भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आहे?
भारताने १९५५ साली संविधानाचा स्वीकार केला आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व राज्ये तेथील रूढी, परंपरा, त्या भागाचा इतिहास, प्रादेशिक भाषा या सर्व गोष्टींचा योग्य अभ्यास करून संविधान तयार केले. या संविधान अभ्यास गटात अनेक दिग्गज होते, परंतू काही वैयक्तिक कारणाने त्यांनी काही काळाने स्वेच्छेने समितीमधून बाहेर पडणे पसंत केले. या सर्व संकटांचा सामना करून संविधान तयार झाले. पण हे संविधान सहजासहजी निर्माण झाले नाही. देश स्वतंत्र झाला तरीही एवढ्या मोठ्या आणि प्रादेशिक भिन्नता असणाऱ्या देशाचा कारभार पाहणे ही काही सोप्पी गोष्ट नव्हती म्हणूनच Mountbatten यांना इंग्लंडने नेहरू यांच्यावर लक्ष देण्यासाठी ठेवले. अखेर २९ ऑगस्ट १९४७ साली भारत सारख्या विशाल देशाचा कारभार कसा चालवावा याचे धोरण ठरवण्यासाठी कमिटी गठीत झाली. त्याचे नेतृत्व अर्थात डॉक्टर भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारले. दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस इतक्या प्रदीर्घ कालखंडात एकूण एकशे सहासष्ट बैठका झाल्या आणि भारताचे संविधान तयार झाले. अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक जाती, विविध प्रांत, भिन्न भाषा, भिन्न संस्कृती, भिन्न पोषाख, भिन्न आहार या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व समावेशक असा समता,बंधुत्व आणि एकता यांचा समतोल राखण्यास साहाय्य होईल असा मसुदा तयार झाला.
२४ जानेवारी १९५० रोजी ते इंग्रजी आणि हिंदी अश्या दोन भाषांत संसदेस सादर करण्यात आले. मसुद्याच्या त्या प्रतिवर सभागृहातील ३८८ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आणि संविधानाला भारतीय घटनेचे रूप प्राप्त झाले. या पूर्वी लिहिल्याप्रमाणे घटना मसुदा समितीतील अनेक सदस्य वेग वेगळ्या कारणाने मध्येच गळाले तरी बाबासाहेब आंबेडकरांनी अविरत कष्ट घेत घटना पूर्ण केली या घटनेनुसार प्रत्येकाला आचार, विचार, संचार,आहार आणि पोषाख याचे स्वातंत्र दिले आहे. समाजातील दुसऱ्या व्यक्तीला कोणतीही हानी न पोचवता तसेच देशाचे स्वातंत्र, समाजाची एकता, संस्कृती वैभव,देशाचा ऐतिहासिक वैभव वारसा यांना हानी न पोचवता हे स्वातंत्र प्रत्येकाने उपभोगावे अशी घटनाकारांची भूमिका होती.
पण वास्तव काय आहे? आज अनेकदा कोणी दुसऱ्याच्या आहाराविषयी आक्षेप घेतो, त्याला आहाराबाबत प्रश्न उपस्थित करून जीवे मारण्याची धमकी देतो. कोणताही धर्म दुसऱ्याला इजा पोचवा असे सांगत नाही तरी आम्ही त्याने घेतलेल्या आहाराबाबत स्वतः कायद्याचे रक्षक समजून शिक्षा देतो. त्याने देवाच्या नावाचा जयजयकार करावा म्हणून त्याच्यावर जुलूम करतो त्याला जबरदस्तीने देवाचे नाव घ्यायला भाग पाडतो. ही जबरदस्ती करतांना त्याच्या मूलभूत आहारस्वातंत्र्यावर तसेच आचारस्वातंत्र्यावर गदा आणतो.
सज्ञान मोठ्या मुलांनी अथवा मुलींनी समजून उमजून, विचारपूर्वक कोणाशी लग्न करावे ह्या त्यांचा हक्क आहे. याबाबत पालकांनी त्या लग्नाबाबत मुलांची समजूत काढली, किंवा भविष्यातील धोक्याची अथवा अडचणींची जाणीव करून दिली तर ते पालकांच्या भूमिकेतून रास्त आहे. तथापि समाज त्यांच्या लग्नाला आक्षेप घेतो. त्यांनी लग्न केले तर त्यांना समाजातून किंवा गावातून बहिष्कृत करतो. त्यांच्या नेहमीच्या व्यवहारात अडचणी निर्माण करतो किंवा चक्क त्यांनी आत्महत्त्या करावी अशी परिस्थिती निर्माण करतो.
अगदी टोकाचे पाऊल म्हणजे त्यांची हत्त्या करतो. जो समाज त्यांना पोसत नाही त्यांच्या सुख दुःखाची विचारणा करत नाही किंवा त्यांना त्यांच्या वाटचालीत अडचणींवर मात करता यावी म्हणून मदत करत नाही त्या समाजाला त्या दोघांच्या संसारात डोकवायचे कारण काय? हा अधिकार त्यांना कोणी दिला? पण अश्या प्रकरणात बऱ्याचदा पोलीस खाते किंवा सुशिक्षित व्यक्तीही त्या जोडप्याला आणि कुटुंबाला मदत करत नाही तेव्हा त्यांच्या शिक्षित असण्याची कीव करावी वाटते.
आता मला सांगा, खरंच आपण स्वतंत्र भारताचे, या प्रजासत्ताक देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत का? जर आपल्याला घटनेने नागरिकाला स्वातंत्र्य दिलं आहे तर ते आपण का उपभोगू शकत नाही? का आपल्या भाषण स्वातंत्र्यावर गदा येते. दुर्दैवाने जे धनवान आहेत किंवा राजकीय पदावर आहेत त्यांच्या वक्तव्यावर पोलीस कारवाई करत नाहीत आणि यदाकदाचित कारवाई झाली तर त्यांना कारवाईपासून संरक्षण देण्यासाठी अतिशिक्षित वकिलांची फौज तयार असते. न्यायालयात त्यांना सहजासहजी जामीन मिळतो. सर्वसामान्य माणसाला कोणत्याही गोष्टीचे संरक्षण मिळत नाही. राजकीय शक्ती स्पष्ट आणि सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला पोलीस आणि दंडुकेशाही वापर करून त्याचा आवाज दडपून टाकतात. कुठे आहे व्यक्त होण्याचे विचार स्वातंत्र. दुसऱ्या व्यक्तीबद्दल, दुसऱ्या धर्माबद्दल आपण एवढे असहिष्णू का? हीच असहिष्णुता कोणी अपल्यावर लादली तर आम्ही सहन करू का? कोणता धर्म स्वीकारावा? कसा आहार घ्यावा? एखाद्या सामाजिक कार्यकर्त्या विषयी, नेत्याविषयी जर त्यांनी मत मांडले आणि तर आम्ही आक्रमक का होतो? सार्वजनिक जीवनात काम करताना जशी स्तुती वाट्याला येऊ शकते तशी टीकाही होऊ शकते हे ज्यास योग्य समजले असेल त्यानेच सार्वजनिक जीवनात उतरावे.
आजही आपल्या देशात पाच दशकाहून अधिक काळ राहणाऱ्या नागरिकांना आपण आपले, या देशाचे नागरिक मानत नाही, आणि जे किमान पाच दशक अगोदर परदेशात स्थाईक झाले त्यांना आम्ही दुहेरी नागरिकत्व बहाल करतो. त्यांचा सन्मान करतो, इतकेच नव्हे तर त्यांनी इथेच स्थायिक व्हावं म्हणून बँक कर्जावर हमी देतो. त्याला त्याच्या प्रगतीची किल्ली देतो. हा दुजाभाव का? सिलिब्रेटीसाठी आपण रेड कार्पेट अंथरतो तर गरिबांसाठी आपले दरवाजे बंद असतात.
समानतेचे सूत्र तर कुठेच पाहायला मिळत नाही ज्या व्यक्तींकडे पैसे आहेत त्या व्यक्तींना मान सन्मान मिळतो त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळते गरिबाला मात्र अपेक्षित शिक्षण, त्याला अपेक्षा असणाऱ्या संस्थेत घेता येत नाही. समानतेचे सूत्र आहेच कुठे? जाती व्यवस्थेवर आधारित आरक्षण निर्माण करून आपण खुल्या वर्गातील गरीब कुटुंबावर अन्याय केला आहे त्यांच्याकडे गुणवत्ता असूनही त्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी, ना सरकारी अस्थापनेत नोकरी, कशाची समानता म्हणायची? अगदी मंदिर प्रवेशाची समानता नाही. गरीब लांबच लांब रांगेत तिष्ठत उभा तर पद धारण करणार उच्च सरकारी अधिकारी वा मंत्री वा सेलिब्रेटी उजळ माथ्याने दहा मिनिटात दर्शन घेऊन तुमच्या डोळ्यादेखत आणि तुम्हाला हात दाखवत दिमाखात निघून जाणार. कुठे आहे हो समानता? विठ्ठल,सिद्धिविनायक, तुळजा माता यांच्या दर्शनाची VIP रांग वेगळी आणि सामान्य माणसाची किड्या मुंग्यांची रांग वेगळी,कुठे आहे समानता? भाऊ कशाला समतेच्या गप्पा मारता!
प्रत्येक प्रजासत्ताकाला आम्ही पुन्हा पुन्हा त्या तिरंग्याला सलाम ठोकतो, प्रत्येक वर्षी कोणी लाल किल्ल्यावरुन तर कोणी विधान भवनात, कोणी शिवाजी पार्कवर तर कोणी पोलीस परेड मैदानात भाषण देतो. आम्ही ते भाषण मन लावून आणि मान झुकवून ऐकतो.तिरंग्याला अभिवादन करतो स्वतःचे स्वप्नरंजन करत घरी जातो. ते भाषण म्हणजे अधिकार पदावर असणाऱ्या व्यक्तीने तुम्ही करा असा आग्रह असलेला संदेश असतो, त्यात तळमळ नसते, त्या शब्दांना कृतीचे आणि कर्तव्याचे अधिष्ठान नसते. ती असते पोपटपंची. आम्ही ऐकावं, टाळ्या वाजवाव्या, आणि त्यांचे शब्द दुसऱ्या दिवशी नव्हे तर ते कार्यक्रमाचे ठिकाण सोडता सोडता विसरून जावे.
