भिती अज्ञाताची भाग १

भिती अज्ञाताची भाग १

लहानपणी घरातील मोठ्या व्यक्ती आपल्याला दूध पिण्यासाठी, जेवण्यासाठी किंवा झोपण्यासाठी बागुलबुवाची किंवा अंधाराची भिती दाखवत. गावी प्रत्येक घरास एक सामान ठेवण्याची, थोडी अंधारी खोली असे. हीच ती बागुलबुवाची खोली. मुलांना भीती कशाची वाटते तर काळोखाची किंवा शरीराने आडदांड असणाऱ्या माणसाची, पण मोठ्या व्यक्तींनाही भीती वाटते, ती कशाची असा प्रश्न स्वतःला विचारला तर जी गोष्ट सहज साध्य होत नाही त्याची भीती वाटू लागते. जसे शाळेतील मुलांना गणिताची, काही मुलांना इंग्रजी विषयाची तर कधी एखाद्या शिक्षकाची सुध्दा. बऱ्याच वेळा शिक्षकांनी प्रश्न विचारला तरी विद्यार्थ्यांना भीती वाटते, अगदी उत्तर माहित असले तरी. याचे कारण आत्मविश्वासाचा अभाव. आत्मविश्वास कमी असण्याचे कारण त्या मुलाला अथवा मुलीला घरुन मिळणारी वागणूक, सतत हेटाळणीचे शब्द किंवा चार चौघात वावर नसणे.

लहान मुले तीन चार वर्षांची झाली तरी आईकडे अंगावर दूध पिण्यासाठी हट्ट करतात मग त्यांना “तो बघ बागुलबुवा, तु कपातून दूध प्यायचं. आईकडे हट्ट केलास तर बागुलबुवा अंधारात धरून नेणार” असं त्याचे बाबा किंवा आजी म्हणायची आणि बिच्चारे बाळ गटागट कपामधल दूध पिऊन मोकळं व्हायचं आणि निरागसपणे विचारायचं “आता नाही न नेणार बागुलबुवा?” आजी म्हणायची “शहाणं ते बाळ,आता नाही हो माझ्या राजाला नेणार”

लहानपणी मलाही अंधाराची खूप भिती वाटे कारण ह्या अंधारात म्हणे भूतं रहातात. ही भूते म्हणजे अकाली मरण पावणाऱ्या माणसाचे अतृप्त आत्मे असतात, ज्या आकांशा इच्छा अपूर्ण राहिल्या असतील त्या अन्य कुणाच्या देहात शिरून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, असे मोठी माणसे सांगत. आमच्या शेजारच्या ओळखीच्या आजी ह्या भूताखेतांच्या गोष्टी बरोबर त्यांना निवांत वेळ असेल तेव्हा सायंकाळी अंधार पडताना सांगत आणि गोष्ट संपता संपता सांगत आता उरलेली गोष्ट उद्या. आमच्या मनात रात्रभर  भूत बसून राही त्या भूताने पुढे  काय केले ते ऐकण्याची उत्सुकता शांत बसू देत नसे. आजीला लकडा लावून मग दुसऱ्या दिवशी गोष्ट पुढे सुरू होत असे, आजी कथेचा समारोप करताना त्या भूताला बाटली बंद किंवा मडक्यात  पुरून टाकी अश्या ह्या कथा ऐकून कधी उत्सुकता तर कधी भीती वाटत असे. 

ह्या जगात असा कोण आहे? ज्याला कधी कुणाची  किंवा कशाची भिती वाटली नाही. अर्थात कोणीही मी भित्रा आहे किंवा मलाही भिती वाटते हे कबूल करण्याचे धाडस कोण दाखेवल? भिती ही अशाश्वत असूनही लोक धसका का घेतात हा कुणालाही न सुटलेला प्रश्न आहे, पण वास्तव हेच आहे की जीवनात कधी ना कधी प्रत्येकाला अज्ञात गोष्टीची भिती वाटत होती. वाटत राहते.वाटत राहील. भितीपासून कोणाचीच सुटका झालेली नाही.





