन घेऊन देणार होतो पण, तीच म्हणाली आईना ती चांदीची भांडी काय उपयोगाची, मी हळदी कुंकू समारंभात वापरेन तरी. नाहीतर पडून राहून काळी पडायची. पण ह्यात करंडा आणि देवाची भांडी दिसत नाहीत ती.”
affiliate link
“कुंकवाचा करंडा माझ्या आईची आठवण आहे आणि उद्या इथे सत्यनारायणाची पूजा घातली तर देवाची भांडी नको का? म्हणून ठेवलीत बर.” “आई तुझं आपलं काही तरीच,आता रत्नाकर अमेरिकेतून इथे येणार की पुण्यातून रेवा तूच सांग बघू,म्हणजे तुला द्यायची नसतील तर नको देऊ पण मी चार सहा महिन्यांनी का होईना येतो. उलट इथून कोणी नेली तर —-“
आईला त्याचे शब्द जिव्हारी लागले. जीव वरखाली झाला, सगळी भांडी एकट्या रोहनला दिली तर रत्नाकर आणि रेवाला काय देणार? तरी त्या म्हणाल्या अरे, या भांड्यान तुज काही अडतंय का, उद्या यांची आठवण म्हणून रेवा आणि रत्नाकर यांना काही हवं की नको. जसा तू तशी ती. हवी असल्यास ही चांदीची भातुकलीही जा घेऊन.”
त्यांनी चांदीच्या भांड्याचा भातुकलीचा संसार त्याच्या समोर ठेवला.ती भातुकली पहाताच त्याला आठवले. ती तिन्ही भावंडे घरातील माडीवर भातुकलीचा डाव मांडून खेळत असत. पोहे, गुळ खोबरे, लाह्या, भाजलेले शेंगदाणे अस काहीही भातुकली खेळतांना चालायच. दोन दोन तास रेवा आणि पटवर्धन काकांची सुलू स्वयंपाक करायच्या. आता सुलू पूण्याला राहाते पण एकदाही फोन करत नाही. किती गोड दिसायची. प्रेमाचे असे अनेक काटे खोल रूतलेले असतात. ते कधीतरीच आठवणींना घेऊनच ठसठसतात.भातुकलीच्या भांड्यावर त्याचे, रत्नाकरचे आणि रेवाचे नाव होते.
“तुझ्या आजोबांनी, म्हणजे माझ्या वडिलांनी, ही भांडी तुम्हाला वाढदिवसाची भेट म्हणून खेळण्यात दिली होती. तुम्ही लहान असताना याच भांडयांनी खेळायचा.आता सगळाच संसार विस्कटला,तीन दिशेला तुम्ही तिघे राहता. ही भातुकली ठेऊन तरी काय करू, कोणा एकाला दिली तर चूकच की म्हणून आजपर्यंत कोणालाच दिली नाहीत. ने बाबा ने तुला हवं ते घेऊन जा. पूजेची भांडी ने, आणिक काय हव ते घेऊन जा. आता पाखरच उडून गेलीत उगाच त्या आठवणी गोंजारून काय करू.”
affiliate link
तिचे ते शब्द ऐकून आणि भरलेले डोळे पाहूनच रोहन गडबडला, “आई, चुकलो मी, मला माफ कर, मला खरंच कळत नव्हतं की ही तुझ्या संसाराची तू सजवलेली ही मैफिल आहे. मी त्यांना निर्जीव भांडी समजत होतो. या प्रत्येक भांड्यात आमच्या बालपणीच्या आठवणी साठवलेल्या आहेत, तुझा जीव गुंतला आहे. ही भांडी म्हणजे बाबांच्या आणि तुझ्या संसाराची अनमोल ठेव आहे. पुढच्या पिढीसाठी या घराचा वारसा आहे. तो मोडून मी कृतघ्न ठरलो असतो. मला काही नको, आई खरंच काही नको.”
“अरे रोहन, भावनेच्या भरात मी बोलून गेले बरं, माझं हे असं झालय म्हातारी झाली रे मी, काहीही आठवत आणि हे असं होत. चुकलच माझ. तू खरच तुला हवं ते घेऊन जा, जिथं आपली माणसेच सोबत नाहीत तर त्यांच्या आठवणी ठेऊन मी काय करू. तुला हवे ते ने, मी नाही रागावत. पण करंडा तेवढा ठेव. सौभाग्य तर देवान नेलं, त्यांची आठवण तेवढी राहूदे.” दुसऱ्या दिवशी तो मुंबईला जायला निघाला तर तिने ओल्या नारळाच्या वड्या नातवांना बांधून दिल्या. रात्री तिने आणि पटवर्धन यांच्या सुनेने जागून केल्या. निघताना त्याचे पाऊल निघत नव्हते. एकीकडे आई, तिच्या डोळ्यातील पाणी आणि दुसरीकडे पत्नी आणि मुले असा संसार वाटला गेला होता आणि दोन्ही टोक साधतांना त्याच्या मनात कल्लोळ निर्माण होत होता.
निघताना नरसू काका आले होते त्यांनी सर्व सामान रीक्षेत ठेवल. एका वेगळ्या पिशवीतून शहाळी दिली. त्याने नरसूला पाचशे रूपये दिले, नरसूने ते परत केले.”रोहन बाबा पैसे नको, माई आमची काळजी घेते. तू अधूनमधून येत रहा, माई तुझी वाट पहात असते. तू आलास की माईला बर वाटतं. सारखी तुझी आठवण काढते. रेवा ताई आधी यायची आता ती पण ये नाही. तुम्ही दोघ येत जा. आता माई थकली आहे.” तो नरसूकडे पाहून आश्वासक हसला. “मी लवकरच येईन बरं,माईवर लक्ष ठेव. तिची काळजी घे.”
पटवर्धन काकांना त्यांनी हाक मारली, “काका , येतो बरं. आईकडे लक्ष ठेवा.” काका हसले. अरे आता आम्हाला ऐकमेकाचा शेजार, जा तू, काळजी करू नको.”
त्याने आईचा हात हातात घेत निरोप घेतला. तिचे डोळे डबडबले. समोरचा रोहन तिला दिसेना. जड मनाने तिने निरोप घेतला. रिक्षा घराकडून निघाली आणि त्याचा प्रवास सुरु झाला पण मन अजूनही भातुकलीच्या डावतच गुंतून पाठी राहिलं होत. त्यांच्या बालपणीच्या आठवणी आईने जपून ठेवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्याची सुटकेस आवरून ठेवायला रशमी गेली तेव्हा तिला चांदीची भांडी मिळाली. ती आनंदाने त्याला हाक मारत म्हणाली, “अहो ही सगळी भांडी चांदीची आहेत का?”
“मग तुला काय वाटल आईने पितळेची भांडी सुनेला पाठवलीत. शंभर नंबरी चांदी आहे. आई सर्व भांडी द्यायला कटकट करत होती, म्हणत होती रेवा आणि रत्नाकरला नको का? पण आता त्यांना तरी देवगडला यायला कुठे वेळ आहे. आणि शेवटी स्वतः कडे ठेऊन तरी काय करणार?” तिने भांडी सोफ्यावर ओतली. त्यात अत्तरदाणी,देवाच्या पूजेची भांडी आणि भातुकली बरोबर चांदीच्या करांड्यासह सर्व भांडी होती.ते पाहून तिला आनंद झाला. “अहो चांदीची भातुकली! खरच किती नशीबवान तुम्ही, चांदिच्या भांड्याने भातुकली खेळायचात.”
रेश्मा ती भांडी पाहून हरखून गेली. चांदीचा करंडा पाहून रेशमाला खूप आनंद झाला, “अहो, चांदीचा करंडा देखील आईंनी दिला. ही सगळी भांडी का आणलीत? आईंच बरोबर होत, या भांड्यावर तुमच्या इतकाच त्या भावंडाचाही हक्क होता” तो तिच्याकडे संशायाने पहात म्हणाला, “मला वाटल मी सर्व भांडी आणली तर तू खुश होशील.तुच म्हणाली होतीस ना चांदीची भांडी घेऊन या म्हणून!” “मी हळदी कुंकू वाटण्यासाठी भांडी आणा म्हणाली,सगळी भांडी आणा मी कस म्हणेन?आईंना माझ्याबद्दल काय वाटल असेल?असे कसे हो तुम्ही?” “रेशमा काल मी आईशी खरच वाईट वागलो. आई म्हणत होती की रत्नाकर आणि रेवाला आठवण म्हणून काही भांडी राहू दे. मी तुझा विचार करुन सर्व भांडी आणली, हा करंडा देखील, तरी आई म्हणत होती अण्णांची आठवण म्हणून राहू दे.”
त्यांने तो करंडा हाती घेतला आणि म्हणाला, ” रेशमा, थांब, आईने हा करंडा माझ्यावर रागावून या भांड्यात ठेवला असावा तो तिला परत केला पाहिजे. या करंड्या बरोबर आई आणि आजीच्या आठवणी आहेत. रेशमा, मी मुर्खासारखी तिच्याकडे चांदीची भांडी मागीतली आणि आईने—-” त्याला हुंदका अनावर झाला पण वेळ निघून गेली होती. व्यवहार पाहिला की माणस आणि त्यांचे नाजूक संबंध दुरावतित तहेच खरं. तो मनातच विषण्णतेने हसला. केवळ बायकोच्या आग्रहाखातर त्याने आईकडे ती भांडी मागितली आणि आईने सर्वच चांदीची भांडी त्याला देऊन टाकली होती. त्याच्याकडे सर्व सुवीधा असूनही मोहापोटी त्याने आग्रह धरला होता.
चांदीच्या भांड्यांकडे पहाता पाहता त्याला बालपण आठवले भातुकली खेळतांना स्वयंपाक करण्यासाठी तो आईकडून गूळ शेंगदाणे, खोबऱ्याच्या कातळ्या, चुरमुरे असे बरेच जिन्नस घेऊन यायचा. रेवा स्वयंपाक करायची आणि तो छोट्याशा ताटलीत तो स्वयंपाक वाढून आईला आणि अण्णांना नेऊन द्यायचा. कधी कधी मी मोठा आहे ना मग आज मीच जेवण बनवणार असा हट्ट तो धरायचा, रेवा समजूत घालत म्हणायची, “दादा, तू अण्णा सारखा पुरुष आहेस, होय ना? अण्णा कुठे जेवण बनवतात. तू फक्त मदत करायची स्वयंपाक नाही करायचा काही, कळलं.” त्याचा नाईलाज व्हायचा. मोठे झाले आणि तिघ तिन दिशेला निघून गेले. सगळंच की संपलं. आज चांदीची भातुकली सोबत होती, नव्हती ती त्याला दादा म्हणणारी रेवा आणी प्रेमानं सोन्या तुला जेवण करायला काय काय देऊ? विचारणारी आई.
सुरेख लेख।
धन्यवाद यशवंत.