सन्यस्त ओढ्यात बैसला
शुभ्र, धवल, पाढूंरका तो खडकावर आदळे प्रपात
भारावून सारा आसमंत गेला वाहे शीतल मंद वात
खाली काळा डोह थोरला सोसतो निमुट, गेली हयात
दर वर्षाला पडे उघडा परी कधी केली न त्याने खंत
वाहे तेथून वेगात ओढा, नदीसवे भेट घडता होई मनी तृप्त
चिल्ली पिल्ली आवेगे उतरती न्हाती गाती नदीच्या धारेत
कृषक जुंपले कामास सगळे, चालती दोन्ही हात वेगात
पेरणी, लावणी, निंदणी उरकती न मोकळे कुणी शेतात
कोणी म्हणती गीते आठवून, परी कोणास ना इथे उसंत
हिरवे शेत, मातीचा दरवळ, गंध भरून राहे मनामनात
झाडे डुलती, कळ्या उमलती, फुले लगडली, कुंपणावर जोमात
ओरडुन थकले बेडुक आता पिल्लांसवे बसले बांधावरी निवांत
आकाशात दाटी मेघांची ढुशा मारती पुन्हा पुन्हा वेगात
कुण्या झाडावरी चिंब ओलेती कोकीळ गाई सप्तकात
स्थितप्रज्ञ खडक ओढ्यात बैसला, जणू सन्यासी ओढ्यात
त्याच्या बाजूस ओबढ धोबड धोंडे जमले, जणू त्याचे भक्त
अन काठावरी औदुंबर हसे, झेलून धारा, त्यास भावे एकांत
चिंता परी त्याच्याही मनी दाट काळ्या मेघाने तो भयभीत