गावी आम्ही दर शनिवारी किंवा रविवारी ओहोळाला पाणी असेपर्यंत ओहोळावर आणि नंतर खोल विहिरीत पोहायला जायचो, पाण्यात पकडा पकडी खेळायचो, सुरवातीला माझ्या मित्रांनी अनेकदा पाण्याखाली लपून माझे पाय ओढून मला बुडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी चक्क शिव्या दिल्या, त्या मुलांच्या नावाने ओरड केली. परंतू आज मी म्हणेन जर मला त्या मुलांनी तशी वागणूक दिली नसती तर मी पोहण्यात तरबेज झालो नसतो. भितीवर खंबीर मनाने मात करावी लागते हे आपण साने गुरूजी यांच्या श्यामची आई पुस्तकात वाचले, प्रश्न आहे किती जणांनी श्यामच्या आईच्या विचारांचे अनुकरण केले? भिती कोणत्या गोष्टींची वाटते ते समजावे म्हणूनच psychiatrist किंवा मानसोपचार तज्ज्ञ अशा व्यक्तिंना वेगवेगळे प्रश्न विचारून बोलत करतात आणि त्यांची भिती दूर करतात त्याला हरवलेला आत्मविश्वास मिळवायला मदत करतात. भारतात अशी समस्या असणारे असंख्य लोक बहुधा डाॅक्टर किंवा मानसोपचार तज्ज्ञ यांच्या पर्यंत पोचतच नाहीत. आपल्याला काही झालंय किंवा मानसीक आधाराची गरज आहे हे मान्य करणं ही हा आजार बरे करण्याची पहिली पायरी आहे.

कुणी घरातील जाणत्या व्यक्तीला किंवा चक्क पत्नीला घाबरतो. नवीन सून सासूला घाबरते. या उलट पाच सहा वर्ष लग्नास झाली की सासू सुनेला घाबरते. कधी कधी आपल बिंग फुटेल अशी भीती कुणाच्या मनात घर करून असते त्यामुळे त्याचे मनच त्याचा पाठलाग करत असते. म्हणतात ना “मन चिंती ते वैरी न चिंती.”

मनात भिती ठाण मांडून बसली तर निद्रानाश होतो. त्याचा मनावर परिणाम होतो. कामावर ,अन्न वासनेवर किंवा संसार, वैवाहिक जीवन आणि कुटुंब यावर  परिणाम होतो. म्हणूनच कोणत्याही कारणास्तव लपवाछपवी करू नये. मान आणि अपमान सारखेच मानून जो कार्यरत राहतो तो कुणाला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. कोणतीही जबाबदारी हाताळताना चूका होणे स्वाभाविकच पण त्या चूका न लपवता मान्य करून चूका सुधारण्याचा सतत प्रयत्न करणे हाच भिती कमी करण्याचा रामबाण उपाय आहे. त्यामुळे नक्की भिती कशाची कधी आणि कोणाला वाटेल याचे कोणतेही सूत्र नाही.





माझ्या परिचयातील एक व्यक्ती गर्दीला भीत असे. त्या एका कारणासाठी तो दोन दोन आठवडे कामावर रुजू होत नसे, मग ओळखीची व्यक्ती त्याला बळेबळे घेऊन येत असे. त्याला कितीही समजूतीने सांगितले तरी त्याचा परिणाम हा तात्कालिक असे. शेवटी आम्ही त्याचा नाद सोडून दिला. मनात वाईट विचार का येऊ द्यावे, नेहमी सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घ्यावी. म्हणतात ना “मन चंगा तो कठौती में गंगा”.

लहान असताना मन अतीसंवेदनशील असते. नवे पाहू ते जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोचलेली असते. परिणामी संकट ओढवले जाण्याची शक्यता ही जास्त असते. हे करू नको असे कुणी सांगितले की आमची चौकस बुध्दी तिथेच धाव घेते. माझ्या लहानपणी आमच्या आजू बाजूस वस्ती कमीच होती आणि जी आदिवासी घरे होती, त्या घरातील महिला चेटूक करतात असा प्रवाद होता. हे आईशी इतर महिलांनी गप्पा मारताना मी ऐकले होते. सहाजिकच एकदा मी आईला आमच्या पाठी मागची आदिवासी  बाई घरी आली असता  म्हणालो “आई ह्या काकू चेटूक करतात ना?” आईने मला धपाटा घालून पिटाळले, त्या बाईची अवस्था काय झाली असेल ते तिलाच ठावूक.

