भिती अज्ञाताची भाग २
भिती कशाची वाटते तर ज्या गोष्टी कधी पाहिल्या नाहीत पण कोणा तरी व्यक्ती कडून ऐकल्या त्या गोष्टी बाबत, बर प्रत्येक व्यक्ती आपण ऐकलेली गोष्ट आपल्या जवळचा मीठमसाला लावून सांगत असल्याने त्याची दाहकता वाढत असे आणि “गलक्याचा भोपळा कधी झाला” हे कळत नसे. त्या वेळी मलेरिया निर्मूलन कर्मचारी ज्याला आता “आरोग्यरक्षक” म्हटले जाते ते घरोघरी भेट देत असत, यांना लोक “मलेरिया डॉक्टर ” म्हणत. ते आले की घरावर भेट दिल्याची तारीख लिहून कोणी आजारी आहे का याची चौकशी करत, पण लोक कांजण्या किंवा देवीचे व्रण कुणाला आले तरी खरी माहिती देत नसत. तेव्हा इंजेक्शनची भिती सर्वांना वाटे.
मला आठवतं चौथीत असेपर्यंत इंजेक्शन पाहिले तरी मला व काही मित्रांना भिती वाटे, आरोग्य खात्याची गाडी आली, तिचा आवाज आला तरी आम्ही ते इंजेक्शन देतील या भितीने लपत असू किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करीत असू. अर्थात शिपाई काका आम्हाला धरून आणत. आम्ही हातपाय झाडून सूटका करुन घेण्याचा प्रयत्न करीत असू पण शिपाई काकांच्या ताकदीपुढे आम्ही कुचकामी ठरत असू आणि इंजेक्शन देईपर्यंत आम्ही रडून वर्ग डोक्यावर घेत असू. लहान असताना एखादी गोष्ट ऐकली नाही की पालक भिती दाखवत, “ऐकत नाहीस ना, डॉक्टर काकांना बोलवून इंजेक्शन देणार”. या रागवण्यामूळे इंजेक्शन महाभंयकर असते असा समज मनात निर्माण झाला होता, म्हणून त्याची अवास्तव भिती वाटत होती. ही भिती इंजेक्शन देताना नक्की काय होते ह्याची कल्पना नसल्याने वाटत होती, एकदा इंजेक्शन टोचले आणि नंतर लक्षात आले अरे मुंगी चावल्यवर वेदना होते तेवढी वेदनाही झाली नाही. मग मी ऊगाच का आरडाओरडा का केला, असे वाटून माझेच मला हसू आले. मला हसतांना पाहून सिस्टर हसू लागल्या आणि त्या हसतात पाहून शिपाई हसू लागला आणि सारा माहोलच बदलून गेला. त्या नंतर इंजेक्शनसाठी कोणीच रडारड केली नाही.
तेव्हा देवीच्या आजारासाठी दंडावर छप्पे उठवत, त्यामूळे ताप येई. आता मुलं जन्माला आल्यापासून इतक्या प्रकारच्या लसी टोचल्या जातात की मुलं आणि त्यांची आई यांना त्याची भिती उरली नाही. आज लहान मुलांना बागुलबुवा,भूत, मरी आई असल्या शब्दांची भिती वाटत नाही. त्यांचे कॉम्पुटर वर असलेले खेळ इतके हिंसक असतात की त्या खेळांपुढे ही भुते नगण्य ठरतात. ही मुले मारामारीचे आणि पिस्तुल, तलवार, मशीनगन यांचा वापर असलेले खेळ खेळून हिंसक तर होणार नाहीत ना? अशी भिती पालकांना वाटते. हे खेळ जरी आभासी असले तरी या खेळामूळे मुलांच्या मानसिकतेत फरक नक्कीच पडतो असे मानसोपचार तज्ञांचे मत आहे.
