अधिकार भाग 1

अधिकार भाग 1

मी या व्यवस्थेत कधी माहीर झालो मला कळलेच नाही, पण आता परतीचा रस्ताच नव्हता, माझ्यावर कोणत्या IPC section अंतर्गत  कारवाई होणार ते सरकारी अभियोगी पक्षाने निश्चित केले नसले तरी, खोटी शपथ घेणे-198, षडयंत्र-320, हल्ला-351, हत्त्येचा प्रयत्न-307, हत्या-302, फसवणूक-415, कपट-420 आणि अजून कोणती कलमे लावली तरी ती कमीच ठरतील. जोपर्यंत मी त्यांच्या कामाचा होतो आणि बिनबोभाट त्यांच्यासाठी काम करत होतो तो पर्यंत कोणत्याच कलमाची आणि अर्थात शिक्षेची मला भीती नव्हती कारण पुरावा नष्ट करण्याचे माझे कौशल्य. शिवाय ज्यांच्या आदेशाचे पालन करत मी हे गुन्हे केले त्यांना स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. मी कधीच गुन्हा करतांना सापडणार नाही, किंवा सापडलो तरी ते सहीसलामत ते सुटका करतील याची खात्री त्यांनी दिली होती. त्यांच्या शब्दाला वजन होते. त्यांचा पक्ष आणि ते सत्तेत असो वा नसो त्यांचा शब्द कोणी खाली पाडणार नाही असा विश्वास मला होता. अनेकदा त्यांनी मला वाचवले होते.साहेबांवर माझा पूर्ण भरोसा होता.

माझे काम फक्त त्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे एवढेच होते. माझ्या कामात माझ्या वरिष्ठांचा हस्तक्षेप होणार नाही याची हमी मला मिळाली होती म्हणूनच प्रत्येक वेळेस वरिष्ठांची अनुमती मागण्याच्या फंदात मी पडत नव्हतो.अर्थात यामुळेच वरीष्ठ माझ्यावर खूश नव्हते आणि संधी मिळाली तर माझा डाव उलटवायला मागे पूढे पाहणार नव्हते. साहेबांनी आमचे संबंध कधी जाहीर केले नाहीत. एका विशिष्ट नंबरवरून ते मला कॉल करत. मी त्यांना फोन करण्याचा प्रश्न नव्हता. वरिष्ठांना त्यांनी माझ्या बाबत सूचना दिल्या असाव्या म्हणून वरिष्ठ ही माझ्या कामात नाक खुपसत नव्हते, या मुळेच इतर स्टाफ मला वचकून होता. माझे सुपीक डोके आणि त्यांची हुकूमत याच्या जोरावर त्यांचा हा असा व्यवसाय आणि राजकारण बिनघोर सूरू होते.

माझ्या अध:पतनाची सुरवात कशी झाली ते नीट आठवत नाही मात्र एक मोठी कामगिरी पार पाडल्यानंतर मी थकवा घालवावा म्हणून त्या अलिशान सुटमध्ये थांबलो होतो तेव्हा माझ्या गॉड फादर सोबत ती प्रथम तिथे आली.

“सोनी”, अर्थात ते तिचं खर नाव, की खोट कळायला मार्ग नव्हता. अतिशय देखणी साडेपाच फूट उंची, अपऱ्या नाकाची, लांब सडक बोटे,गालावर तीळ आणि मादक निळे डोळे. तिने कटाक्ष टाकला तरी माणूस घायाळ होईल अशी नजर, उंची साडी,बोटात हिऱ्याची अंगठी,हातात ब्रेसलेट, कानात मोत्याचे इअर रिंग. केसांचा बॉब त्यामुळे ती शो रूम मधल्या पुतळ्या प्रमाणे दिसायची. खानदानी श्रीमंत वाटत होती. तिथेच साहेबांनी  माझी ओळख करून दिली,त्यानंतर तिची अनेकदा भेट झाली कधी ठरवून कधी अचानक आणि प्रत्येक वेळेस ती जास्तच सुंदर,जास्तच मोहक दिसू लागली. हवीहवीशी वाटू लागली.

