समिधा
“ए समिधा ! समिधा, ए समिधा पाणी देतेस ना?” आईच्या दोन हाकांनीही समिधाची एकाग्रता ढळली नाही. गेला महिनाभर शेजारच्या साठे काकूंचा लोकसत्ता दुपारी आणून समिधा नोकरीच्या शोधात रकानेच्या रकाने चाळत होती. बोटभर जाहिरात ती नजरेआड होऊ देत नव्हती. समिधाSSS!” आईच्या हाकेने समिधाची समाधी भंगली. तिला आई कधीपासूनच हाक मारत असावी आणि आता रागावली असावी याची तिच्या आवाजाच्या पट्टी वरुन जाणीव झाली. “काय गं आई ? आले हं.” “अग मघा पासून काय करतेस तिकडे? घसा कोरडा पडलाय पाणी दे मला.” ती क्षीण आवाजात बोलली. समिधाने ग्लास मध्ये पाणी ओतले आणि हाताचा आधार देत आईला उठवले व लोड पाठीशी लावून बसवले. आईने दोन घोट पाणी प्याले आणि ग्लास समिधेकडे दिला. समिधाच्या डोक्यात मात्र अजूनही जाहिरातीचा एखाद्या कॉलम नजरेतून सुटला नसावा ना असे वाटत होते पण आईला सोबत असावी म्हणून ती तिच्या बाजूला बसून पाय दाबून देत होती.
“पोरी वाटोळं झालं ग तुझ्या शिक्षणाचं आणि आयुष्याचं देखील, एवढी हुशार तू, पण संपात ह्यांची मिल मधील नोकरी गेली अन साऱ्या आशा आकांक्षांचा चुराडा झाला. दोन वाक्य बोलताना तिला धाप लागली. “,आई शांत पडून रहा पाहू सार काही ठीक होईल. मी तुला चहा आणू का? ” पोरीच्या आश्वासक शब्दाने तिला बर वाटले. “किती वाजले गं? गौरव येईल ना इतक्यात?” तिने आईच्या खोल गेलेल्या डोळ्यात पाहिले. पाच सहा वर्षांपूर्वी किती आखीव रेखीव दिसत होती ती! पण परिस्थितीने तिची रयाच गेली होती. “आई चहा देऊ का थोडा?” तिने पून्हा विचारले. “नको गं हे आल्यावर घेईन.” ती आतल्या आवाजात म्हणाली. “अग बाबा रात्री येणार जेवाणाच्या वेळेत.” “मग गौरव आला की दे, उगाच केवढा त्रास करून घेशील?” ती पुटपुटली.
समिधाला आपल्या भावाचे, गौरवचेही कौतुक वाटे, गेल्या दोन वर्षात केवढी समज आली होती. बिचारा, काही मागण नाही, हट्ट नाही, भूक लागली की पोटात ढकले पर्यंत अजिबात थारा नाही. गेल्या मे महिन्याच्या रजेत त्यांने दोन महिने वर्तमानपत्र टाकून पैसै कमावले त्यातून शाळेची पुस्तके, वह्या घेतल्या. परिस्थिती सर्वांना घडवत असते मग गौरव याला अपवाद कसा ठरणार? तिच्या डोक्यात विचार चक्र सूरू होते इतक्यात दारावर थाप पडली पाठोपाठ हाक ही ऐकू आली. “समिधा ए समिधा बाळा दार उघड—” ही हाक नक्की अण्णा काकांची होती. ती लगबगीने उठली.
“या अण्णा काका.” ते घरात आले आणि तिच्या हाती पिशवी देत म्हणाले, “घरात नेवून ठेव.” तिने पिशवी घरात नेऊन ठेवली आणि काकांना पाणी आणून दिले. अण्णा काका तिच्या बाबांचे लोकलमधील मित्र. मिल बंद झाली तेव्हा त्यांनीच चार ठिकाणी सांगून त्यांना कंपनी सिक्युरिटीची नोकरी मिळवून दिली. बारा तास उभ्याने पहारा दिल्यानंतर महिन्याला साडेतीन हजार मिळत होते, कसेबसे घरातील भागत होते. पाणी देता देता समिधाने विचारले,” काका थोडा चहा ठेऊ का?” त्यांना आपल्या मित्राची परिस्थिती ठाऊक होती पण नेहमी नकार दिला तर वाईट वाटेल म्हणून ते म्हणाले, “ठेव थोडा पण वहिनी कुठे गेल्या?” “अण्णा काका ” ती खोल आवाजात म्हणाली, तस त्यांच्या काळजात धस्स झाले. त्यांनी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. “अण्णा काका, आई गेले दोन महिने आजारी आहे.” ती लांब उसासा टाकत म्हणाली. “काय? दोन महिने! पण मग मला तुम्ही का कळवले नाही, पंढरीही गेल्या दिड दोन महिन्यात भेटलाच नाही म्हणा, पण तू तरी मला कळवायचं.” त्यांनी तिच्याकडे पाहिले तस ती म्हणाली, “बाबाच म्हणाले अण्णाला काही सांगू नकोस त्याला त्याचा प्रपंच आहे, म्हणून मग —–” , ते तिच्याकडे पहात म्हणाले, “अण्णा काका रक्ताचा काका थोडाच आहे बरोबर ना? कुठे आहेत वहिनी? चल पाहू काय बर नाही ते.”
ते दोघ स्वयंपाक खोलीत गेले. तिथेच पार्टीशन टाकून पलंग ठेवला होता. त्यांची जाग लागताच पार्वती शक्य तितके आवरून बसण्याचा प्रयत्न करत होती. अण्णा आत शिरताच त्यांनी पार्वती वहिनीना हाक मारली, “वहिनी कशा आहात? पंढरी काहीच कसं बोलला नाही?” ती बळेच हसली, ठिक आहे अस पूटपूटली . “समिधा डॉक्टरांच औषध सुरु आहे ना?”त्यांनी विचारले. “सुरु आहे औषध पण काही गुणच येत नाही.” समिधा खोटे बोलली. समिधाचा चेहरा पाहूनच अण्णा काय समजायचे ते समजले.
तेवढ्यात गौरवही आला.नेहमी प्रमाणे, आई,ताई अशी हाक मारतच घरात शिरला पण अण्णा काकांना पाहून तो गांगरून गेला. “अण्णा काका ! ताई, आई बरी आहे ना?”त्याने प्रश्नार्थक मुद्रेने दोघांकडे पाहिले.” अण्णांनी त्याला हलकेच जवळ ओढले, त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले, “काय गौरव, काय म्हणतो तुझा अभ्यास?” तो हसत म्हणाला, “चाललाय अभ्यास, सहामाही परीक्षेचा निकाल लागला की दाखवेन तुम्हाला.” ते समिधाकडे पहात म्हणाले, “समिधा तुझ्या आईची तब्येत काही ठिक दिसत नाही.तिला आपण डॉक्टरांकडे घेऊन जाऊ.” पार्वतीने नकारार्थी मान हलवली. “हे घरी आले की जावू आम्ही.”
अण्णांना पार्वतीच्या स्वाभिमानी स्वभावाचे कौतुक वाटले. त्यांनी खिशातून शंभराच्या दोन तीन नोटा काढल्या आणि समिधाच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. “अण्णा काका प्लीज —हे पैसै नकोत,आई, बाबांना आवडणार नाही.” “अग मुली, वहीनीना डॉक्टरकडे नेण्याची गरज आहे, वाटल्यास हे पैसै ऊधार समज. अण्णा रक्ताचा काका नसला तरी माणूस आहे,आणि अण्णा काकाची माणूसकी बेगडी नाही.” हे सांगताना त्यांचा गळा भरून आला. अण्णा काकांची आणि बाबांची किती गाढ मैत्री असावी ते तिला कळालं.
“अण्णा काका मी नोकरी करायचं म्हणतेय, सध्या घरात फारच ओढाताण होते नोकरी केली तर तेवढीच मदत होईल.” “पोरीचं वय किती आणि बोलते किती!” ते स्वगत म्हणाले. त्यांना तिच्या समजुतदारपणाच भारी कौतूक वाटलं. त्यांची लेक लग्न होऊन इंदोरला गेली होती,आपल्याला समिधा सारखी दुसरी मुलगी असती तर! ” त्यांना स्वतःच हसू आल जे आपल्याकडे नसतं त्याचीच माणसे अभिलाषा बाळगतात. त्यांना हसताना पाहून तिला आश्चर्य वाटलं, “काका पहाल ना मला नोकरी?” “अग! सतरावं सुध्दा संपल नसेल तुझ, तुझा बाप करू देईल का नोकरी ?”
“काका, मी समजावून सांगीन बाबांना, त्यांना थोडी मदतच होईल, नाहीतरी संपूर्ण दिवस घरात बसून मी काय करणार, प्लीज पहाल ना?” तिला काय ऊत्तर द्यावे त्यांना कळेना, “बरं बरं पाहिन हो तुला नोकरी.” त्यांनी वेळ मारून नेली. गौरव चहा घेऊन आला, “अण्णा काका चहा घ्या, कसा झालाय सांगा हा ताई इतकी धांदरट आहे की बोलण्याच्या नादात चहा गॅसवर विसरून आली. परिस्थितीने गौरव जास्तच समजूतदार बनला होता. काकांनी चहा संपवला आणि ते घरी जाण्यासाठी निघाले. “समिधा, बर बाबांना सांग हो,मी येऊन गेल्याचे.” ते जाता जाता म्हणाले.
एक आठवडा उलटून गेला असावा, एका सकाळीच अण्णा काका आले. त्यांनी नेहमी प्रमाणे हाक मारली “समिधाsss ए समिधा.” समिधा सकाळची कामे उरकण्यात गुंतली होती. तिने तो आवाज ऐकला तिच्या मनात आशेची पालवी फुटली, कधीतरी येणारे काका, आज आठ दिवसांनी परत आले म्हणजे नक्की काही चांगली बातमी असणार. ती लगबगीने गाऊनला हात पुसतच बाहेर आली. अण्णा काकांचा हसरा चेहरा पाहून तिचाही चेहरा फुलला,ते हसतच म्हणाले,”समिधा जा बाळा थोडा चहा ठेव, ते ऐकताच तिची खात्री पटली. तिने झटपट चहा करून आणला, त्यांच्यापूढे चहा करत ती म्हणाली,” अण्णा काका, माझ्या कामाच—-“
“अग हो हो,म्हणूनच आलो बर, अग आमच्या नगरात चित्रे डॉक्टर आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनीस्ट करता मुलगी हवी आहे. मी डॉक्टर चित्र्यांना विचारले, आधी ते ग्रँज्युएट मुलगीच हवी म्हणत होते परंतु मी विनंती केली तेव्हा तयार झाले. तिचा चेहरा खुलला, “अण्णा काका,आपले आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत.” अण्णा रागावले, “हिच पारख केलीस होय काकांची, अग, आभार परक्यांचे मानतात, तु मला मुली सारखी.” “नाही काका, तस नव्हतं मला म्हणायचं, तूम्हाला राग आला तर मी क्षमा मागते.” ती शांत स्वरात म्हणाली.
“बर,वहिनी काय म्हणतात, डॉक्टरकडे नेले होतेस ना?” अण्णा तिच्याकडे रोखून पाहत म्हणाले. बाबा तिला घेऊन डॉक्टरांकडे गेले होते, तिला अशक्तपणा आला आहे,बाकी काही नाही टॉनिक लिहून दिल आहे त्यांनी.” “गरीबी हाच आजार आहे पोरी, बाई स्वतः अपुरे अन्न खावून दुसऱ्यांना पोटभर खाऊ घालते,वहीनींच असच झालाय. हे दिवसही जातील, गौरव शिकून चांगल्या नोकरीला लागला की आईची काळजी घेईल. त्याला मात्र शिकेल तेवढे शिकवले पाहिजे.” “अण्णा काका,म्हणून मला नोकरी केली पाहिजे. माझ नोकरीच पक्क होईल ना!” समिधाने त्यांच्याकडे पहात विचारले. “शब्द तर टाकलाय, प्रयत्न कर, त्या ईश्वराला काळजी, बर वहीनी काय म्हणतात,चल पाहू.”
ते पार्वती झोपली होती तिथे गेले, “वहीनी काय म्हणते तब्येत? बरे वाटते ना?” “आता बर वाटून न वाटून काय उपयोग? मुल मोठी झाली की मी सुटले. “तिच्याकडे पहात अण्णा ठाम शब्दांत म्हणाले, “स्वतःसाठी नाही पण मुलांसाठी तुम्हाला बर झालच पाहिजे.” ती खिन्नपणे हसली. “आई काकांनी मला नोकरी आणली आहे आता काळजी करायच कारण नाही मी गौरवला शिकवेन तू खणखणीत बरी हो” ,समिधाचा उत्साह ओसंडून वहात होता.
अण्णा निघता निघता म्हणाले, “समिधा परवा डॉक्टर चित्र्यांकडे जायच आहे तू तयार रहा.” समीधेचे मन आनंदाने नाचू लागले. ती काकांना सोडायला घराच्या पायरी पर्यंत गेली. संध्याकाळी बाबा थोडे लवकरच घरी आले.तिने त्यांना चहा दिला. “बाबा,अण्णा काकांनी मला नोकरी आणली आहे.” ते विस्फारीत नजरेने तिच्याकडे पाहू लागले, स्वतःच्या किकर्तव्यमुढतेचा विशाद त्यांच्या मनात दाटला होता, तरीही ते म्हणाले, “हा नसता उद्योग अण्णाला कोणी सांगितला?”
“बाबा, मीच त्यांना म्हणाले. नाहीतर घरी बसून काय करणार? मग मी जाऊ ना? त्यांना कळेना ह्या पोरीला जा म्हणावे की नकार द्यावा. पण दबलेल्या आवाजात ते म्हणाले, “आता अण्णा म्हणतोय तर जा, पण पहा बर, पोरी जपून रहा. “त्यांच्या बोलण्याचा अर्थ तिला समजला होता. परिस्थितीने बऱ्याच गोष्टी वेळे अगोदर तिला समजल्या होत्या. ते पार्वतीच्या बाजूला जाऊन बसले.” पार्वती, कस वाटतय तुला?” ” मला मेलीला काय धाड भरली, पण तुम्ही काही ऐकल का?” तिने प्रतीप्रश्न केला. “कशा बद्दल म्हणते ग, समेच्या नोकरी बद्दल का?” ते तिच्याकडे पहायच टाळत म्हणाले. “होय हो ,तेच ते, का नोकरी करायचे आहे? शिकली असती तर पूढे चांगली नोकरी मिळाली असती.”
तिला काय सांगाव ते त्यांना कळेना, “मी कुठे म्हणतोय तस, मला का तिला कामाला पाठवावी असे वाटते पण आता अण्णा म्हणतो म्हणजे ठिकच असणार, पार्वती मी माझ्या सख्या भावांपेक्षा अण्णाला मानतो. तो आपल वाईट होईल अस काही सूचवणार नाही, समिधा त्याला मुलीसारखीच,मला विश्वास आहे.” पार्वती काही बोलली नाही. अण्णा तिच्या कपाळावर हात फिरवून म्हणाले, “तु काळजी करू नको,आधी बरी हो सार काही ठिक होईल.”
दोन दिवसांनी अण्णा काका आले,समिधा घरातील काम आटोपून तयार होती, विशेष म्हणजे पार्वती वहिनी बाहेरच्या खोलीत येऊन बसल्या होत्या. अण्णांनी तिला हाक मारली, समिधा निघायचं ना,अरे वा! वहिनी तुम्हाला इथे पाहून बर वाटलं, आम्ही निघतो,स्वतःची काळजी घ्या.”समिधा आईच्या आणि अण्णांच्या पाया पडली. “आई येते हा,गौरव आला तर दोघ जेऊन घ्या.” वाटेत अण्णांनी तिला शिष्टाचाराच्या चार गोष्टी सांगितल्या हाता. तोंडाशी आलेला घास जायला नको. चित्र्यांचे हॉस्पिटल दहा मिनिटांच्या अंतरावर होते. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर अण्णांनी तिला खुणेने बसायला सांगितले. कोचवर काही पेशंट बसले होते,डॉक्टरांनी बोलावण्याच्या प्रतिक्षेत होते. बाहेर शिपाई उभा होता,अण्णांना पाहून त्यांनी विचारले, “डॉक्टरना भेटायच आहे का? अपॉइंटमेंट घेतल्याय का?” अण्णा म्हणाले, होय डॉक्टरांनी बोलवलय, त्यांना सांगा साठे आलेत. “शिपाई बहूदा सांगून आला असावा, थोड्या वेळाने डॉक्टर त्यांच्या कन्सल्टींग रुम मधून बाहेर आले. अण्णांनी त्यांना उठून नमस्कार केला. समिधाही उभी राहिली. डॉक्टरांनी अण्णांकडे पहात बसण्याची खूण केली आणि तिच्याकडे ओझरत पहात ते निघून गेले.
थोड्या वेळाने शिपाई बोलवायला आला, “मॅडम, डॉक्टरांनी आपल्याला बोलवलय.” तिने अण्णा काकांकडे पाहिले, त्यांनी खुणेनेच जाण्यासाठी सूचवले,तिने आपली सर्टिफिकेट फाईल घेतली आणि कन्सल्टींग रुमचा दरवाजा वाजवला. डॉक्टर भारदस्त आवाजात म्हणाले,”Yes,come in.” समिधाने आत प्रवेश केला. डॉक्टरांच्या केबीनला ए.सी. होता,आत थंडगार होते तरीही तिचे अंग भितीने गरम झाले. आज पहिल्यांदा ती घरातून अनोळख्या व्यक्ती समोर एकटी जात होती. “Good Morning Sir” ती धीर एकवटून म्हणाली. “हं, बसा”, डॉक्टर तिच्याकडे नजर टाकत म्हणाले. तिने आपली फाईल त्यांच्या पूढे धरली. ते फाईल चाळता चाळता व्हेरी गूड अस म्हणाले.मधून मधून ते तिच्याकडे पहात होते, समिधेला ते तस पाहणं आवडत नव्हते. तिने मान खाली घातली. “चांगले पर्सेंट आहेत तुला, पूढे का नाही शिकत?” त्यांनी विचारले. “सर, आमची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, म्हणून नाही जमले.” तिने उत्तर दिले. “बरे तुला पूर्व अनुभव नाही, अशी मान खाली घालून राहिलीस तर आमच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटशी कसे बोलणार? “डॉक्टर, तिच्याकडे पहात म्हणाले. “सॉरी सर, पाहिला अनुभव आहे,पण मी करेन मँनेज, मला संधी द्या.” ती त्यांच्याकडे पहात म्हणाली.
“That’s good, be bold, don’t be nervous, साठे म्हणाले, तुम्हाला नोकरीची गरज आहे,बरोबर ना? म्हणून मी interview साठी बोलवले.” डॉक्टर हसून म्हणाले. समिधाला त्यांच्या नजरेला नजर देणे असाह्य झाले, तरीही ती निमुटपणे बसली होती. शरीराला अनेक इंगळ्या डसाव्या तशी तिची स्थिती होती. परंतू तिने स्वतःला बजावले मला हे पचवलच पाहिजे.
शेवटी डॉक्टर एकदाचे म्हणाले, “You, may go, We will send you message.” तिने हात जोडून नमस्कार केला. ती उठली आणि कन्सल्टींग रुम बाहेर पडली. अण्णा बाहेर वाट पहात होते. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले, ती समजली, अण्णां काकांना तिच्या उत्तराची अपेक्षा होती. “ते नंतर कळवतो म्हणाले.” तिने हळू आवाजात त्यांना सांगितले. तरीही अण्णा डॉक्टरांना भेटायला गेलेच.
बाहेर बरेच पेशंट जमा झाले होते. अण्णा बाहेर आले, त्यांनी खुणेनेच तिला चलण्याची खूण केली. ती घरी आली तिने हात, पाय, चेहरा स्वच्छ धुवून टाकले. नजरेचा विखार जणू ती धुवून टाकत होती. आईने तिला प्यायला पाणी दिले. “समे, कसा झाला इंटरव्ह्यू, डॉक्टर काही म्हणाले का?” ती बळेच हसली, “छान झाला,ते नंतर कळवतो म्हणाले.” तिला कळून चुकले, तिची नोकरी हेच आईचं औषध आहे. तिने तिला वाटत असलेल्या किळसवाण्या नजरे बद्दल काहीही सांगितले नाही, कारण तिने आता आईची आई आणि भावासाठी मोठी ताई व्हायच ठरवल होत.
दुसऱ्या दिवशी अण्णा काका निरोप घेऊन आले, येतांना त्यांनी पेढ्याचा बॉक्स आणला होता,” समिधा, बाळ तुझ्या नोकरीच पक्क झाल हो! डॉक्टर तुला चार हजार पगार देणार आहेत.” ते ऐकून तिला अण्णा काकांच्या आस्थे बद्दल आदर वाटू लागला. किती काळजी करतात आपली, पण मनाच्या दुसऱ्या बाजूला आक्रंदन सुरू होते.डॉक्टर आपल्या अडचणीचा फायदा तर घेणार नाहीत ना?, “समे, अग पेढे देवाकडे ठेवते ना? जा आधी चहा ठेव आणि अण्णा भाऊजींच्यासाठी गोड शिरा कर.” आईचा तो उत्साह पाहुन तिने मनातील वेदना दडवली,ती लगबगीने आतल्या खोलीत पेढ्याचा बॉक्स घेऊन गेली, “काका बसा हा मी आत्ता चहा घेऊन येते.”
“काय वहिनी कस वाटतय आज,अहो आजारपण अंगावर काढल म्हणून काही परिस्थिती बदलणार नाही मी पंढरीच्या मालकांना म्हणालो, “शेठजी,गेल्या दोन वर्षात पगार वाढ दिली नाहीत, गरीबान जगायच कस? महागाई थांबायला तयार नाही, बघा थोडी पगार वाढ करता येते का?, तर म्हणाला साठे साहेब तुमचा शब्द म्हणजे आदेशच की,पाचशे रूपये या महिन्यात वाढवतो मग तर झाल. बोललो नसतो तर छदाम सुद्धा वाढवले नसते. तेव्हा आता चिंता विसरुन जा, समिधा बापाऐवढा पगार घेईल आहात कुठे!” पार्वतीचा अण्णांबद्दलचा आदर वाढला.समिधाने अण्णांना चहा आणि शिरा दिला, “आई हा चहा तूला, शिरा देऊ का तूला ?”
“अग समिधे आईच तोंड ही गोड कर की, आणि वहिनी या पूढे आजारी पडायचे नाही हां. तसे काही वाटले तर डॉ.चित्रे आहेतच, काय समिधे बरोबर ना?” समिधा तोंड देखली हसली, न हसून कस चालेल, ती बाबांचा खांदा व्हायला आतूर होती. त्यासाठी जीवनातील कोणत्याही अडचणींचा सामना करायला ती तयार होती. कुटुंबाच्या सुखासाठी ती त्याग करायला तयार होती. ती होती समिधा. समर्पण, त्याग, संयम यांचा त्रिवेणी संगम.
संध्याकाळी गौरव शाळेतून घरी आला तर समिधाने त्याला शिरा आणि चहा दिला. ते पाहूनच तो म्हणाला,”ताईsss म्हणजे अण्णाकाकांनी सांगितली ती नोकरी तुला मिळाली असच ना! मी घरात आलो तेव्हा आई घरात फिरत होती, मला म्हणाली, गौरव आधी हात पाय धू आणि देवाला नमस्कार कर कोणाच्या पावलांनी देव येतो ते नाही सांगता येत. अस्स आहे तर, तुला नोकरी मिळाली हे ऐकून बाबांना किती आनंद होईल. मला आता मनाप्रमाणे शिकता येईल, खरं ना?”
“हो रे राजा, तुझी बडबड बंद कर आणि खाऊन घे, चहा थंड होतोय.” समिधा सर्व आवरून बाहेरच्या खोलीत वडिलांची वाट पहात बसली, आपण नोकरी केलेली बाबांना आवडेल की मग—-,ती विचाराच्या तंद्रीत असताना ते आले,त्यांनी घरात पाय ठेवताच,गौरव ओरडून म्हणाला, “बाबा एक चांगली गोष्ट ऐकायची आहे का?” पंढरी त्याचा गाल ओढत म्हणाला, “आम्हाला रस्त्यानेच सांगितल बर, समिधा आहेच मुळी गूणी.” समिधा घरातून सगळ ऐकत होती सगळेजण आनंदात होते पण तिला नक्की काय वाटते कोणालाच माहीत नव्हतं. सगळ्यांच्या आनंदासाठी दु:ख पचवायला,काही शुभ घडण्याकरता स्वतःची आहुती द्यायला ती तयार होती कारण ती होती सुखाच्या यज्ञातील समिधा.
593 thoughts on “समिधा”