वास्तवता असे घडलेही. “pubg” या खेळात प्रत्येक पातळीवर नवे आव्हान असे आणि ते पार करता यावे म्हणून खेळणारी मुले कोणत्याही थराला जात. यातूनच काही मुलांनी खोटा खोटा फास लाऊन घेण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने तो चुकला आणि मुलगा फास लागून मेला. Tiktok वर video बनवताना कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा असे जिवावर बेतणारे खेळ खेळणे किती योग्य ह्याचा विचार मुलांच्या पालकांनी आणि हे आभासी खेळ तयार करणाऱ्या कंपन्यांनी ठरवले पाहिजे. खरेच भिती हा शब्द मुले विसरली की काय असा प्रश्न पडतो?
हीच बाब परीक्षेतील कॉपी विषयी. विदर्भ, लातूर अशा ठिकाणी विद्यार्थी न घाबरता मोठ्या प्रमाणात कॉपी करतात आणि कधी कधी त्यांचे मित्र, पालक आणि शिक्षक त्यांना मदत करतात. यात नैतिक अधःपतन आहेच पण सामाजिक गुन्हाही आहे. या विद्यार्थ्यांना अशी कॉपी करतांना भिती का वाटत नाही ? या मुलांवर चांगले संस्कार झाले नाहीत किंवा वाढत्या वयानुसार या मुलांनी प्रगतीचा शॉर्टकट वापरणे ठरविले असावे. विकासासाठी अशा चुकीच्या मार्गाचा वापर करणे आणि चुकीचा पायंडा नवीन पिढीसमोर घालून देणे धोकादायक आहे.
भिती वाटण्यामागे अनेक कारणे आहेत, लहान मुलांना जशी अंधाराची भिती वाटते तशीच एखाद्या व्यक्ती विषयी वाटते. त्या व्यक्तिविषयी जर अन्य कोणाकडून त्यास चुकीची माहिती मिळाली असेल किंवा त्याचे व्यक्तिमत्व तसेच भयावह असेल तरी त्या व्यक्तिविषयी आकस निर्माण होतो. मोठ्या व्यक्तीला एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही आणि आपला अपमान होईल किंवा आपले बिंग फुटेल याची भिती वाटत असते. ब-याचदा कर्मचाऱ्यांना आपल्या अधिका-याने बोलावले तरी भिती वाटते.आपले नेमून दिलेले काम आपण समजून केले त्यामध्ये चुका टाळण्याचा प्रयत्न केला तर मानसिक दडपण येणार नाही. एखाद्या गोष्टी विषयी मनात नकारात्मक भावना असेल तर ती गोष्ट जमत नाही किंवा त्या दिशेने आपण विचारच करत नाही आणी ती गोष्ट जमत नसल्याने त्या गोष्टी विषयी भिती किंवा चिड उत्पन्न होते. गाडीने प्रवास करण्या-या एखाद्या व्यक्तीला अधिकृत तिकीट असले तरी TC ची भीती वाटते.
माझ्या ओळखीच्या मुलीचं लग्न झालं, मुलगा मोठ्या आस्थापनेत तांत्रिक कर्मचारी कायम नोकरीत होता. पगार चांगला होता. घरदार होतं. संस्था सरकारी होती, अजून काय हवं? मुलगी आनंदी होती. लग्नानंतर नातेवाईक मंडळी जोडप्याला पाहूणे म्हणून बोलवतात तसे तिला बोलवले तिच्या एका मावशीकडे गेल्यानंतर तिथे तिच्या मावसभावाने आलेल्या पाहुण्यांना, तिच्या नव-याला इंग्रजी वर्तमानपत्र वेळ जावा म्हणून वाचायला दिले. थोड्या वेळाने त्या मुलीला दिसले आपला नवरा पेपर उलटा धरून पाहतोय, तिने चाणाक्षपणे त्यांच्या हातून ते वर्तमानपत्र घेऊन बाजूला ठेवले. घरी गेल्यावर तिने काहीच न भासवता मराठी वर्तमानपत्र त्यांना दिले आणि जरा मला हेडींग वाचून दाखवता का? मला मेलीला कामापूढे वाचायला वेळच मिळत नाही. तेव्हा ते त त प प करू लागले. मुलीने कपाळावर हात मारला. माहेरी येऊन आई वडिलांना दोष दिला. त्यांना बिचा-याना काय माहिती? झाले असे, ते शाळा शिकले परंतू कामाला लागल्यानंतर कधी पेपर पाहिला नाही कि कधी पुस्तक वाचलं नाही परिणाम अक्षर ओळखच संपली. कुठे गेलो आणि आपल्याला वाचायला वर्तमानपत्र दिले, पुस्तक दिले किंवा एखाद्या घटने बाबत विचारले तर काय सांगणार. या भिती पोटी त्यांनी पाहूणा म्हणून जाणेच बंद कले.
काही व्यक्तींना उंचीची तर काही व्यक्तींना पाण्याची भिती वाटते.ल हानपणी आम्ही तुडुंब भरून वाहणाऱ्या ओहोळात उडी मारत असू. वेगाने वाहणाऱ्या पाण्याची भिती आम्हाला वाटत नव्हती. आज मात्र मुलांना स्विमिंग क्लासला पाठवताना आम्ही दहा वेळा विचार करतो. ही भिती कुठून आली? आज प्रत्येकाला एकच अपत्य असतं त्यामूळे त्याची नको तेवढी काळजी घेतली जाते. तेव्हा कोणाचेही पालक मुलांच्या भविष्यासाठी आता एवढे चिंताग्रस्त नसत. आता मुलाला बालवाडीत प्रवेश मिळण्यापासून चिंता निर्माण होते. तो बरोबर उत्तर देईल की नाही, उत्तरं बरोबर दिली नाही तर प्रवेश रद्द तर होणार नाही ना? मुलाच्या शैक्षणिक प्रत्येक टप्प्यावर मुलाला जेवढी भिती वाटत नाही तेवढी पालकांना वाटते. जर मुलाला स्काँलरशीप मिळाली नाही तर! एस.एस.सी.ला मेरीटमध्ये आला नाही तर! अशा अनेक ‘तर’ चे दडपण घेत पालक आणि मुलं जगत असतात. “सगळ्यात जास्त भिती असते ती समाज, नातेवाईक, मित्र मंडळ,सहकारी काय म्हणतील याची.” आठवा आपले दिवस मुलगा किंवा मुलगी कितव्या इयत्तेत शिकते हे सुद्धा आठवून आपल्या पालकांना सांगावे लागे या बद्दल त्यांना अजिबात किंतूपरंतू वाटत नसे. मुख्य म्हणजे तेव्हा आपणही टक्क्यांच्या भानगडीत नव्हतो. आपल्या पेक्षा जास्त अभ्यास करणारे कुणी नव्हते म्हणून बहुदा “वासरात लंगडी गाय शहाणी” या न्यायाने आपण टिकून होतो.
आत्मविश्वासाचा अभाव असेल तर नवीन कोणत्याही गोष्टीची भिती वाटू शकते जसे वाहन चालवणे. सरकता जिना वापरणे, क्रेडिट कार्डचा वापर करणे, मोबाईल वापरणे, कोण्या नवीन अनोळखी व्यक्तीशी बोलणे, अगदी शिक्षण कमी असेल तरी न्युनगंडापोटी भिती वाटते. बरेच जण आपले शिक्षण लपवतात, अहमदनगर जिल्ह्यातील पेरे पाटील ज्यांनी त्यांच्या गावात विकास घडवून आणला, न घाबरता सांगतात की मी फक्त चौथी शिकलो, पण त्यांच्या अनुभवाची शाळा ते कधीच पास झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ते व्याख्यान देत फिरत असतात. ना त्यांना कमी शिकल्याचा न्युनगंड ना ग्राम्य भाषेची भिती.
कोणतीही गोष्ट प्रथम नवीच असणार आहे, आज घरात वापरली जाणारी गॅस शेगडी खेडो पाडी पोचली आहे. ही शेगडी वापरतांना ग्रामीण महिलेला भिती वाटत नाही, अगदी मोबाइल सुद्धा ती तेवढ्याच आत्मविश्वासाने वापरते. जसे जसे नवीन गोष्टीचे ज्ञान मिळत जाते, मनातील त्या विषयी भिती कमी होत जाते.
