भेदा भेद अमंगळ

भेदा भेद अमंगळ

 नेहमीप्रमाणे आठ तेराच्या लोकलने जात होतो, इतक्यात एक अंदाजे पन्नास वर्षांच्या बाई येवुन आमच्या सीटच्या बाजूस उभ्या राहिल्या. काळी साडी, काळा ब्लाऊज, कपाळाला मोठे सफेद गंध, गळ्यात माळा, हातात सोन्याच्या बांगड्या असा साज होता. गर्दी वाढू लागली. सहसा गर्दीच्या गाडीत महिला एकटी येत नाही हे माझे निरीक्षण, पण त्यांच्या हातात एक पिशवी आणि गळ्यात ऑफिस बॅग अशा तयारीत गाडीच्या पॅसेजमध्ये उभ्या होत्या.

आधीच गाडी खचाखच भरली होती त्यात कुठेही नीट उभे राहायला जागा नव्हती, इतक्यात कोपर स्टेशन आले तसे गर्दी अजून वाढली. मीच अस्वस्थ झालो, बाई ह्या गर्दीत कश्या तग धरणार? गाडी सेमीफास्ट असल्याने गर्दी ठाण्यापर्यंत  वाढतच जाणार होती. गर्दी वाढली तश्या बाई आमच्या सिटच्या पॅसेजमध्ये शिरल्या. वर हात धरायला काहीच नसल्याने त्यांना तोल सावरत नव्हता. मी नाईलाज म्हणुन उठून जागा दिली. त्या बसल्या आणि पुस्तक काढून वाचू लागल्या, थोड्या वेळाने त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं, मी म्हणालो “Madam why don’t you go in Ladies compartment? It’s difficult to travel in general compartment.”

त्या माझ्याकडे पाहून हसल्या, मात्र काही उत्तर देण्याच्या भानगडीत पडल्या नाही. मी नाईलाजाने तसाच उभा होतो. ग्रुपमधील सतिश उठला “सर आईये, यहा बैठो.” मी बळेच त्याला म्हणालो “अरे नहीं नहीं, तुम बैठो अभी तो थाना भी नहीं गया, मैं थाना मे बैठुंगा.” तो हाताला धरत म्हणाला “नहीं ,नहीं ,आपको खडा देखके मुझे अच्छा नहीं लगता. आपको खडा रेहना पडे और हम बैठे ठीक नही.” त्याचा आग्रह असल्याने मी बसलो. त्या मॅडम शांत बसल्या होत्या. आम्ही आमच्या गप्पा गोष्टीत रंगून गेलो. घाटकोपर आलं तसं त्या उठल्या आणि उतरून गेल्या. मी त्यांना विसरून गेलो.

दुसऱ्या दिवशी त्याच आठ तेराच्या गाडीला नेहमी प्रमाणे आम्ही धावतच गाडी पकडली. आम्ही सिट पकडून रिलॅक्स होत होतो, नेहमी प्रमाणे गाडी दोन मिनिटात भरली आणि काल आलेल्या बाई आमच्याच डब्यात चढून , आमच्या सीट जवळ येवुन उभ्या राहिल्या. मी मनातल्या मनात चडफडलो, “काय हे! ह्या बाईंना  नेमकी हीच जागा मिळाली उभ रहायला? ” त्या तश्याच उभ्या होत्या ,गर्दी वाढू लागली. मला राहवले नाही.  “Ma’am I told you yesterday, the compartment is very crowded, why don’t you go in the ladies compartment?”  त्यांनी माझ्याकडे पाहिलं, चेहरा तसाच शांत ठेवत त्या म्हणाला  “I am on  fast, I can’t travel in  ladies compartment  for a month , I will stand here, I am comfortable.” त्यांना मी काय बोलणार, पण मी मनाशी ठरवलं त्या त्यांचं व्रत किंवा उपवास मोडू नये म्हणून मुद्दाम या डब्यात येत असतील तर आम्ही तरी उदार होऊन रोज त्यांना जागा का द्यावी? या पूर्वी जेव्हा जेव्हा स्त्रीदाक्षिण्य म्हणून महिलांना जागा दिली त्यांनी त्या बसल्या नंतर जेव्हा जागा रिकामी झाली तेव्हा हाताने अडवत ती आपल्या पतीला किंवा सोबत असणाऱ्या तरुणीला दिली, आणि जागा देणारा बिचारा उभ्यानेच प्रवास करत होता.

मला आश्चर्य वाटलं आपले उपवास त्याचं पावित्र्य टिकवण्यासठी त्या या गर्दीत पुरुषांच्या डब्यातून  प्रवास करायला तयार होत्या. मुंबईत आणि या युगात शिवाशिव पाळणारी गृहिणी पहिली आणि आश्चर्य वाटलं. महिलांना येणाऱ्या मासिक पाळीत त्यांनी घरी राहायचं ठरवले तर किती प्रश्न निर्माण होतील. विविध माध्यमावर या बाबत पुरेशी चर्चा होत असताना या बाबत वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन होत असतांना या बाईंच्या कानावर काहीच पडल नसावं ही शक्यताच नव्हती. 

 सार्वजनिक ठिकाणी या अडचणीच्या दिवसात महिलांनी आणि शाळा  महाविद्यालयातील मुलींनी आरोग्याची काळजी घ्यावी या करीता सॅनिटरी नॅपकिन याची वेंडिंग मशीन बसवली असूनही आणि या बाई या फेजमधुन गेल्याच असाव्यात तरीही या बाईच्या मनात आजही त्या बाबत असा संकुचित दृष्टीकोन ऐकून आश्चर्य वाटले. जेव्हा ग्रामीण भागातील  महिला व पुरुष या मासिक पाळीच्या शास्त्रीय घटनेबाबत अनभिज्ञ होते तेव्हाची गोष्ट निराळी होती. परंतु सुशिक्षित आणि शहरात उच्च पदावर नोकरी करणाऱ्या महिलांनी आपल्या इतर मासिक पाळी येणाऱ्या भगिनिबाबत इतका संकुचित विचार करणं किती योग्य? शिकल्या सवरल्या लोकांनी विशेषतः महिलांनी हा दृष्टीकोन ठेवायला नको का?

भेदाभेद ही फार जुनी कीड आहे. तो स्पृश्य अस्पृश्य यांच्या बाबतीत, श्रीमंत गरीब यांच्या बाबतीत, काळे गोरे यांच्या बाबतीत वर्षोन वर्ष बाळगला जात होता आजही बाळगला जात आहे.  अमेरीकचे गत राष्ट्राध्यक्ष याच मानसिकतेचे होते. जर्मनीत हिटलरने केवळ वंशव्देश म्हणूनच हजारो ज्यू लोकांची हत्या केली होती. तेव्हा एका वंशाने दुसऱ्या वंशाबद्दल आकस बाळगणे हे फार पूर्वीपासून चालत आले आहे.आर्य आणि द्रविड यांच्यातील मतभेद जाहीर आहेत. आज आपण समता, बंधूता, समरूपता आणि एकता स्विकारली, घटनेने त्याचे उदात्तीकरण केले असे असूनही भेदाभेद मिटला असे दिसत नाही.

मी ज्या गावात राहात होतो तेथे मी दहा बारा वर्षांचा असताना दोन देवळ्यांच्या पूजेच काम पहात होतो. देवळ्या म्हणजे छोटी मंदिरे. या देवळ्यात महादेवाची पिंड, हनुमंत एका देवळीत आणि दत्तत्रेय,आणि गणपती दुसऱ्या देवळीत स्थानापन्न होते. या मंदिराच्या पूजेचे  काम महिना पाच रुपये मिळणार म्हणून स्वीकारले होते तेव्हा देवावरील भक्तीचा, श्रद्धेचा भाग हा होता की नव्हता ते आज नाही सांगता येणार. माझ्यासाठी तेव्हा ते पाच रुपये महत्वांचे होते हे मान्य करावेच लागेल.

आम्ही ब्राह्मण कुटुंबातील असलो तरी त्या देवळ्या ज्यांच्या मालकीच्या होत्या ते कोकणस्थ ब्राह्मण होते. त्या मामीचं सोवळं फारच कडक होतं. पूजेची तयारी करून त्या दुरून मला देत मी शुचीर्भुत होऊनच पूजेस येत असे तरी माझ्याशी त्या असे वागत, जणू त्यांचं ब्राह्मण्य वरच्या पातळीचं होतं आणि माझा स्पर्श झाला तर त्यांचं सोवळं भंग पावलं असतं. याचाच अर्थ ब्राह्मण समाजातही उच्चनिच भेद तेव्हा होते आणि आज एकविसाव्या शतकातही आहेत. फक्त जागतिकीकरण झाल्याने प्रत्येक जण आपल्या सोईचे तितके सांभाळतो. आपल ब्राह्मण्य टिकवण्याची, त्याचं पावित्र्य टिकवण्याची ही धडपड पहिली की आपण अश्मयुगात जगतो आहोत की काय? असे नक्की वाटू लागते.

 तिरुमला मंदिरात बारा ते पन्नास वयोगटातील महिलांना दर्शनासाठी प्रवेश नाकारण्याची मानसिकता यातूनच निर्माण झाली असे म्हणण्यास वाव आहे. मागे पुण्याच्या महिला जनसेवक श्रीमती तृप्ती देसाई यांनी तिरुमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तो तिरुमला येथील महिलांनी हाणून पाडला. या मंदिरात येण्यापाठी त्यांचा उद्देश हा राजकीय आहे त्यामुळे आम्ही त्यांना प्रवेश देणार नाही. अर्थात कायदा सुवेव्यवस्थेचं कारण सांगत तेथील पोलिसांनी त्यांना प्रवेशपूर्वी रोखून परत पाठवले.

मुख्य म्हणजे मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून महिलेला न्यायालयाचे दरवाजे ठोकवे लागतात हे लोकशाही राष्ट्राला लांच्छनास्पद आहे. मातेच्या ज्या गर्भाशयात आपण जन्म घेतला आणि आणि तिच्या रक्तमासातून आपला देह घडला तो गर्भाशय अपवित्र असं तर आपण म्हणत नाही ना!  “नरेची केला नर हिन” अस न म्हणता, “नारीनेच केली नारीस किती दीन ,फुका जगणे फुकाचे जीवन” असे खेदाने म्हणावेसे वाटते. आपल्या समाजातील महिलांना सक्तीने येणारी गर्भधारणा टाळता यावी म्हणून ज्यांनी प्रयत्न केला अशा सुधारकांच्या , धोंडो केशव कर्वे यांच्या महाराष्ट्रातही शिक्षित, प्रतिष्ठित लोकांच्या मनातच गैरसमज असावेत यासारखे दुर्दैव नाही.

मला आठवते मी लहान असताना आमच्या नात्या गोत्यातील  महिला या दिवसात घराच्या एका खोलीत वेगळ्या बसत असत आणि ती वेगळी का बसली?  याचं कारण जर घरातील कोणाला विचारलं तर तिला कावळा शिवला अस सांगितले जाई. अर्थात त्या लहान वयात मासिक पाळी वगेरे शब्द समजलेच नसते. तेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबात सामाजिक बंधन मोडून काढण्याची हिंमत नव्हती. खरे तर असे घरात वेगळे बसवण्यामागे वेगळा दृष्टीकोन असावा असे आज मला वाटते दुर्दैवाने तेव्हा आमच्या वडिलधाऱ्या मंडळींना या मागिल दृष्टीकोन माहिती नसल्याने  त्यांनी आम्हाला दमात घेऊन असले काही विचारण्याची मूभा दिली नाही. या काळात महिलांची शारीरिक झीज होत असते शा वेळी नेहमीच्या कामाच्या दगदगीतून त्यांना मोकळीक मिळावी, विश्रांती घेता यावी असा उद्देश असावा. पण महिला सहजासहजी आपले काम थांबवून आराम करणार नाहीत म्हणून त्याला धार्मिक बंधनाची  जोड दिली, पण अशिक्षित समाजानी त्याचा अर्थ लक्षात न घेता ते चुकीच्या पद्धतीने पुढे नेले. 

गंमत म्हणजे, आई  किंवा ताई  नेहमीच्या गृहिणीच्या रोल मधून बाहेर पडून या काळात वेगळी बसली की मी विचारत असे, “अशी एकटीच वेगळी का बसलीस?” , तर  ती ही “मला कावळा शिवला, आता चार दिवस मला वेगळच बसायचे आहे नंतर घरात येणार.” असे,  म्हणत मला आश्चर्य वाटायचे आपण ऐवढे बाहेर फिरतो कावळा आपल्या वाऱ्याला थांबत नाही आणि यांना बरं येऊन शिवतो, मी ठरवले होते आता पून्हा कावळा  आसपास दिसला तर त्याला दगड मारुन पिटाळून लावायचे. अर्थात कावळा कधी शिवतो ते कळायला मार्ग नसल्याने मी काही त्याला दगड मारून पिटाळू शकलो नाही.  या काळात आई किंवा ताई अशा सक्तीच्या रजेवर गेल्या की आई किंवा ताई नसल्याने घरातले काम करावे लागे त्यामुळे आई दूरूनच स्वयंपाक करण्याचे मार्गदर्शन करत असे म्हणूनच जे आता पन्नास किंवा त्या पूढील वयाचे आहेत ते उत्तम नसला तरी स्वयंपाक बनवू शकतात. घरातील केर वारा करणे, कपडे धुणे ही कामे सहजच करतात. या पूरूषांना स्वावलंबी बनवण्यात महिलांचा वाटा आहे हे मान्य करावे लागेल.

चाळीस वर्षांपूर्वी आमच्या पीढीला एवढी प्रगल्भता नव्हती आणि प्रश्न विचारण्याची मोकळीक नव्हती त्यामुळे हा कावळा मनातच मेला. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणात जीवशास्त्र विषयात या बाबतीत माहिती मिळाली आणि मग ह्या मासिक पाळी बाबत आणि महिलांच्या शारीरिक बदलाबाबत  माहिती मिळाली. तेव्हा मासिक पाळी बाबत जाहीर चर्चा केली जात नव्हती आणि आज tv वर जशा जाहिराती दाखवल्या जातात तशा दुरदर्शनवर त्या काळी दाखवण्यात येत नसत.

या बाबत हळूहळू प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आणि महिला मंडळात महिला डॉक्टर यांचे व्याख्याने आयोजित करून जन जागृती करण्यात आली तरी  महिलांच्या मानसिकतेत तेव्हा फारसा फरक पडला नव्हता किंबहुना हे बंधन त्यांनी स्वतः स्विकारले होते.  या विषयाची चर्चा करणे त्या काळी अप्रसतुत समजले जाई. तेव्हाही डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले अश्या अनेक समाज सुधारक महिलांना   त्यांच्या शिक्षणाविषयी जागृत करण्याचे काम करत होत्या. स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार व्हावा यासाठी झटत होत्या. परंतू हे समाज प्रबोधन फक्त मर्यादित परिवारातील महिलांपर्यंत पोचत होतं. चूल आणि मुल यातून महिलेला सुटकाच नव्हती. बालविवाह करण्याची पद्धत सर्वत्र रूढ होती. मातृत्व अकाली लादले जात होते, संतती नियमनाची साधने नसल्याने कितीतरी महिलांवर मातृत्व लादले जात होते.