“डार्लिंग प्लीज,थोडा रूको ना.”अस म्हणत ती लाडेलाडे गळ्यात हात घालायची आणि मी स्वतःला विसरून जायचो. तिच्या त्या मदहोश नखरेल चाळ्याने वेडा व्हायचो आणि भुंगा जसा स्वतःला कमळाच्या फुलात कोंडून घेतो तस तिच्या बाहुपाशात पडून रहायचो.ती धूंदी संपली की सगळी नशा उतरून जायची आणि वास्तव समोर दिसायचं.

ती नक्की कोणाची कोण? आणि कोणासाठी  काय काम? करते हे कधीच तिने सांगितले नाही. तिच्या मादक नजरेने  माझा कब्जा घेतला, तेव्हा मी विवाहित होतो,दोन मुलांचा बाप, पण तिची ओढ मला शांत बसू देत नव्हती. माझ्या बॉसचे आणि तिचे संबंध कसे असावेत हे समजायला ज्योतिष्याची गरज नव्हती तरीही तिच्या सहवासासाठी काय वाट्टेल ते करायला मी तयार होतो. ती चतुर होती तिने माझ्या नजरेतली तडफड, हाव ओळखली आणि मला नजरेनेच पागल करून टाकले.जर साहेबांनी ठरवलं तर याच गोष्टीसाठी त्यांनी मला या जगातून दूर केलं असत पण साहेबांना अशा सतराशे छप्पन मुली ठाऊक होत्या.

कोणत्याही एका मुली बरोबर ते फार काळ रिलेशन ठेवत नसत. तशी त्यांना गरजही नव्हती, सुरवंट स्वतः हून आत्महत्या करायला दिव्यावर झेप घेत. पण साहेबांच्या सानिध्यात त्या सुरवंटाच फुलपाखरू कधी झालं ते त्यालाही कळत नसे. तिने मला काय सुख दिले ते कोडच होत पण मी तिच्यावर किती पैसे खर्च केले त्याला मोजदाद नव्हती.

किती प्रेझेंट तिने माझ्याकडून वसूल केले आणि कितींदा तिच्या वाढदिवसाची पार्टी माझ्या पैशांनी एंजॉय केली ते तिलाच ठाऊक. क्षणिक सुखासाठी मी  माझं आयुष्य नष्ट करत होतो अस मला राहून राहून वाटत होतं. तरीही तिच्यापासून मी दूर जाऊ शकत नव्हतो.ती माझी एकट्याची असा माझा गैरसमज नव्हता पण तिच्यावर मी पाळत ठेवली तेव्हा  लक्षात आलं की माझी माहिती ती कोणाला तरी पुरवत असावी. तिची उठबस मंत्र्या पासून ते मोठं मोठ्या उद्योगपती पर्यंत होती.  ती पक्की व्यावसायिक होती. लोकांची गुपितं मिळवण्यात अतिशय माहीर होती. लोकांना त्यांच्या बिझनेसमध्ये Contract मिळवण्यासाठी ती मदत करत असे. आपल्या गोड आवाजात ती समोरच्या माणसाला जखडून ठेवी. मासा जाळ्यात फसला की त्याच्याकडून काम करुन  घेईपर्यंत त्याला  सोडत नसे. 

सोनीने मला वारेमाप लुटलं,जर माझ्या पगार खात्याच क्रेडीट कार्ड माझ्या बायकोकडे नसत तर मी कंगाल झालो असतो.जेव्हा मी तिच्या पासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागलो तेव्हा ती कोणा दुसऱ्यासाठी काम करत होती हे लक्षात आलं. माझ्या बऱ्याच गोष्टी आणि मी कुणासाठी काम करतो ते तिला समजलं होत. गंमत म्हणजे आज पर्यंत तिने कोणाचेच नाव किंवा गुपित, उघड केलं नव्हतं पण तस ती करणार नाही याची खात्री नव्हती. साहेबांना हे प्रकरण कळाले तेव्हा  म्हणाले,” अभय  हे प्रकरण तुला  जड जाईल.ती बारा गावच पाणी पिऊन तयार झालेली वाघीण आहे. झाली तेवढी मौज पूरे आहे. तुझा कुणी गेम करण्यापूर्वी..”

मला इशारा कळला, मोठ्या प्रेझेंटच अमिष दाखवून मी तीला लोणावळ्याला घेऊन गेलो, गाडीही तिचीच होती. मी बेसावध आहे  समजून तिने मलाच संपवण्यासाठी ड्रिंकमध्ये poision टाकले,ते माझ्या नजरेस दिसले. अर्थात हा माझ्या साहेबांनी माझ्यासाठी रचलेला सापळा होता की कसे ? ते त्यांनाच ठाऊक. आपल्या बुध्दीच्या पलिकडच्या गोष्टी साहेब चालता चालता करत.गोष्ट घडून गेल्यावर साहेबांशी तिचा संबंध जोडला जाई पण पुरावा नसल्याने साहेब कधीच गोत्यात येत नसत.

केसाने माझा गळा कापायचा तिचा विचार होता. तो तिच्या मुर्खपणामुळे फसला. नाईलाज म्हणून मी तिला संपवलं. तिने आमची माहिती कुणाला पोचवली असावी असा मला दाट  संशय होता. अर्थात तो खरा नव्हता हे समजलं तेव्हा तिला संपवलं त्याच दुःखच झालं.पण तसही ती मला संपवण्याचा प्रयत्न करतच होती.

या पूर्वी मी अनेक गुन्हेगारांना यमसदनी धाडले तेव्हा ती काळाची गरज होती शहरातील गुंडगिरी आणि दहशत संपवणे गरजेचे होते. खंडणी, दरोडे,हप्ते वसुली आणि त्यामुळे दोन गटात होणारी धुमश्चक्री या गोष्टी प्रत्येक एरियात घडत होत्या. बिल्डर, मोठे व्यवसायिक, सोन्याची दुकाने यांचे मालक  त्रासले होते. गृहमंत्री यांच्यावर वर्तमान पत्र आणि मिडिया यावरून टीका होत होती. म्हणूनच त्यानी गृह सचिव यांना तोंडी आदेश देऊन चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पाठवण्याची सूचना केली होती. माझे नाव कोणी सुचवले ते ईश्वराला ठाऊक. पण कदाचित माझे सोलापूर येथील सहकारी किंवा त्यांचे वरिष्ठ यांच्याकडून कळले असावे असा दाट संशय आहे.

माझी त्यांच्याशी  भेट झाली तेव्हा त्यांनी मी या खात्यात का आलो अशी विचारणा केली आणि मी त्यांना खरे ते उत्तर दिले. त्यांनी दुसरा प्रश्न माझा पूर्वानुभव कसा आहे असे विचारले आणि मी सत्य तेच सांगितले. ते ऐकून ते थोडे विचारात पडले, “तुमच्या हाती महत्त्वाचे काम दिले तर तुम्हाला हे काम जमेल का?” मी विश्वासाने म्हणालो, “कोणी हस्तक्षेप केला नाही तर नक्की जमेल.” माझे उत्तर ऐकून ते म्हणाले, “ठीक आहे, तुम्ही पुढच्या एक तारखेस या, इथे जॉईन व्हा, शर्मा तुमचे सिनियर असले तरी तुम्ही मला रिपोर्ट कराल.”, माझ्यासाठी तो आदेश म्हणजे आव्हान होते. मी पळून जाणाऱ्या अधिकारी वर्गातील नव्हतो. त्यांनी हात पुढे केला मी तो स्वीकारला.

शहरात पसरलेली दहशत संपवावी, म्हणूनच त्यांनी मला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यदिले होते.त्यांचे आव्हान मी स्वीकारले.माझी कार्य पद्धती मी ठरवली. या शहारातील सर्वच  पोलिस अधिकारी माझ्या  परिचयाचे नव्हते.ती माहिती मिळवायला मला एक  महिना लागला. या कामी खबरी गाठणे आवश्यक होते.पैसे खर्च केल्याशिवाय ते शक्य नव्हते. अक्काकडे ठेवलेल्या पैश्याचा यासाठी मी वापर केला. तसेही हे पैसे माझे नव्हते. पण अखेर मी माझी पांच माणसाची  टीम तयार करण्यात यशस्वी ठरलो. या टीमला माझ्या व्यतिरिक्त कोणीही आदेश देणार नव्हते, यांच्या येण्याजाण्यावर बंधन नव्हते,ते चोवीस तास माझ्या संपर्कात असणार होते.

पुढच्या पंधरा दिवसातच आम्ही एक खंडणी बहाद्दर गजाआड केला. अर्थात त्याच्यावर रीतसर केस फाईल करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस अधिकारी पहाणार होता. आम्ही शक्य तो कोर्ट कचेरी यांच्या कार्यकक्षेत न येता या गोष्टी जलद गतीने संपवण्याच्या प्रयत्नात होतो.

आठ दिवसांनी आम्ही एका शूटर भाईचा खात्मा केला आणि पहिल्यांदा मीडियाने त्याची स्टोरी केली. या बाबत कितीही गुप्तता राखण्याचा प्रयत्न केला तरी पत्रकारांना वास आला. मीडियाने बराच प्रयत्न करूनही मी नवीन असल्याने  त्यांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरलो.

अनेकदा आम्ही, वरळी, जुहू, गोराई, मढ आयलंड या ठिकाणी डिस्को क्लब आणि बारवर छापे मारले. मढ आयलंड येथे एक डिस्को क्लबमध्ये लहान वयाच्या  दोन तीन  मुली अश्लील चाळे करत मद्य देत होत्या. येणारे ग्राहक त्या फुलणाऱ्या कळ्याना गोंजारण्यासाठी पागल होत. ते हिडीस चाळे मी पाहिले.आम्ही त्यांना महिला सुधारगृहात पाठवले. माझ्या परिने माझे प्रयत्न सुरू होते.अर्थात काही मुली ह्या विनासायास मिळणाऱ्या पैश्यासाठी पुन्हा, पुन्हा त्याच व्यवसायाकडे वळत असल्यासाचे मी पाहिले होते.

जेव्हा आम्ही जे कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत अशा लोकांचा समाचार घ्यायला सुरवात केली. आमचं घरी जाण्याच सूत्र बदललं. कधी घर सोडावं लागेल याला वेळेचं बंधन उरले नाही आणि यामुळेच मीरा आणि माझ्यातील भांडणे वाढली.

गेल्या काही वर्षांत माझ्यावरील कामाचा ताण इतका वाढला की माझ घरी जाण अनियमित झालं. मी घरी कधी असेन हे मलाच सांगण अवघड झाल.  माझ्या लग्नापूर्वीची गोष्ट, आई बाबा माझ्या ह्या अनियमित घरी जाण्याला इतके कंटाळा की तू तिथेच का राहात नाहीस , तुझं बाहेर कुणाशी काही आहे का? स्पष्ट सांग तरी, अस म्हणाले. प्रयत्न करूनही मी लग्नाबद्दल काही स्पष्ट सांगत नाही हे पाहून त्यांनी आक्काला माझे कान उपटायला सांगितलं. एव्हाना माझे कारनामे आक्काच्या कानावर आले असावे.माझ्या वागण्यावर अंकुश यावा म्हणून आक्काने माझं लग्न उरकण्याचा चंग बांधला होता, त्यानुसार तिने दर दोन तीन दिवसांनी whatsapp वर फोटो पाठवण्याचा सपाटा सुरू केला.आठवड्या भरात पाच सहा फोटो तिने पाठवले पण एकही मनात भरेना, खर तर या धकधकीत लग्न कराव अस मनापासून वाटत नव्हते.

कदाचित माझ्या जीवाची मलाच शास्वती नसावी. शेवटी आक्का रागाने म्हणाली, “आई गेले पंचवीस-तीस वर्ष राबतेच आहे तिला थोड सुख देशील की नाही. मी तुझ्या वागण्याला  कंटाळले, तुझे उद्योग आई बाबाना समजले तर खैर नाही.” मी तिला म्हणालो,”तू पाहतेस ना मी किती बिझी आहे. उद्या घरी वेळ देऊ शकलो नाही तर नवीन कटकट सूरू होईल त्यापेक्षा मी एकटाच आहे ते काय वाईट!”

ती रागावली, “तुझे जे उद्योग चाललेत ते माझ्या कानावर आहेत. जरा स्वतःच्या घरी लक्ष दे.किती वर्ष अजून असाच एकटा राहशील. लग्न झालं त्याला अठरा वर्ष झाली आजही आठवतो तो दिवस ज्या दिवशी मिराची आणि माझी पहिली भेट झाली,

कामावर जातांना मी माझ्या ऑफिसच्या गाडी एवजी बुलेट वरून जात होतो. माझी बुलेट एका स्कूटरवर धडकणार होती, त्या स्कूटरवर बसलेली मुलगी रागाने ओरडली, “ओ मिस्टर लक्ष कुठे आहे? उडवाल की कुणाला,जरा पाहून चालावा गाडी.”  मी तिला सॉरी म्हणालो आणि वाटेला लागलो. त्या नंतर जेव्हा कधी मी बुलेट घेऊन गेलो ती माझ्या वेळेत मला दिसली . पावणे सहा फुट उंच, सफरचंदासारखा तुळतुळीत उजळ चेहरा, निमुळती हनुवटी,टोकदार नाक, माधुरी सारखे डोळे आणि सतेज चेहरा.  ती कधी आवडू लागली तेच कळलं नाही.

मी बोलण्याची संधी शोधत होतो एक दिवस सिग्नलला तिची स्कूटर थांबली तस मी हिम्मत करून तिला हाय ! केल. ती हसली पण काही बोलली नाही. दोन तिन वेळा असा प्रकार घडला शेवटी मनाचा हिय्या करून  नाव विचारले, ती  डोळे स्थिर ठेवत म्हणाली, “ओ मिस्टर ओळख ना पाळख नाव कशाला हव? मी मीरा पवार, फ्रीलान्स रिपोर्टर आहे.आपण कोण मला नाव विचारणारे?” मी तिला माझी ओळख सांंगितली तशी वरमली, म्हणाली,”तुम्हाला वर्दीचा अभिमान आहे की नाही.अस चोरट्या सारख का वावरता?”

मी हसून म्हणालो, “तुमची सूचनाच असेल तर गळ्यात बोर्ड घालतो, “मुंबई पोलीस” ती हसली. निघून गेली.भेटी वाढल्या आधी चोरून आणि नंतर जाहीर आणि आमच लग्न ठरल. आक्का प्रचंड खुश झाली. मुलाची बहिण म्हणून मिरवायला मिळणार होतं, भाचे कंपनी एंजॉय करायला मिळणार म्हणून उत्सुक होती. सासरे नगरसेवक होते. स्वतःची दोन  बिल्डिंग मटेरियल सप्लायची दुकान होती. लग्नात सासरे बुवांनी भरपूर खर्च केला.आम्ही काही सांगण्याचा,मागण्याचि  प्रश्न नव्हता. सरकारी नोकरीत पदावर असणारा जावई अजून काय हवं!”

मीरा दिसायला सुंदर तर होतीच पण जर्नालिझमची डिग्री करून रिपोर्टर म्हणून काम करत होती. ती मिडियात राहिली तर लवकरच आपले तीन तेरा वाजतील याची भिती मनात होती. नशीबाने तिचे क्षेत्र कला,साहित्य, त्यातील घडामोडी असल्याने गुन्हेगारी जगता बाबत तिला पूरेशी माहिती नव्हती. एकांकिका नाटक,चित्रपट विविध बक्षिस सोहळे, सिने तारकांच्या मुलाखती यातच ती बिझी होती.आई बाबांनी शिकलेली मुलगी म्हणून तिचे लाड केले. नोकरी करु दिली. माझ्यापेक्षा ती बिझी असे,आक्का म्हणाली सुध्दा ,”तू लग्न केलं फायदा काय? ना आईला आराम ना आमच्या पाहुणचाराची सोय,पहाव तेव्हा तुझी बायको काहीतरी कव्हर करायला गेलेली असते.”

मी हसलो, “तुलाच तर माझ्या लग्नाची घाई होती ना? आता का तक्रार? अग बर आहे ती बिझी असते ते, नाहीतर तिने माझ डोक खाल्ले असते.” आक्का हसून म्हणाली, “नाहीतरी तू बायकोची बाजू घेणारच, घे बापडा तुला पटतय ना मग प्रश्न संपला.” 

आक्काच्या मुलांना नटनट्यांची आवड, ती कधीतरी भाच्यांना घेऊन शुटींग पहायला नाहीतर पिक्चरच्या प्रिमिअरला जायची.मुलं खुश, पिक्चर थेटरमध्ये येण्यापूर्वी पहायला मिळाला शिवाय हिरोहिरोईनला भेटायला मिळाले. पार्टी मिळाली. बास त्यांच्या जीवाची मुंबई झाली हेच फार झाले.

आम्ही लग्न झाल्यावर काश्मीरला जाऊन आलो मीराची संमती घेऊन सासरे बुवांनी बुकिंग केल होत.एकुलत्या एक मुलीसाठी एवढ करण त्यांना अशक्य नव्हते, ते आठ दिवस कसे गेले ते खरच कळलं नाही. आधीच काश्मीर सारख नयनरम्य ठिकाण पृथ्वीवरचा स्वर्ग, ते दाल लेक आणि तिच्या सौंदर्याची मोहिनी. उंचच उंच वाढलेले देवदार वृक्ष आणि बर्फाचे आच्छादन.दालचा तो नयनरम्य देखावा आणि काश्मिरी नागरीकांच अतिथ्य. गुलमर्ग ची घोड्यावरची रपेट आणि  ऐकमेकांवर उडवलेला बर्फ खूप धम्माल केली.

 ही माणस आतंकवाद्यांना मदत करतात अस सांगूनही खर वाटणार नाही. खूप फिरलो, शरीराची आणि मनाची एकाग्रता पराकोटीला नेणारा मिलोनोत्सव अनुभवला. प्रेमाची झिंग अनुभवली आणि तृप्त मनाने परत आलो.खर तर ती नशा पुन्हा पुन्हा अनुभवावी अस वाटत होतं पण कालचक्र ते आमच नव्हतं. मुंबईला पाय लागले आणि मी भानावर आलो.”अभय वागळे, विसरलात काय?ही स्वप्न नगरी नाही, ही तुमची कर्मभूमी, मन म्हणाल. Return to pavilion.

क्रमशः

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “अधिकार भाग 1

  1. अधिकार भाग 2 - प रि व र्त न

    […] भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. […]

  2. अधिकार भाग 3 - प रि व र्त न

    […] भाग १ व भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक […]

Comments are closed.