तेव्हा भिती ही फक्त भूत पिशाच्च यांचीच वाटते असे काही म्हणता येणार नाही. आम्ही एक रूपया दोन तास या दराने भाड्याने आणलेल्या सायकलवर सायकल शिकलो. अनेकदा ढोपर कोपर फुटले, पण त्यावेळी ना इंजेक्शन घेतले ना पट्टी बांधली. आज चुकून छोटी जखम झाली तर किती बाऊ केला जातो. टीटीचे इंजेक्शन, बँडेज आणि किती काही. आम्ही पडलो तर शर्ट, पँट फाटली तर घरून मार मिळेल याची भिती होती. कालानुरूप संदर्भ बदलतात हेच खरे. सकारात्मक विचार करण्याची मनाला सवय लावणे खूप गरजेचे आहे. जर शरीराला आणि मेंदूला काही काम नसेल तर नकारात्मक विचार मनात येण्याची शक्यता वाढते. “रिकामा मेंदू म्हणजे सैतानाचे घर.”
आताची पिढी भूतपिशाच्च अशा गोष्टीना घाबरत नाही हे चांगले लक्षण आहे. आम्हाला मात्र भुता-खेतांची भिती बरेच वर्षे वाटत होती. वय जसे वाढले आणि वाचायचा छंद जडला तसे रत्नाकर मतकरी, नारायण धारप, बाबुराव अर्नाळकर असे मिळतील त्या लेखकांची पुस्तके वाचली. लेखकाचे मनोगत वाचलं आणि लक्षात आले की भूत किंवा अतृप्त आत्मे असे काही वास्तव या जगात नाही. तरीही जंगलात एकटं दुकटं पाठी राहिलो की भितीची लहर सरसरत कण्यातून जाई.
माझ्या लहानपणी प्लांचेट केले जाई. एका सपाट टेबलवर जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडे ठेऊन मृत व्यक्तीच्या अंतर्मनाला आव्हान केले जाई आणि आपणास विचारण्याचे प्रश्र्न सांकेतीक उत्तराच्या भाषेत मिळवले जात. अतृप्त आत्म्याच्या साह्याने गुढ प्रश्र्नांची उत्तरे मिळवत. आम्ही मग वेड्यासारखे फस्टक्लास मिळेल का? अमका आजारी आहे तो वाचेल का? असे प्रश्न विचारत असू आणि मनासारखे उत्तर मिळाले म्हणजे त्या प्लांचेटच्या पाया पडत असू. तेव्हा प्लांचेट करणारा उगाचच भाव खाऊन जाई.
गंमत म्हणजे या प्लांचेट विषयी तेव्हा वर्तमानपत्रात लेखही वाचल्याचे मला चांगले स्मरते. सुरवातीला या प्लाचेंटच्या उलट्या ग्लासवर हात ठेवायलाही भिती वाटे. न जाणो गांधीजींचा आत्मा आपल्या शरीरात शिरला तर! कर्मधर्म संयोगाने असे काही झाले नाही.
लहानपणी असे अनेक उद्योग करत असू, आमच्या आजुबाजूला रहाणारे कधी कधी खाडीत मासे पकडण्यासाठी आके,जाळे घेऊन जात,रस्त्यात कोणालातरी लहर येई तो उद-या काकाला सांगे, “काका तू माग सांगलात त्या गी-या आमी जाताव तय नी ना,नी त वाठ लागायची”. आता हे गि-या काय असते ते सांगतो, नदीत खाडीत असं एक भूत असतं जे तुम्हाला फसवून खोल खोल पाण्यात नेत त्या साठी ते तुमच्या जाळ्याच्या आसपास तुम्हाला खूप, खूप मासे दिसू लागतील असे पहात, त्या माशांच्या मोहापायी तुम्ही किती खोल पाण्यात जाता ते तुम्हाला कळत नाही, आणि मग हे गिरा नावाच भूत तुम्हाला बुडवून मारत. मी ही गोष्ट अशीच कोणाकडून तरी ऐकली होती. त्या गि-याच नाव ऐकूनच माझे हात पाय गळाले.
झक मारली आणि मासे मारायला आलो असे वाटले. त्या दिवशी आम्हाला कोलंब्या,निवट्या आणि बोय मासे थोडे अधिकच मिळाले आणि मनातील भिती वाढली नक्कीच हे गि-याचच काम असावं अस वाटू लागल आणि मी त्यांच्या मागे टुमण लावल,”चला अंधार पडतोय, मासेही खूप मिळालेत मग परतायला वाट सापडणार नाही.” त्यांना मात्र मिळणाऱ्या माशांचा मोह सोडवत नव्हता आणि इथ मात्र आमची पँट ओली व्हायची पाळी आली होती. मी देवाचा धावा सुरू केला आणि त्यांनी आवरत घेत वाट धरली. मी मात्र त्यांच्या मधोमध चालत होतो, न जाणो गि-या येऊन माझीच मानगूट धरून पाण्यात घेऊन जायचा. घरी पोचलो तेव्हा कुठे त्या गि-याच्या विचाराने माझी पाठ सोडली.
आता जेव्हा कधी ह्या गंमती जमती मुलांना सांगतो तेव्हा त्यांची हसून पुरती वाट लागते. पंचवीस तीस वर्षांपूर्वी बंगाली बाबांच प्रस्थ कुर्ला, बांद्रा, मस्जिद, जोगेश्वरी या भागात होतं. “हर तकलिफ हर समस्याका समाधान, सौ परसेंट गँरेटीके साथ” अशी जाहिरात ब-याच वर्तमानपत्रात दिलेली असे आणि अडाणी अशिक्षीत, गांजलेले लोक आपल्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी या बाबा लोकांकडे जात. त्यांच्या मनातील भितीचा आणि दहशतीचा फायदा हे कुडबुडे बाबा घेऊन आपले दुकान चालवून लूट करत.प्रत्येक शहरात,प्रत्येक गावात असे भोंदू बाबा आजही आहेत आणि लोकांना वाटणा-या अगम्य भितीचे भांडवल वापरून यांचा धंदा आजही सुरू आहे.
कोणतीही गोष्ट विज्ञाननीष्ठ बाजूने आपण पहात नाही तोपर्यंत विश्वास न ठेवणे हा सरळ मार्ग आहे. म्हणून मनात कोणताही प्रश्न उद्भवल्यास त्याचे योग्य मार्गदर्शकाकडून निरसन करणे नितांत गरजेचे आहे. शिकले सवरलेले जेव्हा आपली समस्या सोडवण्यासाठी अशा भोंदू बाबांच्या नादी लागतात तेव्हा हसावं की रडावं तेच कळत नाही. कोकणात एक बाबा होते, लोक आपल्या घरातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या मठात जात,एकदा एक गमतीशीर किस्सा घडला, एक चाळीशीतला शेतकरी बाबाकडे आला आणि बाबाच्या समोर त्यांनी नमस्कार केला, “ये सोन्या काय म्हणत,बरो आसस मा?” बाबाने विचारले. “बाबा, एक प्रश्न घेऊन इलय काय सूचणा नाय.” “मठात इलस मा,आता त्याका काळजी,बोल काय अडचण हा?” “बाबा,माझो पाडो कसो तरी करता,अंगात इल्यावरी वागता काय सूचणा नाय?”
