आई, गुरु, कल्पतरू
आई या शब्दाभोवती गुंफलं होतं तुमचंमाझं बालपणी जग
मला मोठं करताना, केला त्याग, सोसले कष्ट, सोसली धग
नऊ महिने गर्भाचे जतन, तिच्या रक्तावरच माझं पोषण
मी सुखरूप आहे ना, पाहण्याची धडपड, तिथंच तिचं मन
मला कळत नव्हतं तेव्हा पासून अंगावर पाजलं तिने अमृत
दृष्ट लागेल म्हणून तीट, माझ्या भोवती तिच्या प्रेमाचं भूत
हाताचा पाळणा, पदराचा वारा, तिच्या नजरेत प्रेमाच्या धारा
फारच हट्ट करू लागलो तर, पुरे तिच्या क्रुद्ध नजरेचा इशारा
स्नान घालतांना तिच्या हाताचा परीसस्पर्श मी अनुभवावा
स्वर्गसुख काय असावे, मला नेहमीच वाटे माझा हेवा
माझ्या सुखासाठी तिने दिवा लावून देवाला नित्य हात जोडावा
रडलो, आजारी पडलो, अस्वस्थ दिसलो तरी तिनेच करावा धावा
माझ्या हातानं तिनेच गिरवले पाटीवर “श्री” पाठीवर तिचा दुसरा हात
आईचं प्रेम हेच आमचे टॉनिक, तिचीच शिकवण करी संकटावर मात
माझ्या प्रगतीचा ध्यास म्हणून निरक्षर असूनही घेतला तिने अभ्यास
माझे फुलणे हाच तिचा श्वास, तिच्या कृती, नीती, युक्तीवर माझा विश्वास
कष्टाशिवाय नाही उपाय, कष्टाने सर्व काही साध्य, ही तिची शिकवण
तिच्या अनुभवाची शिदोरी मोठी, संकल्प, जिद्द, मेहनत हेच तिचे धन
आई या नावातच आहे आत्माचा हुंकार, न पाहिलेल्या ईश्वराचा संचार
आई नाही फक्त जननी, ती कल्पतरु, गुरू साक्षात ईश्वराचा अवतार
गुरुपौर्णिमेला आपण करतो गुरूला वंदन, नित्य का नये स्मरू?
आईने दिला, विश्वास, ज्ञान, अभिमान, कर्तव्याची जाण, आई कल्पतरू