आजही वेग वेगळ्या देवतांचे वेगळे भक्त आहेत, मंदिरात पंडे, भाट, पुजारी, गुरव यांच्या अधिकारावरून वाद आहेत, कोणी कुठून मिरवणूक, जुलूस काढायचा यावर तंटे तक्रारी आहेत. अंबाबाई मंदिरात, विठ्ठल मंदिरात पुजारी आणि मंदिर प्रशासन यांचा वाद कोर्टात आहे, सांगा कुठे एकता आहे? समानता, बंधुत्व, एकता यांच्या शपथा घेणं फार सोप्पी गोष्ट आहे, पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणं, त्याच्या भावनांना न दुखावता प्रेमाने समजून घेणं
आणि स्वतःचा धर्म,स्वतःची जात, स्वतःचा देव तितका मोठा असा अट्टाहास न करता दुसऱ्याच्या धर्माचा, जातीचा, त्याच्या भक्ती आणि शक्ती स्थळांचा आणि मनाचाही आदर करून जगणं हे ह्या प्रजासत्ताक घटनेला अभिप्रेत आहे. तेव्हा दंभ जाळा,अहंकार गिळा आणि एकसंघ राष्ट्र आणि त्याचे सार्वभौमत्व मिळवा.
लिहिणं फारच सोप्पं,कृतीत आणणं फारच कठीण पण “करिता सायास असाध्य ते साध्य.” असे म्हणतात. आजही बोले तैसा चाले उक्तीप्रमाणे जगणारी आणि पीडितांना सक्षम करून जगायला लावणारी प्रकाशाची बेटं आहेतच की. मग डॉक्टर ते प्रकाश आमटे असोत, डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणिताई बंग असोत की वसई येथे कुष्ठरोग हॉस्पिटल निशुल्क चालवणारे सामंत असोत. तिथं येणारे पीडित हा माणूस असतो त्याला ना जात ना धर्म ना पंथ. ना भाषेचे बंधन. ही सेवाभावी कृती मानावता टिकवून ठेवणारी आहे.
द्रष्टी मंडळी येणाऱ्या व्यक्तीचा स्वीकार कोणत्याही अटी शर्ती शिवाय करतात. पण दुर्दैवाने शासनाकडून त्यांना पुरेसे सहकार्य मिळत नाही त्यामुळे अशी सेवा हवी असणाऱ्या गरजू व्यक्तींची संख्या जास्त आणि शक्य असणारी संसाधने कमी असे विषम गुणोत्तर होते आणि पुरेसा निधी नसल्याने योजना ठप्प होते. हे लिहिण्यापाठी अद्याप सगळेच काही संपले नाही हे विनयाने सांगावेसे वाटते. जी प्रकाशाची बेटे आहेत त्या बेटांकडून आपण प्रकाश घेऊ किमान स्वतःसाठी न जाणो त्या मिणमिणत्या पणातीचा कदाचित कुणाला उपयोग होईल.
आपण माझ्यासह थोडा विचार आणि किंचित कृती केली तर निश्चित भव्य दिव्य आकृती शक्य होईल. मुंगी छोटी असली तरी भव्य वारूळ उभारते मग बुद्धिमान माणसाला काय अशक्य आहे? तेव्हा उद्याचा प्रजासत्ताक साजरा करू वेगळ्या विचाराने. चला धर्म, पंथ,जात, देव यांच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला एक माणूस म्हणून पाहू त्याच्या स्वातंत्र्याचा आदर करू आणि त्याला बंधू, सखा, मित्र अशी कोणतीही उपाधी न लावता कोणत्याही बंधनात न बांधता मुक्त स्वरूपात स्वीकारू. मानवतेचे खरे स्वरूप पाहण्यासाठी पशूता त्यागून माणूस बनू. प्रजासत्ताक राष्ट्राचे स्वप्न साकार करताना माणुसकी जपू.एक मेकांचा आदर पूर्वक स्वीकार करू.
खूप छान सर. परिस्थिती नकारात्मक असली तरी संविधानाची मशाल हातात घेऊनच मार्गक्रमणा केली तर समानतेचा मार्ग दिसेल तरी. नाहीतर सर्वत्र अराजकतेचं जंगल माजेल.
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो ही सदिच्छा
अतिशय योग्य लिखाण , हे देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे व प्रत्येकानेच यावर चिंतन केले पाहिजे
धन्यवाद
खूपच तळमळीने लिहिलंय सर, ! वास्तवदर्शी लेख!
Thanks for complement to Damle Mam,Mishra Mam and Sandeep Avsare
Ek vastav…..
Sir…..