बाबा काही गुरांचा डॉक्टर नव्हता पण ठोकताळे बांधून काही तरी सांगण्याएवढ ज्ञान बाबानी अनुभवाने मिळवल होत.”सोन्या किती दाती हा पाडो?” बाबाचा प्रश्न, “चार दाती हा.” त्याचं उत्तर. बाबानी डोळे मिटून घेतले, तोंड हलवत काही तरी पुटपूटल्या सारख केल. आणि एक काळा दोरा त्याच्या हाती देत म्हटलं “निरवंशाची बाधा झाली हा, गावात पोराटोरांशीवाय कोण इसम हा काय?” त्याने आठवल्यासारखं केल आणि म्हणाला,”होय तर बाई माणूस हा,तिच्याच्यान बघवणा नाय, माझो पाडो वाटेन जाऊक लागलो तरी बघीत रवता.” बाबा हसला, “व्हय मा, जा काय एक काळजी करु नको हो दोरो बांध दोन दिवसात तुझो पाडो सामको जाईत.” त्यानी पन्नासची नोट काढून बाबाच्या पायासमोर ठेवली.बाबांनी ती उचलून त्याला परत दिली, “सोन्या,माका दिसता तूझ्या पाड्याचो वाचे बाध मोडुक ऊतारणी करूक व्हयी, त्याका ह्या सामान लागात.” त्याने बाबाकडे येऊन झक मारली वास्तविक तो बैल माजला होता, सतत बांधून ठेवल्याने त्याची मस्ती वाढली होती पण हे महाशय आले मठात, या प्रकरणी देव काय करणार? आता बाबा काय सांगेल ते करणे आले, नाही केले आणि त्याच्या चुकीने किंवा वेळेत गुरांचा डॉक्टर न केल्यास काही झाले तरी वांदे.अशी भीतीयुक्त दहशत बसवून खेड्या पाड्यात भोंदू बाबा आपला कार्यभाग साधत असतात.
कोणी मुलगा व्हावा म्हणून, कोणी कोर्ट कचेरीत यश मिळाव म्हणून,तर कोणी समोरच्या व्यक्तीचा नायनाट व्हावा अशा वाईट हेतूने बाबाकडे येतात आणि बाबा आपल्या बोलण्या वागण्यातील चलाखीने त्यांची कुंडली काढून लुट सूरु करतो. विज्ञान पूढे गेलं तरी टि.व्ही वर लागणारी “रात्रीस खेळ चाले” चे इपिसोड पाहून ती कथा आठवूनही लोक झोपेत दचकतात.हे भूत त्यांच्या मनात असते.
माझ्या लहानपणी एक अजब किस्सा घडला, एक घर बांधण्यासाठी आखणी सुरू होती,खर तर तेवीस बाय एकोणतीसचा चौथरा आणी त्या मध्ये तीन खोल्या एवढी साधी रचना, ही आखणी करतांना या व्यवसायाचा अनुभव असणारे गृहस्थ आले होते. परंतू या मापाच्या खुंट्या ठोकुन दुसरीकडे खुंटी ठोकायला गेल की मापात फरक पडत होता.एकदा नव्हे किमान चार वेळा हा प्रकार घडला आणि ती व्यक्ती कंटाळून गेली, म्हणाली आज पर्यंत अनेक घर बांधली पण एवढ साध माप घेताना अशी दमछाक झाली नव्हती. कोणी तरी म्हणाले ,”दादा या काला मांजर हाय ना, ती अथुनशी फिरतय, माना वाटता यानुस काय तरी गडबड हाय.” त्याने त्या मांजरीला दगड मारुन पीटाळले. ती मांजरही म्याव म्याव अस कर्कश ओरडत निघून गेली. थोड्या वेळाने मोजमाप करून खुंट्या मारल्या आणि काम पूर्ण केलं पण त्या मजूरानी उच्चारलेल वाक्य घर मालकाच्या मनात घरघर निर्माण करून गेलं. एक शुल्लक मांजर, त्याचा या मोजमाप प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसावा पण घडलेल्या घटनेनी आणि त्या मजूराच्या वाक्यानी घर मालकाच मन संभ्रमीत झालं. असं कसं घडलं? नक्कीच काही भूचेष्टा असावी असा ग्रह मनाशी झाला. एक अद्रुश्य भितीने मनात प्रवेश केला. घराचा पाया खणतांना मेलेल्या प्राण्यांची हाड,जुने मातीचे मडके,एखादी घरगुती जुनी वस्तू तेथे सापडली आणि ही जागा नक्की झपाटलेली आहे असा जावई शोध लागला. ही भावना एवढी दृढ झाली की घर बांधणे थांबवावे लागले.
