राणीची आई 05

राणीची आई भाग ०५

साडेआठ वाजता, कॉमन announcement वरून खाली रेसटॉरंट मध्ये येण्याची सूचना देण्यात आली. आम्ही तयार होऊन खाली पोचलो, एका भागात वेजिटरियन आणि दुसऱ्या बाजूला नॉन वेजिटरियन अशी व्यवस्था केली होती. दिल्लीला आम्ही प्रवास असल्याने नॉनव्हेज घेतले नव्हते पण आत्ता इथे चार दिवस स्टे असल्याने आणि काश्मीर त्या साठीच प्रसिद्ध असल्याने non veg घ्यायचं ठरवलं. मटण फ्राय, कबाब, चिकन सूप, रोटी फ्रॉईड राइस, बिर्याणी असे बरेच प्रकार होते. रात्री थंडी वाजत होती इतका हवेत गारवा आला.

दुसऱ्या दिवशी sightseeing साठी सकाळी नऊ वाजता निघालो. रस्ते आखीव रेखीव आणि दोन्ही बाजूला चिनार आणि पाईन वृक्षांची उंच उंच वाढलेली रांग दिसत होती. काही हॉटेलच्या समोर गुलाबाच्या बागा होत्या. बरीच जुनी घरे ही लाकडी दिसत होती. एकदोन ठिकाणी क्रिकेट ची बॅट बनविण्याचे workshop दिसले. ही बॅट विलो नावाच्या झाडाच्या खोडाची बनवतात. ती वजनाला हलकी असते.

परतताना संजूसाठी बॅट घ्यायचं काकांनी ठरवलं. मुंबईच्या तुलनेत कितीतरी स्वस्त आहे. श्रीनगरला झेलम नदीचे मोठे पात्र आहे. एक दिवस आम्ही वैष्णोदेवी यात्रा करून आलो. मंदिर अतिशय सुंदर आहे. एक रात्र आम्ही हाऊसबोट मध्ये घालवली. येथील स्थानिक खूप आदरतिथ्य करणारे आहेत आणि ते येणाऱ्या प्रवाशांची पूर्ण काळजी घेतात. गुलमर्ग येथे आम्ही भेट दिली पण आता बर्फ वितळत असल्याने skiing सुरू नव्हते. श्रीनगर ते पेहेलगाम रस्ता अतिशय देखणा आहे. आमचे पाच दिवस कसे संपले ते कुणालाच समजले नाही. जातांना आमचे श्रीनगर ते दिल्ली प्रवासाचे flight booking केले होते परंतु ते waiting होते. आमच्या नशिबात होते म्हणून आम्हाला त्याचे confirmation मिळाले त्यामुळे परतताना आमचा रस्ताप्रवास वाचला. संजू आणि शार्विका विमानाने जायला मिळत असल्याने खूप आनंदात होते. श्रीनगरला आम्ही आलो तसे मोबाईल नेटवर्क मिळाले आणि गेल्या तीन चार दिवसांचे pending messages मिळाले. प्रितमने अनेक वेळा WhatsApp messages केले होते. तिचे missed कॉल होते. अर्थात आता गैरसमजूत होणार हे नक्की होते. रानडेला निघताना WhatsApp करून काश्मीरला जात असल्या बद्दल कळवले होते त्यामुळे त्याचे मेसेजेस नव्हते. आम्ही by Air दिल्ली आल्याने आमचा एक दिवस वाचला होता त्यामुळे काकूने आग्रा जाण्याचा बेत ठरवला. अर्थात पुन्हा आम्हाला आग्रा जाण्यासाठी पुन्हा जसबिर अंकलना फोन करून बुक करावे लागले.

ताजमहालबद्दल आम्हा सर्वांना प्रचंड आकर्षण वाटत होते. शहाजहान यांनी आपली बेगम मुमताज हिच्या स्मरणार्थ ही ७० मीटर उंच वास्तू १६३२ मध्ये बांधायला घेतली आणि सलग वीस वर्षे तिचे बांधकाम सुरू होते. ही वास्तू पाहताना डोळे दिपून जातात मुघल साम्राज्याची छाप दिल्लीत प्रत्येक ठिकाणी दिसते.असे म्हणतात की “पौर्णिमेला ताजमहालची प्रतिमा यमुनेच्या पात्रात दिसते ते दृश्य पाहणे फार विस्मायजनक असते. किती प्रेम असावे शाहालजहानचे आपल्या पत्नीवर, असं म्हणतात त्याचे थडगे याच वास्तूत आहे. धन्य तो शहाजहान आणि धन्य त्याची बेगम. ताजमहाल कितीही वेळा आणि कुठूनही पाहिला तरी डोळ्यांची तहान भागत नाही.

अशा किती प्रेमिकांच्या जोड्या आणि त्यांची स्मारक असावी. आपण राधा-कृष्ण, नल-दमयंती, रोमिओ-जुलियट अशा प्रेमिकांची नावे ऐकतो पण शहाजहान ने केलं ते योग्य की कसे? खरंच शहाजहान याचे मुमताज हिच्यावर इतके प्रेम असावे? प्रेम ही भावनाच अद्भुत आहे यात वाद नाही. कोणी कुणावर आणि कसे प्रेम करेल ते समजण्यापलीकडे आहे हेच खरे.मीरेचे प्रेम वेगळे, ज्या प्रेमात केवळ त्याग आणि भक्ती आहे त्याला वेगळाच गंध आहे. तो आहे विरक्त प्राजक्ताचा.

हल्ली हे अध्यात्म अस अचानक का उफाळून येत तेच मला कळत नव्हतं. कदाचित हा राणीच्या आई सोबत इतकी वर्षे राहिल्याचा परिणाम असावा. ती बिचारी कोणासाठी जगते हे तिलाच माहीत नसावे, तिचेही कोणावर असेच प्रेम असेल का? का ती नेहमी अशी हरवल्या सारखी दिसते काय गूढ आहे तिच्या जगण्याचे? 

ज्या मुघल साम्राज्यात सत्ताधीशांचा  खून झाला, त्याच दिल्लीत त्याच मुघल साम्राज्यात सलीम-अनारकली नाट्य घडले आणि तिथेच जोधा- अकबर यांनी राज्य केले. मुमताज-शहाजहान यांचे स्मारकही चिरंतन झाले अशा अद्भुत ठिकाणी मी आलो होतो. मन ह्या समिश्र भावनेने व्यापून गेले होते. मी कोण होतो? माझी भूमिका नक्की काय होती. प्रीतमबाबत मला वाटणारे आकर्षण हे शारीरिक की मनाचे? आपण तिच्यावर रागावलो ते कोणत्या अधिकाराने की खरंच मी तिच्यात गुंतत गेलो आहे.

काका काकू आणि आम्ही मुले तिथे तीन चार तास होतो सोबत जसबीर अंकल होते. त्यांनी माहित असलेली वास्तू आणि त्याचा इतिहास याची माहिती आम्हाला सांगितली. यमुनेत फेरी बोटीने फिरूनही आलो. काकांनी मुक्त हातांनी खर्च केला. आग्र्यात आम्ही एका दिमाखदार हॉटेल मध्ये लंच घेतला, जसबिर अंकल आमच्या बरोबर लंचसाठी तय्यार नव्हते. पण काकांनी बराच आग्रह केला. जसबिरला काकांनी ठरल्यापेक्षा जास्त पैसे दिले तसे जसबिर  म्हणाला “साहाब लोक हमारे साथ भाडा बराबर लिया तो भी झगडा करते हैं और एक आप हैं.” मेरा नंबर आपके पास है कभी आये तो याद करणा.” त्याचा निरोप घेऊन आम्ही हॉटेलवर आलो.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा राजधानी गाडीने आम्ही निघणार होतो. काकूने श्रीनगर येथून तिच्या office मधील मैत्रिणींकरता काही खरेदी केली होती. मुलांनाही woolen स्वेटर, आत्याला लेदर पर्स, राणीच्या आईला रुद्राक्ष माळ घेतली होती.काकांनी, पेठा आणि गोड गाठीया घेतल्या होत्या. मुलांनी चांदनी चौक येथून काही गेम घेतले होते. या सर्व वस्तूंचं पॅकिंग करायचे होते. गेल्या पाच सहा दिवसात बरीच दगदग झाली होती त्यामुळे हॉटेल वर आराम करुन संध्याकाळी निघायचे ठरले.दुपारी आत्याचा फोन आला. आत्या काकांना जे काही सांगत होती तेव्हा काका आत्याला समजावत होते, ” सुमे, आम्ही आज निघतो आहोत, पण अस होत तर सांगायचं ना तू, काय? अग तिची तब्येत महत्त्वाची की आमचं फिरणं, हे बघ तिच्या मोठ्या भावाला बोलावून घे, हो, हो, मी पण त्याला फोन करून सांगतो तो नक्की येईल, धीर धर, सूमे रडू नको.आम्ही सकाळी पोचू तिकडे”

