जाग आली भावनांना मन आले फुलून
आला वारा भरारत गंध श्वासात घेऊन
फुल पाखरे नाचती गंध पेरती पेरती
त्यांना पाहुनी आनंदी फुले गोजिरे हसती

मध पिऊनी फुलपाखरांना आली नकळत झिंग
उतरती धरेवरी अलगद, किती तालेवार ते रंग
शालू पाचूचा नेसली ही धरा, त्याचा पुरवी व्यासंग
त्यांच्या नाजूक स्पर्शाने धरित्रीचे शहारले अंग

नेत्रा वाटे समाधान सुख पापण्यात बंद
कशी नटली ही धरा जसे रांगोळीचे रंग
रवी अस्ताचा हा लाल, त्याचे पडे नदीत प्रतिबिंब
प्रभा फाकली सर्वत्र, प्रसन्न संध्या, मन बेहोशित दंग

धडधड होई काळजात तो हसे शांत गालात
हात घट्ट त्याच्या हाती फुले प्रिती एकांतात
नुरे वेळेचे ते भान, रंगे मन त्याच्या मिलनात
सूर्य अस्ताला नकळत गेला, उतरुन आली रात

गूढ सांजवली सांज, गेली पाखरे झोपाया
तो बनला धीट अधीर, मला जवळ घ्याया
त्या कातर वेळी, गुलबक्षीसम बहरले प्रेम
आला चांद गगनात “तो” लाजुनी म्हणे धन्य

Tags:

1 Comment

Comments are closed.