कोणी आजारी पडल की त्याच्यावर डॉक्टरी उपचार करण्या ऐवजी हे खेड्यातील लोक भगताकडे घेऊन जातात आणि उपचार न झाल्यामुळे ती व्यक्ती दगावली की कोणालाही दोष देतात. यात त्यांनीच भुताळीण ठरवलेली एखादी बाई असू शकते. आदिवासी पाड्यात करणी केली म्हणून बाईला मारल्याच्या अनेक घटना त्या वेळी मी ऐकल्या होत्या. हे भुताटकी प्रकरण मात्र तेव्हा अनेक गावात ऐकू येई. एखाद्या घरातील तयार स्वयंपाक रक्ता सारखा लालभडक होई तर कधी तयार केलेल स्वयंपाक नाहीसा होई. या मुळे संपूर्ण घर भयभीत होई. एखाद्या महिलेबाबत तसा प्रवाद निर्माण झाला की अडाणी आणि शिकुनही अज्ञानी राहिलेले लोक तिची दहशत बाळगत तिच्याकडुन वस्तू घ्यायला किंवा तिने काही खाण्याची वस्तू दिली तर ती खायला घाबरत.
एकदा आमच्या घरापासून थोड्या अंतरावर एका घरी एक मुलगी आजारी पडली तीचा कान सतत वाहत असे योग्य उपचार न झाल्याने ती वारली.त्यांच्या घराला लागुन एक मोठे फडाडीचे झाड होते. बहुधा त्यावर वटवाघळे असावीत, ज्या दिवशी ती मुलगी वारली त्या दिवशी त्या झाडावरील वटवाघूळ चुकून घरात शिरले आणि पेटत ठेवलेल्या तेलाच्या दिव्याला अडकले त्या नंतर अशी बातमी पसरली की रात्री मुलीचे भूत घरात शिरले आणि त्यांनी दिवा विजवून टाकला.बरेच दिवस त्या घरात एकट दुकट कूणी थांबत नसे.वास्तविक ह्या प्रकरणी त्या मुलीच्या आत्म्याचा काही संबंध नव्हता पण सांगणार कोण?
ग्रामीण भागात आजही रहदारीच्या रस्त्यावर ओवाळणी टाकलेली दिसते, यात कोहाळ्याला अबीर, गुलाल थापून त्याला टाचण्या टोचून तो रस्त्यावर ठेवलेला दिसतो.तर कधी भातावर अबीर, गुलाल ,काळे तीळ, लाल फुले, काळा दोरा अशी ओवाळणी टाकली जाते. हे ओवाळणी पाहीली तरी मनाने कमकुवत असणाऱ्या व्यक्तीच्या मनावर दडपण येत.
जसे जसे अंनिस सारख्या संघटनेच्या माध्यमातून प्रबोधन झाले तसे हे प्रकार कमी झाले. मात्र आजही जूने लोक ह्या ओवाळणीच्या बाजूने जायलाही घाबरतात. निर्जन रस्त्यावरून येतांना जर व्यक्ती एकटी असेल तर मनात अगम्य भिती निर्माण होते आणि त्या भितीच्या दबावाने माणूस घाबरून जातो त्याचा परिणाम म्हणून ताप येणे मानसिक संतुलन हरवणे, भिती वाटणे असे प्रकार घडतात. परंतु त्याला खंबीर बनवून त्याची भिती घालवण्याएवजी आम्ही ऊतारे, धुपारे काढतो आणि त्याचे मन कमकुवत करतो.
चाळीस वर्षांपुर्वी देवी किंवा कांजिण्या आल्या तरी दैवी कोप झाला समजले जाई आणि तिचा जागर चाले. या प्रकाराची भीती किंवा दहशत उगाचच पसरवून लोक आपले पोट भरत.आदिवासी पाड्यात भगत असे, तो भूत पिशाच्च,संबंध याचा अधिकृत एजंट असे.त्याचा सल्ला घेऊन उतारा केल्याशिवाय पर्याय नसे.
देवी किंवा कांजण्या आल्या की हा भगत येई. देवी आलेल्या व्यक्तीची ओटी भरली जाई. त्याला इतर बघे देवी समजून पाया पडत. भगतासोबत दोन सहकारी असत. एका पितळेच्या ताटात किंवा वेळणीवर मध्यभागी मेण चिकटवून त्यावर वेळू उभा केला जाई, या वेळूवर अलगद हात फिरवला की त्यातून एक सुदंर नाद येई या तालावर पुराणातील आख्यान ढोलकीच्या तालावर चाले. नऊ दिवस हा जागर झाला की देवी आलेल्या व्यक्तीची वाजत गाजत मंदिरात मिरवणूक काढली जाई तीथे ती केस मोकळे सोडुन घुमत असे डोक्यावर हळद कुंकू लावून अवतार जास्त भयावह बनलेला असे आणि अंगात देवीचा संचार झाला अस गृहीत धरून ती व्यक्ती दमछाक होईपर्यंत नाचत असे.
सर्व लोक तिची पूजा करून तिला काय हवे ते विचारीत आणि ती वस्तू देण्याचे मान्य करत. सर्व भक्त पाया पडून मोकळे झाले की देवीपुढे ती पडून राही. ह्या प्रकारात ती नाचताना जोराने श्वास घेत घुमत राही असे केल्याने किती थकत असावी आणि तिची किती कुचंबणा होत असावी तीलाच ठाऊक पण समाजाच्या आणि घरातील दबावाने तिचा इलाज नसे .कालांतराने हा प्रकार बंद झाला. ह्या देवीच्या जागरणाचा त्रास संपूर्ण गावाला होत असे कारण रात्रभर ते वेळूवर वाजवून पुराणातील कथन आणि ढोलकीचे वाजवणे सुरू असे केवळ दैवी कोप होऊ नये म्हणून कोणी या अनिष्ट प्रथेविषयी बोलत नसे. देवी,कांजण्या हे दैवी प्रकोप झाल्याने नव्हे तर विषाणूमुळे येतात हे तेव्हा कोणाला मान्य नव्हते. बिचारा एडवर्ड जेन्नर त्याने ही प्रथा ऐकली असती तर जीव दिला असता.
ज्या घरात महीलांवर तिच्याच नव-याकडून तीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार होत असे अशा महिला या अंगात देवी येण्याच्या तंत्राचा वापर करून स्वतःला सुरक्षीत करीत, अर्थात ही गोष्ट झाकली मुठ सव्वा लाखाची या म्हणी प्रमाणे पाळावी लागे. ही पिडीत महीला आपले दु:ख कोणाला आणि कसे सांगणार पण एका शारीरिक भितीतून मुक्त होण्यासाठी तिला हा प्रकार करावा लागे आणि कालांतराने ती बाई स्वतः स्विकारलेल्या अवस्थेत राहात असे. यात तिच्या अंगात येणाऱ्या दैवी संचारामुळे लोक तिच्याकडे आदरयूक्त भावनेने पहात.
आता खेड्यापाड्यात, घरोघर विज आली आहे. शिक्षणाची गंगा घरोघरी पोचली आहे.अनेक कार्यकर्ते समाजातील आनिष्ठ प्रथा परंपरा बंद व्हाव्या, प्रत्येक घटनेकडे डोळसपणे व शास्त्रीय भुमिकेतून पहावे याबाबत प्रबोधन होत आहे, तरुण पिढी जागृत आणि चौकस झाली आहे. कोणत्याही अंधश्रध्देवर विश्वास न ठेवता हे नवतरूण वास्तव वादी विचाराने काम करत आहेत. एकविसाव्या शतकातील तरुणांनी जास्तीत जास्त प्रवास करून वास्तव जाणून घेणे गरजेचे आहे तरच जून्या अंधश्रद्धा, रुढी परंपरा दूर होतील.