सरत जाते बालपण

सरत जाते बालपण

लहानपणी नात्यात असतो अवीट गोडवा
बहीण भाऊ यांची भांडणे म्हणजे फुलवा

क्षणात भाऊ-ताई बसते रुसून लपून
दोघांपैकी एक हैराण शोधून शोधून

आता तुझ्याशी बोलणारच नाही ती बसते अडून
कधी ताई तर कधी दादा थकतो समजूत काढून

त्यांचं भांडण सोडवायला बसतो आईचा लवाद
कोणाचीही बाजू घेतली तरी सुटतच नाही वाद

शेवटी भांडण संध्याकाळी वरच्या कोर्टात जातं
नजरेच्या धाकानीच बिथरून समजुतीने सुटतं

बालपणी वर्षात एकदा तरी नक्कीच आठवतो मामा
गावी जाताना उत्साह, सगळा ऐवज पिशवीत होतो जमा

पाहता पाहता बालपणे सरते, होतात सख्खे मित्र
दोघांची युती, आईशी भांडतात, बदलूनच जाते चित्र

दोघेही एकमेकांच्या चुकांवर घालतात पांघरूण
हरवत जात भान, आईबाबाला जातात विसरून

हळूहळू आज्जी, मावशी, मामा, आत्या नाती होतात धुसर
वय वाढलं की मित्रमैत्रिणींची गोडी, गावाचा पडे विसर

आता तिचे कपडे, त्याची बेशिस्त पाहून आई रागावते
कामामुळे वडिलांचे लक्ष नसल्यास त्यांचे आयतेच फावते

आईचे मन वळवत दोघेही शोधतात आपले सोबती
मुलांना हवे स्वातंत्र्य, आता आईबाबाच घरात उरती

पाहता पाहता होतात मोठे, आपल्या संसारात व्यस्त
आईबाबासाठी नसतो वेळ, आठवत नाही त्यांचे कष्ट

कधीतरी सणावाराला त्यांचं जाणंयेणं अन्यथा आहेच नेट
गिफ्ट देऊनच होत स्वागत, नाही आपुलकीची गळाभेट

आई बाबा थकून जेव्हा निर्वाणीचं बोलू लागतात
तेव्हा यांच्या फेऱ्या घराकडे नकळत वाढतात

कोण? कितींदा? भेटून गेलं याची होते मोजदाद
कोणाची जबाबदारी मोठी याचे विषय रंगतात

कोणाला किती काय दिलंय यावरून होतो विसंवाद
भाऊ बहिण हक्कासाठी भांडण कोर्टात जातो वाद

पाठीवरची भावंड संपत्तीसाठी होतात एकमेकांचे वैरी
आठवतच नाही त्यांना बालपण वाटून खाल्लेली कैरी

आई बाबा वृद्ध होताच घेतात त्यांना नियमाने वाटून
सहा महिन्यांचे सूत्र आजारीच पडले तर जातात भेटून

आई किंवा बाबा आधी गेले, तर कोणी जबाबदारी घ्यायची?
शेवटी ठरते, सोय आश्रमात लावून महिनाआड भेट द्यायची

रक्ताच्या सख्ख्या बहीण भावात नाही उरत आता जुने नाते
कलीयुगाचा महिमाच तसा ना भविष्यात उरेल मामाआते

वैभवसंपन्न जगात हरवलेत बहीण भावाचे नितळ बंध
स्थावर संपत्ती करता नको कटुता, होऊ नका इतके अंध

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “सरत जाते बालपण

  1. सागर सिद्धू पाटील
    सागर सिद्धू पाटील says:

    कविता वाचताना लहानपणीचे दिवस डोळयासमोर येतात, बहिणीशी कितीही भांडले तरी सकाळी पुन्हा जणू काही झालेच नाही, अशा तोऱ्यात पुन्हा तिच्याशी खेळणे, पण कविते च्या शेवटी समाजाची वास्तवता मांडली आहे, आजच्या कलियुगात माणूस वस्तूवर प्रेम करत आहे माणसावर नाही, नुसता पैसा, गाडी, बंगला पाहिजे, पण आपल्या रक्ताची नाती नको आहेत माणसाला, तुमच्या कविता ह्या नुसत्या कविता नसून समाज प्रबोधनाचे साधन आहे , सर तुम्ही कवितेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत जोपासले आहे , एकंदरीत कविता एकदम छान.

Comments are closed.