शाखा आणि चंदनाचा कार्यक्रम
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जेवढ्या शाखा आणि स्वयंसेवक आहेत ते पाहता अचंबित व्हायला होते. पंन्नास वर्षांपूर्वी सफाळ्या सारख्या अतिग्रामीण भागात संघाची शाखा नियमितपणे चालवण किती अवघड असावं त्याची कल्पना जो विरार किंवा त्यापूढे रहात असेल त्याला येईल. तेव्हा राष्ट्रीय सेवा दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा दोन वेगळ्या शाखा स्टेशनवर पंडितवाडी येथे भरत. डॉ.अमृते हे सेवादलाच नेतृत्व करत आणि निमकर कुटुंब या सेवादलाची शाखा भरवत असत, तर संघाची शाखा नामजोशी सर चालवीत. मुख्य म्हणजे तेव्हा नामजोशी सर हे संस्कृत विषय पंडित विद्यालयात शिकवत.
सेवादल शाखा चालविणारे स्वतःला समाजवादी म्हणवून घेत. सानेगुरुजी यांना ते आदर्श मानत. त्यामुळे ते त्यांच्या शाखेत ना.ग.गोरे, विनोबा भावे ,एस.एम.जोशी इत्यादी समाज सेवकांचा आदर्श लहान मुलांवर बिंबवण्याचा प्रयत्न करत. तर संघ डॉक्टर हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांच्या शिकवणीतून घडला असल्याने ते नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, श्यामा प्रसाद मखर्जी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाखेत मुलांना गोष्टी सांगत. मुलतः दोन्ही शाखांचे ध्येय संस्कार आणि राष्ट्रप्रेम याची शिकवण सारखी असली तरी पूर्वंपार चालत आलेले गांधीजी मवाळ गट आणि सुभाषबाबू जहाल गट या प्रमाणे त्यांचे कार्य चालू असावे असा माझा समज होता आणि आहे.
मी संघाच्या शाखेत कसा जाऊ लागलो ते निट आठवत नसले तरी मी इयत्ता सातवीत असतांना आमच्या घरालगत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटांगणात भरणाऱ्या शाखेत माझ्या मित्रांसोबत गेल्याचे मला स्मरते. तेव्हा फक्त तासभर खेळ घेऊन प्रार्थना झाली की आम्ही घरी धुम ठोकत असू. घरी गेल्यावर आमची दक्ष, विश्राम, आराम अशी पोपटपंची चाले. तेव्हा ना.म.जोशी सरांचा वसंता शाखेसाठी यायचा. कधीतरी ,घरातच ताठ उभे रहात, “नमस्ते सदा वत्सले मातृभूमी” घरी म्हणत असू. शाखेत रोज नवं नवे खेळ घेतले जात, तर कधी वसंता मंडल करून राम, कृष्ण,शिवाजी, संभाजी, माधवराव पेशवे,मल्हारराव, जनकोजी यांच्या गोष्टी इतक्या रंगवून सांगे, त्याची या गोष्टी सांगण्याची हतोटी इतकी सुंदर होती की तास दिड तास कधी संपला ते कळत नसे.
कधीतरी राष्ट्र सेवादलाचे स्वयंसेवक घरी येत आणि आमच्या वडिलांना म्हणत त्याला आमच्या शाखेत पाठवा, वडील त्यांना मोघम सांगून पाठवणी करत. आम्हाला सेवादल व संघ या दोन शाखातं काय फरक ते कळत नव्हते ते समजून घेण्याचे वयही नव्हते. आम्ही रोज कुणीतरी खेळ शिकवते, गोष्टी सांगते, आम्हाला नवीन काही ऐकायला मिळते यात आम्ही खुश होतो.
चार सहा महिन्यांनी आमच्या शाखा प्रमुखानी आम्हाला जमिनीपासून स्वतःच्या काना इतक्या उंचीची आणि साधारण एक इंच व्यासाची काठी घेऊन यायला सांगितले, हे शाखा प्रमुख मध्यम उंचीचे सशक्त, मजबूत हाडापेराचे होते. त्यांनी एक दिवस ही काठी आणली आणि शाखा सुरू होण्यापूर्वी थोड्या अंतरावर ठेवली.ही काठी नक्की का आणली असावी याचा आम्ही अंदाज लावत होतो.
शाखा सुरू झाली. झेंड्याला वंदन करून झाले पण ह्या काठीचे रहस्य कळेना शेवटी हिय्या करून रोकडे दादा यांना विचारले,”दादा,ही काठी तुम्ही इथे का आणली?” ते गमतीने म्हणाले,”जी मुले शाखेत अधून मधून दांडी मारतात ना त्यांना ठोकायला.” मला ते खरे वाटले,मी ते दुसऱ्याला सांगितले त्याने तिसऱ्या मुलाला सांगितले, होता होता सर्वांना समजले. दुसऱ्या दिवशी झाडून सारी मुले शाखेत आली,रोकडेना प्रश्न पडला
,त्यांनी एक मुलाला जवळ बोलावून विचारले, “आज काय विशेष आहे?”त्याला कळेना, सर असे का विचारतात,तो म्हणाला, “सर,काय आहे का आज?” तेव्हा ते म्हणाले,”अरे मित्रा आज उपस्थिती शंभर टक्के म्हणून विचारतो,आज गावात काही विषेश आहे का?” तो हसून म्हणाला, “सर, काल तुम्ही दांडा घेऊन आला त्यामुळे अशी बातमी गावात पसरली की जो नियमित शाखेत येत नाही त्यांना सर बदडणार, म्हणून आम्ही सर्व मुलांना गोळा करून घेऊन आलो.” त्याचे संभाषण ऐकून रोकडे गडगडाटी हसले. ते हसले म्हणून मुले जोराने हसली, कुणालाच कळेना नक्की काय भानगड आहे. म्हणाले “मी दांडा कशासाठी आणला ते आज तुम्हाला सांगणार आहे,आणि हो. याला “दंड” म्हणायचे दांडा नाही.” मी मान डोलवली.त्या दिवशी ती काठी सॉरी तो दंड आत्मसंरक्षणासाठी कसा वापरतात त्याचे प्रात्यक्षिक दाखवले,शिरो मार,अधोमार असे प्रकार सांगितले.
दंड चालवण्यासाठी मनगटात रग पाहिजे असे त्यांचे म्हणणे असे. मग झाले आम्ही मनगटात रग आहे की नाही पाहण्यासाठी तो दंड समांतर, तिरक्या रेषेत फिरवून घुमऊ लागलो.हा सराव घराच्या पाठी चाले. त्या काठीचा घू घू असा आवाज आला की माझी ताई येऊन विचारी, ” काय रे करतो? उगाच वेडे चाळे करू नको स्वतःचे डोके फोडून घेशील.” आता शरीरात वसंताच्या गोष्टीतल्या क्रांतिकारकानीं शिरकाव केल्याने “ताई ला काय कळते उद्या कुणी माझ्यावर हल्ला केला तर स्व संरक्षण आलं पाहिजे.” असं मनात म्हणत तिच्याकडे दुर्लक्ष करून माझ काठी घुमावण चालू ठेवत असे. बिचारी निघून जाई. तर अस एक एक खुळ कोणी न सांगता डोक्यात शिरत होत.
दर दोन महिन्यांनी कुणी प्रचारक शाखेला भेट द्यायला येत असत.नेहमी प्रमाणे ध्वज वंदन,संख्या वगैरे नित्यक्रम आटोपले की मंडल तयार करून सर्व बसत आणि आलेल्या पाहुण्यांची ओळख करून दिली जात असे. मग प्रत्येक स्वयंसेवक आपले नाव, शाळा व इयत्ता,वडिलांचे कामाचे ठिकाण इत्यादी माहिती सांगत असे, त्यानंतर प्रचारकांना विनंती करण्यात येई , ते राष्ट्रात काय घडते आहे,काश्मीर खोऱ्यात पंडित ब्राह्मण यांच्यावर कसा अन्याय सुरू आहे.आसाम कसा अशांत आहे. बोडो यांची समस्या कशी वाढत आहे ते मंडलात बसलेल्या सर्व मुलांकडे पाहून सांगत.त्याच दरम्यान स्थापित सरकार आणीबाणी लादण्याचा प्रयत्न करत होते आणि अनेक जण भूमिगत झाले होते. माधवराव करंबेळकर हे प्रचारक आसाम येथून भूमिगत होऊन आले होते. सफेद लेहंगा आणि सदरा अश्या पोशाखात मी त्यांना पाहिले. त्यांची शरीरयष्टी मजबूत होती धारदार नाक,मोठी कपाळपट्टी यामुळे ते क्रांतिकारक वाटत.त्याच काळात इतिहास शिकतांना चाफेकर बंधू,वासुदेव फडके,भगतसिंग वाचनात आले होते. माधवराव त्यांच्यापैकी एक असावेत असा भास होई. ते काश्मीर येथे पंडितांवर होणारा अन्याय कथन करीत तेव्हा कानशिले गरम होत. वाटे या पंडितांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी गेलेच पाहिजे.