पण नक्की चेटूक म्हणजे काय? हे कोणी मला कधीच सांगितले नाही. पण चेटूक केल्यावर त्याचे परिणाम काय होतात ते मी सहावी इयतेत्त असताना अनुभवले. अर्थात आत्ता त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. झाले असे आमच्या बुध्या नावाच्या गोऱ्यावर कुणी मूठ मारली आणि तो रात्रभर कुंपणात उड्या मारत फिरू लागला, त्याच्या तोंडाला फेस आला, शेवटी तो जमिनीवर आदळला. चांगला चार वर्षाचा बैल, फुकट जातो की काय अशी घरच्या मोठ्यांना भीती. आईचे सर्व गुरांवर अतिशय प्रेम. शेवटी रामू काकाला बोलावणे पाठवले, तो आला आणि आईला म्हणाला “वैनी गोऱ्याला कुणी तरी मूठ मारली, ओवाळणी टाकावी लागेल” आणि त्याने कोळसा, लिंबू काळं कोंबडीचं पिल्लू, तांबडी फुले, अबीर असं काही घेऊन त्याच्यावरून उलट्या दिशेने फिरवून टाकले आणि तोंडाने अतिशय वाईट स्वरात अस्पष्ट बडबडला आणि दहा मिनिटात आमचा बैल स्वतः उभा राहिला आणि गोठ्यात गेला. चांगलं बादलीभर पाणी प्यायला आणि आईचा हात चाटू लागला.आता ह्याला काय म्हणावं? पण हे मी तेव्हा जस पाहिलं ते आज मला आठवलं. बैलाकडे कोणती भिती असावी? ते मला नाही सांगता येत पण आपण ऐकलं असेल कुत्रे रडू लागले की कुणाच्या तरी घरी  काही अघटीत घडते. त्यांना म्हणे अदृश्य शक्ती दिसतात आणि ओळखता येतात. माझ्या लहानपणी भालू अगदी घरा जवळ येऊन ओरडत होतं. मी आईला विचारलं तेव्हा म्हणाली त्यांना सहावं इंद्रिय आहे, त्यांना गावात कुणी आजारी व्यक्तीचे देहवासान होणार असेल तर आधी कळते आणि ते आपल्याला सूचना देतात. अर्थात आता ह्या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल पण तेव्हा हे असेच घडत असे. त्याला अन्य काही शास्त्रीय कारण असावे कदाचित भालू आपली बिबट्या वाघाकडून शिकार होऊ नये म्हणून जंगल सोडून माणसाच्या वस्ती  जवळ येत असाव आणि कुठे तरी बिबट्याचा सुगावा लागल्याने  भीतीने रडत असाव.

पण लहानपणी अशा चमत्कारीक गोष्टी ऐकल्यामुळे त्या खऱ्या वाटत. आमच्या गावात रमेश रहात होता. आगरी समाजाचा  होता. रमेश बुधाजी पाटील हे काही कुण्या नेत्याचं नाव नाही की त्याने केलेल्या कामगिरीमुळे मी लक्षात ठेवावं पण तरीही चाळीस वर्ष ते नाव कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात बसून राहील ते त्याच्या वैशिष्टपूर्ण वर्तनाने. त्या रमेश पाटील बद्दल बरेच समज, गैरसमज होते. त्याला म्हणे भूत वश करून घ्यायची विद्या अवगत होती त्यामुळे तो रात्री कितीही वाजता स्मशानात जाई आणि तेथील सोनं घेऊन येई. अर्थात हे सोने त्याला कोण देत?  असा प्रश्न तेव्हा आम्हाला पडत नसे. गावच्या वेशीवर एक वडाचे झाड होते, तिथे एक गोल उंच शिळा होती, तोच तो चेडा, गावात कोणतेही कार्य असले तरी त्याचा मान दिल्या शिवाय पुढे जाऊ देत नसे, काहींना काही अडचण उभी रहात असे. अगदी कोणी मृत्यू पावले तरी त्याच्या वेशीवर एक मिनिट थांबून नंतर पुढे मार्गस्थ होत त्यामुळे या जागेची मनात दहशत होती.





गावात अशी बरीच ठिकाणं होती ज्या बद्दल आमच्या घरातील मोठ्या व्यक्तींकडून काही चुकीची किंवा अपूर्ण ऐकलेली माहिती आमच्या पर्यंत पोचली होती. त्या वेळच वय साधारण नऊ ते दहा वर्षाचं आणि आत्ता जितका चौकस पणा लहान मुलांकडे आहे आणि असतो तेवढा आमच्याकडे नव्हता आणि असला तरी तेव्हा म्हणजे पन्नास वर्षा पूर्वी आमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना लहान मुलांकडून प्रश्न ऐकायची आणि त्याची उत्तर द्यायची सवय नव्हती. याची कारणे दोन, लहान मुलांनी मोठ्या माणसांना प्रश्न विचारणे हे सभ्य मुलाचं लक्षण समजले जात नव्हते, दुसरे म्हणजे बऱ्याच वेळा लहान मुलांच्या “का?” चे उत्तर मोठ्या माणसांकडे नसायचे. याचा अर्थ आपल्याला उत्तर देता आले नाही तर आपली फजिती होऊ नये या दृष्टीने मोठी माणसे लहान मुलांना उगाच नस्ते प्रश्न विचारू नको असे सांगत किंवा त्याच्या अंगावर धावून जात,” मला विचारण्याची तुझी हिम्मत कशी झाली?” असा उलटा सवाल टाकून त्याला वाटेला लावत.

तर महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावात अशी काही ठिकाणं होती ज्या बाबत प्रवाद होते, त्या पैकी एक म्हणजे भूत बंगला. हा बंगला अगदी प्रशस्त, माडीचा आणि दहा बारा खोल्यांचा होता. माझ्या लहानपणी त्याची पडझड झाली  होती. त्या नंतर तीस वर्ष तो त्याच अवस्थेत होता.हा बंगला कोणे एके काळी खानोलकर कुटुंबाचा होता, पण तो बंगला बांधून वास्तव्यास आल्यावर काही दुर्दैवी घटना कुटुंबात घडल्या आणि ते कुटुंब आपली संपत्ती सोडून आणि हा बंगला स्वस्तात एका कुटुंबाला विकून निघून गेले. त्या नंतर ते कुटुंबही तेथे कधी राहायला आलेच नाही, परिणामी तो बंगला झपाटलेला म्हणून ओळखला जाऊ लागला.हाच तो भूत बंगला. भूत बंगल्यात एक चेडा रहात असे. तो दुपारी बारा ते दोन आणि रात्री बारा ते दोन अशी बहुदा ड्युटी करत असावा असे मोठ्या माणसांच्या चर्चेतून कळे. ह्या चेडयाकडे आपली उंची कमी जास्त करण्याचा मंत्र किवा कसब असावे. तो सहसा कोणास दिसत नसे, ह्याला राक्षस गण असणाऱ्या व्यक्ती अपवाद होत्या. मोठ्या माणसांकडून याच्या इतक्या कथा ऐकल्या होत्या की त्याची फिरण्याची वेळ वगळून जरी तेथून गेले तरी अंगावर काटा येत असे.

दुसरे ठिकाणं होते कुर्लाई देवीच्या मंदिरा पुढे असणारे पापडीचे झाड . यावर म्हणे एक पिशाच्च निवास करत होते आणि ते कोणाला तरी झपाटून टाकत असे. ज्याला ते झपटे तो असंबंध बडबड करत असे किंवा त्याला वेड लागे. त्यामुळे त्या वाटेने जावे लागले तर रामनामाचा जप करत आणि आत्ता कोणी येईल आणि गपकन मानगूट धरेल ह्या भितीने सावध नजर ठेऊन चालत असू तेव्हा हा प्रश्न पडलाच नाही की ते पिशाच्च आहे तर डोळ्यांनी दिसेल कसे?  कधी एकदा ते झाड आणि तो परिसर पाठी पडतो असे होई. हा परिसर ओलांडला की एक चिंचेचे जुने झाड होते इथे फार पूर्वी स्थानिक आदिवासी समाजाची मसनवट होती आणि तिथून दुपारच्या वेळी किंवा रात्री बारा नंतर जाणे सुरक्षित समजले जात नसे.हा असा सगळा गावातील माहोल असल्याने लहान पणी “संध्याकाळी सातच्या आत घरात” हा आम्हाला नियम होता.आज ह्या सगळ्या प्रकारांचा विचार केला असता हसू येते आणि प्रश्न पडतो आता ही सगळी भुतावळ कुठे गेली.पण लहानपणी असे काही प्रकार घडले आणि ऐकले त्यामुळे भितीचा पगडा प्रचंड होता हे मी आजही नाकारत नाही.

हे भूत प्रकरणं कदाचित काही स्थानिक मंडळीनी दहशत पसरवण्याकरिता निर्माण केलं असावं असं आता वाटते. असे घरातील मंडळी सांगतात की मी तीन ते चार वर्षांचा असताना रात्री अचानक घरावर मोठे मोठे दगड पडल्याचा आवाज झाला, तो किमान पाच, दहा मिनिटे सुरू होता. घरातील सर्व म्हणजे पाच सहा लहानमोठ्या माणसांनी हिय्या करुन घराच्या बाहेर पडावं आणि पहावं ठरवले पण बाहेर येऊन पाहतात तर अगदी शांत, कुठे चीटपाखरू दिसेना, तसेच छतावर बॅटरी मारून पहिली तर  एक ही कौल फुटलेले दिसेना. सगळे घरात गेले आणि दार लावले तर पुन्हा तोच प्रकार ह्या वेळेस दारावर धडका बसू लागल्या.पण कोणाची बाहेर पडून कोण आहे ते पाहू या असे म्हणायची हिम्मत होईना.

त्या प्रकरा नंतर महिन्या भरात वेगळाच प्रकार घडला, घरातील दुसऱ्या लहान मुलाला शौचाला रात्री झाले, आता सारखे घरात संडास नव्हते, म्हणून त्याला त्याची  आई  बाहेर घेऊन गेली तिने त्या चेड्याला पाहिले तो पांढरा शुभ्र धोतर सदरा घातलेला माणूस कधी उंच तर कधी लहान होत होता त्याला पाय नव्हते. तिने कसेबसे घरात शिरत दार लावून घेतले. दार बंद होताच त्याने दार जोराने ठोकायला सूरावात केली, आता दार कोसळते की काय अशी भीती वाटत होती.प्रत्यक्षात दाराला काहीही झाले नाही.





अशा भीतीदायक  गंभीर घटना ऐकल्या मुळे त्याचा पगडा मनावर झाला. या पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे गावात एक अतिशय साधा परंतु विक्षिप्त मोठा मुलगा रहात होता, रमेश त्याच नाव. हा माणूस कशालाच घाबरत नसे त्याला भूतांना वश करून घेण्याची विद्या अवगत होती त्यामुळे तो आम्हाला तो फार शूर वाटे. हा माणूस गावातील श्रीमंत व्यक्तीचे निधन झाले की स्मशानात जाऊन राख चाळून काढी. श्रीमंत व्यक्तीचे निधन झाले तर त्याच्या मुखात सोन्याचे पान आणि सौभाग्यवती गेली तर मंगळ सुत्रातील सोन्याचा मणी ठेवण्याचा प्रघात होता. अगदी श्रीमंत व्यक्ती असेल तर भिकबाळी किंवा अंगठी अग्नीसंस्कार करताना तशीच ठेवत. त्यामुळे हा रमेश कोणाचे निधन झाले याची बातमी ऐकून ठरवत असे. ह्या स्मशानातील राख चाळून नक्की काही मिळेल याची हमी नसली तरी प्रयत्न करावा लागे. आम्हाला ही माहिती आम्ही आठवीत शिकत असताना मिळाली आणि मोठं नवल वाटलं. याची खात्री करावी म्हणून आम्ही दोन तीन मुलांनी ठरवलं पण तो हे काम कधी करतो हे कोणाला विचारणार आणि जर दिवसा दुपारी जाण्याची मनात दहशत तर रात्री हिम्मत कोण करणार. अर्थात हा बेत बारगळला.

क्रमशः

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “भिती अज्ञाताची भाग १

  1. Namdeo Bandu Ahire
    Namdeo Bandu Ahire says:

    Nice

  2. A b Lohar

    Chaan, it’s fact. Back in my old days. Ty

  3. अब्दुल रहीम
    अब्दुल रहीम says:

    खूपच interestingविषय. भूत, चेटुक एक्दम adventurous . मला आवडते तसेच भीति पण वाटते. ब्लॉग खुप आवडला.?

Comments are closed.