अंगण फुलांचे कोंदण
मोगरीच्या गंधाचा दरवळ अजूनही माझ्या भाबड्या मनात
प्राजक्ताचा सडा अंगणी भिजे पहाटेच्या मृदू चिंब दवात
लिली, चमेली, मोगरा, बट शेवंती, परसदार माझे छान सजवी
निशिगंधाचे धुंद रान, गंधित श्वास, रोमांच मन मनात फुलवी
रूसून बसली बकुळ बिचारी, बहर ना आला तीच्या जीवनी
ऐश्वर्याचे लेणे लेवून ब्रम्हकमळ, गज थाटात झुले, फुले अंगणी
कुंपणावरती गोकर्ण फुलतो, नाजुक काया हवेवरी विहरतो
वा-या संगे हलतो, डुलतो, शुभ्र, जांभळा प्रत्येकाच्या मनात भरतो
रानकेवडा किती दूर पसरला, सळसळे वारा त्यातून उफाडा
धुंदावत येई सांज, आसमंती भरे गंध, रानात रोमांच, फुले केवडा
जाई जुईचा मांडव अंगणी, तुळशीवृंदावनाचा त्याला आधार
कुंपणाचा सोनचाफा एकाकी, त्याला ना सोबत दाटता अंधार
विहिरी वरची वाट अडवून थबकला, गावरान चौफेर गुलाब
गंध दरवळे मंद मंद, रंग पाहून भुलावे त्याची वेगळी राखावी आब
तेरड्याचे रंग कितीक निराळे धवल, केशरी, तांबडे, निळे, जांभळे
विहरतो राजबिंडा हंस, शीतल तळ्यात, फुलली शुभ्र, निळी कमळे
असा नक्षत्रांचा थाट, मांडे भगवंत, माझ्या कोकणच्या भुमीत
घ्यावे लुटून, नित्य देऊन जल, माझ्या तांबडीचा, श्रीमंती थाट