आम्ही मायबोलीचे भक्त
माझ्या मराठी भाषेचे कौतुक वर्षातून एकदाच आम्ही भक्त
व्यासपीठ हवे आम्हाला त्यासाठीच आम्ही नित्य आगतिक
नाट्यातून ती सजते धजते, काव्यातून होतसे सहजची व्यक्त
सौंदर्य तिचे अन पदलालित्य, कधी छंदात आनंदी तर कधी मुक्त
‘वीर’रसाने येई स्फूर्ती, ‘भयानकाने’ पाय लटपटती, तर ती कधी ‘शांत’
चषक ‘अद्भुत’ रसाने भरला, ‘हासे’ कधी ती कधी ‘विलापे’ करूण रसात
तिच्या ठायी विविध ‘शब्द’,’अर्थालंकार’, ‘अनुप्रास’, ‘यमक’ गमे मनात
‘श्र्लेषाचा’ बहुरूपी स्वभाव, ‘उपमा’, ‘रूपक’, ‘अतिशयोक्ती’ बाण तिच्या भात्यात
भाषेतील शब्दांचे माधुर्य लिहून कृतकृत्य झाले कितिक साधूसंत
आम्ही करंटे परकीय भाषा उचलली, मायबोलीशी घेऊनी फारकत
बालवयात कशासाठी दोन भाषा? सक्तीने का होता येईल व्यक्त?
कुठे हरवली मुलांची पाटी कळेला? मायबोलीचा नको घरीच अस्त
आई शब्द मनाचा हुंकार ‘ई’ ईश्वराचा सहज उच्चारण त्यात असे ममत्व
कशास जागर डॅड, मॉमचा? धमन्यातून सळसळे तुमच्या मराठी रक्त
कित्येक रसांची जननी, ऐश्वर्यगामिनी, भाग्योदय तिचा या मुलकात
कुठे अहीराणी, कुठे मालवणी, सातारी, कुठे वऱ्हाडी, वास दशदिशात
लेहजा भाषेचा ऐकून आनंदी, हासे कोणी आडुन आडुनी पुण्यवंत
खटका, फटका, सवाल-जवाब, शाहिरी रंगते, कुणी रमे शांत भजनात
Baba black ship जरूर शिकवा परी मुलांना ठेऊ भाषेशी अनुरत
मराठीत भरले विपुल वाड्मय ज्ञान लालसा भागविण्यास माय सशक्त
आम्ही मायबोलीचे भक्त, मराठी संपेल असा कशास करू आकांत?
अंगाखांद्यावर तिच्या वैभवाच्या खुणा, खेळ, स्वभाव, विपुल साहित्य
ज्ञानदेवाची, तुक्याची, नामदेव अन सावत्याची वाणी पैजे जिंकी अमृत
सार कथे जीवनाचे बहिणाई, तिच्या ग्राम्य भाषेचे काय वर्णावे सामर्थ्य?