ही कसली निवडणूक?

ही कसली निवडणूक?

कुणाचाच पायपोस नसणारी ही कसली निवडणूक?
ही तर चक्क मतदारांच्या हक्काची बंदिस्त अडवणूक

काल तोच गळा काढून सत्ताधीशांवर करत होता टीका
तोच त्यांच्या रॅलीत पक्षचिन्ह मिरवत आघाडीवर आता

राजकारण दहा पुरुषांची रखेल, कोणापुढेही कसेही नाचा
सत्ता आणि पैसे मिळवण्याच्या, त्यांना ठाऊक खाचाखोचा

ज्यांनी चार महिन्यांपूर्वी भर सभेत उतरवली नेत्याची लक्तरे
तोच त्याच्या विरोधकांना देतोय तोंड वर करत खोटी उत्तरे

ठरावा तुम्हीच, बेशरम नेत्यांना आहे का मनाची लाज?
दर पाच वर्षांनी नवा पक्ष, भ्रष्टसत्ता, यांचा उतरवा माज

महानगरपालिका होती कोणाच्या ताब्यात, कोणाला ठेका?
एकाएका वार्डाचा वतनदार, वार्डाला नगरसेवकाचा धोका

बिचारा मतदार त्याला कुणीही हाका, कुठेही, कसेही ठोका
त्याचा नेताच म्हणतो मी बदलला नेतृत्वाचा जुना ढाचा

हसाव! रडावं! की हसता हसता रडून मग शांत झोपावं?
कालचे चिन्ह आज गायब कळेना काय लक्षात ठेवावं?

इथे प्रत्येक नेता लढण्यास तयार उद्याच जुळवून गणित
कोणा मायच्या लालाचं अडलंय, का जपेल तुमचं हित?

यांना अधुनमधून आठवते मराठी अस्मिता, येतो तिचा पुळका
यांची देहबोली काय सांगते? पुन्हा व्हा सावध ओळखून धोका

काहींनी स्वतःच स्वत्व विकलंय, टेकवतात सत्तेपुढे माथा
त्यांना ठाऊक मिळेल ते लाटावे, या गाढवांपूढे का वाचावी गीता?

मतदार हो उगाचच यांच्या मागे फिरत ‘आमची मुंबई म्हणू नका’
सोन्याची अंडी देणारी कोंबडी आंदण म्हणून का देऊन टाका?

तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल कोणाची आहे स्वच्छ प्रतिमा?
तुम्हीच विचारांती ठरवा अडचणीत कोण येईल तुमच्या कामा?

दिलेली आश्वासने पाळतच नाहीत त्यांना खोल खोल गाडा
किमान ‘मी’ भ्रष्टाचार खपवून घेणार नाही इतका उचला विडा

चांगले विचार, चांगले संस्कार अशा तरुण पिढीशी नाते जोडा
द्या त्यांना नेतृत्वाची संधी मतदानच नको हा अभद्र विचार सोडा

हा आहे सामान्य मतदारांचा काही असामान्य मिळवण्याचा लढा
पारखून घ्या तुमचा नगरसेवक, भविष्य उज्वल करेल तो निवडा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar