अखंड लीला

अखंड लीला

अखंड लीला तुझी प्रभू रे, मानव जातीवरती
सुखदुःखाच्या वाटेवरती, तू आमचा सांगाती

तुच पेलशी त्रिभुवन सारे, तुझ्याच शिरावरती
तुच टांगला दीप उषेचा, पूर्वेला क्षितिजावरती
आज्ञेने तव सूर्यचंद्र हे, तम हटविण्या नित्य फिरती
करून योजना गूढ निशेची, थकल्या जीवा मांडीवर घेशी

तुझी कृपा गिरीशिखरावर, मेघ तुलाच आळवती
चरण धुतसे वरूण तुझे, सरिता धावे सागर तटी
तव स्नेहाची नजर धरेवर, सजीव अखंड अनुभवती
येता शरण भक्त चरणी, तूच पुरविशी त्यांना शक्ती

तुझ्या लीलेने तरू वेली, फुलाफळांनी ऋतूत सजती
तव प्रसादे हरित तृणानी, हसत राही कोमल धरती
रंग उधळता फुलपाखरे, आनंदात रानी बागडती
तुच दिला रे गंध फुलांना म्हणून, अखंड ती दरवळती

तुच दिला रे कंठ खगांना, वृक्षावर धून किलबिलती
तुच शिकावशी सर्व खगांना बांधावी कशी, उंचावरती घरटी
तुच निर्मिशी अखंड धरेवर दाणा गोटा, त्यांच्या स्नेहापोटी
तुझ्याच कृपचे बळ म्हणून पंख पसरून, नभातून ती विहरती

तव आशिष लाभता भक्ता, संतमहात्मे उध्दरती
तव कृपेची शिकवण म्हणूनी, त्यागाची शिकवण देती
आशीच अखंड राहो कृपा प्रभू, अवघ्या विश्वावरती
माय बाप तू सकल जनांचा मी नतमस्तक तव चरणावरती

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar