आपण गोष्ट ऐकतो, वर्षानुवर्षे ऐकत आलो, सांगत आलो. एक मुलगा आपल्या बायकोला खुश करण्यासाठी आईचं काळीज मागतो. ती प्रेमळ आई, वात्सल्याचं प्रतीक असणारी आई, मुलाच्या आनंदासाठी आपल काळीज काढून देते. तो मुलगा आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी ते काळीज घेऊन त्वरेने निघतो. अचानक त्याला ठेच लागते आणि तो धडपडतो,काळीज हातातून खाली पडतं, पण त्यातला आईचा जीव मुलाला विचारतो,”बाळा तुला कुठे लागलं तर नाही ना?”

ही पारंपरिक कथा. या कथेकडे, तिच्या भावार्थाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असू शकेल, परंतू एखादी स्त्री लग्न करून आल्यानंतर जेव्हा प्रथम कुणाचीतरी पत्नी होते तेव्हा तिच्यात एका दिवसात अमुलाग्र होणारे बदल हे कोणत्या शारीरिक रसायनाने होत असावेत ते एक गूढ आहे अस म्हटल्यास वावग ठरु नये. जेव्हा ती पत्नी म्हणून जगत असते तिच्या निष्ठा तिचे प्रेम हे त्या सात पवित्र विवाह रज्जूनी बांधले जाते मजबूत होते.

अशी कोणती शक्ती,अशी कोणती प्रेरणा त्या संस्कारात असते की ती पत्नीच्या नात्यात शिरताना समर्पण कुणीही न शिकवता शिकते. कालांतराने जेव्हा तीला आपण आई होणार असे कळते तेव्हा चेहऱ्यावर येणारे लज्जेचे भाव आणि आई म्हणून पोटी गर्भ वाढवतानाची उत्सुकता असे नकळत घडून येणारे बदल हे कोडंच आहे. म्हणून आईला समजून घेणे तितके सोप्पे नाही.

जेव्हा ती बाळाला जन्म देते तेव्हा तीच्या स्तनात निर्माण होणारे अमृतमय दूध हा निसर्गाचा न उलगडणारा आविष्कार म्हणावा लागेल. बाळ जन्माला येताना होणाऱ्या वेदना ती हसत हसत सहन करते कारण तिला माहीत असते की ती एक नवीन जीव या पृथ्वीवर आणत आहे. मातृत्व ही स्त्रीला निसर्गाने  बहाल केलेली अमूल्य देणगी आहे. हे मातृत्वाचे गोडवे गाताना माझ्या समोर आई या शब्दात काय ताकद आहे त्याचे उदाहरण आहे. ही काही कथा नाही आपण पाहतो की जर घार, ससाणा, किंवा अन्य पक्षी कोंबडीच्या पिल्लावर झडप घालायला आला तर कोंबडी आपल्या पंखाखाली पिल्लांना घेते आणि विशिष्ट आवाज काढून सावध करत सुरक्षित ठिकाणी पळण्याचा किंवा लपण्याचा प्रयत्न करते.

आमच्या घरी चंपी नावाची कुत्री आहे तीला जेव्हा पिल्ले झाली तेव्हा ती त्यांची राखण करत बसून राही. विशेष म्हणजे जोपर्यंत पिल्ले सक्षम नव्हती ती तोंडात धरून घास आणत असे आणि पिल्लांना भरवत असे. आपण अर्धपोटी राहून पिल्लांची काळजी घेणारी चंपी हा प्राण्यांच्या अंगी असलेला आईचा सात्विक गूण आहे. कालांतराने तिची पिल्ले मोठी झाली. त्यापैकी एक पिल्लू कोणीतरी घेऊन गेले दुसरे आमच्याकडे राहिले ते लाल रंगाचे म्हणून आम्ही त्याच नामकरण “लाल्या” असे केले. सांगायचे म्हणजे हा लाल्या अतिशय हावरट आपल्या समोरचे पटापट खाऊन चंपी समोरचे खायला सज्ज. गमतीशीर बाब म्हणजे मातृत्वाचा वसा घेतलेली चंपी लाल्या तिच्या पूढ्यातलं खात असताना निमूट बाजूस बसून राहते, हे मातृत्वाचे धडे कोणी दिले? कोठून ती शिकली हाच तो आई ह्या शब्दातील चमत्कार. 

ज्या वेळेस घरात पंगत बसते आणि एखाद्या चांगला झालेला पदार्थ आई आग्रह करुन वाढते असे किती नवरे आणि मुल आहेत जे मनापासून आपल्या आईसाठी काही शिल्लक राहिले आहे की नाही याचा विचार करूनच आवडणारा पदार्थ होरपतात? आणि या उलट एखाद्या पदार्थ खारट झाला किंवा चांगला झाला नाही तर असे किती जण आहेत की हा पदार्थ त्या माऊलीला एकटीला खावा लागू नये म्हणेन आवडला नाही तरी मुद्दाम मागून संपवतात. मिंत्रानो, आई मुलांना आणि नवऱ्याला वाढताना हा कधीच विचार करत नाही की मला उरेल की नाही याउलट पदार्थ सर्वांना आवडला यातच ती सूखी असते.

म्हणून आईतील मातृत्वाचा आदर करा तिला आनंद द्या. सुख देता येत नसेल, देता आले नाही तरी दुःख देऊ नका. तिच्या मतांचा आदर करा. ती अशिक्षित असली तरी तिच्या अनुभवाची शाळा खूप व्यापक आहे म्हणून तिचे म्हणणे शांत ऐका. आई जवळ असे पर्यंत कुणालाच तिची किंमत कळत नाही, पण नसेल तेव्हा मात्र आईची आठवण पदोपदी येते. ती गेल्यावर फोटो लावून त्याला हार लावून अगरबत्ती दाखवण्यापेक्षा ती असतांना तिचा सन्मान करा प्रेम द्या. लग्न झाले की मुले आईचे वात्सल्य विसरून जातात. पत्नीला प्रेम देताना आईचा तिरस्कार करा असे कोणतेही शास्त्र शिकवत नाही. आईची जागा हृदयात आहे की नाही ते तुम्ही ठरवा पण तिची जागा आश्रमात नसावी हे नक्की लक्षात ठेवा. ज्याला आपली आई समजली नाही जो आईला प्रेम, सन्मान देऊ शकला नाही तो सुशिक्षित असो की अशिक्षित त्याच्या असण्याला काही अर्थ नाही. प्रेमात इतकं अंध बनू नका की आई दिसणार नाही.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे म्हणू नका स्वतः भिकारी बनण्यापूर्वी सावध व्हा.

प्रेमा स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई
मी देव पाहतो तिच्या, प्रेमात ठाई ठाई।

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *