रेखाटले ते चित्र भुईवर
झोपड्या इथे उभ्या, फ्लेक्सच्या भिंती, रेल्वेच्या भुईवर
फोडुनी जलवाहिनी भरती पाणी, ना चिंता, नसे कुणाचा डर
घरात जळती दिवे विजेचे, आकडे टाकले त्यांनी खांबावर
शौच्यासाठी प्रभात काळी, मोकळे सौचकुप रूळारूळावर
कष्टकरी जनता, त्यांचे चाळीत घर, दोन घरात शून्य अंतर
चाळी बाहेर एकच नळ, पाण्यासाठी चाले रोजचाच जागर
असंख्य घरांचे एक शौचालय, दारावर टकटक म्हणे आवर
जमिनीखाली अगणीत बिळे, उंदीरघुशीना मुक्त वावर
मालकांच्या डिपॉझिटच्या खोलीत, अनामत काही हजार, भाडे शंभर
हलती जीने, गळके छप्पर, भितीच्या छायेत, साशंक खोल नजर
ना दुरुस्ती कधी, ना रंगरंगोटी, पिचलेली दारे, नित्य करकरे बिजागर
हादरती भिंती, दडपते छाती, विमनस्क स्थिती, हवाला त्या देवावर
गृहनिर्माण स्वायत्त इमारती, त्यात मद्यम कुटुंबिय सुखात रहाती
बीएचके चे इथे घरकुल, सुखसोयी घरात ते कर्ज हप्त्याने भरती
बचत खासियत, नीट नेटके थोडे राहून, स्वतःस भाग्यवान समजती
यांची मुले मैदानात खेळती, सायंकाळी वेळेत नित्य पर्वचा गाती
पहावे आता, गिरण्यांच्या जागी, उंचच उंच इमारती, अतिउंच टॉवर
मोठं मोठे फ्लॅट, गारगार, ए सी, त्यांचे गरम थंड शॉवर
इंपोर्टेड चारचाकी, लख्ख रस्ते, मॉल, मोठ्या माणसांचा वावर
रक्षक, हिरवे मैदान त्यांचे, ड्रेसमधील माणसे फिरवती मॉवर
या सर्वांवर वरताण ते, त्याची पावर, त्यांचे बंगले समुद्र तटावर
आलिशान बगीचा, रक्षक सोबती, श्रीमंत मित्र, मंत्रालय एका हाकेवर
भेट देती तिन्ही त्रिकाळ जनतेचे पाईक म्हणून झोप घेती तळहातावर
आहा रे प्रभू तेरी माया, म्हणे तू सुस्त झोपतो राज्य तुझे वैकुठावर
चित्र रेखाटले जे मनास दिसले, नसे काही वावगे ना शब्दाचा अस्तर
अवतरेल स्वर्ग का? धारावी शीवला का दाखवता गरीबाला गाजर