काकांनी मोबाईल ठेवला,काय झालं ते काकूला बहुदा कळलं असावं, काका तिला खुणेन काही तरी विचारायचा प्रयत्न करत असावे, माझी अडचण त्यांना भासत असावी,पण नक्की घरी काय झालंय हे मलाही कळत नव्हत, शर्विकाने काकांना विचारलं,” पप्पा कोणाला बरं नाही, आजीला का?” “नाही ग बेटी राणीच्या आईला गेले तीन चार दिवस बर नाही, ताप येत होता पण आतेने आपल्याला उगाच परत यावं लागू नये म्हणून कळवल नाही”. “पण  मग आत्ता काय करणार? मामाला का बोलावून घेत नाही, ते येतील की आत्त्याच्या मदतीला”. काकांनी पुन्हा मुंबईला फोन लावला, “हॅलो, हॅलो, सुमे अग आम्ही पोचेपर्यंत शर्विकाच्या मामांना मदतीला बोलावून घे की, येतील ते झटकन, काय? अगं राणीच्या मामांना सुधा बोलाव, आणि तुझ्या मदतीला माझ्या बँकेतील मुकुंदला बोलावं. कळतय ना काय सांगतो ते. टेन्शन घेऊ नकोस, आम्ही पोचू सकाळीच”. त्यांनी फोन ठेवला तस मी काकांना विचारलं,” काका कोणाला बरं नाही? राणीच्या आईला का? काय झालं तिला?” काका माझ्याकडे पाहत म्हणाले,” गेले तीन चार दिवस तिला ताप येत आहे, तिला हॉस्पिटलमध्ये admit करावी लागेल. पण तू काळजी करू नकोस”. मला कळेना काका मला हे समजावल्या सारखं का सांगत आहेत. काकुच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. काकांनी काकूला बॅग आवरून ठेवायला सांगितल्या. दुपारचे जेवण जेवण्याची इच्छा कोणालाच नव्हती. काकू माझ्याजवळ येवून बसली आणि म्हणाली “स्नेहल तुम्ही तीघं खाली जाऊन जेऊन या, आम्हाला भूक लागली की आम्ही जाऊ, तो पर्यंत आम्ही बॅग्स आवरून ठेवतो. तुमचे सगळे कपडे, कॉमिक्स घेतली याची खात्री करा. शर्विका तुम्ही दोघं दादा बरोबर जा.”

“काकू, मला भूक नाही तुमचं काम आवरलं की मगच आपण जाऊ, चालेल ना?” माझे बोलणे ऐकुन काकू म्हणाली “अरे स्नेहल, संजूला जेवायला वेळ लागतो, आपल्याला लवकर निघायचे आहे तुम्ही जेवून मोकळे झालात तर बरं होईल. आमचं आवरलं तर आम्ही दोघं येतोच की.” 

माझा नाईलाज झाला,आम्ही खाली रेस्टॉरंटमध्ये गेलो. शर्विकाने उत्तपा आणि संजूने मसाला डोसा घेतला. आम्ही आमचं आवरून वर आलो तर काका आणि काकू बोलत होते. काकू काकांना सांगत होती, “आता तरी त्याला सत्त्य सांगितलं पाहिजे, किती दिवस  त्याला अंधारात ठेवणार आहात, वेळ निघून गेली तर त्याचा दोष आपल्यावर येईल.” मी ते ऐकलं पण असं चोरून ऐकणं बर नव्हतं, काकू नक्कीच मला काहीतरी महत्त्वाचं सांगायची विनंती काकांना करत असावी. आमची चाहूल लागली तसा काकांनी विषय बदलला, “अरे एवढ्या लवकर झालं तुमचं, काही खाल्लं की तसेच आलात? बरं तर आम्ही दोघे जाऊन येतो तोपर्यंत तुमचं आवरा.”