कधी कधी बौद्धिक चाले. या दिवशी,शक्य तो शनिवारी रात्री कुणी पत्रकार,किंवा सन्माननीय व्यक्ती भेट द्यायला शाखेवर येई. विवेक, मसुराश्रमाचा धर्माभास्कर या अंकातील लेखाचे वाचन करून त्या वरती प्रत्येकाला काय वाटते असे मत विचारत,अर्थात विद्वानांच्या सभेत आम्ही मुले काय मत मांडणार? आमचे काम श्रोत्यांचे.इंदिरा गांधी जनसंघ आणि समाजवादी अनुयायी यांचा कसा छळ करत आहेत,जगजीवनराम,जॉर्ज फर्नांडिस इत्यादी नेत्यांचा कसा छळ सुरू आहे. किशोर कुमार यांनी दिल्लीच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यास नकार दिल्याने आकाशवाणीवर त्यांच्या गितांवर कशी बंदी घालण्यात आली आणि लवकरच आणीबाणी लागण्याची शक्यता आहे असे ते सांगत. आम्हाला आणीबाणी म्हणजे काय तेच तेव्हा ठाऊक नव्हते आणि अज्ञानापोटी काही प्रश्न विचारावा असे वाटत नव्हते.
या नंतर “चंदनाचा” कार्यक्रम असे तो मात्र महत्वाचा. मंडलाच्या मधोमध वर्तमान पत्रावर खूप मोठ्या प्रमाणात भेळ ठेवली जात असे आणि आम्ही मुले त्यावर ताव मारत असू हा कार्यक्रम आम्ही कधीही चुकवत नसू.
दर दिवाळीला डोंगरी खेड्यात जावून आम्ही पाड्यावर फराळ वाटायचो हा फराळ आम्ही मुलेच वेगवेगळ्या घरातून जमा करत असू तर मकर संक्रांतीला आम्ही तिळगुळ वाटप करायचो. या कार्यक्रमामुळे दूर खेड्यातील आमच्या बांधवांची भेट व्हायची. ह्या मित्रांची घरे साधी कुडाची असली तरी शेण-मातीने स्वच्छ सारवलेली असायची. त्यांची पितळेची भांडी लख्ख सोन्यासारखी चमकायची आणि पाहुणे म्हणजे देव अस मानून ते आदरतिथ्य करायला उत्सुक असायचे. आम्ही कार्यक्रम आटोपून निघालो की दूर अंतरापर्यंत ते सोडायला यायचे. या त्यांच्या मैत्रिपूर्ण वागणूकीने त्यांच्या बद्दल आपुलकी वाढली. हिवाळ्यात या भागात भेट झाली तर चणे, तूर यांचा हुरडा प्रेमाने खाऊ घालत.
तर शाखेतील शिस्त जरी आवडत नसली तरी ध्वज उभारायचे आणि प्रार्थना म्हणायचे किंवा सांगायचे काम आम्ही आनंदाने करत असू तो मान मिळावा यासाठी शाखा चुकवावी असे वाटत नसे. शाखेत समूह गान चाले तो ही माझ्या आवडीचा विषय होता. शाखेत नियमित जाणे बंद झाले त्याला पंचेचाळीस वर्षे झाली तरीही कुठे शाखा भरली असेल तर आवर्जून लक्ष जाते आणि कानात “नमस्ते सदा वत्सले मातृभूमी” शब्द निनादू लागतात. अद्यापही “मंत्र छोटा तंत्र सोप्पे तरी यशस्वी ठरले ते” आठवते आणि स्वतः बद्दल अभिमान वाटू लागतो. मी लहान वयात विक्रमगड येथे उघड्या माळावर अटेंड केलेला निवासी कॅम्प आठवतो. त्या कॅम्प मधील प्रत्येक दिवस अन दव वर्षाव झेलत घालवलेली रात्र आठवते आणि मन म्हणतं “नमस्ते सदा वत्सले मातृभूमी.”
सुंदर अभ्यासपूर्ण माहिती.
Chan aathvani sir.
सोपारकर,भोसले आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपला अभिप्राय हिच माझी लेखन प्रेरणा. चुकले तरी जरुर कळवा ही विनंती.
अतिशय सुंदर उत्साहपूर्ण आणि संस्कारमय आठवणी तसेच उत्कृष्ठ मांडणी
N.M .Thanks for complement.