hospitality-mangesh-kocharekar

हॉस्पिटॅलिटी

आदरातिथ्य म्हणजे नक्की काय? कोणी कोणा विषयी आदर व्यक्त करावा?त्याचा व्यक्तीच्या वयाशी सबंध आहे का?आदरातिथ्य करतांना वय, सामाजिक दर्जा, जात,धर्म ,पंथ,भाषा याचा अडसर येणे योग्य नव्हे.

बालो वा यदी वा वृद्धा युवा वा गृहमागत:|
तस्य पूजा विधातव्या सर्वस्याभ्यागतो गुरु:||

अस संस्कृत वचन आहे.

 पण वास्तवात काय दिसते?तुमच्या स्टेटस प्रमाणे तुमचे स्वागत होते.तुम्हाला, पद असेल, सामाजिक दर्जा असेल, श्रीमंती असेल किंवा शक्ती असेल तर समोरची व्यक्ती, अधिकारी वा घर त्या प्रमाणे तुमचं स्वागत करेल. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा दर्जा लक्षात घेऊन त्याचे स्वागत करत असाल तर त्या आदरातिथ्याला अर्थ नाही.

मनाची म्हणजे तुमच्या स्वभावाची बोली ती तुमच्या देहबोलीतून व्यक्त होत असते. एखादी व्यक्ती तुमच्या घरी आली असता, तुमचा चेहरा त्याची प्रतिक्षिप्त क्रिया व्यक्त करतो त्यातून त्या व्यक्तीला त्याच्या आगमनाने तुम्हाला आनंद झाला आहे की, “आलाच आहात तर या आता, हाकलून तर देता येत नाही ना” असे भाव व्यक्त होतात. असो, तर ह्या आदरतिथ्य स्वभावाचा कस केव्हा लागतो? तर विपत्तीच्या, संकटाच्या काळात. सर्व काही सुरळीत असेल तर कोणीही निभावून नेईल पण जेव्हा कसोटीची वेळ असते तेव्हा तुम्ही कसे सामोरे जाता त्यावरून तुमचा स्वभावधर्म कळतो. आता याच अवस्थेतून जग जात आहे. जर तुम्ही आता मित्राला फोन करून तुझ्या घरी यायला निघालो आहे म्हणालात तर तो म्हणेल, “अरे आम्ही आता अर्जंट बाहेर निघालोय, मी आलो की कळवतो तुला”.  याचे कारण स्वतः आणि कुटुंब सुरक्षिततेची काळजी. मला एवढेच म्हणावेसे वाटते अशाच काळात तुमच्या मैत्रीचा आणि तुमच्यामधील माणूसकीचा कस लागतो. तेव्हा केवळ Hospitality हा अभ्यासक्रम न राहता तो तुमच्या जगण्याशी जोडला जातो.

लॉकडाऊन मुळे एप्रिल महिन्यात अगदी कडेकोट बंद होता. हॉटेल, वडा पावच्या गाड्या, चहाच्या टपऱ्या, घरगुती खानावळी आणि डोंबिवली विशेष “पोळीभाजी केंद्र” अगदी कडकडीत बंद. दुकान उघडे दिसले की माणसे सामान मिळवण्यासाठी पळापळ करत होती,सोशल डिस्टंन्स राखताना कधी एकदा नंबर येईल म्हणून अधीरतेने वाट पहात होती. दुष्काळ असताना जसे दोन किलो तांदूळ आणि पाच किलो गव्हासाठी रेशनींग दुकानात  वणवण करावी लागत होती तशीच काहीशी स्थिती होती. फरक होता तो आत्ता हातात पैसे आणि गोदामात आणि दुकानात धान्य असूनही मोदी सरकारने अचानक लॉकडाऊन पुकारल्याने माणसे नियोजन करू शकली नाही.

मुख्य म्हणजे हा लॉकडाऊन नक्की किती दिवसासाठी हे चित्र स्पष्ट नसल्याने त्याचे गांभीर्य वाढले आणि मुळातच असणारी संचय करण्याची वृत्ती वाढली. पुरवून वापरले पाहिजे याची जाणीव झाली. मग आपल्याला शिल्लक साठा किती दिवस पुरेल हे माहीत नसताना. अन्न फुकट कोण घालवेल आणि उदार होऊन प्राण्यांना कोण जेवू घालेल?

कोकणात आजही कोणत्याही वेळी कोणाच्याही घरी आपण गेलो तर प्रथम गुळ पाणी आणि नंतर चहा दिल्याशिवाय परतू देणार नाही. सकाळी अकरा-साडेअकरा वाजता पोचला तर पेज पाणी दिल्याशिवाय परतू देणार नाही. दुपारी जेवणाच्या वेळी पोचलात तर जे काही शिजलं असेल ते वाढल्याशिवाय परत सोडणार नाही. आदरातिथ्य त्यांच्या नसानसात भरलेलं आहे. कोल्हापूर, सातारा सांगली येथेही पाहुणा आला की पहिलं त्याला गूळ पाणी देतील मगच विचारतील, “पावन, कुठल्या गावच म्हणायचे? काय काम काढलया? दुपारचे आलायसा दोन घास जेवून जा म्हटलं”.

पण मुंबईला अनोळखी माणसाच्या वाट्याला हेच आदरतिथ्य येईल का? दरवाजा उघडला जाईल का? की तुमच्या समोर दार धाडकन बंद होईल किंवा दार उघडले जाणारच नाही, किंवा काय हवंय?  एवढ्या सकाळी दार का ठोठावता?अशी विचारणा होईल. आजही ग्रामीण भागात आदरतिथ्य करण्यात कुणी कंजूसी करत नाही मात्र शहरात अशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे ठरते, ज्या पुण्यात पाहुण्यांना चहा घ्या, न म्हणता, चहा घेणार ना? असे विचारले जाते तिथे जेवून जा म्हणण्याची अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरते.

पण शहरातूनही काही संस्थांनी मात्र करोना काळात शासनाच्या पैशांनी नव्हे तर समाजातील कुटुंबाकडून निधी उभारून त्यांच्या समाजातील गोरगरीब कुटुंबांसाठी अन्नदान सुरू केलं होतं. सकाळी नाष्टा, दुपारी जेवण आणि रात्री जेवण अशा तीन वेळेची सोय त्यांनी केली होती. अर्थात हा उपक्रम अनेक संस्था राबवत होत्या त्याचा लाभ घेणारी कुटुंबे ही त्या समाजातील होती.

स्थलांतरीत मजुरांची अशीच सोय त्यांच्या परतीच्या प्रवासात अनेक सामाजिक संस्थांनी आणि मंडळाने केली. हेच माणूसकी जिवंत असल्याचे लक्षण आहे. काही सामाजिक संस्था मात्र मंदिराच्या सभामंडपात ज्यांना घर ना दार अशा निराश्रित लोकांची भूक भागवत होत्या आणि ते ही सुग्रास अन्न  वाढतांना  त्यात कुठेही दान करत असल्याचा निवेश नव्हता, गर्व नव्हता. ती ईश्वरसेवा होती. ते मुखाने “जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा” अस न म्हणताही ते काम मन लावून, आवडीने करत होते.

काही संस्था काही कुटुंबांना शिधा वाटप करत होत्या तर काही त्यांची आर्थिक गरज ओळखून आर्थिक मदत करत होत्या. ते सर्व गरजू  समाजाचे अतिथी होते. “अतिथी देवो भव.” असं म्हणून ते थांबले नव्हते, तर त्यांना ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील त्या करुन देण्यात धन्यता वाटत होती.आदरतिथ्य अर्थात  Hospitality  ही त्यांच्या जनुकात होती.

कधीकाळी आदरतिथ्य हे अभ्यासक्रमात शिकवावं लागेल असा विचार पाठच्या पिढीने केलाही नसावा. जसे आज शाळेत संस्कार मूल्यशिक्षण विषयात शिकवण्याची वेळ आली तसेच आतिथ्य महाविद्यालयात शिकावे लागत आहे. “कालाय तस्मेय नम: ” असंच म्हणावं लागेल.

समाजाने त्याच समाजातील कुटुंबांसाठी अशी सोय करण आपण गृहीत धरतो तीच तर खरी मानवता. पण काही कुटुंब आणि काही व्यक्ती मात्र मुक्या  प्राण्यांना हे अन्न नियमित घालत होत्या. लॉकडाऊन असताना काही जरुरीच्या कामासाठी मी घराबाहेर पडलो की हे अन्न दान मी पहात होतो आणि मनोमन त्यांच्या कार्याला सलाम करत होतो. या काळात मटण, चिकन यांची दुकाने बंद होती. मासेमारी बंद असल्याने मासे विक्रीही बंद त्यामुळे भटके कुत्रे, मांजरे यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती.

माणूस भूक लागली आणि अनावर झाली तर कुणाकडे तरी मागेल,अगदी नाईलाज झाला तर भुकेपोटी भीक मागेल किंवा चोरी करेल, प्राण्यांनी काय करावं? या मुक्याप्राण्यांची सोय व्हावी म्हणून काही जैन मंडळीनी तरुण मुलांना हाताशी धरून या प्राण्यांसाठी अन्नवाटप सुरू केले. आम्ही रात्री शतपावली घालण्यासाठी बाहेर पडलो की पहात होतो, जेथे मोठ्या प्रमाणात कुत्रे एकत्र थांबतात अशा नाक्याच्या ठिकाणी शिजवलेले अन्न आणि बिस्कीट कुत्र्यांना घातलेली पाहिलं. ही जबाबदारी काही संघटना पेलत होत्या तशीच जबाबदारी काही व्यक्ती स्वतः पेलत होत्या.

मी एप्रिल महिन्यात एक  दिवशी संध्याकाळी थोडे पाय मोकळे करावे म्हणून बाहेर पडलो तर आमच्या नगरातील रिक्षा स्टँड जवळच्या फूट पथावर दोन मुलींच्या सभोवती दहा बारा कुत्र्यांचा गराडा पडलेला पाहिला. या पूर्वी मी त्यांना पाहिलं नव्हत. मी सुरक्षित अंतर राखत जवळ जाऊन पाहिले तर साधारण वीस बावीस वर्षांच्या सडसडीत चणीच्या दोन मुली डिश मधून कुत्र्यांना दूध भात खाऊ घालत होत्या.

त्यांच्याकडे कुत्र्यांना वाढण्यासाठी दोन चार डीश, दोन पिशव्या, पाण्याच्या बॉटल्स असा सगळा सरंजाम होता. कुत्रे खाण्यासाठी अधीर झाले होते, कुत्र्यांनी भूकेपोटी वाढले ते सगळं फस्त केले. पण  कुत्र्यांची भूक भागली नव्हती. त्या दोघीं  पैकी एक मुलगी दुकानावर गेली आणि तिने बिस्किटाचा पुडा खरेदी केला. कुत्र्यांनी तिच्या भोवती कोंडळे केले, आणि तिने त्या कुत्र्यांच्या तोंडात बिस्कीट भरवले. मग एक एक  कुत्रे शेपटी हलवत निघून गेले. 

खर तर भटक्या कुत्र्यांना बरेच जण बिस्किट्स किंवा अन्य खाण्याच्या वस्तू देतात पण या दोन मुलींचा उल्लेख करणं मी योग्य समजतो कारण त्यांच्याशी बोलल्यानंतर मला समजले या मुली लॉकडाऊन पूर्वी पासूनच आमच्या डोंबिवली मधील पूर्वेला ह्या मुक्या प्राण्यांना अन्न दान करत होत्या. लॉकडाऊन मध्ये कोणीही घरा बाहेर पडत नसताना आणि कोव्हीडमुळे परिस्थीती गंभीर असताना केवळ मुके प्राणी उपाशी राहू नयेत या हेतूने त्या दोघी मुक्या प्राण्यांना अन्न घेऊन येत होत्या.

 लाँक डाऊनमुळे जास्त मोठ्या संख्येने कुत्रे व मांजरी यांना अन्न देण्याची गरज भासू लागली. तरीही त्यांनी हार मानली नाही. या अगोदर जेवढे जेवण, दूध भात त्या कुत्रे आणि मांजरे यांच्यासाठी आणत त्यापेक्षा अधिक प्रमाणात त्या आणू लागल्या. केवळ उत्सुकता म्हणून मी त्यांना भेटलो आणि या अन्नदानाबाबत त्यांचे विचार ऐकले.

निकिता ही मोठी बहिण सी.ए आहे ती फर्म मध्ये नोकरी करते, ती म्हणाली “बरेच मध्यमवर्गीय लोक हौस म्हणून कुत्रे किंवा मांजरी पाळतात आणि कालांतराने हौस फिटली म्हणून किंवा जनावर म्हातारे झाले किंवा त्याला दुर्धर आजार झाला की रस्तावर सोडून देतात. ते असाह्य असतात आणि अचानक घरातून बाहेर पडल्यामुळे स्वतःचे संरक्षण करण्यास तयार नसतात. बाहेरचे प्राणी त्यांना सहज स्वीकारत नाहीत.

मुख्य म्हणजे प्राणी माणसापेक्षा प्रामाणिक आणि विश्वासू असतो. अशा प्राण्यांना दया बुद्धी न दाखवता गरज संपली की सोडून देणे गुन्हा आहे. आम्ही अशा नाकारलेल्या प्राण्यांची काही प्रमाणात सेवा करतो याचा मला आनंद आहे.”

तिची दुसरी बहिण सुरभी ही मुंबई युनिव्हर्सिटी कलीना येथे  Hospitality Management करते ती शेवटच्या वर्षाला आहे. तिला मी विचारले रोज किती प्राण्यांना तुम्ही खाऊ घालता आणि त्यासाठी किती खर्च येतो? तुम्ही हा खर्च कसा भागवता?” ती म्हणाली “रोज आम्ही साधारण तीस प्राण्यांना खाऊ घालतो कधी कधी अधिक कुत्रे आणि मांजरी जमा होतात अशावेळी आम्हाला बिस्कीट घालावी लागते. आजवर आम्ही कधी हिशोब ठेवला नाही तरी त्यासाठी अंदाजे  रोज दोनशे रूपये किंवा थोडा अधिक खर्च येतो आणि तो आम्ही स्वतः करतो आमचे आई, बाबा या विषयी कधी तक्रार करत नाहीत.” मला आश्चर्य वाटलं या भटक्या प्राण्यांसाठी हे कुटुंब महीना दोन अडीज हजार रुपये खर्च करतं.

तिला मी  Hospitality  हाच अभ्यासक्रम का निवडला अशी विचारणा केली तेव्हा ती म्हणाली “नेहमीच्या पठडीतील अभ्यासक्रम निवडण्यापेक्षा काही वेगळं करावं अस मला वाटत होतं. मला युनिव्हर्सिटीमध्ये या अभ्यासक्रमाची माहिती मिळाली, ती माहिती आवडली. मला पर्यटन आवडतं. जर मी हा अभ्यासक्रम निवडला तर वेगवेगळ्या क्षेत्रात मला संधी मिळेल असे वाटले म्हणून मी या अभ्यासक्रमाची निवड केली.”

“आपला देश खूप प्राचीन आहे,आपल्या देशाची विविधता केवळ धर्म आणि भाषा किंवा पोशाखात नसून संस्कृती, अन्न, परंपरा यात आहे. ही परिस्थिती आपल्या भारतात पर्यटन वाढवण्यासाठी पोषक आहे पण भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांचे आदरतिथ्य योग्य प्रकारे आणि त्यांना समजेल अशा भाषेत करायला आपण कमी पडतो. आता अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात व्यवसाय करत आहेत साहजिकच त्यांचे प्रतिनिधी येथे व्यवसायानिमीत्त ये-जा करणार ही उत्तम संधी आहे. व्यवसाय मन लावून केला आणि त्यात वैविध्य आणल तर जरूर यश मिळेल. जर मला इंग्रजी व्यतिरिक्त इतर दोन तीन देशांच्या भाषा कामापुरत्या आल्या तरी मी या देशातील पर्यटकांना योग्य आदरतिथ्य देऊ शकेन. मी हा विषय घेतला कारण मला या विषयात आवड आहे.”

“तुला आदरतिथ्य करण्याची आवड आहे तर मग तुझ्या घरी याव लागेल.”  अस मी गंमतीने म्हणालो. ती हसली, मी म्हणालो “मग कुत्रे किंवा मांजरी यांना हे अन्न घालण्याच कस सुचलं?”  ती म्हणाली मला प्राण्यांची आवड आहे. आमच्या घरी मांजर आहे. दोन तीन वर्षांपूर्वी मला कुत्रा चावला पण मी न घाबरता त्यांच्याशी मैत्री केली आता मला कुत्र्यांची भीती वाटत नाही. त्यांची भाषा, नजर मी ओळखते. कुत्रा हा फार प्रेमळ प्राणी आहे. तुम्ही त्याला प्रेमाने कुरवाळले त्याला हिडीस फिडीस केले नाही तरी तो तुम्हाला जीव लावतो.”

तिच्याजवळ सांगण्या सारखे बरेच असावे ती म्हणाली, “असेही बरेचदा आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न शिजवल जात ते संपवले नाही तर कचऱ्यात टाकले जाते. ते फुकट घालवण्यापेक्षा या मुक्या प्राण्यांच्या मुखी लागेल या भावनेने मी हे सूरू केल आणि अजाणतेपणी मी त्यात गुंतत गेले.आता त्या प्राण्यांच्या नजरेत मी प्रतिक्षा पाहते ते माझी वाट पहात असतात. मला पाहिले की आनंदाने उड्या मारतात. तो आनंद मलाही होतो. शक्य असेल तो पर्यंत मी हे सूरू ठेवेन. पूढचे मलाही माहीत नाही. मला  कुठे नोकरी मिळेल ते माहिती नाही मात्र गेल्या वर्षभरात मला प्राण्यांचं मानसशास्त्र थोडबहुत कळू लागलय अस मी समजते. कदाचित याचा उपयोग मला पुढील काळात होईलही.”

मी विचारलं “म्हणजे नक्की तुला काय म्हणायचे आहे?” तेव्हा ती म्हणाली, “प्राणी आजारी असले, नाराज असले किंवा त्यांना मानसिक त्रास होत असला तरी ते सांगू शकत नाहीत पण सरावाने आणि त्यांच्या सपर्कात राहिल्याने ते कळू शकते.” 

मी कुठेतरी या बाबत लेख वाचला होता. प्राण्यांचे मानसिक शास्त्र हे नक्कीच गुंतागुंतीचे असते, पण प्राण्यांची तुम्ही काळजी घेतली तर ते तुमची नक्कीच काळजी घेतील, तुमचे रक्षणही करतील. मला माहित होते, सामान्यता कुत्रा आणि मांजर यांच शत्रुत्व जाहीर आणि ते एकत्र जेवल्याचे उदाहरण तसे दुर्मीळ परंतू निकिता या प्राण्यांना एका डिशमध्ये दुध भात देत होती आणि हे प्राणी तो दुधभात न भांडता, एकमेकांना समजून घेत गुण्यागोविंदाने खात होती. त्या प्राण्यांना जेवण देताना ती  उजवे डावे असे काही करत नव्हती.

अज्जलिस्थानि पुष्पाणि वासयन्ति करद्वयम् |
अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयो: समा || 

असेच तीचे जीवन सुगंधित झाले आहे. 

प्राण्यांमध्ये हे सौहार्दपूर्ण नातं निर्माण करण्यात निकीताचा मोठा वाटा आहे. समाजातील तेढ कमी करण्यासाठी या कलेचा आणि उमद्या व्यक्तिमत्वाचा भविष्यात ती नक्कीच फायदा करू शकेल. तिला भविष्यातील तिच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “हॉस्पिटॅलिटी

 1. अब्दुल रहीम
  अब्दुल रहीम says:

  मुकी जनावरे काहीच सांगू शकत नाही. म्हणून मनुष्यने त्यांच्या भावनांच आदर करावा व आपुल्किने वागव. त्या दोन बहिनिसारखे लोक आहेत जे सर्व मुक्क्या जनवरनशी आपुल्किने वगतत. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी..
  खुप चांगला ब्लॉग लिहिला आहे सर..????

 2. Kocharekar mangesh
  Kocharekar mangesh says:

  Thanks for your complements .

Comments are closed.