यामुळेच पन्नाससाठ वर्षांपूर्वी कोणत्याही विवाहित कुटुंबात चार, सहा  ते अगदी क्रिकेटच्या टीम एवढी मुले असायची. धोंडो केशव कर्वे यांनी तेव्हाही संतती नियमन करणारी साधने महिलांनी वापरावी म्हणून प्रचार करत होते. पण कर्वे अनितीची ,चुकीची शिकवण समाजाला देत आहेत म्हणून त्यांच्यावर सवर्ण आणि विशेषतः ब्राह्मण समाजाने टिकास्त्र सोडले होते. यदाकदाचित जर तेव्हाच धोंडो केशव कर्वे यांचे  संतती नियमना बाबत समाजाने ऐकले असते तर भारतालाही लोकसंख्या मर्यादित ठेवण्यात यश आले असते आणि कमी लोकसंख्येमुळे चांगले आरोग्य, चांगले शिक्षण मिळाले असते पण आपल्या दुर्दैवाने तसे झाले नाही.

मुलगी न्हाती झाली की त्या काळी घरात सण साजरा करत. आई बनण्यास ती पात्र झाली हे जणू कुटुंबातील, सगेसोयरे यांना कळावं यासाठी विधी करत पण त्यानंतर तिला सक्तीने दूर बसवत. दर महिन्यात मासीक पाळी आली की सक्तीने दूर बसवले जाई. महिलाच महिलांच्या मासिक पाळी विषयी असा विचार का बरं करतात? कार्तीकेय किंवा शडानन यांची मंदिरे अशीच महिलांच्या स्पर्शापासून अभेद्य आहेत आणि या कार्तीकेयाच्या मंदिरात म्हणे महिलांना प्रवेश नाही. जुन्या काळी जे गावात रहात होते व ज्यांच्याकडे ऐसपैस घर होत त्यांच्याकडे  मासीक पाळी आलेल्या महिलेसाठी तसेच बाळंतीण महिलेसाठी वेगळी खोली होती, ही खोली घराच्या एका कोपऱ्यात अडगळीची किंवा सामान सुमान ठेवण्यासाठी असावी असे वाटे. या खोलीत नीट प्रकाश येत नसे की पूरेशी वातवाहन यंत्रणा नसे अश्या खोलीत आपल्या कुटुंबातील वंशाचा दिवा किंवा दीवली आपण वाढवतो या बद्दल कोणाला खेद वाटत नसे.

जे महिलांच्या बाबतीत घडत होते तेच अन्य जातीतील समाजा बाबत घडत होते. जे सवर्ण नाहीत ते दलित, उपेक्षित, त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाला तोड नव्हती, त्यांना खुप लाजिरवाणे जीणे जगावे लागे. त्यांना सार्वजनिक  पाणवठा वापरण्याची बंदी होती. संत गाडगेबाबा, महर्षि शिंदे, ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि सामान्य माणूस म्हणून मंदिरे, पाणवठे, शाळा या मागास गणल्या जाणाऱ्या समाजासाठी खुली झाली. या सर्व घटनेस पन्नास, पंचाहत्तर वर्षे झाली तरीही फारसा फरक पडला नाही. आजही नेते निवडणूक लढवतात ते स्वतःच्या जातीचे राजकारण करत, जातीचे नसलेले प्रश्न उपस्थित करून आपली पोळी भाजण्यासाठी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी असते. महाराष्ट्रात आज मान्यवर असणाऱ्या व्यक्तींनी आंतरजातीय विवाह करून ही जाती पातीची उच्च निच दरी कमी करण्याचा प्रयत्न केला तो त्यांच्या पुरता यशस्वी झाला परंतु समाजातील भेदभाव काही कमी झाला नाही.

आजही भारतात काही राज्यात ग्रामीण भागात विशिष्ट जाती धर्माची घरे ही गावाच्या एका टोकाला आहेत आणि त्यांना आजही हीन जीवन जगावे लागते. त्यांना सवर्ण समाजापासून अंतर ठेऊन बोलावे लागते, वागावे लागते. त्यांनी बांधलेले घर, देवघर अगदी देवालय आम्हाला चालते पण त्यांचा स्पर्श आम्हाला चालत नाही. त्यांनी शेतात राबून पिकवलेले अन्न, विणलेले वस्त्र, तोडलेले सरपण आम्हाला चालते मात्र स्पर्श चालत नाही. शासन पातळीवर जन्मानंतर होणारी नोंद आणि दिला जाणारा जन्मदाखला आणि शाळेत आजही दाखल्यावर होणारी नोंद ही जात आणि धर्म यांचे रकाने भरल्याशिवाय पूर्ण होत नाही. शाळेत आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेश देताना जात आणि धर्म यांच्या आरक्षणाच्या टक्केवारी नुसार प्रवेश मिळतो. 

नोकरी मिळवताना आणि कोणतीही निवडणूक लढवताना आरक्षण असेल त्याप्रमाणे नोकरी मिळते किंवा निवडणुकीत उमेदवारी मिळते. इथेही जात आरक्षण, धर्म आरक्षण विचारात घेतल जाते, त्यामुळे सवर्ण मुलांमध्येही असे जाती धर्माचे आरक्षण मिळवून प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांविषयी चिड निर्माण होणे साहजिकच आहे. सवर्ण मुलांना चांगली टक्केवारी असली तरीही प्रवेशासाठी ताटकळत रहावे लागते इतकेच नव्हे तर शिक्षण शुल्कही बरेच जास्त भरावे लागते. केवळ गुणवत्ता असुन काम भागत नाही. “भेदाभेद अमंगळ” असं नुसते म्हणून चालत नाही. जोपर्यंत शासन आणि ते चालविणारे शासक यांच्या मनोवृत्तीत या जातीपातीचा फायदा घेऊन आपले स्थान आणि पद निश्चित करण्याची वाइट सवय संपत नाही, तो पर्यंत समानता, बंधूता हे शब्द चावून चोथा चघळत बसणाऱ्या पानाप्रमाणे लोक वापरत राहणार.

समाजात असणारी जाती पाती आणि त्यामुळे मिळणारे फायदे  होरपण्याची स्पर्धा थांबत नाही तो पर्यंत यात सुधारणा शक्य नाही. नेमस्त भुमीका कोणी आणि का घ्यावी? जोपर्यंत घरातील आणि समाजातील शिवाशीव संपूर्ण बंद होत नाही आणि मनाने यातला फोलपणा आपण स्विकारत नाही, ग्रामीण भागातील सवर्ण आणि दलीत यांच्यातील दुरी संपत नाही आणि सहस्त्र जाती, पोटजाती, धर्म यांतील भेद आपण संपवत नाही तो पर्यंत भेदभाव लढा आपल्याला संपवता येणार नाही.

शहरात याची तिव्रता किंवा दाहकता आपल्या अनुभवास येत नाही ही सौभाग्याची गोष्ट पण आजही ग्रामीण भागात हा भेदाभेद आणि त्याची बंधने आहेत राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेश येथे आणि अगदी सातारा, कोल्हापूर, कोकण येथे अनेकदा जातपंचायत बसवून घडलेल्या प्रकारा बाबत निर्णय घेतात आणि तो बाधित कुटुंबाने मान्य केला नाही तर त्यांना वाळीत टाकले जाते. इतकी ही व्यवस्था जुलुमी आहे. म्हणून जन्म घेणाऱ्या मुलाच्या जन्मदाखल्यावर तो मुलगा की मुलगी एवढीच नोंद नोंदवली गेली तरच समाजातून स्पृश्य अस्पृश्य भेद कमी होईल. जेव्हा कोणत्याही व्यक्तीला मिळणारे शिक्षण, नोकरीच्या संधी ह्या त्याच्या जातीवर,आरक्षणावर न मिळता त्याच्या गुणवत्तेच्या आधारे मिळणे सुरू होईल तोच दिवस भारतासाठी त्याच्या भविष्यासाठी सुदिन ठरेल.

इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “भेदा भेद अमंगळ

Comments are closed.