काका, काकू हॉटेलचे बिल पे करुन आले, तसं Attendent भेटून गेला, उगाचच काकांना म्हणाला “सर,आज आप जा रहे है क्या? सर मूझसे कुछ गलती हुई हो, तो माफ करना.” काकांना त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला, त्यांनी शंभर ची नोट त्याच्या हातावर ठेवली तसा तो हसला, सँलूट मारत म्हणाला. “अच्छा साब, कभी भी आना, मै सेवा की लिये हाजिर हुं.”

आम्ही कॅब पकडून नवी दिल्ली स्टेशन वर आलो, राजधानीची अनाउन्समेंट होत होती. संजयने कॉमिक्स घेण्याचा हट्ट केला. काकूंनी स्टॉल वरून कॉमिक्स आणि न्यूज पेपर विकत घेतले. गाडीत संध्याकाळ काढायची होती. काका थोडे गंभीरच दिसत होते त्यावरून राणीची आई जास्तच सिरीयस असावी असा मी अंदाज बांधला. आम्ही आमच्या सीट शोधून सामान लावले. कूली धावपळ करत होते.माझे लक्ष स्टेशनवर लावलेल्या डिजिटल डिस्प्ले कडे गेले. संपूर्ण दिवसात दीडशेहून अधिक गाड्या या स्टेशन वरून भारतातील प्रत्येक राज्याच्या राजधानीत जातात. कितीतरी नवीन सुपरफास्ट गाड्या गेल्या पाच वर्षात नव्याने सुरू झाल्या आहेत.दर पाच मिनिटांनी एका नव्या गाडीची announcement सुरु असते. त्या अर्थी सगळ्यात वर्दळीचा स्टेशन असावे.

गाडी  सुटली तसा काकांनी आत्याला फोन करून आम्ही निघालो आणि सकाळी पोचत असल्याबद्दल सांगितले. शर्विका आणि संजू मोबाईल वर गेम खेळत होते.काका आणि काकू हळू आवाजात बोलत होते. मी डोळे मिटून वेळ घालवत होतो, मुंबईला गेल्यावर नक्की काय झालं ते कळणार होत पण काका काकूचा मुड खराब होता ते पाहून मला अंदाज आला होता. राणीची आई बरी होऊदे म्हणून मी मनोमन प्रार्थना करत होतो.  थोड्या वेळाने काकांनी मला स्वतः च्या बाजूस बोलावले आणि मला म्हणाले, “स्नेहल आपण सकाळी दहा साडेदहा पर्यंत घरी पोचू, तुला कळलं असेलच राणीच्या आईला बर नाही”.

“काका, आता राणीची आई कशी आहे? आत्या काय म्हणाली? मी घाबरून विचारलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी काका म्हणाले “तू अनेक वेळा मला आणि तुझ्या काकूला प्रश्न विचारत होतास की माझे आई बाबा कुठे आहेत तुला सांगायची वेळ आज नियतीने आणली आहे. स्नेहल राणीची आई हीच तुझी आई.”

मी अविश्र्वासाने काकांकडे पाहिले, तसा त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, “होय हेच सत्य आहे, तीच तुझी आई.” काका, मग एवढे वर्ष तुम्ही सर्वांनी मला तिच्यापासून दूर का ठेवले? का नाही सांगितलं की ती माझी आई आहे, मी माझ्या जन्मदात्या आईबाबांविषयी कितींदा विचारले, किती विनंत्या केल्या, का कुणी सत्य मला सांगितलं नाही”. मी माझा राग आणि आक्रोश शांत करू शकलो नाही. काकांनी मला रडू दिलं.बाजूच्या कंपार्टमेंट मधील प्रवासी आमच्या बाजूस येवून पाहून गेले. काकू काकांना म्हणाली, “आत्ताच हे सांगणं गरजेचं होत का? सांगता आलं असतं ना उद्या, का त्याला दुःख देता”.

ते काकूकडे पहात म्हणाले, “शामल, उद्या त्याला सांगाव लागणारच आहे त्याला सत्य काय ते कळण फार गरजेचं आहे. काकूने मला जवळ घेतलं थोपटत म्हणाली,तु शांत राहून ऐकणार असशील तरच तुला सांगेन, उगाच रडारड करायची नाही, आहे कबूल? मी डोळे पुसत मान हलवली. काकू सांगू लागली,” स्नेहल या कुटुंबातील तु पहिला मुलगा,तुझे बाबा भरत पंडित हे हुशार होते, त्यांचं कॉलेज मध्ये असताना एका मुलीवर प्रेम होत, जेव्हा ते बँकेत कामाला लागले तेव्हा त्यांनी तुझ्या आजोबांना त्यांच्या प्रेमप्रकरणाबाबत सांगितलं. आजोबा वकील होते आपल्या मुलांने स्वतः लग्न ठरवल याबाबत त्यांना प्रचंड राग होता पण जेव्हा ते राणीच्या आईला भेटले आणि तिला त्यांनी पाहिलं तेव्हा राणीच्या आईचा सभ्य आणि सोज्वळ स्वभाव पाहून खूप थाटात लग्न लावून दिले. तुझे बाबा खूप मेहनती होते. केवळ बँकेतील नोकरी न करता पुढे शिकत राहिले आणि लवकरच मॅनेजर झाले. तुझी आई टॅक्स डिपार्टमेंट मध्ये Inspector होती. लग्ना नंतर चार वर्षांनी तुझा जन्म झाला त्यामुळे तुझा वाढदिवस खूप थाटात केला.आजोबा खूप आनंदात होते.तुझ्या बरोबर खेळण्यात त्यांची संध्याकाळ मजेत जात होती.त्यांनी प्रॅक्टिस कमी करून विश्रांती घ्यायची ठरवली होती.

तुझी आत्या त्यावेळी लहान होती,ती तुला खूप खेळवायची, तु तीन वर्षाचा असताना राणीची आई पुन्हा प्रेग्नेंट होती. आमचं तेव्हा नुकतंच लग्न झाल होत. तुझा वाढदिवस आला आणि तुझे आई बाबा तुला gift आणायला म्हणून गेले आणि रस्त्यावर त्यांचा accident झाला. राणीची आई कशीबशी वाचली पण बाबा मात्र ———–“

काकीचे अर्धवट शब्द ऐकून मी हंबरडा फोडला. सोळा सतरावर्षापूर्वी गेलेल्या माझ्या बाबा साठी मी आज रडत होतो. मी तीन वर्षाचा असताना माझी काय अवस्था असावी आणि मला आत्याने कस सांभाळलं असाव त्याची कल्पनाच मी करू शकत नव्हतो. काकू मला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली, “तुझ्या बाबांच्या जाण्याचं दुःख आजोबा सहन करू शकले नाही आणि त्यांना हार्ट अटॅक आला त्यातच त्यांच निधन झाल. तुझ्या काकांवर संकटाचा डोंगर कोसळला. तिथे तुझी आई hospital मध्ये admit  होती. तिला डोक्याला मार लागला होता. डॉक्टरांनी शर्थ केली आणि ती वाचली पण, तिला मानसिक धक्का बसला त्यात तिची अशी अवस्था झाली.

तीन चार महिने तिच्यावर उपचार सुरू होते. तुला कल्पना येणार नाही पण तुझ्या काकांनी आणि आत्याने ती दोन वर्षे जी मेहनत केली आणि किती संकटे झेलली त्याला तोड नाही. आई बरी होऊन घरी आली पण तुझे gift आणायला बाबा गेले आणि त्यांचा मृत्यू झाला ही शेवटची संवेदना तिच्या मेंदूत कोरली गेली. त्यामुळे तिला मधून मधून वेडाचे झटके येऊ लागले. ती तुला मारायचा प्रयत्न करू लागली. तिचा तो समज दूर करण्यासाठी मानसोपचारतज्ञानी खूप प्रयत्न केले पण तो आघतच इतका मोठा होता की तिला त्या विचारातून बाहेर काढणे  डॉक्टरांच्याही आवाक्याबाहेरचे होते पण राणीचा जन्म झाला आणि ती सावरली. तुला विसरून गेली तू तिचा मुलगा आहेस हेच विसरून गेली. आम्हीही तिला राणीची आई म्हणू लागलो. आम्हाला भिती वाटे की ती आम्ही घरी नसताना कधीतरी तुझ्यावर हल्ला करेल. तसा तिने दोन तीन वेळा प्रयत्न केला होता म्हणूनच राणीच्या आईला तू तिचा मुलगा आहे हे कळू नये म्हणून आम्ही तिला राणीची आई म्हणत होतो तुझे नाव तिच्याशी जोडणे आम्ही टाळत होतो”.

राणीच्या आईची कथा ऐकून मी गांगरून गेलो.काकू शांत झाली पण माझी उत्सुकता मला शांत बसू देत नव्हती.” काकू पुढे काय झालं? आई शांत कशी झाली?” “राणीच्या जन्मा नंतर ती  नव्याने उत्साहाने जगू लागली. राणीचे करताना ती मागच्या सर्व घटना आणि मनावरील जखमा विसरून गेली. सर्व काही सुरळीत होणार असा आशावाद निर्माण झाला आणि एक रात्री अचानक राणीला ताप आला, तिला तातडीने admit केले पण दुर्दैव, राणी या जगाचा निरोप घेऊन निघून गेली. तिथंपासून ती अशीच हरवल्यासारखी दिसते. ती राणीची आई आहे ही तिची भावना अजूनही टिकून आहे पण तुझी ओळखच जणू ती विसरून गेली आहे.”

काकीची ही कथा ऐकून मी हादरून गेलो. आपल्या जन्मानंतर ह्या कुटुंबाने बरच काही भोगलं आहे हे लक्षात आले. आत्या अशी का वागते त्याचा उलगडा झाला. पण मला आई पासून दूर राहावं लागलं, केवळ ती कदाचित मला संपवेल ह्या भीती पोटी मी आई असूनही आई वेगळा वाढत होतो. बाबा मला आठवत नव्हते पण आई समोर असूनही तिला आई म्हणून साद घालू शकत नव्हतो. माझ्या जन्माची कथाच जगावेगळी होती. मी स्फुंदून स्फुंदून रडत होतो आणि काकूचा हात घट्ट धरून तिला विचारत होतो,” काकू माझी आई बरी होईल ना? मला माझ्या नावाने हाक मारेल ना?” आजपर्यंत मी माझे आई बाबा कुठे आहेत ते कोणाला सांगू शकत नव्हतो आणि आता समजले तर ती कशी आहे तेच माहीत नव्हते.

मी रात्रभर झोपू शकलो नाही. घरी जाऊन कधी एकदा आईला कडकडून मिठी मारतो अणि तिला सांगतो आई, मला तु हाक मार. तुझ्या बबड्याला जवळ घे. मुंबई सेंट्रल वरून आम्ही टॅक्सी केली आणि घर गाठलं, आमच्या बंगल्या समोर बरेच जण जमले होते. गर्दीतील कोणीतरी म्हणाले.”ते आले वाट सोडा.” आमची टॅक्सी येताच काका खाली उतरले त्यांनी माझा हात धरला,” स्नेहल बाळा ये,नीट डोळे भरून एकदा राणीच्या आईला, तुझ्या आईला पहा”.

मी घरात गेलो, हॉल मध्ये तिला जमिनीवर शुभ्र कपड्यावर झोपवले होते. शेजारी आजी हमसून हमसून रडत होती मला पाहताच तिने  हंबरडा फोडला. “मुला,ती गेली रे, काही न बोलता गेली.” मी तिच्या शेजारी बसलो धाय मोकलून रडू लागलो, “आई, माझी आई ! का नाही कुणी मला सांगितलं ग, तूच माझी आई आहेस म्हणून. तू का नाही मला कधी जवळ घेतलं, इतकी का माझ्यावर रागावलीस?, मला माझे बाबा दिसलेच नाही पण तु जवळ असूनही मी तुला कधी आई म्हणून हाक मारू शकलो नाही.” 

मी काय बोलत होतो ते मलाही कळत नव्हते.मला कोणी तरी जवळ घेत घट्ट मिठी मारली. “सोन्या ती गेली रे सोडून, अरे तुच काय मीही तिला ताई म्हणून हाक मारू शकलो नाही. भोग आपले काय करणार माझ्या राजा.” ते बहुदा माझे मामा असावे. त्यांना या पूर्वी मी कधीच पाहिले नव्हते.

दुःख करूनही कधीच संपणार नव्हतं असा चटका लावून ती निघून गेली होती. या पेक्षा मला बाबांच्या अकाली जाण्याबद्दल दोषी ठरवून तिने मारलं असत तरी चाललं असत. माझी आई असूनही राणीची आई म्हणून ती जगत होती आणि मी अभागी आई असूनही आईबापावेगळा वाढत होतो.पण काका काकूने जे प्रेम, जो जिव्हाळा मला लावला होता त्याच ऋण फेडण्यासाठी मला अनेक जन्म घ्यावे  लागतील याची मला कल्पना होती. मी काकूला घट्ट मिठी मारली आणि म्हणालो तुच माझी आई, राणीची आई गेली आणि मला आई मिळाली.

खूप लोक काका काकूला भेटण्यासाठी येत होते.अभय आणि प्रितमही भेटायला येवून गेले. त्या पंधरा दिवसात प्रीतम तीन वेळा भेटून गेली. माझ्या मामांना आणि मावशीला प्रथमच मी भेटत होतो. मी माझ दुःख कुरवाळत होतो, पण आईला पुन्हा वेडाचा अटॅक येवू नये म्हणून सख्खे भाऊ, बहिणही गेले सतरा वर्षे तिच्यापासून दूर होते ही गोष्ट सामान्य नव्हती. त्यांच्या दुःखाची किनार तितकीच मोठी होती.

 एक दिवस काकूने मला जुना अल्बम दाखवला त्यात आमचे अनेक फोटो होते.आईबाबांच्या लग्नापासून ते माझ्या जन्मापर्यंत अनेक फोटो पाहिले. आई तरुण होती तेव्हा खूपच सुंदर दिसत होती. काकूने दाखवलेल्या एका अल्बम मध्ये धुपट्ट्यात गुंडाळलेला एका परीचा फोटो दाखवला तीच माझी राणी होती माझी धाकटी बहीण.या आठवणी सोबत घेऊन मला वाटचाल सुरू करायची होती.

एक दिवस काकू माझ्या खोलीत आली, येताना तिने एक ब्रिफकेस सोबत आणली होती,” स्नेहल, ही तुझ्या आईची बॅग, यात तिच्या वस्तू आहेत. तुला  आठवण म्हणून तु ठेवू शकतोस”. काकू गेल्यावर मी ती ब्रीफकेस उघडून पाहिली. त्यात चांदीचा कुंकवाचा करंडा, चांदीची लक्ष्मी मूर्ती, पायातील चांदीची वेढणे, दोन पैंजण जोड, असे बरेच काही होते. एक गुरूमहात्म्य पोथी होती. त्या पोथी मध्ये एक आईबाबा आणि छोट्या बाळाचा फोटो होता.पाठी लिहिले होते माझा लाडका स्नेहल. मी ते पाहून चक्रावून गेलो. हे कधी लिहिलं असेल! जेव्हा स्वतःची ओळख विसरली तेव्हा की मग ती ओळख विसरली नव्हती,आता तिच नव्हती त्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर राणीची आई कधीच देणार नव्हती. काही गुढ प्रश्न तसेच ठेऊन ती दूरच्या प्रवासाला निघून गेली. किती ही नाही म्हटलं तरी राणीच्या आईवर माझ्याकडून अन्याय झाला होता. वेळोवेळी मी तीच्यावर छोट्या छोट्या कारणांमुळे उगीच रागावलो होतो. तीने बिचारीने ते सार निमुटपणे सहन केलं होतं. तिला मी तिचाच मुलगा आहे हे ठाऊक होते का? मग ती अशी का वागत होती? काकाकाकू तीची पूरेशी काळजी घेत होते तरीही—

कितीही विचार केला तरी हे कोड उलगडणार नव्हत.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

5 thoughts on “राणीची आई भाग ०५

 1. हुदेवाले अब्दुल रहीम
  हुदेवाले अब्दुल रहीम says:

  खूपच संवेदनशील लेख आहे सर. थोड़ मोठा
  लेख आहे, परंतु मनाला चटका लावनारा आहे.???

 2. हुदेवाले अब्दुल रहीम
  हुदेवाले अब्दुल रहीम says:

  खूपच संवेदनशील लेख आहे सर. थोड़ मोठा
  लेख आहे, परंतु मनाला चटका लावनारा आहे.???

 3. हुदेवाले अब्दुल रहीम
  हुदेवाले अब्दुल रहीम says:

  खूपच संवेदनशील लेख आहे सर. थोड़ मोठा
  लेख आहे, परंतु मनाला चटका लावनारा आहे.???

  1. नंदकिशोर पाटील
   नंदकिशोर पाटील says:

   खूप छान लेख लिहिला आहे , सुरुवात अप्रतिम, नंतर काहीसा लांबलेला वाटला तरीही अंतःकरणाला भिडणारा, छानच.

 4. Kocharekar mangesh
  Kocharekar mangesh says:

  Thanks for comments

Comments are closed.