मत कोणाला?

मत कोणाला?

कोणाला देणार मत? कोणत्या पक्षावर ठेऊया नक्की भरवसा?
येथे निशाणं भगवी, धवल, निळी, हिरवी, कळे ना कोण वागेल कसा?

कोणाचं घड्याळ, कोणाची शिट्टी, कोणाचा बाण ,कोणाची मशाल
काही बाप्यांना कळेना आघाडीत की युतीत, त्यांचे खरंच हाल

काही मात्र निळे बगळे, न लढताही यांच खारदारकीवर लक्ष
केंद्रात असो वा राज्यात जो जिंकून येईल तोच असतो यांचा पक्ष

खरंच का हो आहे भारतात, संविधानाने दिलेली लोकशाही?
अहो आता तर पक्ष नी इमानही बदलतात, पुढे बदलतील आई

ऐवढे निर्लज्ज, युती काय? आघाडी काय? एका रात्रीत बदलतात पक्ष
डोमकावळे साले यांच फक्त मेलेल्या मढ्यावरच असते नेहमी लक्ष

गोरगरीबांना आश्वासन देण्यात माहीर, यांनी जमवली माया
लग्नाची नकोशी झाली तेव्हा हे शहरात ठेऊ लागले सुंदर बाया

या पुर्वीच्या आश्वासनाचं श्राद्ध घातलं समजून पुन्हा द्या मत
गेल्या पंचाहत्तर वर्षात काय झाले विचारा नेत्यांना सतत?

कशी देणार ग्वाही जर गरीबांना इलेक्शनने काही कधी मिळालंच नाही?
बुथबाहेर पडण्याची खोटी की क्षणातच मतदार अनोळखी, सुकते बोटवरची शाई

आज तरी त्यांचेच दुकान, त्यांची बंदूक, ज्यांचे जाळे त्यांचा ससा
प्रत्येक उमेदवार स्वार्थी, मतासाठी हपापला, भरतोय त्याचा खिसा

लयीत ओरडणे मला ठाऊक, कशास जायचे त्याच्या गर्भात तपासा
थकलो की घ्यावी विश्रांती, गप्पा टप्पा पान, सिगार, ओला करावा घसा

यांचे मोर्चे, जमावही यांचाच, दर दिवशी प्रत्येकाला खुराक पुरेसा
वडापाव, पुलाव, बिर्याणी, कोक, हवे ते मनसोक्त फुकट ढोसा

संध्याकाळी यांना पाकीट, दोन दोन गांधी, उन्हात पायपीट सोसा
सिक लिव्ह टाकून प्रचाराला, मत द्या, मशाल घ्या, नवा त्यांचा वसा

यांनी केलाय जमा पक्षचंदा, होईना वस्तूभेसळ यांचा हिशोब खासा
मोठे व्यापारी, भरलेली गोदामे, चढे दर, लावती गळाला मासा

सगेळच तर बहुरूपी यांच्या चेहऱ्यावर वेगळा मुखवटा
आपण स्विकारली यांची लाच तर आयुष्यात तोटाच तोटा

सत्तेत असले की रेटून बोलले तरी कुणी वाकडं करत नाही
विरोधी बाकावर बसलं तरी जनतेची काळजी करत नाही

एकदा निवडून आलं की पाच वर्षे विकासस्वप्न पडत नाही
निधी मिळाला की आधी घर, स्वःविकास, दुसरं सुचत नाही

हुजरेगिरी करणाऱ्यांची यांना मते निव्वळ एक गठ्ठा
मत द्यायचे तर आहेच, कुठेच नाही तर नक्कीच नोटा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar